“उरलेली भजनं वर जाऊन म्हण” असं म्हणत दाऊद गँगने गुलशन कुमारला गोळ्या घातल्या होत्या

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


अत्यंत श्रवणीय अशा भक्तीगीतांची निर्मिती करणाऱ्या आणि असंख्य श्रोत्यांच्या मनावर आपल्या संगीताची छाप सोडणाऱ्या ‘गुलशन कुमार’ या दिवंगत संगीतकाराशी आपण सर्व परिचित आहोतच. अनेकांना त्यांचे नाव माहिती नाही पण त्यांनी त्यांची भक्तिगीते नक्कीच कधी न कधी ऐकलेली असतील. आज जी हनुमान चालिसा सगळीकडे ऐकली जाते, ती स्वरबद्ध करण्याचे काम हे गुलशन कुमारांनीच केले होते.

‘टी सिरीज’ या भारतातील एका नामांकित म्युझिक कंपनीची स्थापना त्यांनी केली होती. कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या टोळीने त्यांची भर दिवसा १९९७ साली हत्या केली होती. याच हत्येच्या कटाची माहिती काही दिवसांपूर्वीच मुंबई पोलिसांना मिळाल्याचा खळबळजनक दावा निवृत्त पोलीस अधिकारी राकेश मारिया यांनी आपल्या ‘लेट मी से इट नाउ’ या पुस्तकात केल्यामुळे सर्वत्र हे प्रकरण पुन्हा चर्चेत आलं असून ‘गुलशन कुमार’ यांच्या आठवणींना उजाळा मिळाला आहे.

कॅसेट किंग म्हणून भारतात एकेकाळी प्रसिद्ध असलेल्या गुलशन कुमार यांचा जीवनप्रवास असंख्य अडचणींनी भरला होता. सुरुवातीच्या काळात गुलशन कुमार यांचा संगीताशी काहीच संबंध नव्हता.

ते दिल्लीच्या दरियागंज भागात आपल्या वडिलांसोबत ज्यूस सेंटर चालवायचे, परंतु कालांतराने त्यांच्या नशिबाने अशी पलटी खाल्ली की ते भारताचे कॅसेट किंग बनले.

८० च्या दशकात त्यांनी टी सिरीजची स्थापना केली आणि ९० च्या दशकात ते ‘कॅसेट किंग’ या नावाने प्रसिद्ध झाले. काही काळातच त्यांची ‘टी सिरीज’ कोट्यवधीची उलाढाल करणारी कंपनी बनली.

गुलशन कुमार हे फक्त भावगीतांची निमिर्ती करायचे नाही तर ते एक मोठे वैष्णोदेवीचे भक्त देखील होते. त्यांनी वैष्णोदेवीच्या भक्तांच्या सुविधेसाठी अनेक प्रकल्प हाती घेतले होते. ते रोज अंधेरीच्या जितेश्वर मंदिरात पूजनासाठी जायचे.

१२ ऑगस्ट १९९७ च्या दिवशी ते असेच जितेश्वर मंदिरात पूजनासाठी गेले होते. मंदिरात जाण्याच्या काही वेळ अगोदर त्यांनी एका निर्मात्याला फोन केला होता, त्यावेळी ते म्हणाले की एका सिंगर आणि मित्राची भेट घेतल्यावर ते पुन्हा मंदिरात परत जाणार आहेत. त्यानंतरची वेळ त्यांनी त्या निर्मात्याचा भेटीसाठी आरक्षित केली होती.

गुलशन कुमार यांचा हा फोन कॉल त्यांचा शेवटचा होता. या फोन कॉलच्या तीन तासानंतर बातमी आली की त्यांची दिवसा ढवळ्या जितेश्वर मंदिराच्या समोरच त्यांची हत्या करण्यात आली होती. ही बातमी पसरताच बॉलिवूडमध्ये खळबळ माजली होती.

गुलशन कुमारांवर झाडण्यात आल्या होत्या १६ गोळ्या

कॅसेट किंग गुलशन कुमाराना १६ गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. मंदीरातील पूजा संपवून ते साडे दहा वाजेच्या आसपास ते मंदिराच्या आवारातून बाहेर आले आणि तेव्हाच त्यांचा पाठीवर कोणीतरी बंदूक ठेवल्याचे जाणवले.

त्यांना एक व्यक्ती म्हणाला ‘ खूप झाली पूजा अर्चना, आता देवाघरी जाऊन कर’ यानंतर त्या व्यक्तीने गुलशन कुमार काही बोलणार याच्या आतच त्यांना १६ गोळ्या झाडल्या.

गुलशन कुमारांच्या पाठीवर आणि मानेवर सोळा गोळ्या होत्या, अशा परिस्थितीतही ते आसपासच्या लोकांकडे मदत मागत होते. त्यांच्या ड्रायव्हरने त्यांचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न केले, हत्याऱ्यांवर कलश मारून फेकला पण त्याचा उपयोग झाला नाही. गोळीबार सुरूच होता. एक गोळी ड्रायव्हरच्या पायाला लागली, ज्यात तो जखमी झाला आणि गुलशन कुमार गतप्राण झाले.

राकेश मारिया यांच्या पुस्तकात करण्यात आलेला खळबळजनक दावा

राकेश मारिया आपल्या पुस्तकात लिहितात की ‘गुलशन कुमार यांच्या हत्येचा कट रचला जात असल्याची माहिती त्यांना २२ एप्रिल १९९७ला त्यांच्या खबऱ्याकडून मिळाली होती. त्यानुसार मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रॅंचने त्यांना सुरक्षा देखील पुरवली होती.

परंतु काही दिवसांनी उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना ‘कमांडो’ लेव्हल सिक्युरिटी दिल्यामुळे मुंबई पोलिसांनी आपली सिक्युरिटी काढून घेतली होती. ज्या दिवशी गुलशन कुमारांची हत्या झाली त्यावेळी त्यांचा बॉडीगार्ड आजारी पडला होता व त्याने सुट्टी घेतली होती, याचाच फायदा हत्याऱ्यांनी उचलला होता.

दाऊद इब्राहिम टोळीने केली होती हत्या

गुलशन कुमार यांच्या हत्येत कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम आणि अबू सालेम यांचा हात होता. हत्येच्या काही दिवस अगोदर दाऊद गॅंगने गुलशन कुमारांकडे १० कोटींची खंडणी मागितली होती.

गुलशन कुमारांनी यासाठी नकार दिला होता. ते म्हणाले होते तुम्हाला देण्यापेक्ष्या हे पैसे आम्ही वैष्णोदेवीच्या चरणी अर्पण करू!

यामुळेच गुलशन कुमारांची हत्या करण्यात आली होती. अबू सालेमच्या सांगण्यावरून दोन शार्प शूटर्स दाऊद मर्चंट आणि विनोद जगताप यांनी गुलशन कुमार यांची हत्या केली.

९ जानेवारी २००१ साली विनोद जगताप याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली, पुढे त्याचा हस्तक दाऊद मर्चंट याला देखील अटक करण्यात आली. आज दोघेही जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत.

गुलशन कुमार यांच्या हत्येची अजून एक थियरी

मुंबई पोलिसांनी या प्रकरणाच्या प्राथमिक तपासानंतर गुलशन कुमार यांच्या हत्येसाठी संगीतकार नदीम सैफी यांनी दाऊद गॅंगला सुपारी दिल्याचे म्हटले होते.

गुलशन कुमार आणि नदीम सैफी यांच्यात अनेक वर्षे शत्रुत्व होते. ज्यावेळी गुलशन कुमार यांची हत्या करण्यात आली त्यावेळी नदीम सैफी लंडनला होते. ज्यावेळी या प्रकारणात त्यांचे नाव असल्याची खबर त्यांना मिळाली, ते लंडनमध्येच राहिले. पुढे त्यांच्या विरोधात मुंबई पोलिसांना पुरावे मिळाले नाही आणि त्यांच्या वरील संशय दूर झाला.

आज गुलशन कुमार यांना जाऊन वीस वर्षांपेक्ष्या जास्त काळ उलटला, पण अजूनही त्यांच्या गीतांची मोहिनी आणि त्यांच्या खुनाच्या चर्चा तशाच सुरु आहेत..


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!