या भारतीय हॉकीपटूचा “सर्वात खतरनाक पेनल्टी कॉर्नर स्पेशालिस्ट” असा दबदबा होता

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब 


क्रिकेटमध्ये इतिहास रचणारे खेळाडू प्रसिद्ध असतात. त्यांची नावं सामान्य लोकांच्या तोंडात सहजपणे रुळलेली असतात. क्रिकेट खेळाडूंना मिळणारी अमाप प्रसिद्धी मात्र इतर खेळातील खेळाडूंच्या वाट्याला क्वचितच येते. अनेक खेळ प्रकारांत भारताचं नाव उज्वल करणारे कित्येक खेळाडू होऊन गेले असतील. पण, त्यांच्याबद्दल सामान्य लोकांमध्ये उदासीनता पाहायला मिळते.

असेच एक म्हणजे, पृथिपाल सिंग.

पृथिपाल सिंग हे भारताचे एकेकाळचे गाजलेले हॉकीपटू. हॉकीतील पेनाल्टी कॉर्नर स्पेशालिस्ट आणि किंग ऑफ शॉर्ट कॉर्नर अशी त्यांची ख्याती होती.

१९६४ साली टोकियो ऑलिम्पिकमध्ये तर त्यांनी इतिहासच रचला होता. या सामन्यात भारताने २२ गोल केले होते. यापैकी ११ गोल पृथिपाल सिंग यांचे एकट्याचे होते.

या ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्णपदक मिळाले होते. भारतात आजवर अनेक मोठमोठे हॉकी खेळाडू होऊन गेले. भारताला ऑलिम्पिकमध्ये सलग तीन पदक पटकावून देणारे पृथिपाल सिंग हे अशा दिग्गज खेळाडूच्या यादीतील एक मोठे नाव आहे.

नानकाना साहिब शहरात २८ जानेवारी, १९३२ रोजी पृथिपाल सिंग यांचा जन्म झाला. आज हे शहर पाकिस्तानमध्ये आहे. फाळणीमुळे या कुटुंबाला सीमा ओलांडून भारतातील पंजाब येथे वास्तव्यास येणे भाग पडले. पृथिपाल सिंग यांचे वडील सरदार वाधवा सिंग चंडी हे शिक्षक आणि शेतकरी होते. फाळणीच्या अनुभवांनी पृथिपाल सिंगच्या मनावर ओढले गेलेले ओरखडे त्याच्या कायम पिच्छा करत राहिले.

पृथिपाल अत्यंत शिस्तबद्ध, सद्वर्तनी आणि श्रद्धाळू होते. पाकिस्तान विरोधात मॅच खेळताना ते अशा त्वेषाने खेळत जणू त्यांचे हरवलेले दिवस त्यांना परत मिळवायचे आहेत. खेळासोबतच त्यांना अभ्यासात देखील गती होती. त्यांच्या कॉलेजने त्यांना रोल ऑफ ओनर्स हा पुरस्कार देऊन गौरवले होते. लुधियानाच्या पंजाब अग्रीकल्चर कॉलेजमधून त्यांनी एमएससी पूर्ण केले.

१९५० ते ५६ या काळात ते त्यांच्या कॉलेजसाठी खेळत होते. शेवटच्या वर्षात त्यांनी कॉलेजच्या संघाचे नेतृत्व देखील केले. १९५६ साली पदवी पूर्ण झाल्यानंतर ते पंजाब पोलिसात इन्स्पेक्टरच्या हुद्द्यावर रुजू झाले. तिथे ते पोलिसांच्या संघासाठी खेळत होते. दोन वर्षांनी ते राष्ट्रीय संघात निवडले गेले. या संघासोबत ते देशोदेशीच्या मॅचेसमध्ये सहभागी होत असत. 

त्यांनी आफ्रिका आणि युरोप खंडातील बहुतांश देशांचे दौरे केले. त्यांची सातत्यपूर्ण, दमदार कामगिरी बघून १९६० सालच्या रोममध्ये पार पडलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठीच्या संघातही त्यांची निवड करण्यात आली. डेन्मार्क आणि नेदरलँड्स विरुद्ध त्यांनी दोन हॅटट्रिक खेळल्या. या स्पर्धेत ते टॉप स्कोअरर आणि बेस्ट फुल्ल बॅक खेळाडू ठरले.

परंतु, पाकिस्तानसोबत झालेल्या फायनल मॅचमध्ये भारतीय संघ हरला.

त्याच्या पुढील वर्षी त्यांना क्रीडा क्षेत्रातील मनाचा अर्जुन पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. हा पुरस्कार पटकावणारे ते भारताचे पहिले हॉकी खेळाडू होते. हा सन्मान त्यांना भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते मिळाला होता.

१९६२ साली इंडोनेशिया येथे पार पडलेल्या आशियन गेम्समध्ये त्यांनी रौप्यपदक पटकावले. १९६३ साली त्यांनी पंजाब पोलीसमधून राजीनामा दिला आणि ते भारतीय रेल्वे पोलिसात भारती झाले. तिथेही भारतीय रेल्वे पोलीस संघाच्या वतीने खेळू लागले. भारतीय हॉकी फेडरेशनमधील विखारी राजकारणामुळे त्यांना पुढच्या वर्षी संघातून बाहेर ठेवण्यात आले.

पत्रकारांनी याविरोधात आवाज उठवला, “पंजाब पोलीसातून राजीनामा दिल्यानंतर पृथिपाल यांची कामगिरी खरेच इतकी खालावली होती, का जेणेकरून त्यांना थेट संघातून बाहेर ठेवण्यात आले?” असे प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केले.

अर्थात, याबाबत भरपूर वाद-प्रतिवाद झाले. तरीही ते भारतीय रेल्वे पोलिसांच्या वतीने खेळत राहिले आणि सामने जिंकत राहिले. १९६४च्या टोकियो ऑलिम्पिकसाठी पाठवण्यात आलेल्या संघात त्यांची निवड करण्याशिवाय काहीही पर्याय नव्हता. याच स्पर्धेदरम्यान पृथिपाल यांची संस्मरणीय कामगिरी पाहायला मिळाली.

या स्पर्धेत त्यांनी २२ पैकी ११ गोल केले होते. याच स्पर्धेतील कामगिरीसाठी ते कायम स्मरणात राहतील. याच सामन्यावेळी पृथिपाल सिंग म्हणजे जणू जिब्राल्टरचा खडक असल्याची उपाधी कमेंटेटर मेलविल डी मेलो यांनी दिली. दोन वर्षानंतर बँगकॉक येथे झालेल्या आशियाई गेम्समध्ये सुवर्ण पदक मिळवलेल्या संघातही त्यांचा समावेश होता.

काही समालोचकांच्या मते, पृथिपाल यांना १९६४च्या ऑलिम्पिक नंतर संघातून कायमचा नारळ देण्याचा विचार करत होते. पण, त्याच्या इतका पट्टीचा खेळाडू कोणी नसल्याने हे होऊ शकले नाही.

भारतीय रेल्वे पोलीसमध्ये बढती न मिळाल्याने राजीनामा देऊन १९६८ साली ते उत्तर रेल्वेमध्ये रुजू झाले. त्यावर्षीच्या मेक्सिको येथे भरलेल्या ऑलिम्पिकमध्ये अनेक वादविवाद झाले. निवड करणाऱ्या अधिकाऱ्यांनी दोन कर्णधार निवडले होते. एक पृथिपाल आणि दुसरे गुरबक्ष सिंग.

आजपर्यंत एकाच संघासाठी दोन कर्णधार निवडण्यात आल्याची ही पहिलीच वेळ होती. प्रिथीपाल आणि गुरुबक्ष यांच्यात कुरबुरी सुरु झाल्या.

गुरुबक्षने पृथिपालच्याविरोधात ते संघातील वातावरण कलुषित करत असल्याचा आरोप केला. परंतु, इतके अडथळे असूनही संघाने या स्पर्धेत कास्य पदक पटकावले. यावर्षीच पृथिपाल यांनीही खेळातून निवृत्ती स्वीकारली.

२० मे १९८३ रोजी त्यांच्याच विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या दोन गटात दिवसाढवळ्या गनवॉर सुरु असताना पृथिपाल दोन्ही गटाच्या मधेच सापडल्याने त्यांना गोळी लागली. यातच त्यांचे निधन झाले. याआधी अशाच गनवॉरमध्ये सहा जणांच्या मृत्यू झाला होता, त्यामुळे पृथिपाल यांची हत्या कुणालाही असाधारण किंवा असामान्य घटना वाटली नाही. पृथिपाल यांच्या हत्येने हॉकी विश्वाला धक्का बसला. या घटनेला कित्येक वर्षे लोटली तरीही या केसचा तपास लागला नाही.

ऑक्टोबर २०१५ला त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट प्रदर्शित झाला. तोपर्यंत लोकांच्या मनपटलावरून त्यांचे नाव पुसले गेले होते.

त्यांच्या जीवनाबाबत कितीही वादविवाद असले तरी, ते एक श्रेष्ठ हॉकीपटू होते. भारतीय जनतेला या खेळाडूचा विसर पडता कामा नये. त्यांनी अनेक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले आणि भारताच्या लौकिकात भर घातली आहे. इतर खेळातून खेळाडूंना आपण जो आदर-सन्मान देतो तोच आदर आपण पृथिपाल यांनाही दिला पाहिजे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!