विश्वास बसणार नाही पण भारताची सिलिकॉन व्हॅली पूर्वी अंडरवर्ल्डचं मुख्य केंद्र होतं

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


भारतात माफिया राज काही नविन गोष्ट नाही. राजकीय आश्रय लाभलेल्या कित्येक माफियांनी भारतात आपला दबदबा निर्माण केल्याचे दाखले आपल्या इतिहासात आहेत. अवैध दारु विक्री, खून करणे, दंगे घडवून आणणे या आणि अशा असंख्य अवैध कामातुन पैसे कमवणारे हे माफिया अतिशय वैभवशाली जीवन जगत असतात. राजकीय तसेच सामाजिक स्तरावर सुद्धा त्यांचा मोठ्या प्रमाणात दबदबा निर्माण झालेला असतो.

असाच एक माफिया राज होता आत्ता माहिती तंत्रज्ञानाची भारतीय राजधानी असलेल्या बंगलोर शहरात. भारताची सिलीकॉन व्हॅली म्हणून ओळखले जाणारे हे शहर एके काळी भारतातील सगळ्यात मोठ्या अंडरवर्ल्डचे केंद्र होते. या अंडरवर्ल्डचा म्होरक्या होता- डॉन मुथप्पा राय.

बंगलोर शहरापासून काही किलोमीटर अंतरावर एक मोठं घर. घर कसलं महालच. अत्याधुनिक शस्त्रे, वॉकी टॉकीजसह सुसज्ज डझनभर अंगरक्षक. महालाच्या परिसरात विद्युत वाहने आणि डझनभर महागड्या लक्झरी कार पार्किंगमध्ये उभ्या असायच्या. या महालात बरेच लोक यायचे पण केवळ काही निवडक लोकांनाच अंडरवर्ल्डच्या गॉडफादरला भेटण्यासाठी परवानगी होती. थोडक्यात, गॉडफादरसाठी फायदेशीर सौदा होईल अशाच लोकांना त्याला भेटता येत असे.

मे २०२० मध्ये कर्करोगामुळे अखेरचा श्वास घेणार्‍या माफिया डॉन मुथप्पा राय (मुथप्पा राय) याने बंगलोरच्या अंडरवर्ल्डवर तीस वर्षांहून अधिक काळ राज्य केले. 

चांगल्या कौटुंबिक आणि शिक्षणाच्या चांगल्या पार्श्वभूमीवरही मुथप्पा माफिया डॉन कसा बनला..? मग त्याने आपले काळे धंदे पांढरे कसे केले? बंगलोरच्या अंडरवर्ल्डचा प्रसार मुथप्पापर्यंत येऊन कसा थांबला हे जाणून घेणे देखील मनोरंजक आहे.

‘कोडिगेहाली मुनी गौडा’ हा ७०च्या दशकातील पहिला गँग्सटर होता. बंगलोरच्या दारूचे कंत्राट आणि व्यावसायिकांकडून आठवडाभर वसुली करत मुनी गौडा शहरात अंडरवर्ल्ड आणणारा पहिला गुंड होता. परंतु, त्याच्यामागे कोणतीही राजकीय शक्ती नव्हती किंवा इतर शहरे किंवा राज्यांच्या अंडरवर्ल्डशी त्याचे काहीही संबंध नव्हते. मुनीनंतर जयराज आणि कोतवाल शहरातील अंडरवर्ल्डमध्ये दाखल झाले होते.

मुनी याला फार तर गँग्सटर म्हणता येईल, परंतु बंगलोरचा पहिला खरा अंडरवर्ल्ड डॉन म्हणून जर कोणी ओळखल्या जायचा तर तो एमपी जयराज.

१९७० च्या दशकात तो या काळ्या धंद्यात आला. मुनी नंतर त्यालाच लोक डॉन म्हणून ओळखू लागले होते. राजकीय संपर्क आणि सत्ता जयराजची मोठी ताकद बनली आणि त्याने अंडरवर्ल्डला आपली शक्ती आणि पोहोच दाखवून दिली. परंतु कोर्टात गोळीबार झाल्यामुळे त्याला त्याची शिक्षा म्हणुन दहा वर्षे तुरूंगात जावे लागले आणि संधीचा फायदा घेत रामचंद्र कोतवाल याने स्वत: ला डॉन म्हणवून घ्यायला सुरुवात केली.

दहा वर्षानंतर, जयराज तुरूंगातून बाहेर आला तेव्हा त्याने पाहिले की कोतवालची भीती व प्रभाव बराच वाढला होता. तो तत्कालीन मुख्यमंत्री हेगडे यांना धमकावतही होता. अशा परिस्थितीत जयराजला पुन्हा आपला प्रभाव प्रस्थापित करायचा होता. तो तुरुंगात असतानाही राजकारण्यांसाठी काम करत होता. त्यावेळी जयराजने षडयंत्र रचून कोतवालचा खात्मा करण्यासाठी अग्नि श्रीधर, बच्चन आणि वरदराज नायक यासारख्या नविन गुन्हेगारांचा वापर केला आणि मग आपले वर्चस्व प्रस्थापित केले.

जयराजने कोतवालला आपल्या वर्चस्वासाठी मारून टाकले, तर इकडे मुथप्पाने मुंबई अंडरवर्ल्ड आणि डी कंपनीच्या मदतीने संपूर्ण कट रचला आणि जयराजला संपवण्याचे ठरवले. यानंतर मुथप्पाने स्वत:ला बंगलोरच्या अंडरवर्ल्डचा डॉन घोषित केले आणि अनेक दशकं इथं राज्य केले.

हा मुथप्पा कोण होता आणि तो अचानक अंडरवर्ल्ड डॉन कसा बनला? हे जाणुन घेणे खुप मनोरंजक आहे.

वाणिज्य पदवी घेतल्यानंतर मुथप्पाने विजया बँकेत अधिकारी म्हणून काम केले. पण १९८०च्या उत्तरार्धात मुथप्पा बंगलोरच्या अंडरवर्ल्डमधील काही लोकांच्या संपर्कात आला. त्यांच्यासाठी आधी त्याने काही काम केले होते. अंडरवर्ल्डमध्ये पोहोचण्यासाठी मुथप्पाला एक मोठा कट रचण्याची संधी होती आणि ती म्हणजे जयराजची हत्या. जयराजच्या हत्येचा कट यशस्वी झाला त्यानंतर मुथप्पाने मागे वळून पाहिले नाही.

जयराजच्या हत्येचा कट अगदी विचार करुन बनवला गेला होता. जयराजला नियमित पोलिस ठाण्यात हजेरी लावावी लागत असे. २१ नोव्हेंबर, १९८९ रोजी सकाळी जयराज व त्याचा वकील वरदमान्य आणि भाऊ उमेश हे त्याच्या अ‍ॅम्बेसेडर कारमधून पोलिस स्टेशनला जात असताना लालबागच्या मागच्या गेटवर असलेल्या फियाटने अ‍ॅम्बेसेडरचा मार्ग अडविला. जयराजच्या कारच्या दोन बाजूस मोटारसायकली थांबल्या आणि दुसर्‍याच क्षणी काही हल्लेखोर एका वर्तुळात उभे राहिले आणि त्यांनी अ‍ॅम्बेसेडर कारवर गोळीबार केला.

सगळी नीट तयारी करायला मुथप्पा तेथे हजर होता आणि गोळीबार करतानाही तो बंदुक हातात घेऊन सगळ्यात पुढे उभा होता. जखमी वकीलाचा मृतदेह ढाल म्हणुन वापरत जयराजने स्वत: चा बचाव करण्याचा प्रयत्न केला. गाडीत असलेले काही बॉम्ब हल्लेखोरांवर फेकूनही जयराज यावेळी वाचला नाही.

गोळ्यांचा भडीमार जयराजच्या शरीरावर होत राहिला. जयराजचा मृतदेह पाहिल्यानंतर हल्लेखोर पळून गेले. दिवसाढवळ्या, उघडपणे झालेल्या या हत्याकांडाने मुथप्पाचे वर्चस्व वाढतच गेले. आता मुथप्पा अंडरवर्ल्डचा बादशहा बनला होता!

९०च्या दशकाच्या सुरूवातीपासूनच अर्थव्यवस्थेचा एक नवीन टप्पा सुरू झाला आणि उदारीकरणामुळे परदेशी गुंतवणूकीचा मार्ग मोकळा झाला. याचा परिणाम असा झाला की पुढील काही वर्षांतच बंगलोर जमीन विक्रेत्यांचं अंडरवर्ल्ड म्हणुन प्रसिद्ध झाले. मुथप्पा हा सर्वात मोठा जमीन विक्रेता होता. यावेळी, मुथप्पाने दाऊद इब्राहिमचा उजवा हात समजल्या जाणार्‍या शरद शेट्टी याच्याशी संपर्क साधला. शेट्टी दुबईहून क्रिकेट मॅचचं फिक्सिंग आणि सट्टेबाजी हाताळत असे. शेट्टीने दुबईतील मुथप्पाला आश्रय दिला आणि आखाती देशांमधील संपर्क आणि व्यवसायात मदत केली.

२१ व्या शतकाच्या सुरूवातीस, शेट्टीची दुबईमध्ये हत्या झाली आणि मुथप्पा आखाती देशात गेला. असे म्हणतात की मुथप्पाचा या हत्येमागे हात होता. त्यानंतर काही प्रकरणात दोषी सिद्ध झालेल्या मुथप्पाला युएईहून देशात आणण्यात भारताला यश आले आणि मुथप्पा काही महिने तुरूंगात पडून राहिला आणि अर्थातच काही काळातच त्याला सर्व खटल्यांतुन मुक्त करण्यात आले. आता आपली प्रतिमा पुन्हा तयार करण्याचे प्रयत्न मुथप्पाने सुरू केले.

मुंबई बॉम्बस्फोटानंतर अंडरवर्ल्ड आणि दहशतवाद एकमेकांना जोडले गेले होते. पोलिस प्रशासन देशभर कडक धोरण अवलंबत होते. या काळात बंगलोरच्या अंडरवर्ल्डने आपले रुप पालटण्याचा विचार केला. एकीकडे मुथप्पा हा जमीन माफिया बनला परंतु उघडपणे नव्हे तर एक व्यावसायिक म्हणून. अशी प्रतिमा निर्माण करण्याच्या हेतुने जयराजने तर ‘गरीबी हटाओ’ नावाचे वृत्तपत्र काढले होते. मुथप्पानेही तसंच काही करायचे ठरवले आणि ‘जय कर्नाटक’ ही संस्था सुरू केली. ज्यामार्फत गरिबांनाही मदत मिळाली. थोडक्यात मुथप्पाला गॉडफादर आणि रॉबिनहुड बनण्याची इच्छा होती.

दुसरीकडे, मुथप्पा आणि त्याच्यावर हल्ला करणारा, त्याचा कट्टर शत्रू श्रीधरही आपला चेहरा पालटत होता. श्रीधर याने कन्नड वृत्तपत्र ‘अग्नि’ सुरू केले आणि त्याला अग्नि श्रीधर म्हटले जाऊ लागले.  चित्रपटांच्या धंद्यातही गुंतलेल्या श्रीधर याने ‘माय डेज इन अंडरवर्ल्ड’ हे पुस्तक लिहिले.

 बंगलोरमधील माफिया राज संपण्यापूर्वी शेवटचा अंडरवर्ल्ड डॉन मुथप्पा राय हाच होता.

‘अब्जाधीश’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या मुथप्पाने बंगलोर शहराला लागूनच असलेल्या परिसरामध्ये स्वतःची पत्नी व दोन मुले यांच्यासाठी विपुल संपत्ती जमवून ठेवली आहे. उदारीकरणापासून बंगलोर केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात ‘आयटी शहर’ म्हणून उदयास आले. जगभरातील कंपन्यांसाठी, जमिनीच्या सौद्यांमध्ये शहरातील माफिया एकजुट झाले, त्यातही मुथप्पाच म्होरक्या होता.

जेव्हा एखादी परदेशी कंपनी व्यवसायासाठी बंगलोरमध्ये येत असे तेव्हा कोणावर विश्वास ठेवावा याबद्दल शंका येत असे. अशा परिस्थितीत मुथप्पाचे लोक जाऊन कंपनीला आश्वासन देत असत. ज्या सौद्यामध्ये मुथप्पा रायचे नाव जोडले गेले आहे, त्यात शंभर टक्के हमी आहे, सुरक्षा आहे, कोणतीही फसवणूक नाही, धोका नाही असे त्या कंपनीला सांगितले जात असे. मुथप्पाच्या महालात दररोज १५० लोक तरी तक्रारी घेऊन येत असत असे म्हटले जाते.

‘मी भारत आणि विशेषतः बंगलोरच्या विकासासाठी बरेच काम केले आहे.’ असे मुथप्पा सतत बजावत राहिला. जरी मुथप्पाने बंगलोरमधे आयटी क्षेत्राच्या वाढीबाबत आणि परदेशी कंपन्यांच्या गुंतवणूकी बाबत चांगले काम केल्याचा दावा केला असला तरी जागतिक बँकेकडून किंवा इतर सर्वेक्षणातून पोलिस व प्रशासनाच्या अनेक संस्था वेळोवेळी असे सांगतात की मुथप्पाच्या काळात बंगलोर शहर जमिनी संपत्तीच्या बाबतीत जगातील ५ व्या क्रमांकाचे भ्रष्ट शहर होते. हा आरोप मृत्यूनंतरही मुथप्पाच्या डोक्यावर कायम राहील.

काहींसाठी गुंड तर काहींसाठी रॉबिनहुड असलेला मुथप्पा आजही एक मोठी हस्ती म्हणुन बंगलोर शहरात ओळखला जातो. त्याचा तो मोठा महाल कोणे एके काळी बंगलोरमध्ये असलेल्या अंडरवर्ल्डच्या वर्चस्वाची आठवण करून देतो.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!