बॉक्स ऑफिसवर चित्रपट चालणार की नाही हे फिल्मइंडियाच्या परीक्षणावरुन ठरायचं

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


भारतीय सिनेसृष्टीची सुरुवात दादासाहेब फाळके या अवलिया माणसाने केली, या सिनेसृष्टीचा विकास हा कालानुरूप होत गेला आणि तिच्यात अनेक बदल होत गेले. भारतीय सिनेसृष्टीला आणि चित्रपटात भूमिका करणाऱ्या कलाकारांना एक वेगळाच ग्लॅमर येत होता, लोकांच्या मनात सिने कलाकारांविषयी कुतूहल निर्माण झाले होते.

लोकांचे हे सिनेसृष्टी विषयी असलेले कुतूहल लक्षात घेऊन बाबुराव पटेल यांनी फिल्मइंडिया नावाच्या मासिकाची सुरुवात केली. या मासिकाची सुरुवात भारतातील सिनेजर्नालिझमची देखील सुरुवात मानली जाते.

१९३५ साली सुरु करण्यात आलेले फिल्मइंडिया हे बॉलिवूडच्या एका सुवर्ण काळाचे साक्षीदार राहिले आहे. फिल्मइंडिया लोकप्रिय झाले ते त्याच्या चित्रपटविषयक माहितीमुळे आणि त्या माहितीला प्रस्तुत करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या धारदार भाषेमुळे!

फिल्मइंडियामध्ये अनेक चित्रपटांचे परीक्षण छापून यायचे. या परीक्षणांमध्ये सिनेमावर बऱ्याचदा फार जहरी टीका केलेली असायची. देवानंदच्या एका चित्रपटाच्या रिव्ह्यूमध्ये तर ‘तुमच्याकडे वाया घालवण्या इतपत पैसा असेल तर हा चित्रपट हा चित्रपट बघायला जाल’ अशा शब्दात जहरी टीका करण्यात आली होती.

माला सिन्हा या अभिनेत्रीला तर फुगलेला बटाटा अशी उपमा फिल्मइंडियामध्ये देण्यात आली होती. जी पी सिप्पी या निर्मात्याला मुंबईचा कचरा निर्माता आणि सुप्रिया नावाच्या अभिनेत्रीला ‘कुरूप’ म्हणणाऱ्या या फिल्म इंडियाने भोवती असंख्य भांडणांचे जाळे विणले होते.

परंतु फिल्मइंडिया फक्त या आपल्या वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध नव्हते. फिल्मइंडियाचा आकर्षक आऊटलूक आणि त्यात छापून येणारे चित्रपटांचे पोस्टर्स यामुळे लोकांच्या मनात या सिने मॅगझीनचे आकर्षण कायम होते.

फिल्मइंडियामध्ये अजूनही आकर्षक बाब होती वाचकांच्या प्रतिक्रियेचा कॉलम, यावर तब्बल ५ पाने फिल्म डिया खर्च करत होता. फिल्मइंडियात छापून येणाऱ्या प्रतिक्रिया कलाकार देखील वाचत होते.

फिल्म इंडियाच्या अपार सफलतेत निर्विवाद वाटा होता तो बाबुराव पटेल यांचा.

त्यांनी ज्यावेळी हे मासिक सुरु केले त्यावेळी भारतात ब्रिटिश राजवट होती. या राजवटीत सर्वत्र ब्रिटिश विऱोदही वातावरण होते. ब्रिटिश लोकांच्या मनातील भारतीयांचा द्वेष जसाच्या तसा होता. अनेक ब्रिटिश चित्रपटात भारतीयांचे फार चुकीचे प्रदर्शन केले जात होते, याचा बाबुराव पटेलांना फार राग येत असे यातूनच त्यांनी ब्रिटिश चित्रपटांच्या विरोधात फिल्मइंडियात लेखन करण्यास सुरुवात केली.

डेक्कन क्रॉनिकलच्या अहमद ख्वाजा आणि पटेलांनी ड्रम आणि गुंगा दिनसारख्या चित्रपटांच्या विरोधात रान उठवले होते. त्यांना ब्रिटिशांची बाजू घेणाऱ्या भारतीय चित्रपटांचा प्रचंड तिटकारा होता.

बाबुराव पटेलांनी फिल्मइंडियाच्या माध्यमातून सिनेसृष्टीवर ज्या तोफा डागल्या होत्या, त्यावर असंख्य प्रतिक्रिया यायच्या. अनेक लोक बाबुराव पटेलांना विषारी मनुष्य मानायचे, बॉलिवूडच्या अभिनेते-अभिनेत्रींनी तर बऱ्याचदा त्यांची उघड निंदा केली होती.

अनेकांनी तर बाबुराव पटेलांना सनकि म्हटले होते तर अनेकांनी त्यांचा पत्रकारितेच्या पद्धतीवर आणि सनसनाटी दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. पण बाबुराव पटेल कोणालाच जुमानत नव्हते. कोणी कितीही बोल लावले तरी त्यांनी आपले काम काही थांबवले नाही.

बाबुराव पटेलांनी सिनेसृष्टी बरोबरच राजकारणात देखील आपले नशीब आजमावून बघितले होते. बाबुराव पटेल हे आधीपासूनच काँग्रेसच्या राजकारणाचे निंदक होते.

ते नेहमी म्हणायचे जर भारताला स्वातंत्र्य मिळाले तर तिथे नेहरूंची मनमानी असेल. पटेलांचे टोमणे असतील, गांधींच्या प्रार्थना असतील आणि सरोजिनी नायडूंचा मेलोड्रामा असेल. 

देश स्वातंत्र्य झाल्यावर देखील बाबुराव पटेलांनी राजकारणाकडे पाठ फिरवली नाही, ते पुढे जनसंघाच्या तिकिटावर विधानसभेसाठी उभे राहिले. १९५७ मध्ये त्यांचा पराभव झाला पण १९६७ मध्ये ते निवडून आले.

बाबुराव पटेलांची कारकीर्द ही वादग्रस्तच राहिली. या वादग्रस्त कारकिर्दीत त्यांनी अनेक गोष्टी केल्या.

१९८२ साली त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीने फिल्मइंडियाची धुरा सांभाळली आणि त्या माध्यमातून त्यांनी बाबुराव पटेलांची हा ठेवा १९८५ पर्यंत जपला. या मासिकाच्या ५० व्या वर्धापन दिनी या मासिकाचे काम थांबवण्यात आले. पण या ५० वर्षात या मासिकाने चित्रपट पत्रकारितेला एका वेगळ्या उंचीवर आणले होते.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!