आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
‘रक्ताचं नातं,’ हा शब्द आपण सतत वापरत असतो. सख्ख्या नात्यातल्या लोकांना आपण रक्ताचे नातेवाईक म्हणून संबोधतो. उदाहरणार्थ आई, वडील, मुलगा, मुलगी, बहीण, भाऊ अगदी चुलत घराण्यातले नातेवाईकही आपण रक्ताचे नातेवाईक मानतो. या रक्ताच्या नात्यांना आपल्याकडे मोठं महत्त्व दिलं जात. मात्र, जगाच्या काही भागात; विशेषतः आदिवासी जमातींच्या टोळ्यांमध्ये रक्ताच्या नात्याची वेगळीच व्याख्या केली जाते. ही नाती जोडली जातात तीही खूपच अनोख्या प्रकारच्या विधी आणि कर्मकांडांतून!
आपण ज्याला रक्ताची नाती म्हणतो त्या अर्थाचं कोणतंही नातं नसलं तरी परस्परांना विश्वास देऊन-घेऊन जुळवलेलं, प्रत्यक्षात रक्ताच्या नात्यांपेक्षाही अधिक उत्कट, अधिक जवळचं, आपल्या भाषेत, जीवाला जीव देणारं नातं म्हणजे रक्ताच्या बंधुत्वाचं! अर्थात, ‘ब्लड ब्रदर्स’ किंवा ब्लड सिस्टर्स!
हे नातं जसं खऱ्या रक्ताच्या नात्यांपेक्षा पुढच्या स्तरावरचं मानलं जातं तसंच ते लग्नासारखे देवाधर्माला साक्षी मानून ‘संस्कार’ म्हणून विधिपूर्वक जोडलेल्या विवाहबंधनासारख्या नात्यापेक्षाही अधिक पवित्र मानलं जातं.
जगाच्या पाठीवरच्या अनेक देशांमध्ये प्रामुख्याने एकोणिसाव्या शतकात या ‘ब्लड ब्रदरहूड’चा बराच बोलबाला होता. हे नातं ‘ब्लड ब्रदर’ किंवा ‘ब्लड सिस्टर म्हणून का ओळखलं जावं? त्याचं कारण ते नातं जोडण्यासाठी केल्या जाणाऱ्या एका कर्मकांडात आहे. हे नातं जोडू इच्छिणारे दोघे जण आपापल्या तळ हातावर कापून छोटीशी जखम करायचे. ‘शेक हँड’ करून आपापल्या तळहाताच्या जखमेवरचं रक्त एकमेकांच्या रक्तात मिसळवून टाकायचे. अशा प्रकारे निर्माण झालं हे ‘रक्ताचं नातं’ किंवा ‘रक्ताचं बंधुत्व!’
स्थळ आणि काळाप्रमाणे यामध्ये थोडेफार फरक केले जायचे. काही प्रदेशांमध्ये किंवा विशिष्ट जमातींमध्ये तळहाताला जखम करण्याऐवजी टोकदार शस्त्राने हाताच्या बोटाच्या वरच्या टोकाला टोचून त्यातून बाहेर येणाऱ्या रक्ताचे काही थेंब खाद्य किंवा पेय पदार्थांमध्ये मिसळायचे आणि एकमेकांचे रक्त घातलेले पदार्थ खायचे किंवा पेय प्यायचे.
काही प्रदेशात, काहीशा सधन वर्गांत किंवा यो*द्ध्यांच्या गटात, अशा प्रकारचं नातं जुळवण्यासाठी तर रीतसर एखाद्या धार्मिक समारंभासारखे, लग्न, मुंजीसारखे समारंभ आयोजित केले जायचे. या समारंभात अनेकांच्या साक्षीने हा रक्तप्राशन करण्याचा कार्यक्रम व्हायचा. अर्थात हा विधी कसा पार पडला त्याला फार महत्त्व नव्हतं.
कशाही पद्धतीने हा विधी पार पडला तरी त्याला अन्य धार्मिक विधींपेक्षाही अधिक महत्त्व होतं. या रक्त बंधुत्वाला न जागणाऱ्यांना ईश्वर स्वतः, किंवा धर्मगुरू, पुजारी यांसारख्या त्याच्या मध्यस्थांमार्फत दंड करतो किंवा इमान न राखल्यामुळे मित्राचं प्राशन केलेलं रक्तच शिक्षा करतं, अशी श्रद्धा त्या काळात प्रचलित होती.
ही प्रथा किंवा रूढी सर्वप्रथम डेन्मार्क, नॉर्वे, स्वीडन या देशांच्या प्रदेशात पूर्वी प्रचलित असलेल्या ‘व्हायकिंग’ संस्कृतीमध्ये प्रचलित असल्याची नोंद इतिहासात आहे. या संस्कृतीत एकमेकांचे रक्त प्राशन करून घट्ट आणि प्रामाणिक मैत्रीची हमी देण्याच्या विधीला ‘रक्ताची शपथ’ (ब्लड ओथ) अशी संज्ञा प्रचलित होती.
जी व्यक्ती आपल्याला सर्वात जवळची आहे आणि जिच्यासाठी आपण प्राणही देऊ शकतो, अशा व्यक्तीलाच रक्ताची शपथ द्यायची पद्धत होती. या विधीला लग्नापेक्षाही अधिक पवित्र मानलं जात होतं. व्हायकिंग संस्कृतीतूनच पर्यटकांद्वारे ही प्रथा पाश्चिमात्त्य राष्ट्रांमध्ये आल्याचं मानलं जातं.
मंगोल वंशीयांमध्येही ही रक्त बंधुत्वाची प्रथा बऱ्याच जुन्या काळापासून रूढ होती. मात्र, त्यांचा विधी काहीसा वेगळा होता. ते तळहातावर जखम न करता हाताच्या कोपराजवळच्या भागावर जखम करून त्यातून येणारं रक्त आपल्या होणाऱ्या रक्ताच्या भावाला पेयात घालून प्यायला द्यायचे आणि त्याचं रक्त आपण प्यायचे. आफ्रिकेतल्या आदिवासी जमातींमध्येही ही प्रथा होती. ते तर एकमेकांचे थेट रक्तच पिऊन टाकायचे.
बार्बरीक टोळ्यांमध्ये खूप पूर्वीपासून ही प्रथा सुरु होती. त्यांच्यामध्ये केवळ वैयक्तिक मैत्रीपुरती ही प्रथा पाळली जात नव्हती तर टोळ्या-टोळ्यांमधले संघर्ष टाळण्यासाठी मुत्सद्देगिरीचं साधन म्हणून तिचा वापर केला जायचा. या प्रथेमुळे कित्येक टोळ्यांमधले संघर्ष टळले. कित्येक टोळ्यांमध्ये नव्या ‘युत्या’ आकाराला आल्या.
एरवी सतत एकमेकांवर कुरघोडी करणाऱ्या तब्बल ७ आदिवासी टोळ्या रक्ताच्या शपथेची देवाण-घेवाण करून एकत्र आल्या. त्यांनी सहमतीने एका टोळीप्रमुखाच्या हातात सगळी सूत्र सोपवली आणि एक आदिवासी राज्य उभं केल्याची नोंदही इतिहासात आहे.
अमेरिका आणि रशिया यांच्यातल्या शीतयु*द्धाच्या काळात जगात मोठी उलथापालथ झाली होती. या दोन महासत्तांच्या संघर्षात अनेक छोटी-मोठी राष्ट्रही भरडून निघत होती. त्यामुळे तो काळ अस्वस्थतेचा होता. बहुसंख्य लोकांना महासत्तांच्या साठमारीत काही रस नव्हता त्यांना देशादेशांमध्ये आणि व्यक्तिगत आयुष्यातही शांतता आणि सौहार्द हवं होतं.
विशेषतः त्या काळातले तरुण विद्यार्थी यासाठी आग्रही होते. त्यांना व्यक्तिगत आणि सामूहिक पातळीवर प्रगाढ मैत्री आणि सौहार्दाची शपथपूर्वक हमी देणाऱ्या या रुढीचं आकर्षण वाटलं नसतं तरच नवल! त्यामुळे पाश्चिमात्त्य देशांमध्ये सन १९५०-६० च्या दशकात या ‘रक्ताच्या शपथे’चं पुनरुत्थान झालं.
हे विद्यार्थी नव्या युगाचे प्रतिनिधी होते, शिक्षित होते. त्यामुळे त्यांनी जखमा करून आपलं रक्त एकमेकांच्या जखमेत मिसळण्याचा काहीसा अघोरीपणा टाळला. केवळ बोटाच्या टोकावर टाचणी टोचून थेंबभर रक्त बाहेर काढायचं आणि त्या बोटाची टोकं एकमेकांच्या बोटाला टेकवायची; एवढी प्रतीकात्मकता त्यांनी शिल्लक ठेवली.
मात्र, सन १९७० पासून या प्रथेला उतरती कळा लागली. लोकांमध्ये; विशेषतः विद्यार्थीवर्गामध्ये आरोग्याविषयी जाणीवजागृती निर्माण होत होती. रक्तामुळे अनेक प्रकारचे संसर्गजन्य रोग पसरण्याची शक्यता आहे; हे पटवून देण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेपासून अनेक सरकारी आणि स्वयंसेवी संस्था, संघटना यांनी जागृतीच्या मोहिमा हाती घेतल्या.
त्यातच सन १९८१ च्या सुमारास ‘एचआयव्ही’ने जगभरात वेगाने आपले हातपाय पसरायला सुरुवात केली. हळूहळू या विषाणूने जगात आपली द*हश*तच निर्माण केली. या पार्श्वभूमीवर ही प्रथा हळूहळू लयाला गेली.
अर्थात, या शपथपूर्वक ‘रक्ताचं नातं’ निर्माण करणाऱ्या प्रथेने मैत्रीची नाती बंधुत्वाच्याही पलीकडे नेऊन ठेवली. रंग, रूप, धर्म, पंथ आणि देशोदेशींच्या सीमांनी आपल्याला वेगळं केलं असलं तरी एकाच रंगाच्या रक्तानी आपल्याला एकत्र गुंफलं आहे, ही एकोप्याची भावना वाढीला लावली. अनेक संघर्षांना लगाम घातला. शांतता आणि सौहार्द हाच समृद्ध जग घडवण्याचा एकमेव मार्ग आहे, याची जाणीव निर्माण केली हेच वास्तव आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.