आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
तुम्ही ज्यूरासिक पार्क ही मुव्ही पाहिलेली आहे का.? या पृथ्वीतलावरून कैक वर्षांपूर्वी नामशेष झालेले डायनोसॉर या मुव्हीमध्ये “जीन-एडीटिंग” तंत्रज्ञानाच्या माध्यमातून परत आले होते. मित्रांनो, आता ही संकल्पना केवळ चित्रपटातच नव्हे तर वास्तवामध्येसुद्धा पूर्णत्वास येत आहे. जनुकीय तंत्रज्ञानात दिवसेंदिवस होत असलेल्या प्रगतीमुळे जगभरातील शास्त्रज्ञांचे लक्ष या क्षेत्राकडे वळले आहे.
पृथ्वीवरील सजीव प्राण्यांच्या उत्क्रांतीचा कालखंड हा सुमारे ८० ते १०० करोड वर्षांपूर्वीचा मानला जातो. या दरम्यान अनेक जीव पृथ्वीतलावर वावरत होते. मानव उत्क्रांत होण्याआधीपासूनच पृथ्वीवर अधिवास असलेले हे प्राणी काळाच्या ओघात मात्र हळूहळू नामशेष झाले. कधी नैसर्गिक आपत्ती, कधी इतर प्रजातींपासून निर्माण झालेला धोका, तर कधी हवामानातील बदल यासारख्या घटनांनी या प्राचीन प्रजातीचे अस्तित्व धोक्यात आले होते.
डायनोसोर्स, महाकाय सस्तन प्राणी, सरपटणारे जीव असो की विशाल जलचर अशा कित्येक प्रजाती या पृथ्वीतलावर आपल्या अस्तित्वाचे निशाण याआधी टिकवून गेल्या आहेत. याशिवाय अजूनही आपले स्वतंत्र अस्तिव टिकवून ठेवलेल्या काही प्रजातींचा धोका मात्र मानव उत्क्रांत झाल्यानंतर अधिकच वाढला. मानवाची वसाहत निर्माण करण्याची महत्त्वाकांक्षा या प्रजातींच्या नैसर्गिक अधिवासाच्या आड येऊ लागली. पण मानव जेवढा आपल्या प्रगतीसाठी उत्सुक आहे तेवढीच त्याला आपल्या सहचरांविषयी असलेल्या बांधिलकीची जाणीव आहे. त्यामुळेच त्याने आता नामशेष झालेल्या परंतु इकोसिस्टीममध्ये महत्त्वाचे स्थान असलेल्या काही प्रजातींचे आपल्या प्रगत तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पुनरुत्थान करण्याचे ठरवले आहे.
अशाच एका उपक्रमाचा भाग म्हणून ऑस्ट्रेलियातील गेल्या शतकामध्ये नामशेष झालेल्या “तस्मानियन टायगरला” जनुकीय तंत्रज्ञानाच्या मदतीने पुन्हा अस्तिव मिळवून देण्याचे शास्त्रज्ञांनी ठरवले असून, त्यायोगे लवकरच आपल्याला हा नामशेष झालेला प्राणी पुन्हा पृथ्वीतलावर वावरताना दिसू शकणार आहे. पण हा “तस्मानियन टायगर” नेमका कसा होता व शास्त्रज्ञांना त्याला पुन्हा अस्तित्वात आणणे खरंच शक्य होईल का.? हे आपण जाणून घेऊया.
ऑस्ट्रेलियाच्या ओसाड प्रदेशात एकेकाळी निर्भयपणे वावरणारा “थायलेसीन किंवा तस्मानियन वाघ” हा मांसभक्षक प्राणी मर्पिलियस म्हणजेच पोटाला पिशवी असणाऱ्या प्रजातींपैकी एक आहे. या प्रजातीमध्ये येणारे इतर प्राणी जसे की कांगारू, कोआला, हे आहेत. सुमारे चार हजार वर्षांपूर्वी हा प्राणी ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर उत्क्रांत झाला होता. अगदी नावानुसार हा प्राणी पूर्णपणे वाघासारखा दिसत नसला तरी त्याच्या पाठीवर असणाऱ्या पट्यांमुळे त्याला हे नाव मिळाले आहे. तसेच इतर शरीरवैशिष्ट्यावरून या प्राण्यास श्वानवर्गीय प्राणी असेसुद्धा संबोधले जात होते.
ऑस्ट्रेलियामध्ये या प्राण्यांचे शेवटचे दर्शन १९०० साली झाले होते, त्यावर्षी या प्राण्यांची पृथ्वीतलावर असलेल्या संख्या सुमारे ५००० इतकी होती. त्यानंतर या प्रजातीमध्ये शेवटची शिकार ही १९०९ साली “तस्मानिया” या बेटावरच झाली. हा प्राणी मानवी वसाहतीस धोकादायक आहे असे त्याची शिकार करण्यासाठी कारण पुढे केले जात असले तरी हे पूर्णतः सत्य नाही. हा प्राणी अर्ध निशाचर असून तो क्वचितच मानवी वसाहतीच्या जवळपास फिरकला असल्याचे आढळून आले आहे. या प्रजातीमधील शेवटचा “बेंजामिन” हे टोपणनाव असलेल्या तस्मानियन वाघाचा त्याला झालेल्या संसर्गबाधेमुळे सन १९३६ यावर्षी होबार्ट, तस्मानिया इथे ब्युमेरिस प्राणिसंग्रहालयात मृत्यू झाला.
ऑस्ट्रेलियन सरकारने या प्रजातीस संरक्षित प्रजाती असे घोषित केले असले तरी आता त्यास खूप उशीर झाला होता, यामुळेच की काय आपली चूक सुधारण्यासाठी ऑस्ट्रेलियन संशोधकांनी या “तस्मानियन टायगर”चे पुनरुत्थान करण्याचे ठरवले आहे.
ऑस्ट्रेलिया येथील मेलबर्न विद्यापीठ तसेच जुनिकीय आणि बायोसायन्स अभियांत्रिकी समूह यांच्या संयुक्त विद्यमाने चालवल्या गेलेल्या उपक्रमात नामशेष झालेल्या “तस्मानियन टायगर” या प्रजातीचे “कोड-एडीटिंग” पद्धतीच्या माध्यमातून पुनरुत्थान करण्याचे शास्त्रज्ञांनी ठरवले आहे. पण हे पुनरुत्थान कसे शक्य आहे तर, या प्रजातीचे संरक्षित केलेले जनुके यांची सध्या अस्तित्वात असलेल्या व या प्रजातीशी अधिक जवळ जाणाऱ्या “डुनार्ट” या प्राण्याच्या जनुकांशी सांगड घालण्यात येत असून त्यायोगे एक नवीन पेशी निर्माण करण्यात येत आहे. ही नवीन तयार करण्यात आलेली पेशी पुन्हा सरोगसीच्या माध्यमातून साधर्म्य असणाऱ्या “डुनार्ट” प्रजातींच्या गर्भपिशवीमध्ये ट्रान्सप्लँट करून एक नवीन जीव जन्माला घालणे शास्त्रज्ञांना अपेक्षित आहे. परंतु आज अस्तिवात असलेल्या तंत्रज्ञानानुसार बरेच काही शक्य असले तरी विज्ञानालासुद्धा आजघडीला काही मर्यादा आहेत.
या प्रयोगाविषयी बोलताना कोपेनहेगेन्स युनिव्हर्सिटीशी संलग्न ग्लोब इन्स्टिट्यूटचे जनुकीय तंत्रज्ञ डॉ. टॉम गिल्बर्ट असे म्हणतात, “मानवाला अजूनही एखाद्या प्रजातीची संपूर्ण जनुकांची साखळी संरक्षित करता आलेली नाही. संरक्षित केलेल्या सॅम्पलमध्येसुद्धा अनेक जनुकांचा अभाव असू शकतो आणि अशा अपूर्ण जनुकांची जेव्हा इतर जीवाच्या जनुकांशी सांगड घातली जाईल तेव्हा आपल्याला मिळणारा रिजल्ट हा पूर्णपणे नामशेष झालेल्या प्राण्याचा नसून तो हायब्रीड असेल, म्हणजेच दोन प्राण्यांच्या संयोगातून निर्माण होणारा या तिसऱ्या जीवामध्ये दोन्ही प्राण्यांचे गुणवैशिष्ट्ये असतील.
टॉम गिल्बर्ट यांनी व्यक्त केलेल्या मतामध्ये तथ्य असून, नामशेष झालेल्या कुठल्याही प्रजातीचा संपूर्ण जनुकांचा कोड आपल्याला अजूनही संरक्षित करता आलेला नाही. त्यामुळे जर हा प्रयोग यशस्वी झाला तरी निर्माण होणारी प्रजाती मूळ “थायलेसीन” या प्राण्याची नसली तरी त्या प्रजातीशी बरीच मिळती जुळती असू शकेल. तसेच, अपूर्ण जनुकांच्या संयोगातून जन्म प्राप्त होणारा हा नवीन प्राणी सुद्धा दोषपूर्ण जन्माला येऊ शकतो. त्यामुळे त्या जीवाची विशेष काळजी शास्त्रज्ञांना घ्यावी लागणार आहे.
पुढे आपले मत नोंदवताना “गिल्बर्ट”असे म्हणतात, कुठल्याही प्रजातीचे पुनरुत्थान करण्यासाठी असलेला हा उपक्रम मला मात्र त्याच्या उद्देशामुळे अधिक महत्त्वाचा वाटतो, कदाचित या प्रयोगामुळे जास्तीत जास्त लोकांचे लक्ष निसर्ग आणि जैवविविधतेचे सरंक्षण याकडे आकर्षित होईल आणि पृथ्वीतलावर आपल्याला सुद्धा आपले भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठीसुद्धा या प्रयोगाच्या निमित्ताने मार्ग शोधण्यास मदत होईल. “गिल्बर्ट” पुढे अजून असे नमूद करतात, पण या प्रयोगकर्त्यांना याची जाणीव असेल का, की ते प्रयोगातून जे निर्माण करू इच्छितात तो पूर्णपणे “तस्मानियन टायगर” नसून तो अपूर्ण असा हायब्रीड जीव असेल, पुन्हा लोकांना असं वाटायला नको की विज्ञानाला हे शक्य नाही किंवा विज्ञानाकडून आपण फसवले गेलो आहोत, शेवटी सामान्य लोकांचा विज्ञान व तंत्रज्ञानावर असलेला विश्वास महत्त्वाचा.
ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञांनी होऊ घातलेल्या या प्रयोगाचे अनेक जणांनी स्वागत केले आहे. काही जणांनी मात्र असे नमूद केले आहे की काही लाखो डॉलर्स खर्च करून नामशेष झालेल्या या प्रजातींचे पुनरुत्थान करण्यापेक्षा सध्या नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या प्रजातींकडे लक्ष देणे अधिक संयुक्तिक होणार नाही का.?
एक मात्र खरे की, जनुकीय तंत्रज्ञानाचा हा प्रयोग जर यशस्वी झाला तर या पृथ्वीतलावरून नामशेष झालेले व इकोसिस्टीममध्ये महत्त्वाची भूमिका बजावू शकतील असे अनेक प्राणी त्यांच्या नैसर्गिक अधिवासामध्ये परत वावरताना आपल्याला लवकरच बघायला मिळू शकतील.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.