आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
काळ म्हणजे एक अनंत आणि अविरतपणे चालणारं चक्र आहे. कित्येक वर्षे उलटून जातात, कित्येक शतके उलटून जातात, या दरम्यान पृथ्वीच्या पाठीवर अनेक बदल घडून येतात. फक्त सामाजिक नव्हे तर भौगोलिक उलथापालथसुद्धा घडते. जस-जसे नवनिर्माण घडत जाते तसे पूर्वीचे निशाणसुद्धा हळूहळू पुसट होत जाते. अनेक शहरे, संस्कृती नव्याने निर्माण होत असताना जुनी शहरे, संस्कृती मात्र काळाच्या पडद्याआड होत जातात.
मानव हा कुतूहल असणारा जीव आहे. त्याला इतर गोष्टींप्रमाणेच या विस्मृतीत गेलेल्या गोष्टींचंसुद्धा खूप कुतूहल असतं. काळाच्या ओघात अशीच एखादी नामशेष झालेली गोष्ट त्याला नव्याने सापडली तर त्याच्या चेहऱ्यावरची उत्सुकता बघण्यासारखी असते. जुन्या गोष्टींबद्दल केवळ उत्सुकताच नव्हे तर माहितीपर दृष्टीकोनामधूनच पुरातत्वशास्त्र उदयाला आले.
याच कुतुहुलापोटी २०२३ साली इस्राएल येथील पुरातत्व संशोधकांना सापडलेल्या सुमारे १२०० वर्षे प्राचीन हवेलीची गोष्ट आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. चला तर मग, मुळात ही हवेली कशी आहे आणि आज तिची एवढी चर्चा का होत आहे, त्या हवेलीमध्ये वेगळं अस काय आहे, हे जाणून घेऊया.
इस्राएल. पश्चिमी अशियामध्ये वसलेले एक प्रगत राष्ट्र. क्षेत्रफळाच्या दृष्टीने अगदी छोटे असलेले पण आपल्या संस्कृती आणि तंत्रज्ञानातील अत्याधुनिक प्रगतीमुळे आज अगदी महासत्तांशी बरोबरी करणारे राष्ट्र. भूमध्य समुद्राच्या आग्नेय (दक्षिण-पूर्व) किनाऱ्यावर असणाऱ्या इस्राएल या राष्ट्राची आजची प्रगती जितकी विशेष आहे तितकाच गौरवशाली आणि प्राचीन इतिहाससुद्धा या राष्ट्राला आहे.
प्रागैतिहासिक कालखंडामध्ये हिब्रू भाषिक आणि ज्यू लोकांची बहुसंख लोकसंख्या असणाऱ्या या राष्ट्राने काळाची घडी बदलत असताना अनेक उलथापालथीसुद्धा अनुभवल्या. असे म्हणतात धातूयुगाची सुरूवात होण्यापूर्वी इथे कॅनानियन या “मोनालॅट्राटिक” म्हणजेच अनेक देवांवर विश्वास असणाऱ्या परंतु एकाच देवतेची उपासना करणाऱ्या व तिथून पुढे बदलत जाऊन केवळ एकच देवाच्या अस्तित्वावर विश्वास असणाऱ्या लोकांची म्हणजेच “मोनोथेस्टिक” लोकांची वसाहत होती.
पुढे काही काळानंतर आजूबाजूच्या प्रदेशातील टोळ्यांनी या भागात आक्रमण व वसाहत करण्यास सुरुवात केली. बऱ्याच काळानंतर झालेल्या धार्मिक यु*द्धापूर्वी, काही काळ मुस्लिम शासकांनीसुद्धा इथे राज्य केले. हा कालावधी सुमारे इसवी सन ६०० ते ७०० च्या दरम्यान असावा.
आपल्या आक्र*मणांनी व तिथे असलेले जनजीवन नेस्तनाबूत करण्यासाठी कुप्रसिद्ध मुस्लिम शासकांच्या या कालखंडात काही सामर्थ्यवान लोकांनी आपले अस्तित्व मात्र टिकवून ठेवले होते. कदाचित हे लोक मूळचे सामर्थ्यवान असावेत किंवा मुस्लिम राजवटीच्या अधिपत्याखाली आपले, धनसंपत्तीचे आणि हवेल्यांचे संरक्षण करणारे असावेत.
२०२३ साली इस्राएलमधील पुरातत्वशास्त्रज्ञांनी लावलेल्या शोधामध्ये अशीच एक भव्यदिव्य हवेली सापडली आहे. इस्राएलमधील नेगेव्ह या वाळवंटी प्रदेशात असलेल्या, “बेडऊन राहत” या शहरामध्ये हवेलीचा शोध लागला असून, इस्राएली पुरातत्व संशोधकांनी जाहीर केलेल्या माहितीनुसार ही वैभवशाली हवेली सुमारे १२०० वर्षे जुनी आहे.
त्याकाळी प्रचलित असणाऱ्या संगमरवरी दगडी बांधकामातून ही हवेली विशिष्ट रीतीने बांधण्यात आलेली आहे. हवेलीसमोर विस्तीर्ण दगडी अंगण असून चार विविध भागांमध्ये विभागलेल्या या वास्तूत अनेक खोल्या आहेत. इतकंच नव्हे तर या हवेलीच्या भिंती आणि फरसबंदी सुद्धा विविध रंगानी युक्त असलेल्या सुरेख भित्तिचित्रांनी परिपूर्ण आहेत.
वास्तुकला आणि स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना असलेली ही हवेली केवळ आपल्या बाह्यदर्शनानेच नव्हे तर त्या हवेलीमध्ये असणाऱ्या इतर काही वैशिष्ट्यपूर्ण गोष्टीमुळेसुद्धा चर्चेचा विषय ठरली आहे. याच हवेलीमध्ये पुरातत्व संशोधकांना तळघराकडे जाण्याचा रस्तासुद्धा सापडला आणि पाहतात तर काय, बाहेरून दिमाखात उभ्या असलेल्या या हवेलीला तेवढ्याच सर्वसोयींनी युक्त संपन्न असे तळघरसुद्धा आहे.
खरेतर इस्राएलचा भूभाग हा कमी पावसाचा, इथला उन्हाळा म्हणजे अगदी कहर. कदाचित प्रचंड उष्मेपासून विसावा मिळावा म्हणून या तळघराची रचना केली गेली असावी असा पुरातत्व संशोधकांचा कयास आहे. हे तळघर अगदी माणसांना वावरण्यास सोयीचे जावे इतपत ऐसपैस आहे. या तळघरामध्ये विविध वस्तू अथवा माल साठवण्याचे कोठारसुद्धा आहेत. तसेच या तळघरामधून जाणारा एक मार्ग त्याकाळी नागरिकांना थंड पिण्याचे पाणी असलेल्या कुंडाकडे सुद्धा घेऊन जातो.
सर्वसोयींनी युक्त असलेल्या या समृद्ध हवेलीचा मालक हा सुद्धा तितकाच संपन्न आणि वैभवशाली असावा. अतिभव्य हवेली ही त्याचेच राहणीमान दर्शवते असे इस्राएली पुरातत्व संशोधकांचे मत आहे. या हवेलीमध्ये वैशिष्ट्यपूर्ण रचना असणाऱ्या भल्या मोठ्या खोल्या व तिथे आढळून आलेले ओव्हन पाहता या खोल्यांचा वापर हा बहुधा स्वयंपाकासाठी होत असावा असा अंदाज आहे. शिवाय काचेपासून बनलेल्या व त्यावर सुरेख नक्षी असलेल्या डिशेसचे तुकडेसुद्धा या हवेलीमध्ये आढळून आले आहेत.
इस्राएलच्या पुरातत्व विभागाचे संचालक असलेले “अली इस्कोसिदो” यांच्या म्हणण्यानुसार नुकतीच सापडलेली ही हवेली जनसामान्यांमध्ये “कुतुहुल आणि आकर्षण” निर्माण करत आहे. त्यानुसार त्यांनी पुरातत्व विभाग आणि ‘बेडऊन ‘ या शहरामध्ये असलेल्या स्थानिक “वसाहत आणि निर्माण विभागा”च्या सोयीनुसार लवकरच नागरिकांसाठी हे स्थळ खुले करणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्याचबरोबर या वास्तूचे योग्यरितीने “जतन आणि संवर्धन” करण्याचे निर्देशसुद्धा त्यांनी दिले. लवकरच सामान्य नागरिकांनासुद्धा या ठिकाणी मोफत भेट देणे लवकरच शक्य होणार आहे.
मित्रांनो कशी वाटली तुम्हाला ही तळघर असलेल्या विशाल हवेलीची गोष्ट? आजच्या आपण अनेक इमारतींनी दुकानांना, पार्किंग लॉटसाठी असणारी तळघरे पाहतो पण ही तळघराची संकल्पना आज उदयाला आलेली नसून ती खूप प्राचीन आहे. फक्त इस्राएलच नव्हे तर आपल्या देशातसुद्धा अनेक ठिकाणी तुम्हाला जुन्या काळातील घरांना, मंदिरांना असणारे तळघर आढळून येईल.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.