The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

या भारतीय शास्त्रज्ञाने वायफाय तंत्रज्ञानाचा पाया रचलाय.

by द पोस्टमन टीम
29 November 2024
in विज्ञान तंत्रज्ञान
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


लेखक: पुष्कराज घाटगे 


“ईहा केवल बंधूत्वेर कार्य नोहे, स्वदेशेर कार्य !” रवीन्द्रनाथ म्हणाले. कारण त्यांना माहीत होतं की आपला हा खास दोस्त जे काम संपूर्ण स्वतःला झोकून देऊन केवळ स्वदेशासाठी करतोय आणि म्हणूनच आपल्या मित्राला विदेशात पैशांची गरज आहे.

त्याचसाठी त्यांनी ठाकुर महिमचंद्र यांना लिहिलेल्या पत्रात लिहिलंय,”केवल ***बाबूर कार्ये(बाबूंच्या कार्यासाठी) आमि मान अपमान अभिमान किछुई मने स्थान दिते पारि ना !”

(केवळ यांचं कार्य आहे म्हणून मी माझा मान-अपमान-स्वाभिमान याला मनात काही स्थान देत नाही आहे [म्हणूनच तुम्ही मला लाचार समजू नका किंवा तुम्हाला लुबाडतोय असं समजू नका] हे केवळ माझ्या भावाचं कार्य नाही, देशकार्य आहे !)….



राष्ट्रकवी असलेले रवींद्रनाथ टागोर नक्की हे कोणाबद्दल म्हणत होते? कोणासाठी म्हणाले असतील ते हे वाक्य?

आपल्या मित्रासाठी, तिकडे विदेशात राष्ट्रप्रेमापुढे आणि आपल्या संशोधनापुढे समोर चालत आलेल्या लक्ष्मीलाही ठोकरतो, ‘मिळालेलं हे धन स्विकारलं तर माझी राष्ट्रभक्ती आणि संशोधनावर असलेली निष्ठा कुठेतरी उणी पडली असं मला वाटतं’ असं जो म्हणतो त्या आपल्या परम् मित्रासाठी रविंद्रनाथ असं म्हणाले.

हे देखील वाचा

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

शास्त्रज्ञ आणि त्यातही पदार्थविज्ञानातले लोक हे जडवादी, नास्तिक, तत्वज्ञान/धर्म यांना फाट्यावर मारणारे असतात असं सहसा मानलं जातं आणि अर्थातच बरीच उदाहरणं बघितली तर हे खरं आहे, हे ही लक्षात येतं.

पण याला भारतीय वैज्ञानिक कायमच अपवाद ठरत आले आहेत. मग ते रामानुजन (गणिती असले तरी) असोत, सर सी. व्ही. रमण असोत, सुब्रमण्यम चंद्रशेखर असोत किंवा….सर जगदीशचंद्र बोस असोत !

या आणि इतर अनेकांनी विज्ञान/गणित या विषयात भरीव असं संशोधन करताना डोक्यात भारतीय तत्वज्ञान आणि काहींनी तर भारतीय प्राचीन अशा वैदिक, औपनिषदिक तत्वज्ञान आणि अधुनिक विज्ञानातलं एकत्व सिद्ध केलं आणि ते ही आधुनिक विज्ञानाच्या कक्षेत राहून !

त्यातीलच प्रामुख्याने समोर येणारं पण दुर्लक्षित राहिलेलं नाव म्हणजे सर जगदीशचंद्र बसू (इंग्रजी उच्चार-बोस, बंगाली उच्चार- बोशू).

पारतंत्र्याच्या काळात फार मोठी अवहेलना सहन करणारा भारतीय शास्त्रज्ञ म्हणजे जगदीशचंद्र बसू. बुद्धीची फार मोठी झेप घेण्याची क्षमता असूनही कधी ते ज्या कॉलेजात शिकवत तिथल्या प्राध्यापकांकडून, कधी भारतातल्या इंग्रज सरकारकडून, तर कधी इंग्लंडमधल्या अहंकारी शास्त्रज्ञांकडून बसूंना फार मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला.

पण त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे प्रा. क्रॉफ्ट किंवा सुप्रसिद्ध संशोधक रॅले अशी गोरी मंडळी त्यांच्यापाठी उभे राहिले म्हणून जगदीशबाबुंना आपलं संशोधन रॉयल सोसायटीसमोर मांडता आलं.

आपल्याला माहीत आहे की कुठलाही सजीव जेव्हा त्याला बाहेरून सौम्य किंवा सशक्त अशी उत्तेजना दिली जाते तेव्हा तो त्यानुसार काही ना काही प्रतिसाद देतोच, मग तो माणूस असो, कोणी जनावर असो वा ती वनस्पती असो.

पण हे झालं सजीवांचं पण निर्जीवांचं काय? प्रतिसाद देणे हे एका अर्थी जीवंतपणाचं लक्षण झालं पण निर्जीव तर निर्जीव असतात ना, त्यांना अशा संवेदना असतील?

बसुंनी केलेला असा विचार अद्भुत होता ज्यातून भारतीय आणि जागतिक विज्ञानविश्वात मोठा बदल तर झालाच तेवढेच वादही झाले. त्यांनी एक प्रयोग केला.

जेव्हा चुंबकीय ऑक्साइडच्या पृष्ठभागावर विद्युततरंग सोडला जातो तेव्हा त्यातल्या रेणुंमध्ये काही बदल होतात, त्यांची वहनक्षमता वाढते. तसच जेव्हा आपण दिलेली वीज किंवा विद्युततरंग कमी करतो त्याबरोबर त्याची वहनक्षमता पूर्ववत होते.

जशी वीज वाढली तशी क्षमता वाढली आणि जशी वीज कमी केली तशी क्षमताही कमी झाली. हा बदल केवळ नेहमीचाच प्रयोगातला बदल आहे म्हणून दुर्लक्ष करावं असं बसुंना नक्कीच नाही वाटलं.

त्यांना होणाऱ्या या परिवर्तनाचा आश्चर्यकारक असा आलेख मिळाला, मानवी किंवा इतर कोणत्याही सजीवाने उत्तेजनाला दिलेल्या कमी जास्त प्रतिसादाच्या आलेखाशी हा एका रासायनिक ऑक्साइडच्या प्रतिसादाचा मिळालेला आलेख जुळत होता.

हा होता पहिला प्रयोग जो त्यांनी प्राथमिक स्वरुपात यशस्वी केला, दुसरा प्रयोग अजूनच भारी ठरला.

जिवंत पेशींना आपण जेव्हा औषधाची मोठी मात्रा देऊ तेव्हा त्यांचा प्रतिसाद किंवा मिळणारा परिणामही त्याच प्रमाणात जास्त असतो आणि तसंच जर आपण तो अगदी अत्यल्प दिला तर तो तसाच अत्यल्प परिणाम दिसतो.

अगदी त्याच प्रकारे जेव्हा एखाद्या धातूवर जेव्हा आपण जास्त प्रमाणात प्रारणे (रेडिएशन्स) सोडतो तेव्हा मिळणारा प्रतिसाद हा तीव्रतेच्या प्रमाणात कमी जास्त होतो.

तसंच काही रसायनं धातूंची संवेदनक्षमता वाढवतात तर काही असतात ती विषाप्रमाणे एकदम घटवतात. कारण यापूर्वी होणारे हे बदल इतरांनाही दिसले असतील पण केवळ ही रसायने आहेत किंवा हा धातू आहे, असं म्हणून त्यांनी सोडून दिले असेल.

पण बसूंनी या गोष्टीचा एवढ्या खोलावर जाऊन केलेला उहापोह वेगळा होता. यातून मिळालेले निष्कर्ष नक्कीच चकीत करणारे होते.

पॅरिसमध्ये १९०० सालच्या ऑगस्ट महिन्यात भौतिकशास्त्रज्ञांची परिषद (इंटरनॅशनल काँग्रेस फॉर फिजिक्स) आयोजित केली गेली होती. जगदीशबाबुंनी आपलं हे संशोधन या काँग्रेसमध्ये मांडण्याचं ठरवलं आणि अपेक्षित गोष्टी घडल्या.

ते शिकवत असलेल्या महाविद्यालयाने त्यांची सुट्टी नाकारली, शिफारसपत्रही मिळेना, नोकरी सोडताही येत नव्हती कारण खुद्द केंब्रिजमधून प्राध्यापक पदासाठी आलेली संधी त्यांनी स्वदेशप्रेमासाठी नाकारली होती म्हणूनच ते भारतात राहून प्राध्यापकी करत होते.

पण जिथे प्रचंड इच्छाशक्ती असते तिथे जादू घडून येते. यापूर्वीच्या त्यांच्या नावाजलेल्या संशोधनामुळे त्यांना अधिकृतरित्या भारताचा (अर्थातच भारतातल्या इंग्रज सरकारचा) प्रतिनिधी म्हणून या परिषदेला जाण्याबाबत पत्र मिळालं, जो त्यांच्यासाठी सुखद धक्का होता. आणि अशाप्रकारे पॅरिसचा मार्ग सुकर झाला.

या परिषदेला साक्षात स्वामी विवेकानंद उपस्थित होते. स्वामी विवेकानंदांचे पॅरिस येथे भरलेल्या परिषदेत भाषण चालू होतं आणि तेवढ्यात जगदीशचंद्रांचं नाव पुकारलं गेलं, आपल्या या स्वदेशीय आणि त्यातही बंगाली बंधूचं नाव ऐकून स्वामीजी प्रचंड आनंदित झाले, अभिमानाने त्यांनी आपल्या भाषणात जगदीशचंद्रांचा गौरव केला.

विवेकानंद म्हणाले, “या सगळ्यांमध्ये हा एकटा तरुण पदार्थविज्ञानवेत्ता उठून दिसत आहे. विज चमकून प्रकाश उजळावा त्याप्रमाणे त्याने पाश्चात्त्यांना भारून टाकले आहे. आज जगदीशचंद्र बोस हे सगळ्या पदार्थवैज्ञानिकांचे मुकुटमणी बनले आहेत. एक भारतीय! एक बंगाली! शाब्बास रे वीरपुत्रा! ” विवेकानंदांचा उर त्या वेळी अत्यंत अभिमानाने भरून आला होता.

विवेकानंद नेहमी बसुंचा उल्लेख ‘बंगालचा अभिमान आणि गौरव’ असा करत असत. नंतरच्या काळात अगदी शेवटच्या श्वासापर्यंत भगिनी निवेदिता जगदीशचंद्र आणि त्यांच्या पत्नी अबलादेवी यांच्यासोबत होत्या.

त्या जगदीशचंद्रांनी नवनवी शिखरे कशाप्रकारे पादाक्रांत केली ह्याबद्दल भगिनी निवेदिता नेहमीच विवेकानंदांना पत्राद्वारे कळवत असत.

या परिषदेत बसुंनी आपलं संशोधन मांडलं, जे सर्वच उपस्थितांना आश्चर्यकारक ठरलं. परिषदेतल्या व्याख्यानामुळे शास्त्रीय जगतात आणि एकूणच यूरोपमध्ये जगदीशचंद्रांना बरीच प्रसिद्धी मिळाली.

यानंतर त्यांनी एक महत्वाचा प्रयोग केला. सजीव आणि निर्जीव यांच्यावर झालेल्या प्रयोगांच्या निष्कर्षावरून त्यांनी वनस्पतींवर प्रयोग करायचं ठरवलं.

सजीव आणि निर्जीव यांच्या विद्युत् प्रतिसादात जर साधर्म्य असेल तर यांमध्ये असणाऱ्या वनस्पतींचा प्रतिसाद काय असेल असा विचार जगदीशचंद्रांनी केला.

त्यांनी विविध प्रकारच्या भाज्या वापरून त्या विविध रसायनांना कसा प्रतिसाद देतात ते बघितलं आणि असं दिसून आलं की या रसायनांमुळे भाज्याही उत्तेजित झाल्या.

जास्त विष दिल्यामुळे मेल्या, कमी विष दिल्यावर कमी उत्तेजित झ्याल्या आणि दारु पाजल्यावर झिंगल्यासुद्धा !

आता पुन्हा ते मागे फिरले आणि असा प्रयोग धातुंवर केला तर तिथे असं आढळलं की विषारी रसायनांचा असा वापर धातुंवर केला तर मिळणारा प्रतिसाद हा प्राण्यांच्या स्नायुंसारखा आणि वनस्पतींसारखाच होता.

त्यांनी कथिल, जस्त, प्लॅटीनम अशा धातुंवर केलेल्या प्रयोगांचा आलेख हा स्नायूंच्या प्रतिसादाच्या आलेखासारखा मिळाला होता. आता ही मुख्य गोष्ट, हा मोठा शोध त्यांनी लंडनच्या रॉयल सोसायटीसमोर मांडावे असा सल्ला त्यांना प्रसिद्ध शास्त्रज्ञ मायकेल फॉस्टर यांनी दिला.

तो त्यांनी मानला, काही अडथळे येथे आलेही, पण फॉस्टर यांना हे संशोधन एवढं भावलं होतं की त्यांनी आपलं संशोधक म्हणून असलेलं वजन वापरून जगदीशचंद्रांना मोकळी वाट करून दिली.

जगदीशचंद्र तेथील प्रत्येक बाब रविंद्रनाथांना कळवत होते। त्यांनी एका पत्रात म्हटलं की, ‘ इथले शास्त्रज्ञ भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र ह्या शाखांना वेगळं मानतात.

पण विज्ञानासमोर ह्या शाखा एकच आहेत आणि हेच मी सिद्ध करू इच्छितो. इथले ख्रिस्ती शास्त्रज्ञ मानवी जीवनाला सर्वोच्च मानतात, स्वतःला श्रेष्ठ समजतात आणि त्यामुळे सजीवांची पातळी वरची आहे असं दाखवतात.

पण मला हे सर्वांना दाखवून द्यायचय की सजीव-निजीव हे एकाच पातळीवर आहे, फक्त व्यक्त होण्यात फरक आहे. रॉयल सोसायटी च्या व्याख्यानात हेच मी दाखवून देणार आहे’.

प्रस्तुत व्याख्यानापूर्वी काही मिनिटं बिनतारी संदेशवहन क्षेत्रात काम करणाऱ्या कंपनीचा कोट्यधीश मालक बसूंना भेटला. त्यांनी बसूंना बिनतारी बाबतच्या संशोधनाचं पेटंट घेण्याची विनंती केली परंतू बसूंनी नकार दिला.

त्याने समजवण्याचा प्रयत्न केला की फार मोठ्या पैशांवर तुम्ही लाथ मारताय, यातील व्यावसायिक उत्पादनातून मिळणाऱ्या नफ्याची निम्मी रक्कम मी तुम्हाला देतो, असंही तो म्हणाला पण जगदीशबाबूंनी साफ नकार दिला.

बसूंनी रविंद्रनाथांना पत्राद्वारे सांगितलं की, ‘तो कोट्यधीश असलेला कंपनीचा मालक माझ्यासमोर भिकारी झाला होता, विनवित होता. पण मी नकार दिला.

ह्या देशातले लोक पैशांसाठी हपापले आहेत, मी पण जर या जाळ्यात अडकलो तर यातून माझी सुटका होणार नाही.मी माझ्या राष्ट्राशी प्रतारणा करू इच्छित नाही.’ संशोधनासाठी फक्त सरस्वतीची उपासना करणाऱ्या बसूंनी लक्ष्मीला नाकारलं आणि पुढे म्हणूनच लक्ष्मीे गरजेवेळी बसुंकडे चालत आली.

१० मे १९०१ या दिवशीच्या त्या व्याख्यानाचा विषय होता- ‘द रिस्पॉन्स ऑफ़ इनऑर्गेनिक मेकॅनिकल अँड इलेक्ट्रिकल स्टिम्युलस’.

त्या व्याख्यानात त्यांनी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र यांची सुंदर गुंफण करून, यांमधली एकता प्रयोगातून सहजपणे दाखवून दिली.

त्यांनी स्वतः तयार केलेलं ‘आर्टिफिशियल रेटिना’ किंवा कृत्रिम डोळा हे उपकरण सर्वांसमोर सादर करून निर्जीवांच्या संवेदना समोर बसलेल्या सजीवांना दाखवून दिल्या.

विषामुळे धातुला होणाऱ्या वेदनाही दिसल्या आणि तारेला पिळ दिल्यावर म्हणजे मेकॅनिकल अर्थात यांत्रिक उत्तेजनेमुळे त्या तारेने म्हणजे धातूने दिलेला प्रतिसादही दिसला.

या व्याख्यानाच्या शेवटी बसू म्हणाले की’, ‘सजीव आणि निजीव यांच्यात हे अविश्वसनीय असं साधर्म्य आहे. तेव्हा इथे आपण भौतिक, जैविक, रासायनिक यांच्यामध्ये भेदाची अशी कोणती सीमा आखू शकतो ? अशी विभाजन रेषा अस्तित्वात नाही.

यातून मला वैश्विक एकत्वाची जाणीव झाली जेव्हा हे निष्कर्ष मी प्रथम बघितले. सर्वाच्या मुळाशी असलेल्या एकत्वाचं दर्शन मला झालं आणि आमच्या भारतातल्या पूर्वजांनी दिलेल्या संदेशाप्रमाणे हे वैश्विक एकतेचं शाश्वत सत्य मला उमजलेलं आहे’.

शेवट त्यांनी उपनिषदातल्या मंत्राने केला !

स्वतः ला शास्त्रज्ञ म्हणवणाऱ्यांनी याला ‘अवैज्ञानिक‘ म्हणून विरोध केला. द्वैतामध्ये हरवलेल्या या समाजाला अद्वैत तत्वज्ञान सांगणारे जगदीशचंद्र बोस हे चुकीचे वाटत होते.

ही बाब भलेही आध्यात्मिक होती पण ती बसूंनी शास्त्रीय पद्धतीने सिद्ध करण्याचं महत्वाचं पाऊल टाकलं होतं. पण ह्याला पश्चात्यांनी कुठेही किंमत दिली नाही.

बसूंचं हे भाषण जेव्हा रॉयल सोसायटी ने छापलं तेव्हा बसूंचे एकत्वाबाबतचे व्याख्यातले अखेरचे शब्द आणि औपनिषदिय मंत्र हे गाळलेलं आढळलं.

आधीच बसू हे एका गुलाम देशाचे रहिवासी, त्यातही त्या देशातल्या अध्यात्माची, तत्वज्ञानाची सांगड ते विज्ञानातील महत्वाच्या प्रयोगाशी घालत आहेत ही कल्पना युरोपियनांना अशक्य होती.

पण सूर्यासमोर कितीही ढग आले तरी त्याचं तेज कमी होत नाही. जगाने त्यांचं संशोधन मान्य केलच! एन्सायक्लोपीडिया, ब्रिटानिकामध्ये बसूंच्या अद्वितीय संशोधनाबद्दल विस्तृत लिखाण केलं गेलं.

१९१७ साली त्यांना ‘सर’ हा किताब दिला गेला..!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Tags: Indian PhysicsJagdishchandra Bose
ShareTweet
Previous Post

पूर्णिमा सिन्हा – भारतातील पहिली महिला भौतिकशास्त्रज्ञ

Next Post

पोर्तुगीजांची झोप उडवणारा मराठ्यांच्या इतिहासातील अजरामर सेनापती

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
xr:d:DAEiXqP5IBY:4353,j:5814571545322122661,t:24041011
विज्ञान तंत्रज्ञान

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

8 April 2025
विज्ञान तंत्रज्ञान

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

5 April 2024
विज्ञान तंत्रज्ञान

नवीन आलेल्या सोडियम-आयन बॅटरीज् लिथियम-आयन बॅटरीजसाठी पर्याय ठरत आहेत..!

26 March 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: गगनयान: नेमकं काय आणि कशासाठी?

28 February 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: सॅम अल्टमन आणि ओपनएआयमध्ये नेमकं चाललंय काय..?

27 November 2023
Next Post

पोर्तुगीजांची झोप उडवणारा मराठ्यांच्या इतिहासातील अजरामर सेनापती

निसानचा CEO पियानो मध्ये बसून जपान मधून निसटला होता

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.