आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
एखाद्या कार अपघातात आपलं रक्षण करणारी सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे सीटबेल्ट. एखाद्या भरधाव वाहनाने धडक दिल्यास डोक्याला होऊ शकणाऱ्या गंभीर इजांपासून सीटबेल्ट आपली रक्षा करते. भारतातील आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार भारतात होणाऱ्या बहुतांश वाहन दुर्घटना अपघाताला सीट बेल्ट न लावणे कारणीभूत ठरते.
१३-४४ या वयोगटातील लोकांनी कार चालवताना सीट बेल्ट न लावल्यामुळे अपघातात मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक आहे. अशा परिस्थितीत सीटबेल्ट ही अत्यंत महत्वाची गोष्ट ठरते. पण जीवरक्षक सीट बेल्टचा आविष्कार कोणी केला? या सीटबेल्टचा शोधाची कथा अगदी रंजक आहे.
सीटबेल्टचा शोध जॉर्ज केली नावाच्या एका इंग्लिश इंजिनियरने लावला. त्याने शोध लावलेला या सीट बेल्टचा वापर फक्त पायलट्सला आपल्या ग्लायडर्सशी व्यवस्थितरित्या बांधून ठेवण्यासाठी होत होता. परंतु सीट बेल्टचं पेटंट मात्र एडवर्ड क्लेगहॉर्न यांच्या नावावर होते.
त्याने १० फेब्रुवारी १८८५ रोजी हे पेटंट फाईल केलं होतं. या सीट बेल्टचा वापर न्यूयॉर्कच्या टॅक्सीमध्ये बसणाऱ्या प्रवाशांच्या व चालकांच्या सुक्षेसाठी केला जात होता. सुरुवातीच्या काळात सीट बेल्टचा वापर अगदीच मर्यादित होता.
एकोणिसाव्या शतकात शोध लागून देखील सीटबेल्टचा वापर फारच मर्यादित राहिल्यामुळे, १९३० साली अमेरिकेतील फिजिशियन्सकडून वाहन कंपन्यांना सीटबेल्टचा वापर वाढविण्या व विकासासंबंधी सूचना करण्यात आली. यासाठी अमेरिकेत वाढते अपघात कारणीभूत होते.
स्पोर्ट्स कार क्लब ऑफ अमेरिका या संस्थेने १९५४ साली आपल्या कार रायडर्सला सीटबेल्ट लावणे बंधनकारक केले. त्याच्या पुढच्या वर्षी सोसायटी ऑटोमोटिव्ह इंजिनियर्स या संस्थेने मोटर व्हेईकल सीटबेल्ट कमिटीची स्थापना केली.
रेस कार ड्रायव्हर्सला पुढे सीटबेल्ट वापरणे अनिवार्य करण्यात आले. पुढे अनेक वर्ष रेस कार्सममध्ये सीटबेल्टचा वापर होत होता.
परंतु सीटबेल्टच्या क्षेत्रात क्रांतिकारी बदल तेव्हा घडवून आला, ज्यावेळी नील्स बोहलीन नावाच्या एका स्वीडिश इंजिनियरने थ्री पॉईंट बेल्टचा आविष्कार केला. हा आविष्कार होईपर्यंत सीटबेल्ट हे अत्यंत प्राथमिक दर्जाचे होते. त्यांना टू-पॉईंट सीटबेल्ट म्हटले जाते, जे पोटाभोवती गुंडाळले जात होते.
वोल्वो या प्रसिद्ध वाहननिर्मिती कंपनीने या थ्री पॉंईंट सीटबेल्टचा आविष्कार केला होता. या सीटबेल्टचा उद्देश एखाद्या अपघातातून चालकाचा जीव वाचवणे इतकाच होता. या नव्या थ्री-पॉईंट बेल्टमुळे वरचा आणि खालचा असे दोन्ही शरीराचे भाग वाचवणे शक्य होणार होतं.
महत्वाचं म्हणजे या बेल्ट्ची रचना आणि डिझाईन इतकी साधी होती की इतर चार कंपन्यांनी लगेच या डिझाईनला विकत घेतलं.
सर्वात आधी अमेरिकेत सीटबेल्टवर लोकांमध्ये जनजागृती करण्यात आली होती. अमेरिकेत सीटबेल्टचा वापर मोठ्या प्रमाणावर करण्यात येऊ लागला. काही कालावधीतच अमेरिकेत सीटबेल्ट हे ड्रायव्हिंगच्या नियमांचा भाग बनले. गाड्यांना सीटबेल्ट असणे अनिवार्य करण्यात आले. हळूहळू सीटबेल्टचा प्रचार जगभर झाला आणि सगळ्याच मोठ्या वाहनात सीटबेल्टचा वापर केला जाऊ लागला.
२००१ साली फोर्ड कंपनीने अजून संशोधन करून एयर बॅग असलेले सीटबेल्ट तयार करून घेतले. जे अपघाताच्या वेळी इन्फ्लेट होतात आणि यामुळे माणसाचा जीव वाचवणे सहज शक्य होते.
अनेक कंपन्या सीटबेल्टचे तंत्रज्ञान विकसित करत असून लवकरच यात अजून नवीन प्रकारचे सीटबेल्ट बाजारात येत आहे.
भारतात, २५ मार्च १९९४ नंतर ज्या गाड्यांची निर्मिती करण्यात आली त्यात पुढच्या सीट्सवर सीटबेल्ट्स बसवण्यात येऊ लागले. पुढे २००२ साली हा नियम मागच्या सीट्ससाठी अनिवार्य करण्यात आला. या निर्णयाचे भारतातील सर्वच राज्यात स्वागत करण्यात आले आणि हा निर्णय देशभरात लागू झाला.
आज भारतात शहरी भागात जरी सीटबेल्टचा वापर मोठ्या प्रमाणात होत असला तरी ग्रामीण भागात मात्र याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालेलं दिसतं, त्यामुळे ग्रामीण भागात अपघाती मृत्यूंचे प्रमाण खूप जास्त आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.