जिच्यासाठी रविंद्रनाथांनी आयुष्यभर कविता लिहिल्या, ती कादंबरी कोण होती…?

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


कोणत्याही कवीला, लेखकाला आपल्या शब्दांचे मोती घडवायला प्रेरणा लागते. कधी ती प्रेरणा अंतर्मनातून येते कधी बाह्य कारणामुळे. कधी जन्मतःच शब्दांची देण घेऊन हे कवी जन्माला येतात तर कधी परिस्थिती त्यांना ही कला प्रदान करते. त्यांचे शब्द जिवंत वाटू लागतात कारण प्रेम, दुःख, आनंद, उत्साह, विरह, यातना सगळ्याच भावना फार सुंदररीत्या मांडलेल्या असतात. हे शब्द वाचकाच्या अंतर्मनातील भावनांना स्पर्श करतात. स्वतःच्या भावनांना वाट करून देताना नकळत हे जादूगार वाचकांच्या भावनांना सुद्धा वाट मोकळी करून देतात.

रविंद्रनाथ टागोर. अशाच अजरामर कलाकृती घडवणाऱ्या लेखकांपैकी एक थोर नाव. त्यांच्या या जगप्रसिद्ध कवितांच्या रचनेमागे काय रहस्य होते व कशापासून प्रेरित होऊन ते शब्दांची रांगोळी रेखाटत हे जाणून घेऊया.

रविंद्रनाथ टागोर यांचा जन्म बंगालच्या सगळ्यात श्रीमंत व रुबाबदार सावकार घरातला. ब्रिटिश राजाशी त्यांच्या वडिलांची म्हणजे द्वारिकानाथ टागोरांची घनिष्ठ मैत्री होती. ते त्याकाळातील दोन्ही देशांमधील सगळ्यात श्रीमंत कुटुंबांपैकी एक होते. त्यांच्या बंगल्यात साहित्यापासून, संगीत, नृत्य, नाटक अशा मैफिली रंगत. तिथूनच त्यांना कलेविषयी आकर्षण वाटणे सुरू झाले.

पण खरी कळी खुलली ती कादंबरीच्या स्वरूपात, प्रेमाच्या त्यांच्या मनाच्या उंबऱ्यावर येण्याने.

रविंद्रनाथ आठ वर्षांचे असताना त्यांचे ज्येष्ठ बंधू यतींद्रनाथ टागोर यांचा विवाह कादंबरीशी झाला व घरात दहा वर्षांची बालिकावधू आली. पण यतींद्रनाथपेक्षा रविंद्रनाथ व कादंबरी हे समवयस्क असल्याने त्यांची छान गट्टी जमली. हळूहळू ते दोघे जवळ आले. पाहता पाहता ते एकमेकांच्या प्रेमात पडले. हे प्रेम इतके घट्ट होत गेले, की रविंद्रनाथच्या लग्नाच्या विरोधात कादंबरीने कारस्थानं रचली. तिचा त्यांच्या लग्नाला जबरदस्त विरोध होता. रविंद्रनाथ फक्त तिचेच असावे असे त्यांना वाटत होते. तिने रविंद्रनाथांवर लग्नाला नकार देण्यासाठी दबावसुद्धा आणला. पण रविंद्रनाथ दबावाला बळी न पडता लग्नाच्या बंधनात अडकले.

सुधीर कक्कड़ यांच्या “यंग टागोर” या पुस्तकात त्यांनी नमूद केले आहे की ,“हा विरह सहन न झाल्यामुळे कादंबरीने अफिमचे अधिक मात्रेत सेवन करून आत्महत्या केली. या घटनेमुळे टागोर फार दुखावले गेले. त्यांना स्वतःला सावरणे कठीण झाले होते.”

यामुळे रविंद्रनाथ व त्यांच्या पत्नीत प्रचंड वाद झाले, व ते इतके शिगेला पोहोचले की त्या घर सोडून माहेरी निघून गेल्या. पण काळानुसार वेदना कमी झाल्या. रविंद्रनाथ व त्यांच्या पत्नीतील भांडण मिटून त्यांचा संसार सुरळीत झाला. पण रविंद्रनाथ कादंबरीला कधीही विसरू शकले नाही. त्यांचे पहिले प्रेम, त्यांची लाडकी मैत्रीण कादंबरी, त्यांच्या मनात भरलेलीच होती. असे म्हणतात की त्यांनी जितक्याही रोमँटिक कविता लिहिल्या व जितकी महिलांची चित्र त्यांनी काढली, ती सगळीच कादंबरीला ध्यानात ठेऊन साकारली होती.

रविंद्रनाथ हे मुळातच इतके आकर्षक व्यक्तिमत्त्वाचे होते की अनेक स्त्रिया त्यांच्याकडे आकर्षित होत. धीरगंभीर स्वभाव, सावकारी रुबाब व शब्दांना हवेतसे आणि अत्यंत आकर्षक पद्धतीने वापरण्याचे कौशल्य या सगळ्यांमुळे स्त्रिया त्यांच्यावर भाळून जात. कादंबरीनंतर मनःशांतीच्या शोधत असलेले रवींद्रनाथ, अनेक वेळा प्रेमात पडले.

अन्नपूर्णा

टागोर सतरा वर्षांचे असताना अहमदाबाद येथे आपल्या भावाकडे, म्हणजेच सत्येंद्रनाथकडे गेले. सत्येंद्रनाथ तिथले आईसीएस होते. तिथून रविंद्रनाथांना त्यांनी मुंबईत, आपले मित्र, डॉक्टर आत्माराम पांडुरंग यांच्याकडे पाठवले. तिथे त्यांची ओळख डॉक्टरांच्या मुलीशी, म्हणजे अन्नपूर्णाशी झाली. अन्नपूर्णा स्मार्ट, चार्मिंग होती. रविंद्रनाथ तिच्या प्रेमात पडले व तीसुद्धा पाहताक्षणीच रविंद्रनाथांच्या प्रेमात पडली. पण काही कारणास्तव त्यांच्या नात्याची कळी कोमेजली.

डॉ. स्कॉटच्या सुकन्या

तिथून रवींद्रनाथ काही कामानिमित्त लंडनला गेले. तिथे ते डॉ. स्कॉट यांच्याकडे पेईंग गेस्ट म्हणून राहू लागले. डॉ. स्कॉट यांना दोन मुली होत्या. त्यांची एक मुलगी कवी रविंद्रनाथ यांच्यावर मोहित झाली.

रेणू अधिकारी

कोणत्या ना कोणत्या स्वरूपात प्रेम टागोरांच्या आयुष्यात येत गेले. असेच एकदा रेणू अधिकारीच्या रुपात पुन्हा आले होते. रेणू अतिशय सुंदर व चर्मींग होत्या. त्याही टागोरांवर तितकेच प्रेम करत. रविंद्रनाथांनी रेणूला जवळपास २०० हून अधिक पत्रे सुद्धा लिहिली होती. पण नियतीने पुन्हा घाव घातला व हे नातेसुद्धा कोलमडले.

अर्जेंटिना येथील एक विधवा स्त्री.

प्रेम कोणत्या स्वरूपात जीवनात येईल हे सांगता येत नाही. तसेच काहीसे टागोरांनी अनुभवले. अर्जेंटिनाला असताना ते प्लेट नदीच्या काठी असलेल्या मोठ्या बंगल्यात वास्तव्यास होते. तिथे त्यांची ओळख व्हिक्टोरिया नामक एका विधवेशी झाली. दोघांनाही एकमेकांप्रती भावना आणि संवेदना जाणवू लागल्या. त्या ६३ वर्षीय महिलेने टागोर कशाप्रकारे त्यांच्या भावनांचा आदर करत व त्यांचे नाते कसे होते आणि टागोर कसे त्यांचा प्राण बनले हे सगळे सविस्तर लिहून ठेवले आहे.

रविंद्रनाथांच्या कधीच प्रेम टिकले नाही. याच दुःखातून त्यांनी अनेक कविता रचल्या. त्यांच्या बहुतेक कवितांमध्ये हेच दुःख दडलेले आहे. इतक्या स्त्रिया येऊनही कादंबरीची जागा मात्र कोणीही घेऊ शकले नाही. कादंबरी कायम त्यांच्या ध्यानात होती व असंख्य शब्दांतून ती त्यांना पुन्हा पुन्हा भेटत गेली. नवीन उमेद देत गेली. ज्यामुळे जगाला गुरुदेव नावाचे अमूल्य रत्न मिळाले.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!