नथुराम गोडसेची पुतणी सावरकरांची सून म्हणून आली होती

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब 


नथुराम गोडसे आणि त्याच्या साथीदारांनी मिळून ३० जानेवारी १९४८ रोजी दिल्लीतील बिर्ला हाउस येथे महात्मा गांधींचा खून केला. या कटात स्वातंत्र्यवीर वी. दा. सावरकरांचेही नाव गोवण्यात आले होते. परंतु न्यायालयाला त्यांच्या विरोधात सबळ पुरावे न मिळाल्याने सावरकरांची या आरोपातून निर्दोष मुक्तता करण्यात आली. हा खटला जेंव्हा न्यायालयात सुरु होता तेंव्हा सावरकरांनी आपण नथुरामला ओळखतच नसल्याचे म्हटले होते.

नथुराम गोडसे आणि नारायण आपटे यांना हत्यारे पुरवणाऱ्या दिगंबर बडगेने न्यायालयात असा दावा केला होता की, सावरकर, नथुराम गोडसे आणि नारायण आपटे यांची गांधी हत्येपूर्वी भेट झाली होती.

१४ जानेवारी आणि १७ जानेवारी रोजी या दोघांनी तात्या सावरकरांची भेट घेतली असल्याचा दावा दिगंबर बडगेने केला होता. १७ जानेवारी रोजी रोजी गोडसे आणि आपटे यांची सावरकरांनी भेट घेतली.

शेवटी जाताना, यशस्वी होऊनच परत या, असा आदेशही सावरकरांनी या दोघांना दिल्याचे बडगेने म्हटले. बडगेच्या या वक्तव्यानंतर गांधी हत्येच्या कटात सावरकरही सहभागी असल्याचा संशय बळावला होता.

परंतु सावरकरांनी न्यायालयात दिलेल्या जबाबात आपण नथुराम आणि नारायण या दोघांनाही ओळखत नसल्याचे म्हटले. तसेच गांधी हत्येचे असे कुठले षडयंत्रही आपल्याला माहित नव्हते, त्यामुळे या गोष्टीवरून गोडसे आणि आपटे यांच्याशी आपली चर्चा होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असेही सावरकर म्हणाले होते.

सावरकरांनी आपली बाजू स्पष्टपणे न्यायालयासमोर ठेवली. त्यांनी आपल्या विधानातून गांधी हत्येशी त्यांचा संबंध साफ नाकारला. न्यायालयानेही सावरकारांविरोधात कोणताही ठोस पुरावा न सापडल्याने त्यांना या आरोपातून निर्दोष मुक्त केले.

या खटल्यात नथुराम गोडसेला फाशीची तर गोपाळ गोडसेला १४ वर्षे कारावासाची शिक्षा झाली.

या खटल्यातील इतर आरोपींनी उच्च न्यायालयात धाव घेतली. पण नथुरामने मात्र न्यायालयाच्या निर्णयाचा मान राखत फाशीची शिक्षा स्वीकारली. यावेळी त्याच्या चेहऱ्याबर तिळमात्रही पश्चातापाची भावना नव्हती.

गोपाळ गोडसे जेंव्हा तुरुंगातून सुटून आला तेंव्हा सावरकर आणि गोडसे यांचे संबंध अधिक दृढ झाले. नुसतेच दृढ नव्हे तर हे संबंध नात्यात बदलले. गोपाळ गोडसेंची धाकटी मुलगी ही सावरकर कुटुंबाची सून बनली.

गोपाळ विनायक गोडसे हा नथुरामचा धाकटा भाऊ. याला गांधी हत्येच्या खटल्यात त्याला १४ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. ही शिक्षा संपवून गोपाळ गोडसे तुरुंगातून बाहेर आला तेंव्हा त्याची पत्नी सिंधुताई गोडसे स्वतःचा लोखंडी वस्तू बनवण्याचा छोटासा कारखाना चालवत होती.

१९६५ साली गोपाळ गोडसेची तुरुंगातून सुटका झाली तेंव्हा तो आणि त्याची पत्नी सिंधुताई पुण्यातील सदाशिव पेठेत राहू लागले. पतीला जेल झाल्यावर सिंधुताई सुरुवातीला दत्तात्रय गोडसे याच्या दुकानात काम करत होती.

पण, नंतर १९४८ ते १९६५ दरम्यान तिने प्रताप इंजिनियरिंग नावाने स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय सुरु केला. याच व्यवसायाच्या जोरावर तिने आपल्या कुटुंबाचा गाडा चालवला. या व्यवसायात त्यांचा मुलगा नाना गोडसे त्यांची मदत करत असे. गोपाळ गोडसेचे २००५ मध्ये तर सिंधूताईचे २००७ मध्ये निधन झाले.

गोपाळ गोडसे आणि सिंधुताई गोडसे यांना दोन मुली होत्या. एक विद्युल्लता आणि दुसरी असिलता. असिलताचे दुसरे नाव होते हिमानी सावरकर. याच हिमानी सावरकरमुळे गोडसे आणि सावरकर यांच्यात नाते संबंध निर्माण झाले.

हिमानी सावरकर यांचे निधन झाले तेंव्हा नवभारत टाइम्समध्ये छापून आलेल्या वृत्तानुसार हिमानीचे लग्न वी. दा. सावरकर यांचे लहान भाऊ नारायण सावरकर यांच्या मुलाशी झाले होते.

म्हणजेच हिमानी सावरकर हिचे लग्न वि. दा. सावरकरांच्या पुतण्याशी झाले होते. हिमानी यांनी लग्नानंतर राजकारणातही प्रवेश केला.

हिमानी सावरकर या हिंदू महासभा आणि अभिनव भारत चळवळीशी जोडल्या होत्या. काही काळ त्यांनी या चळवळीचे नेतृत्वही केले. हिमानी सावरकर यांनी २००४ मध्ये लोकसभा निवडणूक लढवली. २००८ मध्ये त्या विधानसभेसाठीही रिंगणात होत्या. परंतु दोन्ही वेळा त्या अपयशी ठरल्या.

नथुराम गोडसेला फाशीची शिक्षा झाली तेंव्हा हिमानी म्हणजेच असिलता फक्त एक वर्षे आठ महिन्यांची होती तर सावरकर गेले तेंव्हा हिमानीचे वय १९-२० वर्षांचे होते. सावरकरांचा मृत्यू २६ फेब्रुवारी १९६६ रोजी झाला.

हिमानी यांना ब्रेन ट्युमर झाल्याने २०१५ मध्ये त्यांचे निधन झाले.

गांधी हत्येचा तपास करणारा अधिकारी रॉबर्ट पायने देखील सावरकर आणि गोडसे एकमेकांना ओळखत नसल्याचा खुलासा केला होता.

या खटल्यावर आधारित ‘द लाईफ अँड डेथ ऑफ महात्मा गांधी नावाचे एक पुस्तकही त्याने लिहिले होते. यात त्याने सावरकराबद्दल लिहिताना म्हटले आहे, “सावरकर कधीच या षडयंत्रातील सहभागी व्यक्तींना भेटले नव्हते. आणि जरी ते भेटले असले तरी त्यांची भेट आणि गांधी हत्येचे षडयंत्र याचा काहीही संबंध नव्हता.

कारण ते कधीच आपल्या घराच्या पायऱ्या उतरून खाली येत नसत. त्यांची तब्येत इतकी खालावली होती की त्यांना कुणाशी बोलणेही जमत नसे. त्यांनी यशस्वी होऊन परत या असे म्हटले असेलच तर त्याचा या हत्येशी काहीही संबंध नव्हता.

त्यांनी हे वाक्य दुसऱ्या कोणत्या तरी संदर्भाने म्हटले असेल. या वाक्याचा आणि या हत्येचा काहीही संबंध नाही. बडगेच्या प्रत्येक वाक्याचा संदर्भच सावरकरांनी बदलून टाकला. त्यांनी न्यायालया समोर हे सिद्ध केले की, त्यांचा आणि गांधी हत्येचा दुरान्वयेही संबंध नाही.”

ज्या गोडसे बंधूंना न्यायालयात ओळख दाखवण्यासही नकार दिला त्याच गोपाळ गोडसेची मुलगी वि. दा. सावरकारांच्या घरची सून झाली. गोपाळ गोडसे जेलमधून परत आल्यानंतर, सावरकर आणि गोडसे यांच्यातील संबंध दृढ झाले.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!