जेव्हा लिव्ह इनचा अर्थही माहिती नव्हता तेव्हा राम मनोहर लोहिया “लिव्ह-इन-रिलेशनशिप”मध्ये राहत होते

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


भारतीय राजकारणात राम मनोहर लोहिया यांचे नाव खूपच आदराने घेतले जाते. भारतीय राजकारणात कधीकाळी लोहिया यांचा मोठा दबदबा होता. त्यांच्या मुशीत तयार झालेले काही दिग्गज राजकारणी आजही त्यांची विचारधारा जपत त्यांच्या वाटेने चालण्याचा प्रयत्न करत आहेत.

राम मनोहर लोहिया यांनी एका बंधमुक्त समाजाचे स्वप्न पहिले. जिथे कसलाही उच्चनीचपणा, भेदभाव नसेल. जातीभेद असो धर्मभेद असो की लिंगभेद त्यांनी या सर्वांना त्यांनी नाकारले आणि समताधीष्ठीत समाज रचनेचे स्वप्न पहिले. स्त्रियांच्या बाबतीतही त्यांचे विचार उदार आणि व्यापक होते.

लोहिया यांनी जर्मनीतून उच्च शिक्षण घेतले. मराठी, हिंदी, बंगाली या देशी भाषांसह इग्रजी, जर्मन, आणि फ्रेंच या परकीय भाषेवरही त्यांचे प्रभुत्व होते. त्यांनी आपला पीएचडीचा शोधनिबंध जर्मन भाषेतूनच लिहिला होता. शालेय जीवनापासूनच त्यांनी आपल्या कुशाग्र बुद्धीमत्तेची झलक दाखवली होती.

ते आजन्म अविवाहित राहिले असले तरी त्यांची मैत्रीण रोमा मित्रासोबत ते लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहत होते.

राम मनोहर लोहिया यांच्या आयुष्यातील या क्रांतिकारी घटनेकडे मात्र आजवर अनेकांनी दुर्लक्ष केले. १९५०-६०च्या दशकात भारतीयांना लिव्ह-इनचा अर्थही माहित नसेल. त्याकाळी राम मनोहर लोहिया यांनी हे धाडसी पाउल उचलले. ही गोष्ट त्यांच्या खाजगी जीवनाशी संबधित असली तरी, राजकारणात रमणाऱ्या व्यक्तींच्या प्रतिमाभंजनाला वेळ लागत नाही.

लोहियांना अनेक मैत्रिणी होत्या. स्त्री-पुरुष नात्यात प्रगल्भता आणि सामंजस्य असावे या मताचे लोहिया होते. त्यांच्या संपर्कात येणाऱ्या स्त्रियांवर त्यांच्या बुद्धीमत्तेची, स्पष्टवक्तेपणाची आणि साध्या पण, आकर्षक व्यक्तिमत्वाची छाप पडे.

कुठल्याही मैत्रिणीमुळे मात्र त्यांच्या जीवनात कसलेच विवादास्पद प्रसंग घडले नाहीत. यावरून त्यांनी आपले चारित्र्य कसे जपले होते याची कल्पना येईलच. त्यांच्या अनेक मैत्रिणी होत्या हे खरे असले तरी त्यांनी आपली मैत्री कधीच लपवून ठेवली नाही. त्यामुळे त्याचा सार्वजनिक जीवनावर काही विशेष परिणाम झाला नाही. ते प्रामाणिक होते आणि तत्वनिष्ठ होते.

जर्मनीहून परतल्यानंतर लोहिया गांधीजींसोबत स्वातंत्र्य लढ्यात उतरले. तेंव्हाही रोमा यांनी त्यांना साथ दिली. यादरम्यान ते एकमेकांच्या जास्त जवळ आले. १९४२ साली लोहिया यांना ‘चले जाओ’ आंदोलनात सहभागी झाल्याने अटक झाली. त्यावेळीही रोमा त्यांच्यासोबतच होत्या. रोमा यांनी लोहियांच्या प्रत्येक चांगल्या वाईट काळात त्यांना साथ दिली.

शिडशिडीत उंच बांध्याच्या रोमा यांचे व्यक्तिमत्व आकर्षक होते. सोबत बुद्धीचे तेज असल्याने त्यांच्या व्यक्तिमत्वाला एक वेगळीच झळाळी येत असे. सौंदर्य आणि तर्कबुद्धीमुळे सर्वांवर त्यांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडत असे.

रोमा यांचे बंगाली कुटुंब उदारमतवादी विचारसरणीचे होते. त्यांच्यावर कम्युनिस्ट विचारसरणीचा जास्त प्रभाव होता.

त्यांचे मोठे भाऊ मोठे कम्युनिस्ट नेते होते आणि बंगाल सरकारमध्ये मंत्रीही होते. त्या स्वतः प्रखर बुद्धिवादी होत्या आणि स्पष्टवक्त्या होत्या.  त्यांच्या व्यक्तिमत्वावर ‘सिमोन-दि-बोव्हा’चा खूप प्रभाव होता. युरोपात शिक्षण घेण्याच्या काळात त्यांचा आणि सिमोनचा संपर्कही आला होता. त्यांनी सिमोनची मुलाखतही घेतली होती.

१९३०च्या आसपास जेंव्हा लोहिया जर्मनीच्या हमबोल्ट विद्यापीठात मास्टर्स आणि पीएचडी करत होते तेंव्हा रोमा युरोपातच उच्च शिक्षण घेत होत्या. दोघेही एकमेकांना चांगले ओळखत होते. त्याकाळी दोघांमध्ये पत्राद्वारे संवादही होत असे.

एखाद्या भावूक प्रियकराप्रमाणे लोहिया रोमा यांना भेटण्यास आतुर असत. त्यांच्या अतिव्यस्त जीवनशैलीतूनही त्यांना रोमा यांच्यासोबत वेळ घालवायला आवडत असे. हा वेळ कधी कुठे कसा घालवायचा याचे ते पूर्ण नियोजन करत आणि रोमाला पत्राद्वारे कळवत. कधीकधी त्याच्या भेटीत खंड पडला आणि याला जर रोमाच जबाबदार असेल तर ते तिच्यावर प्रचंड नाराजी व्यक्त करत.

एखाद्या मजनूप्रमाणे दिवसातून तीन-तीन वेळा तिला पत्र पाठवून तिच्याशी संवाद साधत. त्यांच्यातील पत्रव्यवहारही त्यांच्या वागण्याप्रमाणेच अगदी खुला होता. यात राजकारणापासून त्यांच्यातील भावनिक गुंत्यापर्यंत सगळ्या विषयांची चर्चा केलेली असे. या पत्रात व्यक्त केलेल्या भावनेवरूनच लक्षात येते की लोहीयांना एका मिनिटासाठीही रोमचा विसर पडत नसे.

लोहिया यांच्या संपर्कात येणाऱ्या महिला देखील बुद्धिमान आणि आधुनिक विचारसरणीच्या असत. परंतु रोमा यांच्याशी असलेले त्यांचे भावनिक बंध काही वेगळेच होते. इतर कुठल्याही मैत्रिणीशी त्यांचे असे सूर जुळले नाहीत. रोमा यांनाही त्यांच्या इतर मैत्रिणींबद्दल कसलेच आक्षेप नव्हते.

भारतात १९५०-६०च्या दशकात लिव्ह-इनमध्ये राहण्याची संकल्पनाच किती क्रांतिकारी ठरली असेल याची कल्पनाच केलेली बरी! अशा काळात हे दोघे लिव्ह-इनमध्ये एकत्र राहत होते.

भारतीय समाज त्याकाळी किती जुनाट रूढी-परंपरांनी ग्रस्त होता हे वेगळे सांगण्याची गरज नाही. परंपरेची ही बंधने तोडून विद्रोह करणे सोपे नव्हते. तेंव्हाची समाजव्यवस्था आणि मान्यता यांच्या दृष्टीने पाहता हे एक क्रांतिकारी पाउल होते. तेंव्हाच समाज अनेक प्रकारच्या बंधनांनी बांधलेला होता. लग्नाशिवाय कुठल्याही जोडप्याने एकत्र राहणे पाप समजले जात असे.

१९६०च्या दशकात लोहिया संसदेत खासदार म्हणून निवडून गेले तेंव्हा त्यांना गुरुद्वारा रकाबगंज येथे एक सरकारी निवासस्थान मिळाले होते. या घरातच रोमा आणि लोहिया एकत्र राहत होते.

प्रत्येक येणाऱ्या-जाणाऱ्या व्यक्तीसोबत दोघेही मोकळेपणाने भेटत, बोलत असत. यावेळ लेखक अयुब सैय्यद एकदा लोहीयांची मुलाखत घेण्यास त्यांच्या घरी गेले होते. लोहियांनी अयुब यांना विस्तृत मुलाखत दिली. यावेळी त्यांनी रोमा यांना सूचनाही दिल्या की, मुलाखत संपेपर्यंत मला कसलाही डिस्टर्ब होणार नाही याची खबरदारी घे! स्वतः अयुब यांनी आपल्या पुस्तकात या घटनेचा उल्लेख केलेला आहे.

लोहिया आयुष्यभर अविवाहित राहिले असले तरी रोमा यांची साथ त्यांनी कधीच सोडली नाही. रोमाही शेवटपर्यंत सावलीसारख्या त्यांच्यासोबत राहिल्या. दोघांच्याही नात्यात प्रगल्भता आणि सामंजस्य होते.

रोमा मित्रा दिल्लीच्या प्रसिद्ध मिरांडा हाउस कॉलेजमध्ये इतिहासाच्या प्राध्यापिका होत्या. १९४९ ते १९७९ पर्यंत त्यांनी या कॉलेजमध्ये शिकवण्याचे काम केले. रोमा एक विद्यार्थीप्रिय शिक्षिका होत्या. त्यांचे विद्यार्थी आज देशात परदेशात मोठमोठ्या पदावर आहेत. पण, ते आपल्या या प्रिय शिक्षिकेची आजही आठवण काढतात.

राम मनोहर लोहिया आणि रोमा मित्रा यांच्यातील हे प्रेमसंबंध स्त्री-पुरुषांतील सुदृढ नाते कसे असावे यासाठी एक आदर्श उदाहरण आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!