आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
ग्रीक संस्कृतीला युरोपातील पहिली ज्ञात संस्कृती मानलं जातं. इतिहासकारांचा असा विश्वास आहे की, ग्रीसच्या स्थानिक लोकांना मिनोअन लोकांनी पराभूत केलं आणि गुलाम बनवलं. त्यांनी आपल्या मूळ विचारांनी ग्रीक संस्कृतीचा मोठ्या निष्ठेनं पाया घातला. ग्रीक संस्कृतीचा उदय इसवी सन पूर्व १५०० मध्ये झाला असा अंदाज आहे.
ग्रीस हा युरोपमधील बाल्कन द्वीपकल्पाच्या आग्नेय भागात लहान-मोठ्या बेटांचा समावेश असलेला भूभाग आहे. प्राचीन काळी, या प्रदेशाला आर्यांनी अनुक्रमे हेलास, पेरिकल्स, भारतीयांनी आणि रोमन लोकांनी इसवी सन १४५ मध्ये ग्रीस हे नाव दिले.
एजियन समुद्रात वसलेली क्रेटची संस्कृती हे प्राचीन ग्रीक संस्कृतीचं मूळ मानलं जातं. ही संस्कृती ग्रीसमध्ये ग्रीक वंशाच्या आगमनापूर्वी उदयास आली होती. आर्यांच्या अनेक टोळ्या एजियन प्रदेशात आल्या, ज्यात अचेयन, एओलियन, आयोनियन, डोरियन इत्यादींचा समावेश होतो. पुढे ते सर्वजण स्वतःला हेलन (ग्रीक) म्हणवू लागले.
टेकड्या आणि दऱ्यांनी विभागलेले असल्यामुळं, ग्रीसमध्ये एक विशाल साम्राज्य कधीही निर्माण होऊ शकलं नाही. मात्र, छोट्या राज्यांच्या अस्तित्वामुळे येथे प्रजासत्ताक शासन पद्धतीला चालना मिळाली. वरील सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला शाळेत असताना इतिहासाच्या पुस्तकातून मिळालेली असेल. मात्र, मी जर तुम्हाला म्हटलं ही माहिती खोटी असू शकते तर? हो काही वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेल्या एका लहानशा दगडामुळं ग्रीक संस्कृतीच्या इतिहासातील एका मोठ्या आणि महत्त्वाच्या भागाच्या अस्तित्त्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
इतिहासातील काही घटनांबद्दल नेहमीच शंका उपस्थिती झालेल्या आहेत. या घटना खरोखर घडून गेल्या आहेत का? सापडलेल्या ऐतिहासिक पुराव्यांचं विश्लेषण करून अर्थ लावण्यात मानवाकडून काही चूक तर झालेली नाही ना? असे साधेसोपे प्रश्न इतिहासाच्या सत्यतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यास पुरेसे ठरतात.
कधी-कधी तर एखादी टीचभर आकाराची वस्तूही संपूर्ण संस्कृतीलाच बदलण्याची क्षमता ठेवते. असाच काहीसा प्रकार ‘द पायलोस कॉम्बॅट एगेट’ या लहानशा सीलमुळं घडला आहे. कांस्ययुगातील ग्रीक लोकांनी मानवी समाजात आणलेल्या तत्त्वज्ञानामुळं तसेच प्राचीन इतिहासातील त्यांच्या धार्मिक विश्वासांमुळं आपण त्यांना देवता मानतो. मात्र, द पायलोस कॉम्बॅट एगेटमुळं ही समजूत बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
२८ मे २०१५ रोजी, नैऋत्य ग्रीसमधील पायलोस येथे उत्खनन करत असलेल्या पुरातत्वशास्त्रज्ञांना कांस्ययुगीन कबर सापडली. ज्यामध्ये समृद्ध कलाकृतींनी वेढलेला एक सांगाडा आहे. या थडग्यामध्ये सापडलेल्या कलाकृती पाहिले असता हे थडगं एखाद्या महत्त्वाच्या माणसाचं असण्याची शक्यता आहे. हे थडगं मायसेनिअन संस्कृतीशी संबंधित असून अंदाजे इसवी सन पूर्वी १७५० ते १०५० या काळातील असल्याची शक्यता आहे.
पण, त्यामध्ये सापडलेल्या अनेक वस्तू मिनोअन संस्कृतीशी संबंधित आहेत. ग्रिफिन वॉ*रियरच्या या थडग्याचा शोध हा सर्वात आकर्षक पुरातत्व शोधांपैकी एक मानला जात आहे. कारण, तो मिनोअन आणि मायसेनिअन संस्कृतींना जोडणारा दुआ ठरू शकतो.
एकंदरीत पुरातत्व संशोधनातून असं दिसून आलं आहे की, ग्रीस, प्राचीन इजिप्त, युरोपाच्या अति पूर्वेकडील शहर (सध्याचं टर्की) आणि भूमध्यसागरीय बेटांपर्यंत मायसेनिअन संस्कृतीचा पसारा होता. पुरातत्वशास्त्रज्ञांना सापडलेलं ग्रिफिन वॉ*रियरचं थडगं हे नैर्ऋत्य ग्रीसमधील पायलोस या कांस्ययुगीन शहरातील नेस्टरच्या प्राचीन पॅलेसजवळ सापडलं आहे.
पुरातत्वशास्त्रज्ञ शेरॉन स्टॉकर, सिनसिनाटी विद्यापीठातील जॅक डेव्हिस आणि ग्रीक पुरातत्वशास्त्राचे विद्यापीठातील अभ्यासक कार्ल डब्ल्यू. ब्लेगन यांनी हे ग्रिफिन वॉ*रियरचं थडगं शोधून काढलं आहे. दोन बाय एक मीटरचा बाणाचा दांडा सापडलेल्या ठिकाणी उत्खननाला सुरुवात केली गेली होती.
शाफ्टच्या आत एक लाकडी शवपेटी असलेली दगडी कोठी होती. चेंबरच्या आत आणि शवपेटीवर अर्पण केलेल्या अनेक गोष्टी सापडल्या. दागदागिने, सीलस्टोन, कोरीव हस्तिदंत, कंगवा, सोन्या-चांदीचे गोबलेट्स आणि कांस्य शस्त्रे सापडली. यावरून हे थडगं यो*द्ध्याचं असल्याचं लक्षात आलं.
थडग्यामध्ये सापडलेल्या मानवी सांगाड्याचं विश्लेषण केलं असता, ती व्यक्ती वयाच्या तिशीमध्ये होती. त्याची उंची पाच फूट होती आणि त्याचे केसही लांब होते. यो*द्ध्याच्या सांगाड्याची संगणकीकृत पुनर्रचना केली असता, बंद डोळे, मजबूत जबडा आणि दृढनिश्चयी चेहरा तयार झाला आहे. विश्लेषण असं सूचित करतं की, हा ग्रिफिन यो*द्धा मध्य कांस्य युगात राहत होता.
ग्रीक मुख्य भूप्रदेश आणि क्रेटमधील उत्खननात असं दिसून आले आहे की, इसवी सन पूर्व १६००च्या सुरुवातीस, इतर ठिकाणांच्या तुलनेत ग्रीसमध्ये अत्याधुनिक संस्कृतीचा विकास झाला होता. काही शतकांपासून मुख्य भूप्रदेशातील ग्रीक लोक मिनोअन्सचं अनुकरण करत आले आहेत.
मायसेनिअनचं सुरुवातीचं पॉवर सेंटरच्या असलेल्या पायलॉसमध्ये एश्लर दगडी बांधकाम असलेल्या मोठ्या घरांसारख्या इमारती होत्या. अशाच इमारती क्रेटमधील नॉसॉस येथेही सापडलेल्या आहेत. या इमारतींच्या भिंती रंगवलेल्या होत्या. हा एक प्रकारचा कलात्मक वारसा होता जो मिनोअन्सनं सुरू केला होता.
मायसेनिअन लोकांनी काही ठराविक काळासाठी मिनोअन लक्झरी वस्तू आयात केल्या होत्या. श्रीमंत मायसेनिअन लोकांना या लक्झरी वस्तूंसोबत दफन केलं जाई. काळाच्या ओघात मायसेनिअन समाजानं देखील अनेक बदल स्विकारले. होमरच्या लिटरेचर वर्कमध्ये दाखवल्याप्रमाणं राजवाड्यातील सदस्यांच्या हातात सत्ता केंद्रित झाली होती. ग्रिफिन वॉ*रियर थडग्यात सापडलेल्या वस्तू पुरातत्वशास्त्रज्ञांच्या वरील युक्तिवादाचं समर्थन करणाऱ्या आहेत.
ग्रिफिन वॉरियर थडग्यातील सर्वात आश्चर्यकारक शोध म्हणजे एक लहानसा सीलस्टोन आहे. या सीलस्टोनवर तीन यो*द्ध्यांची चित्रं कोरलेली आहेत. एक यो*द्धा आपल्या प्रतिस्पर्ध्याला मारत आहे आणि तिसरा यो*द्धा खाली मृत पडलेला दिसत आहे.
चित्रातील नायक यो*द्ध्याने मनगटावर घड्याळासारखी एक वस्तू घातलेली आहे. त्याच्या दोन विरोधकांनी समान पॅटर्नचे किल्ट (पुरुषांचे स्कर्ट) घातलेली दिसत आहेत तर नायक कॉडपीस घातलेला आहे. या कोरीव कामातील सर्वच तपशीलावर विश्वास ठेवणे कठीण आहे. कारण, ते केवळ भिंगानं पाहिलं जाऊ शकत आहेत.
हा सीलस्टोन फक्त ३.६ सेमी आकाराचा आहे. एगेट म्हणून ओळखल्या जाणार्या कठोर दगडावर तो कोरलेला आहे. म्हणून त्याला ‘द पायलोस कॉ*म्बॅट एगेट’ असं नाव देण्यात आलं आहे. अथेन्स येथील ब्रिटिश शाळेचे संचालक आणि पुरातत्वशास्त्रज्ञ जॉन बेनेट यांच्या मते हा सीलस्टोन लघु कला आणि विशेषतः एजियन कलेचा उत्कृष्ट नमुना आहे.
या सीलस्टोनवर कोरलेल्या तपशीलामुळे पुरातत्वशास्त्रज्ञ हैराण झाले आहेत. कारण, काही तपशील फक्त अर्धा मिलिमीटर आकाराचे आहेत. याचाच अर्थ कोरीवकाम करणाऱ्यानं ते कोरण्यासाठी भिंगाचा वापर केला असावा. याशिवाय, सीलस्टोनवरील मानवी शरीराचे तपशील आणि सापडलेल्या ग्रिफिन वॉ*रियरचा काळ यामध्ये तफावत आहे. त्यामुळं पुरातत्वशास्त्रज्ञांचा असा युक्तिवाद आहे की, या सीलस्टोनवर सखोल संशोधन झालं तर आतापर्यंत समोर आलेल्या इतिहासामध्ये मोठा बदल होऊ शकतो.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.