जाणून घ्या पुण्यातील प्रसिद्ध पेठांचा इतिहास

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


पुणे म्हटल्यावर सगळ्यात पहिले डोळ्यांसमोर येतो तो इथला इतिहास आणि त्या इतिहासाला जपणाऱ्या इथल्या पेठा. आज यातल्याच तीन पेठांची माहिती आपण या लेखातून घेणार आहोत.

सदाशिव पेठ

ही पेठ सदाशिवराव भाऊ यांच्या स्मरणार्थ वसवण्यात आली. पूर्वी इथे नायगाव नावाचे एक खेडे होते. सन 1769च्या सुमारास आप्पाजी मुंढे यांनी माधवरावांच्या सांगण्यावरून येथे वसाहत निर्माण केली.

सुरुवातीची 7 वर्षे येथे जकात माफ होती. ही जकात किमती वस्तूंवर माफ असल्याने व्यापारी, सावकार, सरदार यांनी याचा फायदा घेतला आणि पेठेत आपले वाडे बांधले.

सन 1765 मध्ये येथे फक्त 87 घरे होती व सन 1818 मध्ये हीच संख्या 752 पर्यंत जाऊन पोहोचली.

पेठेत पाणी पुरवठा करण्याचे काम नाना फडणीस यांनी पार पाडले. आंबेगाव येथून नळाद्वारे पाणी आणून ते पेठेतील हौदात सोडले. त्यावेळी या योजनेला सुमारे 8 हजार रुपये इतका खर्च आला होता.

सदाशिव पेठेचा विस्तार पुढे मोठ्या प्रमाणात झाला. विश्रामबागवाडा, सेनापती गोखले यांचा वाडा तसे गद्रे सावकारांची बाग ही याच पेठेतली. गद्रे सावकारांच्या बागेच्या परिसरातच खुन्या मुरलीधराचे मंदिर आहे.

सदाशिव पेठेत तब्बल 32 मंदिरे आहेत. मंदिरांच्या संख्येत या पेठेचा क्रमांक हा कसबा आणि शुक्रवार यांच्या खालोखाल लागतो. उपाशी विठोबा, पासोड्या मारुती, चिमण्या गणपती, डुल्या मारुती ही काही देवतांची अजब नावेसुद्धा याच पेठेतली.

मराठ्यांच्या इतिहासात मोठ्या प्रमाणावर भर घालणारी संस्था म्हणजे भारत इतिहास संशोधक मंडळ. ही संस्थासुद्धा याच पेठेत आहे याचा सदाशिव पेठकरांना अभिमान असला पाहिजे.

“शनवार” पेठ

खरे तर या पेठेचे नाव मूर्तझा पेठ होते. परंतु या पेठेचा गाजावाजा झाला तो पेशव्यांनी उभारलेल्या त्यांच्या वाड्यामुळे. पेशवाईमध्ये त्या वास्तूला थोरला वाडा असे नाव होते. अर्थात शनिवार पेठेत असल्याने त्याला पुढे शनिवार वाडा असे म्हणले जाऊ लागले आणि हीच पुण्याची खरी ओळख बनली.

रामशास्त्री प्रभुणे यांचा वाडासुद्धा याच पेठेत होता. पूर्वीच्या काळी शनिवारवाड्याच्या समोरील पटांगणात भाजी मंडई भरत असे.

सन 1764 साली या पेठेत सुमारे 374 घरे होती पण पुढे जसे जसे शनिवार वाड्याचे महत्व कमी होऊ लागले तशी या पेठेतील वस्तीसुद्धा कमी होऊ लागली. सन 1826मध्ये या पेठेत फक्त 159 घरे होती.

शनिवार पेठेतेच ओंकारेश्वर आणि अमृतेश्वर यांसारखी सुंदर पेशवेकालीन मंदिरे आहेत. ओंकारेश्वर मंदिराच्या इथे पूर्वी स्मशान होते. पेठेतील अमृतेश्वर मंदिर हे थोरल्या बाजीराव पेशव्यांच्या बहिणीने बांधले आहे.
शनिवार पेठेत अनेक प्रसिद्ध सरदारांचे वाडे होते. यात सांगलीकर, रास्ते, नातू, मेहेंदळे, गोळे, बिवलकर, थत्ते, राजमाचीकर यांचा समावेश होतो.

रविवार पेठ

रविवार पेठेचे मुळ नाव हे ‘मलकापूर’ पेठ. अहमदनगरच्या निजामशाहीचा वजीर मलिक अंबर याच्या नावावरून ही पेठ वसवण्यात आली. पुण्यात शिवाजी महाराजांचे वास्तव्य होण्याच्या आधीपासून या पेठेत व्यापारी लोकांची वस्ती होती.

पुढे नानासाहेब पेशव्यांच्या काळात म्हणजे सन १७४०-१७४१च्या दरम्यान या पेठेची पुनर्रचना महाजन व्यवहारे-जोशी यांनी केली.

या पेठेत पूर्वीपासूनच सावकारांचे आणि व्यापाऱ्यांचे वास्तव्य आहे. खालच्या मजल्यावर दुकान आणि वर घर अशी साधारण या पेठेतील घरांची रचना होती. ज्या प्रकारचे जिन्नस येथे विकले जात त्यावरून या पेठेतील भागांना नावे पडली. उदाहरणार्थ मोती चौक, सराफ आळी, बोहरी आळी, कापड गंज.

येथे तांबे आणि पितळ या दोन धातूंपासून बनवलेल्या भांड्यांचा व्यापार होत असे. ही भांडी बिदर, हैदराबाद तसे भारतातील इतर शहरातसुद्धा विकली जात. या पेठेत सर्व जातीचे आणि धर्माचे लोक राहत असत.

सन १८००मध्ये या पेठेत सुमारे २००० घरे होती यावरून पेठ किती गजबजली असेल याचा अंदाज येतो. पुढे इंग्रजांच्या आमदनीत पेठेतील रहिवाशांची संख्या रोडावली आणि सन १८३०मध्ये हीच संख्या २००० वरून ६६६ वरती आली.

या पेठेत सरदार हरिपंत फडके यांचा वाडा होता. हा वाडा सन १७९४-९९च्या दरम्यान बांधण्यात आला. वाड्यात तब्बल ७ चौक होते आणि वाड्यात असणाऱ्या भाडेकरुंच्या कडून वर्षाकाठी तब्बल १५०० रुपये इतके उत्पन्न मिळत असे. यावरून वाड्याची भव्यता कळून येते. वाड्यात कात्रज येथील तलावातून पाण्याचा पुरवठा होत असे.


संदर्भ – पुण्याचे पेशवे, अ. रा. कुलकर्णी
Pune Gazetteer, Part 3, Pg. no. 280


या माध्यमावर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मते असतात. संपादक मंडळ त्या प्रत्येक मताशी कदाचित सहमत असेलही.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : 
फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!