आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
कल्पना करा तुम्ही ज्या रस्त्याने रोज वावरता त्या रस्त्यावर अचानक कोणी विमान उतरवलं तर? नक्कीच हे आपल्यासाठी धक्कादायक असणार आहे. मध्यंतरी उत्तर प्रदेशातील हायवेवर फायटर प्लेन उतरविण्याचा प्रयोग केला गेला होता. पण तो राष्ट्रीय महामार्ग ६ किंवा ८ लेनचा नक्कीच असेल.
परंतु एका अमेरिकन वैमानिकाने शहरातील रस्त्यावर विमान उतरवण्याचा पराक्रम केला होता, त्याने दारूच्या नशेत लावलेल्या एका पैजेसाठी न्यूयॉर्कच्या मॅनहॅटन स्ट्रीट या अत्यंत गजबजल्या रस्त्यावर आपाले विमान उतरवले होते. त्याने तब्बल दोन वेळा रस्त्यावर विमान उतरविण्याचा पराक्रम केला होता.
होय, १९५६ साली दुसऱ्या महायुद्धातील एक फायटर पायलट, जो युद्धानंतर कमर्शियल पायलट झाला, त्याने हा पराक्रम केला होता. थॉमस फिट्झपॅट्रीक असे या वैमानिकाचे नाव होते.
१९३० साली अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टनमध्ये थॉमसचा जन्म झाला. त्याने पुढे अमेरिकेच्या नौदलात प्रवेश घेतला आणि दुसऱ्या महायुद्धाच्या काळात त्याची निवड पॅसिफिक महासागरातील एका मोहिमेसाठी करण्यात आली.
या मोहिमेच्या माध्यमातून त्याने अमेरिकन सैन्यात अत्यंत दैदिप्यमान अशी कामगिरी बजावली आणि मग महायुद्ध संपल्यावर तो नौदलातून निवृत्त झाला.
नौदलातून निवृत्तीनंतर देखील त्याने न थांबता अमेरिकन सैन्यात प्रवेश केला आणि कोरियन युद्धात सहभाग नोंदवला.
पुढे त्याला वैमानिक बनण्याची इच्छा जागृत झाली व त्याने एका वैमानिक प्रशिक्षण केंद्रात आपले नाव नोंदवले. यावेळी तो २६ वर्षांचा झाला होता. ३० सप्टेंबर १९५६ साली, न्यूयॉर्क शहरातील एका बार मध्ये तो दारू पित होता. मग तो त्या बार मधून आपल्या फ्लाईंग स्पेसला जाऊन पोहचला व त्याने तिथे असलेलं एक सिंगल इंजिन विमान घेतलं आणि आकाशात उड्डाण केलं. ते विमान घेऊन तो परत त्याठिकाणी जायला निघाला ज्याठिकाणी तो आधी प्यायला बसला होता. आधी एका शाळेच्या प्रांगणात त्याला ते विमान लँड करायचं होतं.
पण त्याला दारूच्या नशेत काहीच न सुचल्याने त्याने ते विमान सेंट निकोलस अव्हेन्यूच्या एका रस्त्यावर उतरवलं. तेव्हा रात्रीचे ३ वाजले होते.
जेव्हा लोक सकाळी उठले तेव्हा त्यांनी रस्त्यावर उभं असलेलं विमान बघितलं आणि त्यांना आश्चर्याचा धक्का बसला !
एका अत्यंत अरुंद रस्त्यावर त्याने केलेलं विमानाचं लँडिंग एक आश्चर्य आणि त्याच्या उत्कृष्ट वैमानिकी कौशल्यांचं प्रतीक होतं. बारमध्ये लावलेल्या एका पैजेनुसार न्यूजर्सीमधून बारमध्ये १५ मिनिटात परत यायचं होतं व त्यासाठी त्याने हा पराक्रम केला होता. त्याच्या या पराक्रमाने पोलीस देखील आचंबित होते. या घटनेच्या दोन वर्षांनी, ५ ऑक्टोबर १९५८ साली, थॉमसने अजून एक विमान मॅनहॅटन स्ट्रीटवर उतरवलं होतं. यावेळी देखील मागच्या वेळीप्रमाणे एक विमान लहान मुलांचं खेळणं असल्यासारखं त्याने न्यूयॉर्कच्या अत्यंत गजबजलेल्या भागात उतरवलं.
त्याने हा पराक्रम एका माणसाच्या खिजवण्यावरून केला होता, जो त्याला म्हणाला होता की त्याने आधी अश्याप्रकारे एखादं विमान उतरवलं होतं. फक्त त्याला दाखवायला म्हणून त्याने हे कृत्य दिवसा ढवळ्या केलं. यावर देखील आधीप्रमाणे त्याने हे सर्व कृत्य दारूच्या नशेत केलं असल्याचा कबुलीजबाब दिला. पण यावेळी त्याच्याकडे वैमानिक असल्याचा कुठलाच पुरावा नव्हता, त्याच्याकडे लायसन्स नव्हतं.
तो यावेळी हा पराक्रम केल्यावर सरळ पोलिसांकडे गेला आणि स्वतःला पोलिसांना सुपूर्द केलं. पोलिसांनी त्याचा या कृत्यावर आश्चर्य व्यक्त केलं आणि त्याला ताब्यत घेतलं.
मागच्या वेळी त्याने हा पराक्रम केला तेव्हा त्याला कोणी तसं करताना बघितलं नव्हतं, पण यावेळी मात्र त्याला अनेक प्रत्यक्षदर्शींनी पाहिलं होतं. हा प्रकार बघणाऱ्यांनी त्याच्या पराक्रमाचं कौतुक केलं, सोबतच आपला रोष देखील प्रकट केला होता.
त्याचा या पराक्रमाने सगळयांना आश्चर्यचकित केलं होतं. पोलिसांनी देखील त्याच्या या साहसावर आश्चर्य व्यक्त केलं होतं.
पहिल्यावेळी एवढा मोठा पराक्रम करून देखील त्याला हवाई हद्द उल्लंघन कायद्यांतर्गत फक्त १०० डॉलर्सचा दंड ठोठावण्यात आला. परंतु दुसऱ्यावेळी मात्र त्याला चांगलीच फटकार पडली, त्यांचं न्यूयॉर्कच्या रस्त्यावर उतरणारं विमान जणू आकाशातुन उतरणारा यमदूत आहे, असं मत लोकांनी मांडलं.
तर न्यायाधीशांनी त्याला मागच्या वेळीच शिक्षा केली असती तर बरं झालं असतं असा शेरा मारला.
यावेळी त्याला चोरीचे विमान शहरात उतरवल्या बद्दल ६ महिन्यांचा कारावास भोगावा लागला. परंतु त्याने दोन वेळा केलेल्या पराक्रमाची चर्चा बराच काळ चालली. त्याने ज्या प्रकारे न्यूयॉर्कच्या अरुंद रस्त्यांवर विमान उतरवले होते, त्यावर आजही अनेक लोक आश्चर्य व्यक्त करतात. महत्वाचं म्हणजे हा अचाट पराक्रम त्याने मद्यधुंद अवस्थेत केला होता.
त्याचा हा पराक्रम न्यूयॉर्क शहराच्या इतिहासात अजरामर झाला आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.