आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
राज्याच्या कानाकोपऱ्यांतून निघालेल्या संतांचे पालखी सोहळे, टाळ-मृदुंगाचा गजर, भारुडांची मौज, यंदा चांगल्या पावसांत पेरणी झाल्याने पंढरपूर क्षेत्रात मोठ्या प्रमाणात येणाऱ्या वारकऱ्यांचा मेळा या सगळ्यामुळे सध्या महाराष्ट्राचे वातावरण चैतन्यमय बनले आहे. आषाढी एकादशीचा सोहळा अवघ्या काही दिवसांवर आला असून सर्वच पालखी सोहळ्यांमधील वारकऱ्यांचा उत्साह शिगेला पोहोचलेला दिसून येतो. जसजसे पंढरपूर जवळ येते, तसतसे पालखी सोहळ्यांमधील रिंगण सोहळे, धावे वाढतच जातात. त्यामुळे “नाचत जाऊ त्याच्या गावा रे खेळिया सुख देईल विसावा रे” हे तुकोबांचे शब्द प्रत्ययाला येत आहेत.
वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचं प्रतीक आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. “ज्या देशातले लोक पंढरीला येतात, तो महाराष्ट्र”‘ अशी महाराष्ट्राची एक व्याख्या ज्येष्ठ समाजशास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ व लेखिका इरावती कर्वे यांनी केली आहे, यावरून महाराष्ट्राच्या लोकजीवनात वारीचे महत्त्व अधोरेखित होते. याशिवाय मराठीतील म्हणी देखील या वारीचे महत्त्व अधोरेखित करतात, कोणत्याही क्षेत्राच्या दृष्टीने एखादे स्थान अतिशय पूजनीय असल्यास त्या स्थानाला त्या क्षेत्राची पंढरी म्हटले जाते. उदाहरणार्थ मुंबईला भारतीय क्रिकेटची पंढरी म्हटले जाते.
खरंतर वारी ही महाराष्ट्राची शतकानुशतके जुनी परंपरा. अगदी संत ज्ञानेश्वर महाराजांचे वडील देखील वारी करत असत. पण या वारीला पालखी सोहळ्याचं स्वरूप दिलं ते तुकोबारायांचे कनिष्ठ सुपुत्र नारायणबाबा मोरे (देहूकर) यांनी. नारायणबाबांकडे त्या काळातील वारकरी संप्रदायाचे नेत्तृत्व होते असे म्हटले तरी चालेल. तुकारामपुत्र म्हणून त्यांना सर्वत्र मान होता. छत्रपती राजाराम महाराज, शाहू महाराज व मराठा मंडळातील सेनापती, सरदारांशी त्यांचे चांगले संबंध होते. त्या आधारे त्यांनी लहान देहू देवस्थानचे रूपांतर मोठ्या संस्थानमध्ये केले. देहूला वारकरी पंथाचे मुख्य केंद्र बनवले.
एकदा नारायणबाबांना स्फूर्ती झाली, की आपण प्रतिवर्षी पंढरीची वारी करतो; दिंडी घेऊन जातो. ही वारी ज्ञानोबा-तुकोबांच्या बरोबर का करू नये? हे संत जरी देहरूपाने आपल्या समवेत नसले, तरी प्रतीकात्मरीत्या आणि नामरूपाने असू शकतात. मग त्यांची पालखी सज्ज करून तिच्यात तुकाराम महाराजांच्या पादुकांची प्रतिष्ठापना केली. ही पालखी मिरवीत ते आळंदीला गेले. तेथे त्याच पालखीत ज्ञानोबारायांच्या पादुका ठेवल्या व ही जोडपालखी पंढरपूरला नेली, आणि तिथपासून महाराष्ट्रात पालखी सोहळ्याला सुरुवात झाली.
हैबतबाबा आरफळकर हे ग्वाल्हेरच्या शिंदेंच्या दरबारी सरदार होते, सरदारकी वगैरे सोडून, तिथून परत आपल्या मूळ गावी, आरफळ येथे येत असताना चंबळच्या खोऱ्यात त्यांना एका डाकूने कैद केले, तेव्हा त्यांनी संत ज्ञानेश्वरांचा धावा केला, काही दिवसांनी डाकूला पुत्रप्राप्ती झाली आणि त्याने त्याच आनंदात आरफळकरांना मुक्त केले, मिळालेले हे जीवनदान त्यांनी संत ज्ञानेश्वरांच्याच सहवासात व्यतीत करायचे ठरवले आणि थेट आळंदी गाठली.
१८३१ साली देहू संस्थानमध्ये अंतर्गत वादविवाद सुरु झाले, ते पाहून आळंदीला वास्तव्यास असलेल्या हैबतबाबा आरफळकर यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांचा स्वतंत्र पालखी सोहळा सुरु करण्याचा निर्णय घेतला. या पालखी सोहळ्याला राजवैभव प्राप्त व्हावे असे त्यांच्या मनी होते, त्यांनी आपले मनोगत ग्वाल्हेर दरबारी कळवले, परंतु ग्वाल्हेर-आळंदी हे अंतर जास्त असल्याने ग्वाल्हेरकर शिंद्यांनी पालखी सोहळ्याला लवाजमा पुरवण्याची जबाबदारी दक्षिणेतील अंकली येथे असलेल्या शितोळे सरकार यांच्यावर सोपवली. त्यानुसार सध्या कर्नाटकात असलेल्या अंकली येथील शितोळे सरकारांनी अश्व, गज, पालखी, अब्दागिरी, असा सर्व राजेशाही लवाजमा पुरवला आणि १८३१ साली संत ज्ञानेश्वरांचा पालखी सोहळा सुरु झाला.
ग्वाल्हेरकर शिंद्यांनी संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात वीणा मंडप, महाद्वार आणि आजूबाजूच्या ओवऱ्या बांधून दिल्या, त्यांच्या सन्मानार्थ आजही संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा पुण्याहून सासवडला जात असताना, महादजी शिंदे छत्रीजवळ भैरोबा नाला याठिकाणी आरती होते.
कालांतराने ज्ञानोबा-तुकोबांबरोबरच अन्य संतांचे पालखी सोहळे देखील आषाढीच्या निमित्ताने पंढरपूर क्षेत्री यायला सुरुवात झाली. या व्यतिरिक्त अन्य असे काही वैशिष्ट्यपूर्ण पालखी सोहळे आहेत, ज्यांच्याबद्दल आपल्याला क्वचितच माहिती असते, अशाच काही वैशिष्ट्यपूर्ण पालखी सोहळ्यांबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
१. संत नामदेव महाराज –
संत नामदेवरायांचे समाधीस्थळ हे पंढरपूरच आहे. त्यामुळे नामदेवरायांचा पालखी सोहळा आषाढी वारीसाठी निघत नाही. पंढरपूरला येणाऱ्या सर्व संतांच्या स्वागतासाठी मात्र नामदेवरायांची पालखी पंढरपूरहून वाखरी याठिकाणी संतांना सामोरी जाते. त्यानंतर सर्व संतांसोबत नामदेवांची पालखी पंढरपूरला येते.
याशिवाय कार्तिकी वारीला नामदेवरायांचा पालखी सोहळा पंढरपुरवरून आळंदी येथे कार्तिकी वारी व ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी सोहळ्यासाठी जातो. स्वतः पांडुरंग नामदेवरायांसोबत ज्ञानेश्वरांना भेटायला जातात अशी भाविकांची श्रद्धा आहे. अलीकडे काही वर्षांपासून विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीनेसुद्धा कार्तिकी वारीनिमित्त पंढरपूर ते आळंदी असा स्वतंत्र पालखी सोहळा सुरु केला आहे.
२. संत सावता महाराज –
एका आख्यायिकेनुसार सावता महाराजांनी आपल्या मळ्यातच पांडुरंग पाहिला व त्यामुळे ते कधीच पंढरपूरला गेले नाहीत. देवच त्यांना भेटायला त्यांच्या मळ्यात आले. सावता महाराजांचा सुप्रसिद्ध “कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी” हा अभंग सुरेश वाडकरांनी स्वरबद्ध केला आहे.
“नेमाने वारी न करणारे सावता महाराज विठ्ठल भक्त कसे?” या प्रश्नाने आख्यायिकेची सुरुवात होते, याच आख्यायिकेनुसार, पांडुरंग स्वतः अरण येथे येऊन सावता महाराजांच्या पोटात लपतात. इतर संत देवाला शोधू शकत नाहीत व त्यांना सावता महाराजांची महती कळते असा या आख्यायिकेचा शेवट होतो.
त्यामुळे अजूनही सावता महाराजांची पालखी पंढरपूरला येत नाही. आषाढी वारी झाल्यानंतर पांडुरंगाचीच पालखी सावता महाराजांच्या समाधी सोहळ्यास अरण येथे जाते. सावता महाराजांचा समाधी दिवस आषाढ वद्य चतुर्दशीला अरण गावी साजरा केला जातो.
३. संत गजानन महाराज (शेगाव) –
संत गजानन महाराजांचा पालखी सोहळा हा पंढरपूर क्षेत्री सर्वांत दूरच्या अंतरावरून येणारा पालखी सोहळा आहे. शेगाव ते पंढरपूर हे अंतर सुमारे ७५० किलोमीटर असून या अंतरामध्ये अनेक तीर्थक्षेत्रे लागतात.
श्री क्षेत्र शिरपूर जैन, श्री क्षेत्र नरसी नामदेव, श्री क्षेत्र औंढा नागनाथ, श्री क्षेत्र परळी वैजनाथ, श्री क्षेत्र अंबाजोगाई, श्री क्षेत्र तुळजापूर, श्री क्षेत्र सोलापूर, श्री क्षेत्र मंगळवेढा ही प्रमुख तीर्थक्षेत्रे आहेत. यांपैकी श्री क्षेत्र शिरपूर जैन ही जैनांची पंढरी मानली जाते.
श्री गजानन महाराज संस्थानने इसवी सन १९६८ पासून श्री क्षेत्र पंढरपूरला पायी वारी व श्री क्षेत्र आळंदीला मोटारीने पालखी दिंडीसह नेण्याचा अभिनव उपक्रम सुरू केला. श्री गजानन महाराज संस्थानाप्रमाणेच हा पालखी सोहळा देखील अतिशय शिस्तबद्ध रीतीने चालतो, म्हणूनच की काय याला “पायदळ” वारी देखील म्हटले जाते.
४. संत गोरा कुंभार –
संत गोरोबा काकांची पालखी आषाढी वारीला न येता कार्तिकी वारीला पंढरपूरला येते. यामागे निश्चित कारण ज्ञात नसले तरी परंपरेने ही पालखी कार्तिकी वारीला येते.
या पालखी सोहळ्यात रथाचा वापर करत नाहीत. पूर्ण मार्गावर पालखी खांद्यावर वाहून नेतात.
५. संत मुक्ताई –
संत मुक्ताईंचा पालखी सोहळा हा देखील दुरून येणारा पालखी सोहळा असून साडे पाचशे किलोमीटर अंतर चालून, ३३ दिवसांचा प्रवास करून ही पालखी पंढरपूरला पोहोचते. संत मुक्ताबाईंची निर्याण स्थळे दोन ठिकाणी दाखवतात. तापीतीरी मेहूण व कोथळी, या दोन्ही ठिकाणाहून संत मुक्ताबाईंची पालखी येते. याशिवाय जळगाव येथील श्री राम मंदिरातूनसुद्धा संत मुक्ताबाईंची पालखी येते. अशाप्रकारे मुक्ताबाईंच्या तीन पारंपरिक पालख्या पंढरपूरला येतात.
याशिवाय आळंदी येथूनसुद्धा एक नवीन मुक्ताबाई पालखी सोहळा सुरु झाला आहे.
इसवी सन २००० च्याच सुमारास पंढरपूर शहरात आषाढी वारीच्या निमित्ताने सुमारे १५० पालखी सोहळे आले होते. अलीकडच्या काळात पश्चिम महाराष्ट्रात पालख्यांना मिळणारा प्रतिसाद बघता असे अजून काही सोहळे सुरु होऊ शकतात.
एकाच संताचे अनेक पालखी सोहळे असण्यामागे अनेक कारणे असू शकतात. आधीच सुरु असलेल्या सोहळ्यात सामील झालो तर वारकरी म्हणून सामील व्हावे लागते. मानकरी व इतर हक्क हवे असतील तर नवीन पालखी सोहळा काढणे हाच एक पर्याय आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.