आजची टुकार पत्रकारिता बघून न्यूजट्रॅकची आठवण झाल्याशिवाय राहत नाही

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


१९८० च्या दशकात भारतात बातमीपत्र या व्यतिरिक्त बातम्या, देशातील घडामोडी समाजापर्यंत पोहचण्याचा एकमेव स्त्रोत म्हणजे “दूरदर्शन”. त्यावेळी फक्त सरकारी वाहिन्यांद्वारे बातम्या प्रसारित केल्या जात असत. आज जरी आपल्याला या आकांडतांडव करणाऱ्या वृत्तवाहिन्यांचा वैताग आला असला आणि दूरदर्शनच्या बातम्या “सटीक”, “टू द पॉइंट” वाटत असल्या तरी त्या काळी मात्र चित्र पूर्णपणे उलट होतं.

दूरदर्शन ताज्या घडामोडी, देशात व जगात सुरू असलेली उलाढाल हे सगळे जनतेपर्यंत पोहोचवत नव्हते. ठराविक बातम्या, सरकारला जे योग्य वाटेल तेच मुद्दे पोहचवल्या जात होते. अर्थातच, लोक याला वैतागली होते. त्यांना खऱ्या बातम्या आणि कटु सत्य जाणून घेण्याची गरज भासत होती. त्याकाळात तर कित्येक लोकांनी दूरदर्शन पाहणे देखील सोडले होते. काही नाईलाजास्तव पाहत होते.

लोकांपर्यंत खऱ्या बातम्या पोहोचवण्याची गरज आहे हे सध्या इंडिया टुडे मासिकाचे संचालक असलेले, अरुण पुरी व त्यांची बहीण न्युज लाँड्रीच्या मुख्य संपादिका मधु त्रेहान यांनी हेरलं. इथूनच सुरुवात झाली पत्रकारितेच्या विश्वातल्या क्रांतीला. अशी क्रांती ज्यामुळे पत्रकारितेची मोजकी चौकट मोडून पडली व नवीन प्रयोग पार पाडून प्रगतीची वाट मोकळी झाली.

१९८९ साली अरुण व मधु यांनी “न्युजट्रॅक” नावाचं एक व्हिडिओ मॅगझिन सुरु केलं. याच व्यासपीठाने आपल्याला विक्रम चंद्रा, मृत्युंजय झा, गीता दत्ता, दीपक चौरसिया यांसारखे उत्कृष्ट पत्रकार दिले. हेच मॅगझिन आता “आजतक” म्हणून ओळखलं जातं.

मधु त्रेहान या कोलंबिया युनिव्हर्सिटी येथून पद्विधर होत्या व तब्बल वीस वर्षे त्या अमेरिकेत होत्या. तर, अरुण पुरी त्यांच्या इंडिया टुडे या मासिकाच्या कामात व्यस्त होते.

दूरदर्शनच्या त्या पारंपरिक व टिपिकल बातम्यांच्या दशकात हे व्हिडिओ स्वरूपातले मासिक समस्त जनतेसाठी कुतूहलाचा, कौतुकाचा विषय होता. कारण पहिल्यांदा एखादी खाजगी संस्था बातम्या प्रसारित करणार होती.

न्युजट्रॅकला वृत्तवाहिनीच्या स्वरूपाचे जगासमोर आणण्यात अरुण व मधु यांना पहिला अडथळा आला तो ब्रिटिशकालीन कायद्यांचा, जे स्वातंत्र्यानंतरही कुठलाच बदल न करता पाळले जात होते. “दि इंडियन टेलीग्राफी ऍक्ट, १९३३” अंतर्गत बातम्यांचे प्रसारण हे पूर्णपणे सरकारकडे होते. कोणत्या बातम्या लोकांपर्यंत पोहचवायच्या हे सर्वस्वी सरकार ठरवत असे.

पण न्युजट्रॅक हे एक मासिक असल्यामुळे त्यात बाधा आली नाही. प्रवाहाविरुद्ध जाऊन खऱ्या व सटीक बातम्या लोकांपर्यंत पोहचवू लागले.

द न्यूयॉर्क टाईम्सच्या एका रिपोर्ट नुसार “८४० मिलियन जनसंख्या असलेल्या भारतात फक्त काही हजार लोकांनी हे टेप विकत घेणे किंवा भाड्याने घेणे सुरू केले”.

या व्हिडिओ कॅसेटची विक्री किंमत $8 इतकी होती. त्यामुळे भाड्याने घेणे स्वस्त असल्यामुळे लोक भाड्याने घेणे पसंत करू लागले. पण या बातम्या हिंदी व इंग्रजी भाषेत रेकॉर्ड केल्या जायच्या. त्यामुळे सुशिक्षित किंवा हिंदी भाषिक लोक न्युजट्रॅककडे जास्त आकर्षित झाले. वीसीआरच्या मागणीत वाढ होण्यासाठीसुद्धा कुठे ना कुठे न्युजट्रॅकच कारणीभूत आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

अरुण पुरी म्हणतात, “आम्ही न्युजट्रॅक सुरू केले तेव्हा पत्रकार हातात माईक घेऊन बातमी मिळवण्यासाठी गल्लो गल्ली फिरणे फारच विचित्र व कधीही कोणीही न पाहिलेले दृश्य होते”. त्यामुळे लोकांना हे विचित्र वाटणे साहजिक होते.

न्युजट्रॅकची टीम महिनाभर संपूर्ण देशात घडणाऱ्या बातम्या गोळा करणे, मुद्दे व्यवस्थित मांडणे हे करीत असे व मधू स्वतः प्रेझेंट करून व्हिडिओ रेकॉर्ड करून, एडिट करून महिनाभरात घडलेल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी कॅसेटमार्फत लोकांपर्यंत पोहचवत. लोकांना हळूहळू हा प्रकार आवडू लागला आणि अधिकाधिक प्रेक्षक या व्हिडिओ मासिकाकडे वळू लागले.

कॅसेट बाजारात आणण्याआधी पुरी व त्रेहान यांनी लाखो रुपये खर्च करून एक सर्वे केला, ज्यात लोकांना “तुम्हाला व्हिडिओ टेपद्वारे तासाभरात ठळक घडामोडी ऐकायला आवडतील का? असे विचारले होते”.

पण लोकांपुढे दूरदर्शनचे उदाहरण असल्यामुळे बहुतांश लोकांनी याला नापसंती दर्शवली. सर्वे जरी नकारात्मक असला तरी अरुण व मधु यांनी आपल्या आत्मविश्वासामुळे ही रिस्क स्वीकारली व न्युजट्रॅकची सुरुवात केली ज्याला पुढे दणाणून यश मिळवले.

सुरुवातीला न्युजट्रॅकच्या कॅसेट ३० मिनिटांची असायची. त्यात ३-४ महत्त्वाच्या बातम्या दाखवल्या जायच्या. पण हळूहळू प्रसिध्दी मिळत गेली. लोकांना बातम्यांची ही पद्धत आवडू लागली. अनेक कंपन्यांनी जाहिराती करता आपले स्लॉट बुक करणे सुरू केले.

याचा परिणाम असा झाला की कॅसेटचे टायमिंग वाढले. ३० मिनिटांचे ६० मिनिटं आणि शेवटी ६० वरून ९० मिनिटे इतके झाले. पूर्वी ३-४ मोठे स्कुप असणारी कॅसेट आता ६-७ मोठ्या व महत्त्वाच्या बातम्या दाखवू लागली.

न्युजट्रॅक एकमेव अशी टीम होती जी बाबरी मस्जिद प्रकरणात कॅमेऱ्यासह अयोध्येत उपस्थित होती.

याशिवाय १९९३च्या मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी याकुब मेमनची मुलाखत पहिल्यांदा घेणारी, हूच ट्रॅजेडीचा पर्दाफाश करणारी टीम न्युजट्रॅकचीच होती.

मधु सांगतात “फक्त धमकावणे व आम्हाला आतील सोर्सपर्यंत न पोहचू देणे, याव्यतिरिक्त सरकारी यंत्रणेकडून आम्हाला कुठलाही त्रास झाला नाही.”

१९९१ साली जेव्हा ली बरलायझेशानला सुरुवात झाली, न्युजट्रॅकचे काम सुरूच होते. जेव्हा कायदे सुधारून खाजगी कंपन्यांना सुद्धा पत्रकारितेचे अधिकार देण्यात आले तेव्हा कणखर, सत्याचा मार्ग मोकळा करणारे व निडर पत्रकारिता असलेले न्युजट्रॅक 31 डिसेंबर २००० साली “आज तक” न्युज चॅनलमध्ये परिवर्तित झाले.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!