आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
मेडिकल कोलेजमध्ये ॲडमिशन घेऊन शिस्तप्रिय डॉक्टर अस्थानाला त्रास देणारा आणि डॉक्टर होण्याची स्वप्ने पाहणारा मोठ्या पडद्यावरचा मिश्कील मुन्नाभाई आपल्याला लक्षात असेलच. गुन्हेगारीच्या भयानक जगात वावरणारा हा मुन्नाभाई त्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्याच्या आत लपून राहिलेला अस्सल ‘माणूस’ आपल्यासमोर उभा राहतो.
व्हरांड्यात झाडू मारणाऱ्या म्हाताऱ्याला ‘थँक यु’ म्हणत मिठी मारणारा, ऐन उमेदीच्या काळात कर्करोगाच्या भयंकर विळख्यात सापडलेल्या ‘जहीर’चे सांत्वन करण्यासाठी त्याला मिठी मारणारा दिलखुलास मुन्नाभाई आपला “दिल खुश” गेला.
थोड्या फार फरकाने या कथेच्या जवळ जाणारी एक कथा खऱ्यात घडलीये! कर्नाटकातल्या सुभाष पाटील नावाच्या एका तरुणाने १४ वर्षे तुरुंगात काढल्यानंतर डॉक्टरकीची पदवी मिळवलीय. इथून पुढचे आयुष्य तो आता रुग्णांची सेवा करत घालवणार आहे.
माध्यमांनी घेतलेल्या मुलाखतींमध्ये त्याच्या शिक्षा होण्यापासून, १४ वर्ष जन्मठेपेची शिक्षा भोगून डॉक्टर होण्यापर्यंतचा प्रवास त्याने उलगडला आहे.
झालं असं की, सुभाषने २००० साली कर्नाटकात कलबुर्गी इथल्या वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसला प्रवेश घेतला. डॉक्टर होण्याचं त्याचं स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी तो मेहनत करू लागला. कॉलेजच्या काळात पद्मावती नावाच्या एका मुलीच्या तो प्रेमात पडला. तीही त्याच महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षण घेत होती.
अशोक गुत्तेदार नावाच्या एका कंत्राटदाराशी पद्मावतीचा आधीच विवाह झाला होता.
अशोक आणि पद्मावती यांच्यात विवाहानंतर अनेक कारणांनी कटुता आली. पद्मावती कॉलेजमध्ये शिकत असताना सुभाष तिच्या जवळ आला. ही बातमी अशोकला समजताच त्याने सुभाषला मारून टाकण्याच्या धमक्या द्यायला सुरुवात केली.
वरचेवर त्याच्या धमक्यांचे प्रमाण वाढत गेले. याच दरम्यान अशोक बेंगलोर येथे आपल्या आईच्या घरी आलेला असताना सुभाषने त्याचा पाठलाग केला आणि त्याच्या घरीच बेडरूममध्ये तो बेसावध असताना शॉ*टगन वापरून त्याची ह*त्या केली.
त्याच्या या गुन्ह्यात अशोकची पत्नी पद्मावतीही त्याच्या सोबत होती. आपल्या संबंधांच्या आड येणाऱ्या अशोकला त्या दोघांनी ठरवून संपवले होते.
यानंतर या गुन्ह्याच्या पोलीस तपासात सुभाष आणि पद्मावती यांना अटक करण्यात आली. अशोकच्या ह*त्येची शिक्षा म्हणून न्यायालयाने पद्मावती आणि सुभाष यांना चौदा वर्षांच्या जन्मठपेची शिक्षा सुनावली.
या गुन्ह्याचे माध्यमांमध्ये तेव्हा झालेले वार्तांकन उपलब्ध आहे. (येथे वाचा). पोलीस तपासात सुभाष आणि अशोक या दोघांच्या कुटुंबांचे पूर्वीपासूनच एकमेकांशी वैर असल्याचे आढळून आले. सुभाषचे वडील तुकाराम पाटील हे गुलबर्गा जिल्हा परिषदेचे सदस्य होते.
गुलबर्गा येथील वास्तव्यात सुभाष आणि अशोक यांची कुटुंबे शेजारी राहत होती.
हिरण्य कुक्केशी नावाच्या एका कंत्राटदराचा गुलबर्ग्यात खू*न झाला होता. हे हिरण्य म्हणजे सुभाषचे काका. अशोक गुत्तेदारच्या कुटुंबातील काही सदस्यांवर सुभाषच्या काकांची हत्या केल्याचा आरोप होता.
व्यवसायातील वादातून ही ह*त्या झाली होती. याच शृंखलेतून अशोक गुत्तेदार याची ह*त्या केली असून पद्मावतीचा या ह*त्येची काही संबंध नसल्याचे दाखवण्याचा प्रयत्न सुरुवातीला सुभाषने केला. पण पोलीस चौकशीनंतर त्याने पद्मावतीशी आपले नाते असल्याचे मान्य केले.
यादरम्यान, पद्मावती आणि अशोक यांच्या एमबीबीएसच्या पदवीचे दुसरे वर्ष पूर्ण झाले आणि न्यायालयाने या प्रकणात निकाल दिला.
अशोकच्या ह*त्येच्या आरोपाखाली दोघांनाही चौदा वर्षांच्या जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. २००६ साली दोघांच्याही शिक्षेची सुरुवात झाली, सुरुवातीची तीन वर्षे एका स्थानिक तुरुंगात त्यांना ठेवण्यात आले. पुढे २००९ साली कलबुर्गी मध्यवर्ती कारागृहात त्यांना हलवण्यात आले.
तुरुंगात राहून वैद्यकीय पदवी मिळवणे शक्य नसल्याने त्याने दुसऱ्या वर्षानंतर ते शिक्षण सोडले आणि म्हैसूरच्या मुक्त विद्यापीठात पत्रकारितेच्या डिप्लोमाला प्रवेश घेतला.
२००७ झाली हा डिप्लोमा पूर्ण झाल्यानंतर त्याचं विद्यापीठातून त्याने पुढच्या दोन वर्षात पत्रकारितेत पदव्युत्तर पदवी पूर्ण केली. सोबतच पद्मावतीनेही हा अभ्यासक्रम पूर्ण केला.
चौदा वर्षांची शिक्षा भोगून तुरुंगातून बाहेर आल्यानंतर सुभाषने पद्मावतीशी विवाह केला. एमबीबीएसचा राहिलेला एक वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केला आणि डॉक्टर झाला.
चौदा वर्षांच्या तुरुंगातील आयुष्यात अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या असून त्यांचा आपल्याला पुढील आयुष्यात फायदा होणार असल्याचे सुभाष सांगतो. या संघर्षात त्याच्या वडिलांनी आणि कुटुंबाने त्याला पूर्ण साथ दिली.
तुरुंगात असताना सर्व नातेवाईकांनी पाठ फिरवली होती परंतु आता डॉक्टर झाल्यानंतर सगळे परतत असून त्यामुळे मी आनंदित असल्याचे सुभाष सांगतो.
रुग्णांची सेवा करण्यातच पुढील आयुष्य व्यतीत करण्याचे सुभाषने ठरवले आहे. या संकल्पात त्याची पत्नी पद्मावतीही त्याच्यासोबत आहे.
चौदा वर्षाचा काळ म्हणजे थोडाथोडका नसून आयुष्यातला ऐन उमेदीचा काळ तुरुंगात गेल्यानंतर पुन्हा आपल्या ठरवलेल्या मार्गावर परत येणे म्हणजे सोपी गोष्ट नव्हे, पण सुभाषने ते शक्य करून दाखवलं आहे.
गुन्हेगाराला नव्हे तर त्याच्यातील गुन्हा करण्याच्या प्रवृत्तीला संपवले पाहिजे असे आपण हजारदा ऐकत आलो आहोत, पण या प्रकरणात गुन्हा संपवूनही गुन्हेगार माणूस म्हणून शिल्लक उरतोच हे अधोरेखित झाले आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.