मध्यमवर्गीय लोक त्यांचे स्वप्न “मुंगेरीलाल”च्या माध्यमातून छोट्या पडद्यावर बघत..

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


मध्यमवर्गीय कुटूंबावर आता दैनंदिन मालिका सापडतच नाहीत. सासू-सुनेच्या कारस्थानांनी भरलेल्या मालिकाच आता सगळीकडे दिसतात. विनोदी मालिकांचा दर्जाही आता अगदीच घसरलाय. अशा वेळी ती एक मालिका आठवल्याशिवाय राहत नाही ज्या मालिकेने विनोदाचा आधार घेऊन मध्यमवर्गीयांवर, त्यांच्या स्वप्नांवर भाष्य केले जात असे. या मालिकेचे नाव होते-‘मुंगेरीलाल के हसीन सपने’

“सपनों के दाम नहीं, सपनों के नाम नहीं, सपनों के घोडों पर किसी की लगाम नहीं।”

१९८९ मध्ये सुरू झालेल्या दूरदर्शन नेटवर्कवरील अतिशय लोकप्रिय टीव्ही मालिका, ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ (मुंगेरीलाल यांची सुंदर स्वप्ने) हिचे हे अविस्मरणीय शीर्षक गीत मालिकेचा साधेपणा दर्शविण्यास पुरेसं आहे.

दिग्दर्शक प्रकाश झा आणि प्रसिद्ध लेखक मनोहर श्याम जोशी यांनी बनवलेल्या या १३ भागांच्या सामाजिक व्यंगचित्ररुपात अभिनेता रघुबीर यादव यांनी बिहारमधील मुंगेर जिल्ह्यातील सामान्य मुंगेरीलालचं पात्र रंगवलं होतं. प्रत्येक भागात मुंगेरीलाल आपल्या बॉस आणि कुटुंबातील सदस्यांना कंटाळून एका काल्पनिक वैकल्पिक जगात जात असत.

या वैकल्पिक जगात तो कधीकधी मुलींना भुरळ घालणारा नायक, चित्रपट अभिनेता, कधी कधी तर स्वतःचाच बॉस आणि कधीकधी खलनायक देखील बनायचा. या समांतर विश्वात, त्याच्या सगळ्या दडलेल्या इच्छा त्याचे वास्तव बनत असत. त्याच्या चॅपलिन आणि हिटलरशी साम्य असलेल्या मिशा, डळमळलेली सायकल आणि हलकेच डोळ्याने चिमटा करण्याची ती डोळ्याची एक विशेष झलक जिथून मुंगेरीलाल एका वेगळ्या विश्वात जात असत, या अदाकारीने अभिनेता रघुबीर यादव यांना भरपूर प्रसिद्धी मिळवून दिली.

मालिकेचे लेखक जोशी साहित्य अकादमी पुरस्कार विजेते म्हणून ओळखले जातात. त्यांनीच भारताच्या पहिल्या दैनंदिन मालिका असलेल्या हम लोग (१९८४) आणि प्रसिद्ध मालिका बुनियाद (१९८६) यांचे लेखनही केले होते.

मुंगेरीलाल यांची कल्पना प्रत्यक्षात अमेरिकन लेखक जेम्स थर्बर यांची प्रसिद्ध कथा ‘द सीक्रेट लाइफ ऑफ वॉल्टर मिट्टी’ या प्रेरणेतुन लिहिली गेली होती, जी पहिल्यांदा १८ मार्च १९३९ रोजी ‘द न्यूयॉर्कर’मध्ये प्रकाशित झाली होती.

या कथेला अनेक म्युझिकल्स, रेडिओ नाटक, तसेच विशिष्ट चित्रपटांमध्ये रूपांतरित करण्यात आले आहे. २०१३ मध्ये याच नावाचा एक चित्रपट ज्यात अभिनेता बेन स्टीलर याने अभिनेता आणि दिग्दर्शक दोन्ही म्हणुन काम केले आहे.

परंतु “केवळ त्याच्या कल्पनाविश्वातच गर्जना करणारा उंदीर” हे भारतीय रूपांतर अगदी अद्वितीय होते. म्हणुनच की काय मोठे स्वप्न बघणाऱ्या दुरदर्शन काळातील जागतिकीकरणाच्या पुर्वीच्या प्रेक्षकांशी सहजतेने मालिकेची नाळ जोडली गेली होती.

ही मालिका मुंगेरीलाल नावाच्या एका साध्या माणसाच्या जीवनाला अनुसरुन होती. त्याने उत्तर बिहार ते नवी दिल्ली प्रवास केला. संस्कृत, साहित्य आणि तत्त्वज्ञान या विषयात तीन पदव्युत्तर पदव्या पूर्ण असूनही, मुंगेरीलाल तसा हजरजबाबी नव्हता. जीवनातील अवघड वस्तुस्थितीला सामोरे जाण्यास मुंगेरीलाल घाबरत असे. कोणीही मुंगेरीच्या बौद्धिक क्षमतांना महत्त्व देताना दिसत नव्हते. अशा वेळी त्याचा पोलिस अधिकारी असलेला सासरा- बजरंगी याने काही तरी ओळखी काढून त्याला वानर वनस्पती या दिल्लीतील कंपनीच्या खात्यात लिपिक म्हणून नोकरी मिळवून दिली.

उच्च शिक्षीत लिपीकाला कमी दर्जाची नोकरी मिळाल्यामुळे मुंगेरीलाल यांना आपला बॉस श्री राठोड यांच्या बारमाही क्रोधाचा सामना करावा लागत असे आणि त्याला आपण अदृश्य आहोत, आपले अस्तित्व अगदी शून्य आहे असे वाटू लागले.

त्याच्या कार्यालयातील सुंदर सेक्रेटरी ‘मिस मलकानी’च्यासमोर तर त्याला या गोष्टीचे अजुनच जास्त वाईट वाटे. घरी तो आपली पत्नी गुणवंतीची इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न नेहमी करत असे. परंतु नेहमीच तिच्या श्रीमंत कुटुंबासमोर आणि तिच्या शक्तिशाली वडिलांसमोर असुरक्षित वाटत असे.

त्याच्या सामान्य आयुष्यातील नैराश्यांना सामोरे जाण्यासाठी, त्याने आपल्या “कल्पनाशील मनाचा (सर्जनशील मनाचा)” आश्रय घेतला आणि फक्त एका डोळ्याच्या चिमट्याने, तो स्वत:ला समांतर विश्वात घेऊन जात असे. या विश्वामध्ये तो सामान्य लिपिक नव्हता तर एक आदरणीय वकील, एक नौदल अधिकारी, एक ऑपरेटिंग रूममध्ये जादू करणारा एक उत्कृष्ट सर्जन आणि कधीकधी मिस मलकानी आवडणारा एक अधिकारी.

वॉल्टर मिट्टीच्या सिक्रेट लाइफच्या विशाल सांस्कृतिक प्रभावामुळे ‘मिट्टीस्क्यू’ या शब्दाचा उगम झाला. हा शब्द एका काल्पनिक विश्वात रमणाऱ्या व्यक्तींसाठी वापरला गेला. वॉल्टर मिट्टीच्या भारतीय रुपानेही भारतात हेच काम केले.

मुंबई स्थित वास्तुविशारद (आर्किटेक्ट) पारुल कुमठा या मालिकेस गंमतीदार आणि विचार करणार्‍या म्हणून आठवतात. परंतु त्यांची सर्वात स्पष्ट आठवण सांगताना त्या म्हणतात “माझे (आता) पती आनंद घरी गेले होते की आम्ही आमच्या लग्नाचे नियोजन करीत आहोत हे कुटूंबांना सांगण्यासाठी. तेव्हा त्यांनी मिश्किलपणे उत्तर दिले की‘ हे खरोखर खरे आहे की ते ‘मुंगेरीलाल का हसीन सपना’ आहे..?”

८० च्या दशकाच्या उत्तरार्धात मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चमध्ये पीएचडीचे विद्यार्थी असलेले हेमंत आडारकर यांना बढाया मारणाऱ्या व्यक्तींसाठी मुंगेरीलाल असा शब्द वापरात होतो हे आठवते. अधिक महत्वाकांक्षी आहेत हे सांगण्यासाठी किंवा विस्तृत दावे करणार्‍या एखाद्याला गप्प करण्यासाठी त्यांचे सहकारी त्यांच्या सह-संशोधकांवर सहसा याच शब्दाचा उपयोग करीत असत.

अलीकडच्या काळात, हा शब्द भारताच्या राजकीय क्षेत्रामध्ये लोकप्रिय झाला होता.

मार्च २०१८मध्ये भाजप नेते नितीन गडकरी यांनी सोनिया गांधी यांचे म्हणणे फेटाळून लावण्यासाठी २०१९ च्या लोकसभा निवडणुका कॉंग्रेस “मुंगेरीलाल के हसीन सपने” म्हणून जिंकतील असे वक्तव्य केले होते. त्यांनीच पुन्हा स्वतः भाजपचा पंतप्रधानपदाचा उमेदवार असण्याचा दावा फेटाळण्यासाठी मार्चच्या सुरुवातीस हा शब्द पुन्हा वापरला होता.

ऑगस्ट २०१८ मध्ये कॉंग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली की, “विरोधी पक्षातील ऐक्य तुटण्याबाबत पंतप्रधानांचे विधान ‘मुंगेरीलाल के हसीन सपने ’सारखे आहे.”

नुकतीच २०१९ मध्ये स्मृती इराणी यांनी अमेठीतील कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या पोस्टर्सवर विनोद करत यांच्यासाठी पंतप्रधानपद म्हणजे ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ आहे असे म्हटले होते.

मालिकेशी संबंधित असलेल्या मोठ्या नावांमुळे हा कार्यक्रम म्हणजे विशेष प्रकल्प आहे हे टीव्हीवर प्रसारित होण्याच्या क्षणापासूनच स्पष्ट झाले होते. “मोठ्या संख्येने लोक मालिकेला ‘मुंगेरीलाल के अनोखे सपने’ या नावाने संबोधत असत. दिग्दर्शक झाकडून आम्हाला खूप आशा होत्या, कारण त्यांनी १९८५ साली ‘दामुल’ सारख्या चांगल्या चित्रपटांची निर्मिती केली होती, ”असे आडारकर सांगतात.

गंगाजल आणि राजनीती सारख्या चित्रपटांच्या दिग्दर्शनासाठी प्रसिद्ध असलेले प्रकाश झा त्यावेळी देखील लोकप्रिय चित्रपट निर्माते होते. प्रकाश झा यांनीच रघुबीर यादव यांना मुंगेरीलालचे पात्र करण्यास पटवले. पुढे जाऊन यादव हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक चित्रपटात काम करणार होते. लगान (२००२), पीपली लाइव्ह (२०११) आणि न्यूटन (२०१७) या भारताच्या ऑस्करसाठी निवडल्या गेलेल्या अनेक चित्रपटांचा ते एक भाग होते.

मुंगेरीलाल ही त्यांची मुख्य भूमिका होती ज्यामुळे त्यांचे खरे नाव झाले. २०१६ च्या मुलाखतीत यादव म्हणाले होते की,

“या मालिकेची खास गोष्ट म्हणजे लिखाण आणि ते चित्रीत करण्याची पद्धत. लोकांनी जे केले ते मनापासुन केले आणि मालिकेच्या यशात ते दिसून आले.मालिका हिट ठरली असली तरी अगदी कमी बजेटवर बनवण्यात आली होती. कार्यक्रमाचे बरेच भाग एकाच दमात चित्रीत करण्यात आले होते.”

८० च्या दशकातील नुक्कड (१९८६), वागले की दुनिया (१९८८), ये जो है जिंदगी (१९८४) यासारख्या मध्यमवर्गीय आदर्शवादावर प्रकाश टाकणार्‍या दुरदर्शनवरील अनेक कार्यक्रमांचे हे वैशिष्ट्यच होते. पैशाची कमतरता भरुन काढण्यासाठी सगळे कलाकार एकाच दमात होइल तेवढं जास्त चित्रण करण्याचा प्रयत्न करत असत.

बऱ्याच वर्षांनंतर ‘मुंगेरी के भाई नौरंगीलाल’ नावाची या मालिकेवर आधारित मालिका सुरू झाली. ही मालिका विनोदी अभिनेता राजपाल यादव यांची पहिली मालिका होती आणि यात विनोदी कलाकार राजू श्रीवास्तवदेखील होते. परंतु या स्लॅपस्टिक कॉमेडीमध्ये मुळ कार्यक्रमात असणारे आकर्षण नव्हते. म्हणुन ही मालिका जास्त दिवस चालू शकली नाही.

मध्यमवर्गीय कुटूंबातील नोकरी करणाऱ्या प्रत्येकासाठी ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ म्हणजे एक सुखद पळवाट होती. आपल्या स्वप्नांची पुर्तता त्यांना मुंगेरीलालच्या कल्पनाविश्वात सापडत होती हेच या मालिकेचे खरे यश होते.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!