जाणून घ्या, भारताच्या पोस्ट खात्याला समर्पित पंकज सोनवणेची ‘तार’ ही शॉर्ट फिल्म कशी आहे..?

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


हिंदीमध्ये अनुराग कश्यप आणि मराठीत नागराज मंजुळे या दिग्दर्शकांच्या नावावरच चित्रपट चालतात. ते दिग्दर्शक आहेत की निर्माते किंवा त्यांनी चित्रपटात काम केलंय याने काही फार फरक पडत नाही. द सायलेन्स, नाळ, अशा काही मोठ्या प्रोजेक्टनंतर नागराज मंजुळे मुख्य अभिनेते म्हणून पंकज सोनवणे यांच्या “तार” या शॉर्ट फिल्ममध्ये दिसतील असं समजल्यापासून बरेच प्रेक्षक नागराजला बघायला आतुर होते. मुंबई फिल्म कंपनीच्या युट्युब चॅनलवर आज ही शॉर्ट फिल्म रिलीज झाली आणि एकूण प्रतिक्रियांवरून तरी प्रेक्षक भूतकाळात हरवून गेलेत असं लक्षात येतं.

2013 ला 165 वर्षानंतर भारताची तार सेवा बंद करण्यात आली. ही शॉर्ट फिल्म भारतीय डाक विभागाच्या कार्याला समर्पित आहे.

1971 ला बांग्लादेश मुक्तीच्या लढ्यात भारत-पाकिस्तान यांच्यात युद्ध पेटलं होतं. गावागावात इंदिरा गांधींच्या प्रभावी नैतृत्वाची स्तुती आणि शहीद झालेल्या सैनिकांचा शोक या दोनच गोष्टी दिसून येत होत्या. त्यावेळेस सगळ्या चांगल्या-वाईट बातम्या कळण्याचं एकमेव साधन म्हणजे रेडिओ आणि त्वरित संवादाचं साधन म्हणजे तार.

तार महाग असल्याने अत्यंत महत्वाच्या गोष्टी सांगायलाच तिचा वापर होत असे. म्हणून युद्धाच्या काळात गावात तार आली की गावातला सैन्यात असलेला मुलगा गेला असाच अर्थ काढला जाई.

या शॉर्ट फिल्ममध्ये हे तार पोहोचवण्याचं काम करणाऱ्या पोस्ट मास्तरची भूमिका नागराज मंजुळे यांनी केली आहे. ही फिल्म त्या पात्राच्या आयुष्यात बघते आणि त्याच्या नजरेतून तेव्हाच्या जगाची ओळख आपल्याला करून देते.

एकाच वेळी एकाच जगात दृष्टिकोन बदलून बघितलं तर अनेक विश्व दडलेले असतात. या शॉर्ट फिल्ममध्ये पण छोट्या छोट्या पात्रातून अशी विश्व दिसतात. एक लहान मुलगा पत्ता सांगायला सायकलवर बसायची लाच मागतो तर एका गृहिणीला काही झालं तरी लेकरू हवं असतं. ही शॉर्ट फिल्म फार छोट्या छोट्या घटनांमधून त्याकाळचं वास्तव आपल्यासमोर उभं करते.

पण ही फिल्म खूप साऱ्या गोष्टी एकत्र दाखवायच्या प्रयत्नात मूळ गाभा विसरल्यासारखी वाटते. म्हणजे होतं असं की, 19 मिनिटं खूप छान जातात, त्यातले बारकावे आपल्याला धरून ठेवतात पण संपल्यावर भावनिक हाय पॉईंट यावा तो येत नाही. त्यामुळे शेवट पूर्ण वाटत नाही.

अर्थात संपूर्ण वेळ नागराजचा अभिनय बघण्यात आपण एवढे सुखावलेले असतो की बाकी बाबी गौण वाटायला लागतात. स्वतःला व्यक्त करण्यासाठी त्याने कविता, सिनेमे, असं बरच काय काय केलं पण त्याचा अभिनय बघितला की त्याच्या आत दडून बसलेल्या गोष्टींची जाणीव होते. आतून पोखरणारी दुःख, व्यक्त व्हायला जागा नसली की कसे दुर्लक्षित होऊन ते वागण्यात दिसू लागतात, तसं काहीसं होताना आपल्याला या पात्रात दिसतं, नागराजने ते उत्तम हेरलंय.. त्याचा अबोलासुद्धा स्क्रीनवर काहीतरी सांगून जाईल असा त्याचा अभिनय आणि त्याच्या जोडीला पंकजचं दिग्दर्शन.

पण नागराजला बोली भाषेतील मूळ लेहजा एवढा नीट माहीत असतो की काही प्रसंगात तो नेमकं काय बोलतो हे नीट समजत नाही. या फिल्मच्या कमेंटमध्ये आणि नागराजच्या इतर सिनेमांना बघताना ते काहीसं जाणवतं, पण लेहजा पकडणं याबद्दल त्याची स्तूति करावी तितकी कमीच. 

जेष्ठ अभिनेते “रामचंद्र धुमाळ” यांनी या शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून आपल्या आयुष्यातील शेवटचा सिनेमा केला. मे महिन्यात त्यांचं दुर्दैवी निधन झालं होतं.

त्यांनी सेक्रेड गेम्समध्ये नवाजच्या वडिलांचं छोटसं पात्र, फँड्री, सैराट, गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा आणि ख्वाडासारख्या कित्येक सिनेमात छोटी छोटी पात्र साकारली आहेत. हिरो सोडून इतर पात्र साकारणाऱ्या या कलाकारांना आत्ता कुठं हिंदी सिनेमासृष्टीत मान मिळतोय. तो आपल्या मराठीत कधी मिळेल याची वाट बघतच धुमाळ काकांना जावं लागलं. येणारा काळ नक्कीच त्यांना लक्षात ठेवेल.

शॉर्ट फिल्म सुरू होते तेव्हा पहिल्याच सीनमध्ये संध्याकाळ दाखवायला केलेलं कलर करेक्शन किंवा तत्सम तांत्रिक काम नीट न झालेलं जाणवतं आणि त्यात साउंड मिक्सिंगही सॉफ्ट वाटत नाही. त्यातले संवाद जरा टिपिकल वाटतात. हा पहिला सिन वगळता तांत्रिक बाबतीत फिल्म चांगली आहे. कलादिगदर्शन तर खूपच काटेकोर केलं आहे. भाकरी थापायला त्या काळात असणारी लाकडाची वापरली जात होती, ते बघणं एक पर्वणी होती.

दिग्दर्शक पंकज सोनवणे यांनी पहिल्याच प्रयत्नात उत्तम दर्जाची शॉर्ट फिल्म बनवली आहे, त्यांच्याकडून असंच चांगलं काम पुढे मराठी प्रेक्षकांना बघायला मिळेल अशी आशा वाटते. ही शॉर्ट फिल्म युट्युबवर मुंबई फिल्म कंपनीच्या युट्युब चॅनलवर तुम्ही बघू शकता.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!