आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
मोसादचं नाव जिथं निघतं तिथं काही ना काही थरारक आणि वेगळं घडत असतं, घडून गेलेलं असतं अथवा मोसाद काहीतरी घडवणार असतं. जर इतिहासाची पाने उलगडून पाहिली तर आपल्याला दिसून येईल की वर्षातून एकदा तरी मोसादने पराक्रम केलेलेच आहे. अगदी १९७६ च्या “Wrath of God”पासून ते मागच्या वर्षी इराणच्या अणुभट्टीमध्ये कॉम्प्युटर व्हायरसच्या मदतीने तांत्रिक अडचणी तयार करण्यापर्यंत मोसादचे पराक्रम संपुर्ण जगाने पाहिले आहेत.
मोसाद आपल्या शत्रू राष्ट्रांमध्ये हेरगिरी करण्यासाठी काय, कुठली आणि कसली पध्दत वापरेल, याची आपण कल्पनाही करू शकत नाही. ज्या गोष्टी आपण फक्त चित्रपटात बघतो किंवा कथेच्या स्वरूपात ऐकतो असे सर्व संरक्षण क्षेत्राशी संबंधित प्रयोग मोसादने केले आहे. आताही मोसाद काहीतरी वेगळं करत असल्याचा आरोप मोसादच्या टॉप लिस्टमध्ये असणाऱ्या ‘हमास’ नावाच्या संघटनेने केला आहे.
हमासने एक व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला आहे, ज्यात त्यांनी आरोप केला आहे की मोसादने त्यांच्या हेरगिरीसाठी ‘मानवाचा मित्र’ समजल्या जाणाऱ्या ‘डॉल्फिन’चा उपयोग केला आहे. हमासने सोमवारी दावा केला की, हमासच्या एक सैनिकाला पोहताना लक्षात आले की त्याचा पाठलाग करण्यासाठी कमांडो डॉल्फिनचा उपयोग केला आहे. त्या डॉल्फिनजवळ मानवाला मारण्यासाठी वापरण्यात येणारी सर्व हत्यारे होती, असा दावा हमासने केला आहे.
हमासच्या आतंकवाद्यांनी मात्र त्या कमांडो डॉल्फिनचा प्रतिकार करण्याऐवजी पळून जाण्यात धन्यता मानली. अल-कसम ब्रिगेडच्या नौसेना कमांडरने याचा फोटो सोशल मीडियावर टाकून याची माहिती दिली आहे.
हमसच्या या दाव्यामध्ये तथ्य असल्याचे काही शास्त्रज्ञांचे मत आहे कारण आज काल बहुतांश देश पारंपरिक हत्यारांचा वापर करणे सोडून नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून हत्यार तयार करत आहेत. अगदी मागच्याच वर्षी चीनने एक लढाऊ रोबोट तयार केला होता जो अगदी शार्क माश्यासारखा दिसत होता.
याआधीही एकदा असा प्रयोग झाला आहे का?
२०१५ च्या ऑगस्ट महिन्यात इस्रायली सेना आणि हमासच्या आतंकवाद्यांमध्ये अनेक लहान मोठे संघर्ष घडले होते. याच दरम्यान इस्रायली सेनेने एका आतंकवाद्याला मारलं होतं. नंतर हमासने सांगितले की त्याचा सामना एका कमांडो डॉल्फिनसोबत झाला होता ज्याच्या डोळ्यात कॅमेरा आणि त्यासोबतच इतर हत्यारे देखील होती.
नंतर मात्र हमासने कमांडो डॉल्फिनला पकडल्याचा दावा केला होता. त्यांच्यामते इस्रायली सेनेने तीन डॉल्फिनला पकडले होते व नंतर त्यांना ट्रेनिंग देऊन त्यांच्या शरीरावर खास उपकरणे लावून त्यांना पाण्यात सोडले होते.
माशांच्या हजारो प्रजाती असल्या तरी इस्रायलने फक्त डॉल्फिनचाच उपयोग करण्याचे का ठरवले असेल?
यामागेही एक खास कारण आहे. काही वर्षांपूर्वी एक संशोधन करण्यात आले होते, ज्यामध्ये असे दिसून आले होते की पृथ्वीवर फक्त दोनच बुद्धिमान प्रजाती आहेत. एक मानव आणि दुसरा डॉल्फिन. नंतर इतर अहवालांमध्ये असे सांगण्यात आले की डॉल्फिनचा मेंदू मानवांपेक्षा जास्त काम करतो.
हमासने दावा केला आहे की, त्यांनी इस्राईलने प्रशिक्षित कमांडो डॉल्फिनला मुद्दामून मारले आहे. ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये हार्नेस दाखवण्यात आला आहे. डॉल्फिनच्या नाकात हार्नेस बसवण्यात आला होता. हे यूएस आणि रशियन नौदलात वापरल्या जाणार्या हार्नेससारखे आहे. हार्नेसला भाल्याच्या बंदुकीसारखे उपकरण जोडलेले होते. डॉल्फिन मित्र किंवा शत्रू यांच्यात फरक करू शकत नाही. म्हणूनच ते प्राणघातक हल्ला करत नाहीत. मात्र, लक्ष्य कुठे आहे हे शोधण्यासाठी डॉल्फिन उपयुक्त ठरू शकतो. हार्नेस डिव्हाइस समान सिस्टिमचा एक भाग असू शकतो, असे मत संरक्षण तज्ज्ञ एचआय सटनने व्यक्त केले आहे.
पण इस्राइलवर अनेक देशांनी प्राणी किंवा करण्याचे आरोप लावले आहे
इस्रायलवर याआधी पण हेरगिरीसाठी प्राण्यांचा वापर केल्याचा आरोप लागलेला आहे. २०१३मध्ये तुर्की मिडियाने दावा केला होता की इस्रायली युनिव्हर्सिटीकडून ट्रॅकिंग उपकरणांसह टॅग केलेले पक्षी हेरगिरी मोहिमांवर पाठवले जात होते.
२०१२मध्ये इस्त्रायली टॅग असलेला गरुड सुडानमध्ये पकडला गेला होता आणि तो मोसादचा गुप्तहेर असल्याचे सूडानने आरोप केले होते. तर २०११ मध्ये सौदी अरेबियाच्या अधिकाऱ्यांनी इस्रायलसाठी हेरगिरी केल्याच्या संशयावरून एका गिधाडाला ताब्यात घेतले होते, कारण त्या गिधाडावर हेरगिरीसाठी एक ट्रॅकिंग उपकरण लावले होते. तसेच मागे एकदा इजिप्तच्या एका अधिकाऱ्याने पण आरोप लावले होते की, लाल समुद्रात पर्यटकांवर झालेल्या अनेक हल्ल्यांमध्ये इस्रायल-नियंत्रित शार्कचा सहभाग असू शकतो. परंतु अद्याप या सर्व आरोपांवर इस्रायलने उत्तर दिलेले नाही.