मदर तेरेसा गोरगरिबांची सेवा करण्यासाठी भारतातच का आल्या..?

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब 


“आयुष्यात जर आपण दुसऱ्यांसाठी काही करू शकलो नाहीत तर ते जीवन व्यर्थ आहे” या वाक्याला अनुसरून जीवन जगलेल्या नोबेल पुरस्कार विजेत्या समाजसेविका म्हणजे मदर तेरेसा या होय.

मदर तेरेसा यांना १९७९ मध्ये जगातील सर्वोच्च सन्मान समजला जाणारा शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला होता. जगातील कदाचित असा एकही प्रतिष्ठित पुरस्कार नसेल की जो मदर तेरेसा यांना मिळाला नाही.

खरंतर मदर तेरेसा यांनी भारतातील गरीबांसाठी केलेल्या कामांची भरपाई कोणत्याही पुरस्काराद्वारे होऊ शकत नाही. पण तरीही जगाने त्यांना पात्र असलेला आदर देण्याचा प्रयत्न केला.

भारत सरकारने सुद्धा त्यांना भारतरत्न देऊन सन्मानित केले आहे इतकेच काय तर अमेरिका आणि रशिया या देशांनी सुद्धा त्यांना आपल्या देशाचा सर्वोच्च सन्मान देऊन गौरविले आहे.

अग्निस गोंझी बॉयाजीजू असे मूळ नाव असलेल्या मदर तेरेसा यांचा जन्म २ ऑगस्ट १९१० रोजी युगोस्लाव्हिया इथे झाला. त्या ९ वर्षांच्या असतानाच त्यांच्या वडिलांचं निधन झालं आणि घराची जबाबदारी आईवर आली मदर तेरेसा या भरतकाम करून आपल्या आईला हातभार लावण्याचा प्रयत्न करत होत्या आणि त्यांचं कुटुंब चालू होतं.

कदाचित बालपणाच्या अनुभवांमुळेच त्यांना गरजू व्यक्तींना मदत करण्याचा भाव जागृत झाला असावा पुढे जाऊन ही भावना इतकी प्रबल झाली की त्यांनी आपले संपूर्ण आयुष्यच निराधारांच्या कल्याणासाठी समर्पित केले.

त्या काळात मदर तेरेसा यांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतले व पदवीनंतर त्यांनी ख्रिश्चन मिशनरीसाठी काम करण्याचे ठरविले. त्यांनी नन होण्यासाठी नन्सचे कठोर प्रशिक्षण घेत बंगालच्या कोलकाता येथील शाळांमध्ये नोकरी करण्यास सुरवात केली.

कोलकात्याच्या शाळेत शिकवत असणाऱ्या तेरेसा यांचा प्रवास एका वेळेला अशा टप्प्यावर आला की त्या माणुसकीचे एक उदाहरण म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या.

१९२० मध्ये पहिल्यांदा मदर तेरेसा बंगाल, कोलकाता येथे आल्या. आल्यानंतर त्यांनी सेंट तेरेसा स्कूलमध्ये अध्यापन सुरू केले. याच ठिकाणी त्यांनी प्रथमच भारतात असणारं भयानक दारिद्र्य, भूक, असहायता पाहिली. कदाचित याच ठिकाणी त्यांचा विवेक जागृत झाला आणि त्यांनी तिथे असणाऱ्या गरिबांसाठी काहीतरी करण्याचा विचार सुरू केला. या गोष्टीनंतर त्या काही वर्षे तिथून निघून गेल्या.

जेव्हा त्या परत आल्या तेव्हा त्यांनी तिथल्या गरीबांसाठी सर्वप्रथम झोपडपट्टी शाळा उघडली. आणि या शाळेच्या पायरीवरच पहिल्या दवाखान्याची सुद्धा सुरुवात झाली.

मदर तेरेसा १९३१ मध्ये जेव्हा भारतात परतल्या त्यावेळी देशात दुसऱ्या महायुद्धाचं वातावरण होतं. युद्धाच्या परिस्थितीमुळे देशातील बऱ्याच गोष्टींवर परिणाम झाला होता आणि त्यामुळेच भारतातल्या गरिबांना उपाशीपोटी झोपण्याचे दिवस आले होते.

लहान बाळं आणि त्यांच्या माता यांचं जगणं बिकट होऊन बसलं होतं. अशा परिस्थितीत तेरेसा यांनी गरीब मुलांना शिक्षण देण्यास सुरुवात केली, गरिबांना सुद्धा सन्मानाने जगण्याचा हक्क आहे याची जाणीव करून दिली. रोग्यांवरती उपचार केले.

त्यांनी लोकांना हे सांगायला सुरुवात केली की आपण सर्व जणं एकच असून सगळे देवाची अपत्ये आहेत व सर्वांना समान सन्मानाने जीवन जगण्याचा हक्क आहे.

देश स्वतंत्र झाल्यावर १९४७ मध्ये भयानक दंगली घडल्या. त्यावेळीसुद्धा मदर तेरेसा दंगलग्रस्तांची सेवा करीत होती. त्यावेळी मदर तेरेसा यांनी निर्मल हृदय नावाची एक संस्था सुरू केली आणि आयुष्यभर गरिबांच्या सेवेत स्वतःला गुंतवून घेतलं. त्यांची संस्था धर्म, जात या गोष्टींपासून दूर राहिली आणि लोकांची सेवा करू लागली.

त्यांची संस्था गरिबांच्या मृत्यूनंतर त्यांच्या धर्माप्रमाणे शेवटचे संस्कारसुद्धा करत होती.

मदर तेरेसांसाठी गरिबांचा आदर करणे हेच सर्वात मोठं ध्येय होतं.

१९४७ मध्येच मदर तेरेसा यांनी भारताचे नागरिकत्व सुद्धा घेतले. त्या अस्खलितपणे बंगाली बोलत असत. मदर तेरेसा यांनी अनेकदा चमत्कार केले असं म्हटलं जातं.

भारताचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त नवीन चावला यांनी त्यांच्यावर एक पुस्तक लिहिले आहे. १९९२ मध्ये लिहिलेल्या त्या पुस्तकावर चित्रपट व माहितीपट सुद्धा बनविण्यात आले आहेत.

मदर तेरेसा यांच्या जीवनाचा परिचय असलेले एक व्यक्ती सांगतात की मदर रोमहून फ्लाइटने येत होत्या तेव्हा त्यांचे उड्डाण वीस ते पंचवीस मिनिटांपर्यंत लांबले.

दिल्ली विमानतळावर उतरताच त्यांनी सांगितले की त्यांना कोलकाताला जाण्यासाठी कनेक्टिंग फ्लाईट हवी आहे पण त्यावेळी संध्याकाळी कोलकाताकडे जाण्यासाठी एकच विमान असायचे.

मदर तेरेसा यांना उशीर झाला होता आणि ते विमान आधीच निघत होते. नवीन चावला त्यांना म्हणाले की आज थांबा आणि उद्या सकाळी कोलकाताला जा. मदर तेरेसा म्हणाल्या की त्या उद्यापर्यंत थांबू शकत नाही कारण त्यांनी आपल्याबरोबर आजारी मुलासाठी औषधे आणली होती. ते औषध त्या मुलास देणे फार महत्वाचे होते.

बरेच लोक दिल्ली विमानतळावर त्यांचा ऑटोग्राफ घेण्यासाठी येत होते पण त्या सर्वांना सांगत होत्या की काहीतरी करा आणि मला कोलकात्यात पोहचवा. शेवटी हा प्रकार कसा तरी कंट्रोल टॉवरपर्यंत पोचला.

पायलटला जेव्हा हे समजले तेव्हा त्याने नियमांकडे दुर्लक्ष करून विमान खाली घेतले व मदर तेरेसा यांना विमानातून कोलकत्याला पोहचवण्यात आले.

हा प्रसंग आश्चर्यकारक होता पण कदाचित एखाद्या गरीब मुलाच्या बरे होण्याच्या दुर्दम्य इच्छेने ते झाले असावे असे तेरेसा म्हणाल्या होत्या.

मदर तेरेसा यांना आयुष्यात भरपूर सन्मान मिळाला, कितीतरी संस्थांनी त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित केलं.

त्यांनी मानवतेसाठी केलेली सेवा पाहुन भारत सरकारने १९६२ मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरविलं.

पुढे त्यांना देशातील सर्वोच्च असा ‘भारतरत्न’ हा पुरस्कार सुद्धा देण्यात आला.

एवढेच नाही तर मानव कल्याणार्थ केलेल्या उत्कृष्ट कार्याकरीता त्यांना १९७९ मध्ये नोबेल शांतता पुरस्काराने गौरवण्यात आलं.

तेरेसा यांनी मानव कल्याणाकरता ज्या निस्वार्थ भावनेने काम केलं ते खरोखर वाखण्याजोगं आहे. सर्वांनीच मदर टेरेसा यांच्याकडुन परोपकार, दया, सेवा, यांची शिकवण घेण्याची गरज आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!