भारताला ऑलिम्पिकमध्ये पहिलं वैयक्तिक पदक कोल्हापूरच्या मातीनं मिळवून दिलंय

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब 


कोल्हापूर ही कुस्तीची पंढरी म्हणून ओळखली जात असे. एकेकाळी कोल्हापूरच्याच तालमीत घडलेल्या पैलवानाने भारताला ऑलिम्पिकचे पहिले मेडल मिळवून दिले होते. कोल्हापुरात कुस्तीला प्रोत्साहन देऊन चांगले मल्ल घडवण्यासाठी स्वातंत्र्यपूर्व काळात इथल्या राज्यकर्त्यांनी कुस्तीसारख्या कुस्तीला राजाश्रय दिला होता.

१९४८ साली लंडन येथे झालेल्या ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्यासाठी कुस्तीपट्टू खाशाबा जाधव यांच्याकडे लंडनपर्यंत जाण्याचे पैसे देखील नव्हते. तेंव्हा कोल्हापूरचे महाराज छत्रपती दुसरे शहाजी यांनी त्यांच्या लंडन वारीचा संपूर्ण खर्च स्वतः केला.

१९४८ साली लंडन येथे भरलेल्या ऑलिम्पिकमध्ये खाशाबा जाधव यांनी सहभाग घेतला. ऑलिम्पिकच्या इतिहासातील ही पहिली वेळ होती जेंव्हा एक स्वतंत्र देश म्हणून भारताने सहभाग घेतला होता. आणि पहिल्याच प्रयत्नात भारताने चांगली कामगिरी केली होती.

खाशाबा हे सातारा जिल्ह्यातील गोळेश्वर गावचे. २२ वर्षाच्या खाशाबांनी ५१ किलो वजनी गटातून कुस्ती खेळली. मॅटवरच्या कुस्तीचा त्यांना सराव नसल्याने या स्पर्धेत त्यांना खेळ जिंकता आला नाही तरीही त्यांनी सहा राउंड पूर्ण केले. या स्पर्धेतून परतल्यावर त्यांनी मॅटवरील कुस्तीची चांगलीच तयारी केली.

१९५२ सालच्या ऑलिम्पिकमध्ये त्यांनी ५४ किलो वजनी गटात कांस्य पदक मिळवले. वैयक्तिक खेळ प्रकारात भारताला मिळालेले हे पहिले कांस्य पदक होते.

यानंतर तब्बल ५६ वर्षांनी कुस्तीपट्टू सुशीलकुमार यांनी २००८ साली झालेल्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावले.

जास्तीत जास्त कुस्तीपट्टू हे देशाच्या हरियाणा किंवा पंजाबसारख्या प्रदेशातूनच येतात असा समज आहे. (दंगल आणि सुलतान सारख्या चित्रपटांनीही हे अधोरेखित केले.) पण, एकेकाळी कोल्हापूर संस्थान हे कुस्तीसाठी प्रसिद्ध होते. कुस्तीपंढरी अशी कोल्हापूरची आजही ख्याती आहे. मांसाहार करणारे आणि लंगोटवर फिरणारे कुस्तीपट्टू हे कोल्हापुरातील सामान्य चित्र होते.

कोल्हापूरचे छत्रपती हे स्वतः प्रचंड क्रीडाप्रेमी होते. त्यांनी अनेक खेळांना आणि खेळाडूंना प्रोत्साहन दिले. कुस्तीचा तर त्यांना फारच शौक होता. पुरोगामी विचारांच्या छत्रपती शाहू महाराजांनी कुस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी संस्थानात शंभरपेक्षाही जास्त तालिमी बांधल्या.

तालीम हा उर्दू शब्द आहे. ज्याचा अर्थ होतो शिकणे. कुस्तीसाठी हा शब्द वापरण्याचे कारण म्हणजे कुस्ती असा खेळ आहे, जिथे सातत्य, लक्ष्य, चिकाटी आणि जिद्द लागते.

शाहू महाराजांनी कुस्तीला राजाश्रय दिल्याने कुस्तीला आणि पैलवानांनाही चांगले दिवस आले. त्याकाळी पैलवानाला आणि कुस्तीला फार मोठे स्थान होते. समाजात पैलवानांचा दबदबा होता. फक्त कोल्हापूरच नाही तर महाराष्ट्रतील सातारा, सांगली आणि नागपूरसारख्या भागांतून आपल्या मुलांना कुस्तीचे प्रशिक्षण मिळावे म्हणून कोल्हापूरच्या या आखाड्यांत पाठवत असत.

साध्या स्थानिक कुस्ती स्पर्धेतही मुलाने डाव जिंकला तर लोकं ते अभिमानाने चारचौघात सांगत. अगदी आजही कुस्तीबाबतीत कोल्हापूरच्या लोकांमध्ये इतकाच आदर आहे. अर्थात, आज मात्र शासनाच्या उदासीनतेमुळे कुस्तीला तितके चांगले दिवस राहिले नाहीत. ही खेदाची बाब आहे.

आज कोल्हापुरातील ही कुस्ती पंढरी ओस पडली आहे. तालीमींची संख्या देखील कमी झाली आहे. आजच्या काळात आर्थिक स्थैर्य महत्वाचे असल्याने कुस्तीसारख्या खेळाकडे फारसे कुणी वळताना दिसत नाहीत. उत्तरेकडील पैलवानांना सरकारी नोकरीत सामावून घेऊन त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडवला जातो. महाराष्ट्रात मात्र पैलवानांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकार कमी पडत आहे.

उत्तरेकडे पैलवानांना पोलीस किंवा सुरक्षा रक्षक म्हणून त्वरित सरकारी नोकरीत सामावून घेतले जाते. महाराष्ट्रात मात्र, कुस्ती सोडून दिली की पैलवानांना शेती किंवा शेतमजुरी करावी लागते.

भारताला पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून देणाऱ्या खाशाबा यांचेही शेवटचे दिवस अत्यंत हालाखीत गेले. काही काही नावाजलेल्या पैलवानांनी तर, साखर कारखान्याबाहेर वॉचमनची ड्युटी केली आहे.

आज पैलवानकीची तालीम घेणे सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलांना अजिबात परवडत नाही. अनेक पैलवान तर शेतकरी कुटुंबातील असतात. आधीच शेतकरी आर्थिक टंचाईत आहे, शेतकऱ्यांच्या जगण्यामारण्याचा प्रश्न तीव्र होत चाललेला असताना त्यांना मुलांना पैलवानकीचे प्रशिक्षण देणे अजिबात परवडत नाही. कारण पैलवानांना चांगल्या दर्जाचा आणि पौष्टिक आहार लागतो. ज्यात किलोनी काजू बदाम आणि इतर सुकामेवाही लागतो. शिवाय, दुध, तूप, फळे अंडी आणि मांसाहारही आवश्यक असतो.

एका पैलवानाच्या फक्त आहाराचाच मासिक खर्च १५,००० येतो. शिवाय, पैलवानकी करायची तर कठोर शिस्तही बाळगली पाहिजे. पैलवानांचा दिवस पहाटे ५.०० पासून सुरु होतो. आधी सूर्यनमस्कार, मग जोर-बैठका मग इतर व्यायाम प्रकार असा पैलवानांचा दिवस पूर्ण शारीरिक मेहनतीने भरलेला असतो.

या क्षेत्रात श्रेणी पद्धत असते. तालीम देणाऱ्या पैलवानांना येथे खूप मोठा मान असतो. ज्यांना वस्ताद म्हणतात. ज्येष्ठ पैलवान नवख्या पैलवानांना मार्गदर्शन करतात. सुरुवातीला ज्येष्ठ पैलवानांची कुस्ती होते. तोपर्यंत नवे पैलवान व्यायाम करतात. त्यानंतर त्यांची कुस्ती लावली जाते.

आखाड्यात उतरताच हे पैलवान अंगाला आखाड्यातली माती फसतात. कारण, समोरच्या तेल लावलेल्या पैलवानाला पकडणे जमले पाहिजे.

तालमीत या पैलवानांना फक्त कुस्तीच शिकवली जाते असे नाही. तर, त्यांना कुस्तीतील काही नीतीनियमही अंगीकारावे लागतात. तालीमीत येणाऱ्या प्रत्येक पैलवानाला सुरुवातीला गामा पैलवानाची गोष्ट सांगितली जाते, जेणेकरून त्याच्यात उत्साह संचारला पाहिजे.

गामा पहिलवान यांचे खरे नाव गुलाम मुहम्मद होते. फाळणीपूर्व पंजाबमध्ये त्यांचा जन्म झाला. या गामा पैलवानांनी कधीच कुठल्या कुस्तीत अस्मान पाहिले नव्हते. फाळणीच्या काळातील त्यांच्याबद्दलची एक आख्यायिका देखील प्रसिद्ध आहे.

एका हिंदू वसाहतीवर येणाऱ्या हल्लेखोरांच्या गटाला त्यांनी एकट्याने चीत करून त्या वसाहतीचे रक्षण केले होते. तालीमीत हाच न्याय शिकवला जातो. पैलवानांनी नेहमी तत्वासाठी आणि न्यायासाठी लढले पाहिजे.

अर्थात, कुस्ती क्षेत्रातील करिअरला पूर्वीसारखे सोनेरी दिवस राहिले नाहीत. आजच्या जमान्यात डॉक्टर, इंजिनियर आणि आयटी क्षेत्राची क्रेझ यामुळे या क्षेत्राकडे दुर्लक्ष होते. अशा असंख्य कारणामुळे आज कुस्तीचे हे वैभव ओसरत चालले आहे.

शासन पातळीवर या खेळाला पुन्हा जुने दिवस आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी शासनाने कोल्हापुरातील खासबाग कुस्ती मैदानाची डागडुजी करण्यासाठी निधी दिला आहे. परंतु खेळाडूंच्या प्रोत्साहनासाठी आणि त्यांच्या उदरनिर्वाहाच्या सोयीसाठीही शासनाने तरतूद केली पाहिजे.

पुरुषी समजल्या जाणाऱ्या या क्षेत्रात आज मुली देखील आपले नाव गाजवत आहेत. फोगाट भगिनी आणि साक्षी मलिकसारख्या मुलींनी आज यात आपले आणि देशाचे नाव उज्वल करून दाखवले आहे.

आज कोल्हापुरातील अनेक मुलीही या क्षेत्रात स्वतःला सिद्ध करत आहेत.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!