दोन वेळा मुख्यमंत्री राहूनसुद्धा रिक्षानेच प्रवास करायचे

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


मुख्यमंत्री म्हटलं की आपल्या समोर उभा राहतो तो इस्त्री केलेल्या पांढऱ्या खादीच्या कपड्यातील व्यक्ती, त्याची ती आलिशान गाडी, बरोबर असलेली पोलिसांची आणि काही अंगरक्षकांची फौज. नेत्यांचा संबंध आपण नेहमीच धनाशी लावतो. प्रामाणिकपणे काम करणारे लाल बहादूर शास्त्री यांसारखे काही मुठभर नेते सोडले तर हे बऱ्याच प्रमाणात योग्यसुद्धा वाटते.

मोठं पद आलं की आपोआप पैसा येतो अशी आपली धारणा. या धारणेच्या विरुद्ध जाऊन काम करणारे खुप कमी नेते आज आहेत. अशाच प्रवाहाविरुद्ध वाहणाऱ्या मुठभर नेत्यांच्या यादीत नाव सामिल होते ते माजी बिहार राज्य मुख्यमंत्री- कर्पुरी ठाकुर.

आकाशापर्यंत पोहचणारे हात असले तरी पाय मात्र जमिनीवर ठेवायचे असतात याचं उत्तम उदाहरण असलेले कर्पुरी ठाकुर हे एकदा बिहारचे उपमुख्यमंत्री तर दोन वेळा बिहार राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कार्यरत होते. ते आपल्या साधारण राहणीमानासाठी ओळखले जायचे.

विधानसभेतील त्यांचा एक किस्सा आजही सांगितला जातो. विधानसभेत विरोधीपक्ष नेता असताना त्यांनी दुपारच्या जेवणाला जाण्यासाठी त्यांच्याच पक्षाच्या एका आमदारास गाडी मागण्यासाठी चिठ्ठी लिहिली होती.

त्यावेळी त्या आमदाराने त्यांंना उत्तर देताना चिठ्ठीत लिहिले होते, “माझ्या गाडीत तेल नाही, कर्पुरीजी दोन वेळा राज्याचे मुख्यमंत्री राहिले आहेत, ते स्वत:ची गाडी का विकत घेत नाहीत.”

या त्यांच्या साध्या आणि प्रामाणिक राहणीमानाचा पुरस्कार म्हणजे त्यांची तांदळासारखी शुभ्र असलेली राजकीय कारकीर्द. त्यांच्या काळात गैरव्यवहार करुन संपत्ती कमावणाऱ्या कित्येक नेत्यांना पुढे जाउन कायदेशीर कारवाईस सामोरे जावे लागले होते.

मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना सुद्धा ते रिक्षेचाच वापर करत असत. त्यांच्या उत्पन्नात त्यांना गाडीचा खर्च भागवता येत नाही असं ते म्हणत. कर्पुरी ठाकुर यांच्या निधनानंतर त्यांची जागा घेणाऱ्या लालूप्रसाद यांनी मात्र पूर्णपणे वेगळ्या जीवनशैलीचं आयुष्य स्विकारलं.

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री हेमवंती बहुगुणा ज्यावेळी कर्पुरी ठाकुर यांच्या मृत्युनंतर त्यांच्या मुळ गावी गेले होते तेव्हा त्यांची जुनी झोपडी बघुन त्यांना रडू आले होते. १९५२ पासून कायम आमदार असलेले कर्पुरी ठाकुर यांनी स्वत:साठी एक घरसुद्धा बांधले नाही.

सत्तरच्या दशकात पटनामध्ये आमदारांना खाजगी घरांसाठी जागा कमी दरात दिल्या जात होत्या. कर्पुरी ठाकुर यांच्या काही आमदारांनी त्यांना जागा घेण्याचे सांगितले. त्यावेळी कर्पुरी ठाकुर यांनी स्पष्टपणे नकार दिला. त्यावेळी तुमच्यासाठी नाही तर निदान तुमच्या मुलांसाठी तरी जमीन घेऊन ठेवा असे त्यांना त्यांच्या काही आमदारांनी सांगितले होते. कर्पुरीजींनी त्यालाही नकार दिला होता.

तुमच्या मुलांच्या राहण्याचं काय असं विचारलं असता त्यांनी ते माझ्या मुळगावी राहतील असं उत्तर दिलं होतं. आपल्या मुलांसाठी कोट्यावधी रुपयांची संपत्ती ठेऊन जाणाऱ्या नेत्यांसाठी हा एक धडाच होता, अजुनही आहे.

आपल्या मुलांचे लग्न म्हटलं की पैशाची बेधुंद उधळण करणाऱ्या आजच्या नेत्यांसाठी सुद्धा कर्पुरीजींनी आदर्श निर्माण केला होता. बिहारचे मुख्यमंत्री असताना रांचीच्या एका गावात त्यांच्या मुलीसाठी वर शोधण्यासाठी त्यांना जायचे होते. सरकारी वाहन न वापरता ते त्यावेळी टैक्सीने गेले होते.

मुलीचे लग्नसुद्धा मोठ्या आलिशान हॉटेल मध्ये नाही तर त्यांच्या मुळ गावी ‘पिंतोजिया’ इथे आयोजित केलं होतं. खरंतर देवघर मंदिरात लग्न करण्याची इच्छा कर्पुरीजींची होती. बायकोच्या हट्टापायी त्यांनी लग्न गावात ठेवले. विशेष बाब म्हणजे आपल्या मंत्रीमंडळाच्या एकाही नेत्याला त्यांनी लग्नासाठी बोलावले नव्हते.

एवढंच नाही तर त्या आवारात बिहारी सरकारचे कोणतेही हेलिकॉप्टर किंवा विमान दरभंगा किंवा सहरसा या विमानतळावर उतरणार नाही याची खबरदारी घेण्याची ताकिद त्यांनी अधिकाऱ्यांना दिली होती.

त्यांच्या कारकिर्दीतील अजुन एक किस्सा सांगितला जातो तो म्हणजे त्यांनी त्यांचे सहकारी पीलू मोदी यांना प्रचारासाठी एक हेलिकॉप्टर उधार मागितल्याचा. “तुम्ही जर मला एक हेलिकॉप्टर प्रचारासाठी दिले तर अर्धी विधानसभा आपली असेल.” असं कर्पूरीजी बोलले होते. त्याला मिश्किलपणे उत्तर देताना पीलू मोदी म्हटले होते, “तसं असेल तर २ हेलिकॉप्टर घेऊन जा, सगळीच विधानसभा जिंकून या.”

आपल्याकडे असलेल्या मर्यादीत वाहनांमुळे प्रचारावेळी त्यांना सगळीकडे जाता येत नसे. त्यामुळे हा हेलिकॉप्टरचा किस्सा प्रसिद्ध झाला. त्यांना हेलिकॉप्टर मिळाले नाहीच, परंतु निवडणूक मात्र ते जिंकले.

त्यांच्या साधेपणाचं दर्शन करुन देणारा अजून एक गंमतशीर किस्सा बिहारच्या राजकीय वर्तुळात प्रसिद्ध आहे. १९७७ साली जयप्रकाश नारायण यांचा वाढदिवस साजरा केला जात होता. देशभरातुन सगळे जनता पक्षाचे नेते समिती भवनात जमले होते. त्यात चंद्रशेखर, नानाजी देशमुख इत्यादी नेते सुद्धा सामिल होते.

मुख्यमंत्री असुनही फाटका सदरा, तुटलेली चप्पल आणि विखुरलेले केस या वेषात कर्पुरीजींनी तिथं प्रवेश केला. त्याच वेळी एका मुख्यमंत्र्याला नेमका किती पगार दिला जातो यावर एका नेत्याने मिश्किलपणे विनोद केला होता.

कर्पुरीजींची ही अवस्था बघुन चंद्रशेखरजी उठले आणि आपल्या सदऱ्याची झोळी करत त्यांनी तिथे जमा असलेल्या नेत्यांकडून वर्गणी गोळा करण्यास सुरुवात केली. काहीच वेळात १०० रुपये गोळा झाले. ते घेऊन चंद्रशेखर कर्पुरीजींकडे गेले आणि त्यांना सदरा आणि धोतर घेण्यास सांगितले. त्यावेळी कर्पुरीजींनी चेहऱ्यावर कसलेही भाव न दर्शविता “हे पैसे मी मुख्यमंत्री मदतनिधी मध्ये जमा करतो” असे सांगितले होते.

साधी राहणी-उच्च विचारसरणी याचं मुर्तिमंत उदाहरण म्हणजे कर्पुरीजी ठाकुर. स्वत:चं म्हणता येइल असं त्यांच्याकडे फक्त त्यांचं कर्तुत्व होतं, त्या बदल्यात कसल्याही परतफेडीची अपेक्षा त्यांनी केली नाही. आजच्या नेत्यांसाठी कर्पुरीजी एक उत्तम आदर्श आहेत एवढं मात्र नक्की.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!