आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
आपल्या भारतात निवडणुका आल्या की सगळ्या नेत्या लोकांचं जाती-धर्मावरचं प्रेम उफाळून येतं. काही दिवसांपूर्वी लोकसभेच्या निवडणुकांचं सर्वत्र वातावरण होतं. यातही इतर राज्यांपेक्षा जास्त चर्चा झाली ती अर्थातच योगींच्या उत्तर प्रदेशातील निकालाची.
याच उत्तर प्रदेशात २०२२ साली विधानसभा निवडणुका झाल्या. त्या निवडणुकांच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान व्हायच्या तीन दिवसांपूर्वी काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी वाराणसीच्या कबीर मठात राहायला गेल्या होत्या. साहजिकच या गोष्टीची चर्चा सर्वत्र झाली. ही खेळी खेळण्यामागे प्रियंका गांधींचा काय हेतू असेल तो असेल पण त्यानिमित्ताने हा कबीर मठ मात्र चांगलाच चर्चेत आला. आज आम्ही तुम्हाला या कबीर मठाचाच इतिहास सांगणार आहोत.
कंबीर पंथींसाठी हे त्यांचे पवित्र स्थान आहे. हा मठ लहरतारा येथे विस्तीर्ण परिसरात पसरलेला आहे. या संकुलात अनेक मोठ्या इमारती, मंदिरे आणि स्मारके आहेत.
बनारसमधील कबीरचौरा येथे संत कबीर यांनी बराच काळ वास्तव्य केले होते असं म्हणतात. ही एक प्रकारे त्यांची कर्मभूमीच होती. इथेच त्यांनी आपल्या बोलण्याने लोकांना प्रभावित केले. हा मठ त्यांच्या शिकवणींचे, संदेशांचे आणि आठवणींचे केंद्र आहे. दरवर्षी कबीर जयंतीला देश-विदेशातून मोठ्या संख्येने अनुयायी येथे येतात.
कबीर कोण होते हे वेगळं सांगायची गरज नाही. कबीर हे पंधराव्या शतकातील महान संत होते. हिंदी साहित्यातील भक्ती युगाचे ते प्रवर्तक होते. त्यांचा अलिप्त विचारसरणीवर विश्वास होता. त्यांच्या रचनांचा लोकांवर खूप प्रभाव पडला. कबीरांच्या शिष्यांनी त्यांच्या विचारधारेवर आधारित एक पंथ सुरू केला, ज्याला कबीर पंथ म्हणतात. देशभरातील सुमारे एक कोटी लोक या पंथाशी संबंधित असल्याचे मानले जाते. हा संप्रदाय अनेक प्रवाहांमध्ये विभागला गेला आहे.
वाराणसीमधील कबीरचौरा येथे त्यांच्या शिष्यांनी त्यांच्या नावाने एक मठही बांधला, जो काळानुसार वाढत गेला. हा मठ एक मोठे आध्यात्मिक केंद्र तर आहेच, पण असं म्हणतात की इथे त्यांचा आवाज ऐकू येतो. लोक येथे येतात आणि इथे त्यांना कबीरांच्या संदेशांची जाणीव होते.
कबीर मठात समाधी मंदिर, कबीर झोपडी, त्यांचे व्यासपीठ, बिजक मंदिर, नीरू टिळा, ग्रंथालय आणि अनेक स्मारके आहेत. संकुलातील मोठ्या आणि हिरव्यागार बागेत अनेक पुतळे आहेत. येथील वातावरण एक वेगळीच अनुभूती देते.
संत कबीरांनी आपल्या विचारांचा प्रसार करण्याची जबाबदारी चार मुख्य शिष्यांवर दिली. हे चार शिष्य म्हणजे ‘चतुर्भुज’, ‘बांके जी’, ‘सहते जी’ आणि ‘धर्मदास’. कबीरांच्या वचनांचा प्रसार करून एक वेगळ्या प्रकारचा समाज निर्माण व्हावा म्हणून देशभर फिरले. तथापि, त्याच्या पहिल्या तीन शिष्यांबद्दल फारसा तपशील उपलब्ध नाही.
पण, चौथे शिष्य धर्मदास यांनी कबीर पंथाची ‘धर्मदासी’ किंवा ‘छत्तीसगढ़ी’ शाखा स्थापन केली होती, जी सध्या देशातील सर्वात मजबूत कबीरपंथी शाखा आहे. कबीरांचे शिष्य धर्मदास यांनी त्यांच्या मृत्यूनंतर सुमारे शंभर वर्षांनी हा पंथ सुरू केला, असेही मानले जाते.
संत कबीर हिंदू आणि इस्लाम या दोन्ही धर्मांवर टीका करत. त्यांनी त्याग आणि सुंता निरर्थक ठरवले. मात्र, त्यांच्या या बोलण्याने त्यावेळी हिंदू आणि मुस्लिमांमध्येही प्रचंड नाराजी पसरली होती. त्यांना अनेकदा धमक्याही आल्या.
देशातील एकूण ९६ लाख लोक कबीरपंथी असल्याचे मानले जाते. त्यात मुस्लिमांची संख्या कमी आणि हिंदू मोठ्या संख्येने आहेत. यासोबतच बौद्ध आणि जैन धर्मासह इतर अनेक धर्माचे लोक देखील आहेत. कबीरपंथी कंठी घालतात, बीजक, रमणी इत्यादी ग्रंथांबद्दल आदरयुक्त वृत्ती बाळगतात. गुरू हा सर्वांपेक्षा श्रेष्ठ मानला जातो. सुरुवातीला तात्विक आणि नैतिक शिक्षणावर आधारित असलेला हा पंथ पुढे धार्मिक पंथात रुपांतरीत झाला.
कबीरपंथाच्या दोन प्रमुख शाखा आहेत. पहिल्या शाखेचे केंद्र ‘कबीरचौरा’ (काशी) आहे. ज्याची महघरमध्ये उपशाखा आहे, जिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी गेले होते. दुसरे मोठे केंद्र छत्तीसगढ अंतर्गत येते, ज्याची स्थापना धर्मदासांनी केली होती. त्यांच्या अनेक शाखा आणि उपशाखा देखील नमूद केल्या आहेत. पुढे छत्तीसगढी शाखाही अनेक शाखांमध्ये विभागली गेली. ज्यामध्ये कबीरचौरा जगदीशपुरी, हरकेसर मठ, कबीर-निर्णय-मंदिर (बुऱ्हाणपूर) आणि लक्ष्मीपूर मठ यांचा समावेश आहे.
कबीरपंथाच्या इतर शाखांच्या तुलनेत, छत्तीसगढ़ी शाखा ही सर्वात जास्त पसरलेली आहे आणि अनुयायांची संख्याही सर्वात जास्त आहे. छत्तीसगड शाखेच्या उपशाखा मंडला, दमखेडा, छतरपूर इत्यादी ठिकाणी आहेत.
कबीर पंथाच्या छत्तीसगढ़ी शाखेने कबीरांवर अनेक ग्रंथ आणि रचना तयार केल्या. मात्र, यासोबतच कबीरने जे सांगितले होते, तेच मुळात गायब झाले. परिणामी, हा पंथही सांप्रदायिकता, कर्मकांड आणि इतर दिखाऊपणात बंदीस्त राहिला.
असं म्हणतात की कबीर हे वाराणसीहून कबीरचौरा येथे येऊन राहत होते आणि इथेच त्यांनी लोकांना ज्ञानदानाचं काम केलं. त्यामुळे हे कबीरांचे मुख्य मंदिर आहे. येथे कबीरदासांचा मठ आणि मंदिर आहे, ज्यामध्ये त्यांचे चित्र ठेवलेले आहे. त्याच्या दर्शनासाठी दूरदूरवरून लोक येतात.
केवळ प्रियंकाच नाही तर महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू आणि इतर बडे नेते यापूर्वी येथे आले आहेत. गांधीजी येथे वारंवार येत असत. रवींद्रनाथ टागोर इथे येऊन राहायचे. हे काशीचे सांस्कृतिक केंद्र मानले जाते.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.