प्रचंड प्रतिकूल वातावरणातही या ठिकाणांवर आपले सैन्य सीमेचे रक्षण करत आहे

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


भारतीय सैन्य सीमेवर कायम दोन आघड्यांवर युद्ध लढत असते. शत्रूशी आणि बिकट नैसर्गिक परिस्थितीशी. आपल्या अतुलनीय शौर्याने राष्ट्राचे रक्षण करणाऱ्या सैन्याला आपण नेहमी मानवंदना देत असतो, पण प्रतिकूल वातावरणात स्वतःला लढण्यायोग्य बनवण्यासाठी सैनिकाला किती संघर्ष करावा लागतो, याची आपल्याला कल्पना नसते.

आपल्या देशाची अखंडता आणि सार्वभौमत्व यांच्या रक्षणासाठी आपले सैन्यदल सदैव तत्पर असते. गेल्या काही महिन्यांपासून भारत आणि चीनचा सीमाप्रश्न पेटला असून लडाखच्या चीन सीमेवर मोठ्या प्रमाणावर सैन्य तैनात करण्यात आले आहे. हा असा भाग आहे जिथे वर्षातील काही महिने प्रचंड थंडी पडते आणि या काळात दळणवळण ठप्प होत असते.

भारतात असे देखील काही भाग आहेत ज्यात प्रचंड थंडी आणि कडक ऊन या दोहोंचा सामना सैन्याला करावा लागतो.

भारतीय थलसेना, नौसेना आणि वायुसेना यांचे जवान आपल्या अजोड देशभक्ती, अनुशासन आणि साहसासाठी ओळखले जातात. बऱ्याचदा अत्यंत विपरीत परिस्थितीत भारतीय सैन्याने आपल्या शौर्याचे प्रदर्शन केले आहे.

उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत आणि पश्चिमेपासून पूर्वेपर्यंत अत्यंत कठीण परिस्थितीत सैन्य तैनात असते.

भारतातील अशा १० कठीण ठिकाणांची माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत जिथे अत्यंत प्रतिकूल नैसर्गिक परिस्थितीचा सामना करून भारतीय सैन्य देशाचे रक्षण करत असते.

१) सियाचीन ग्लेशियर

सियाचीनला जगातील सर्वात उंच रणभूमी म्हणून संबोधले जाते. काराकोरम पर्वताच्या पूर्वेला समुद्रसपाटीपासून १८८३५ फूट उंचीवर असलेल्या रणभूमीचे तापमान ऋण ५० सेल्सिअसपर्यंत घसरते.

या भागातील अनेक सैनिक खराब वातावरणामुळे आपल्या प्राणाला मुकतात. सियाचीनमध्ये तैनात करण्यापूर्वी सैनिकांची कठोर ट्रेनिंग घेतली जाते.

२) द्रास

जम्मू आणि काश्मिरच्या उत्तरेला स्थित ‘द्रास’ हा लहानसा कसबा ज्याची लोकांसंख्या फक्त १०२१ इतकी आहे, तो भारताच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. हा जगातील सर्वात शीतल प्रदेशांपैकी एक आहे.

इथे १० सेल्शियस पेक्षा जास्त तापमान कधीच नसते. बहुतांश वेळा तापमान 0℃ पेक्षा कमीच असते.

हा छोटासा भाग भारताला लडाखशी जोडतो म्हणून त्याला संरक्षण दृष्ट्या फार महत्व आहे. १९९९ साली पाकिस्तानने या भागात आपलं वर्चस्व निर्माण करायचा प्रयत्न केला होता, पण त्यानंतर झालेल्या कारगिल युद्धात पाकिस्तान तोंडावर आपटला होता.

३) जम्मू-काश्मीर

कडाक्याची थंडी आणि मान्सूनमुळे या भागातील स्थिती बऱ्याचदा प्रतिकुल असते. आतंकवाद आणि इतर अनेक संरक्षण विषयक समस्यांमुळे येथे सैन्य दल सदैव अलर्ट वर असते.

२०१४ साली जम्मू काश्मीरमध्ये प्रचंड प्रलयंकारी पूर आला होता, त्यावेळी भारतीय सैन्याने सामान्य नागरिकांची खूप मदत केली होती. थलसेना, वायुसेना आणि नेव्ही यांच्या एकत्रित प्रयत्नामुळे येथे २ लाख लोकांच्या जीवाचे रक्षण करणे शक्य झाले होते.

४) राजस्थान सीमा

पाकिस्तान आणि भारताला विभागणाऱ्या उत्तरे पासून पश्चिमेपर्यंत पसरलेल्या या सीमा रेषेवरील हवामान अगदी विपरीत स्वरूपाचे असते.

रात्री प्रचंड थंडी पडते तर दिवसा रखरखत्या उन्हात जवानांना गस्त घालावी लागते.

इथे तापमान ५० अंशापर्यंत सहजपणे जाऊन पोहचतं. धुळीचे वादळ, रेती यामुळे या भागात वास्तव्य करणे फार अवघड असते. हे वातावरण असं असलं तरी देखील भारतीय सेना या भागावर गस्त घालत असते.

५) समुद्री सीमा

गुजरातपासून बांग्लादेशपर्यंत भारताची सागरी सीमा पसरलेली आहे. या सीमेची लांबी ७५०० किलोमीटर इतकी असून याठिकाणी नौदल आणि कोस्टगार्डस तैनात केलेले आहेत.

२६/११च्या हल्ल्यानंतर सागरी सीमांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नौसेनेची भूमिका महत्वाची होती. या लांब सीमा रेखेवर प्रतिकूल वातावरण आणि वादळी वारे यांचा सामना करत भारतीय नौदल गस्त घालत असते.

६) अंदमान निकोबार

बंगालची खाडी आणि अंदमानचा समुद्र यांच्या मधोमध स्थित हा द्वीपसमूह हा भारतीय नौसेना आणि वायुदल या दोघींच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा भाग आहे. इथे पाऊस दीर्घकाळ चालतो आणि वातावरणात सदैव दमटपणा असतो. यामुळे सैन्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. हा भाग दक्षिण चिनी समुद्राच्या जवळ असल्याने चीनचा हालचालींवर नजर ठेवण्यासाठी इथे सैन्याला प्रचंड अलर्ट वर राहावे लागते.

७) अरुणाचल प्रदेश

भारताची चीनसोबत ३ हजार किमीची सामायिक सीमा आहे. या सीमेचा बहुतांश भाग अरुणाचल प्रदेश मधून जातो, यामुळे सैन्याला सदैव अलर्ट राहावे लागते.

इथली भौगोलिक संरचना विचित्र असल्याने या भागात कनेक्टिव्हिटीचा मोठा त्रास आहे.

अशा पर्वतीय प्रदेशात सैन्याबरोबर वायूदल देखील गस्त घालत असते. इथे कोसळणाऱ्या प्रचंड पावसामुळे बऱ्याचदा या भागात सैन्याला प्रचंड त्रास सहन करावा लागतो.

८) सिक्कीम

इथे वर्षभर पाऊस आणि बर्फाच्या वादळाचे फेरे आलटून पालटून सुरूच असतात. इथे प्रचंड थंडी तसेच खूप पाऊस असतो, या वातावरणात देखील सैनिक पहारा देतात. येथे थलसेना पहारा देत असते आणि वायुसेना त्यांना आवश्यक सामग्री पोहचवण्याचे काम करत असते. हा भाग चीनच्या सीमेला लागून असल्याने इथे भारतीय सैन्याला फार काळजीपूर्वक कारवाई करावी लागते.

९) उत्तराखंड

उत्तराखंड हे देखील जम्मू काश्मीर प्रमाणे एक पर्वतीय राज्य असून या ठिकाणी देखील तापमान शून्य सेल्सियस पेक्षा कमी असते, या भागात मान्सूनमध्ये प्रचंड वर्षा होते.

या भागात चीनच्या बाजूने होणाऱ्या घुसखोरीला रोखण्यासाठी प्रचंड सावधान रहावे लागते. यामुळेच कठोर हवामान असले तरी सैन्य तैनात असते.

२०१३ मध्ये या भागात मोठा पूर आला होता, त्यावेळी सैन्याने हजारो लोकांचा जीव वाचवला होता.

१०) हवाई रणभूमी

देशाच्या हवाई रणभूमीच्या रक्षेचे दायित्व वायु सेनेवर असते. देशभरात सैन्यदलाच्या साधन सामग्री पुरवठ्यापासून हवाई हद्दीच्या संरक्षणापर्यंत सर्व काही करण्याची जबाबदारी ही वायुसेनेची असते.

उत्तरेतील प्रचंड बर्फाळ वातावरण असो की राजस्थानमधील भीषण उष्णता, दोन्ही ठिकाणी वायू सेना आपला पराक्रम दाखवत असते.

भारतीय सैन्य अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपले व आपल्या परिवाराचे रक्षण करत असते, त्यासाठी ते स्वतःच्या परिवाराचा देखील विचार करत नाही, त्यांच्या साठी भारत माता आणि तिची सेवा हेच सर्वस्व असते, त्यामुळे त्यांच्या कार्याप्रति आपण सर्वच सदैव कृतज्ञ असायला हवे!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!