हार्वर्ड बिझनेस स्कूलचे प्रमुख म्हणून या मराठी माणसाची नियुक्ती करण्यात आली आहे

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


भारतीय वंशाचे प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ श्रीकांत दातार यांची नुकतीच जगप्रसिद्ध हार्वर्ड बिझनेस स्कुलच्या प्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. नितीन नोहरिया यांच्यानंतर या ११२ वर्ष जुन्या संस्थेचे प्रमुखपद भूषविणारे ते दुसरे भारतीय आहेत.

श्रीकांत दातार हे मुंबई विद्यापीठ आणि आयआयएम अहमदाबाद या संस्थांचे माजी विद्यार्थी असून ते हार्वर्ड बिझनेस स्कुलच्या आर्थर लुईस डिकन्सन बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन भागाचे प्राध्यापक आणि वरिष्ठ सहाय्य्क शाखाप्रमुख होते.

येणाऱ्या १ जानेवारी पासून ते हार्वर्ड बिझनेस स्कुलच्या प्रमुखपदाची जबाबदारी स्वीकारतील.

श्रीकांत दातार हे एक संशोधक वृत्तीचे प्राध्यापक आणि एक प्रज्ञावंत अभ्यासक आहेत. बिझनेस एज्युकेशनच्या क्षेत्राच्या भविष्यात होणाऱ्या विकासाचे ते आद्य प्रवर्तकी असून येत्या काही काळात ते या क्षेत्राच्या विकासात महत्वपूर्ण योगदान देणार आहे.

हार्वर्ड बिझनेस स्कुलद्वारे कोरोनाच्या सामन्यासाठी ज्या काही योजना आखण्यात आल्या, त्याला श्रीकांत दातार यांचेच मार्गदर्शन लाभले आहे. श्रीकांत दातारांनी गेल्या ५ वर्षात या संस्थेतील अनेक महत्वपूर्ण पदांना भूषविले आहे. त्यांनी हार्वर्डच्या इतर संस्थांच्या सोबत एकत्रितपणे अनेक योजनांची यशस्वी अंमलबजावणी केली आहे.

दातार यांनी या नियुक्तीने फार भारावून गेल्याची आणि एक प्रकारचा मोठा सन्मान मिळाल्याची भावना व्यक्त केली आहे.

हार्वर्ड बिझनेस स्कुलच्या इतिहासात या संस्थेने अनेक प्रकारे समाज व्यवस्थेला उपकारक ठरणाऱ्या प्रोजेक्ट्सचा अंगीकार केला आहे.

 भविष्यात हार्वर्डच्या माध्यमातून लोकांच्या जीवनावर परिणाम करणाऱ्या असंख्य कल्पनांचा विकास करता येईल या दृष्टीने प्रयत्न करत राहणार असल्याचे श्रीकांत दातार यांनी नमूद केले आहे.

नोहारीया यांच्या १० वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर त्यांनी गेल्या वर्षी हे पद २०२० च्या अखेरपर्यंत मुक्त करण्याची घोषणा केली होती. आता त्यांच्या रिक्त जागेवर श्रीकांत दातार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीकांत दातार या संस्थेचे ११ वे प्रमुख आहेत.

श्रीकांत दातार यांचे पदवीचे शिक्षण मुंबई विद्यापीठात पार पडले. १९७३ साली उत्तम गुणांनी ते पदवी परीक्षा पास झाले, त्यानंतर त्यांनी सीएची परीक्षा देत त्यात यश मिळवले. पुढे त्यांनी अहमदाबादच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधून व्यवस्थापन शास्त्रातील पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर प्रसिद्ध स्टॅनफोर्ड विद्यापीठातून त्यांनी सांख्यिकी शास्त्राची पदविका मिळवली आणि पुढे अर्थशास्त्रात पीएचडी पूर्ण केली.

१९८४ ते १९८९ या काळात त्यांनी कार्नेगी मेलॉन स्कुल ऑफ इंडस्ट्रियल ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये आधी सहाय्य्क प्राध्यापक आणि त्यानंतर सहयोगी प्राध्यापक म्हणून नोकरी केली. याच ठिकाणी त्यांना जॉर्ज लेलँड बॅच टिचिंग अवॉर्डने सन्मानित करण्यात आले.

१९८९ ते १९९६ या कार्यकाळात त्यांनी स्टँनफोर्ड विद्यापीठात नोकरी करण्यास सुरुवात केली. त्यांनी लिटलफिल्ड प्रोफेसर ऑफ अकौंटिंग अँड मॅनेजमेंट हे पद भूषविले. त्यांना स्टॅनफोर्ड विद्यापीठाचा पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला.

त्यांनी या काळात आपली मातृभूमी असलेल्या भारताला बऱ्याचदा भेट दिली. हार्वर्ड बिझनेस स्कुलच्या अनेक प्रकल्पांसाठी ते अनेक देशात फिरले. आशिया, आफ्रिका, युरोप आणि उत्तर अमेरिकेतील अनेक कॉलेजांमध्ये त्यांनी आपले संशोधन प्रस्तुत केलेअसून यासाठी त्यांचे सर्व स्तरावरील तज्ञांनी कौतुक केले आहे.

त्यांनी देशोदेशीच्या व्यवस्थापनशास्त्र अभ्यासक्रमावर अनेक सेमिनार आयोजित केले आहेत. हार्वर्ड बिझनेस स्कुलच्या आफ्रिकेतील सिनियर एक्सीक्युटिव्य्ह प्रोग्रामचे नेतृत्व त्यांनी केले आहे.

घाना, मॉरिशस, रवांडा आणि दक्षिण आफ्रिकेत त्यांनी अनेक प्रोग्रॅम उपलब्ध करून दिले आहेत. भारताच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या डायरेक्टर पॅनलमध्ये त्यांनी काम केले आहे.

१९९६ सालापासून ते हार्वर्ड विद्यापीठातील अनेक महत्वाच्या पदांवर राहिले आहे. हार्वर्ड बिझनेस स्कुलला एक वेगळी दिशा देण्यात, नवनवीन कोर्सेसची रचना करण्यात, संशोधनाला चालना देण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे.

२०१५ पासून ते हार्वर्डच्या इनोव्हेशन लॅब्स या फोरमवर कार्यरत असून त्यांनी नुकतेच इनोव्हेटिव्ह हायब्रीड टिचिंग अँड लर्निंग मॉडेल तयार केले आहे.

याचा शिक्षण क्षेत्राला मोठा फायदा झाला आहे. याच मॉडेलचा वापर कोरोनाच्या काळात हार्वर्डद्वारे करण्यात आला आहे.

व्यवस्थापनशास्त्रातील दशकभराच्या अभ्यासातून आणि संशोधक वृत्तीतून ते हार्वर्डला एका वेगळ्या उंचीवर नेतील, असा विश्वास त्यांच्या सहकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. अगदी नोहारीया यांनी देखील हार्वर्ड बिझनेस स्कुलसाठी दातार यांच्या शिवाय दुसरी उत्तम व्यक्ती असू शकत नाही, असा विश्वास व्यक्त केला आहे.

दातार यांनी अनेक पुस्तकांचे सहलेखन केले असून त्यांनी बायोटेक, लाईफ सायन्स आणि इंजीनिअरिंग सायन्स या क्षेत्रातील व्यवस्थापकीय अभ्यासक्रम सुरु करण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. दातार हे सध्या नोव्हार्टीस आणि टी मोबाईल या दोन कंपन्यांच्या बोर्डवर देखील कार्यरत आहे.

मूळचे भारताचे आणि त्यातल्या त्यात आपल्या महाराष्ट्राचे असलेले श्रीकांत दातार हार्वर्ड बिझनेस स्कुलला एका वेगळ्या उंचीवर नेतील यात तिळमात्र शंका नाही.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!