आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
जगासमोरील आठ मुख्य विषयांपैकी एक असलेला, आणि मानवतेसमोर मोठं आव्हान होऊन बसलेला प्रश्न म्हणजे पर्यावरण! युरोपात झालेल्या औद्योगिक क्रांतींच्या परिणामांनी जितकं मानवाचं आयुष्य घडलंय त्यापेक्षा कैक पटीने ते बिघडलंय असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. वातावरणात सतत होणार बदल, वन्य प्राण्यांचं मानवी वस्तीत येणं, समुद्रपातळीत होणारी वाढ आणि पृथ्वीचं सतत वाढणारं तपमान ही पर्यावरणाचा समतोल बिघडण्याची लक्षणं आहेत.
या सर्व कारणांमुळे मानवाच्या प्रकृतीवरही मोठा परिणाम होतोय. मागच्या दहा वर्षांत घटलेलं आयुष्यमान, मधुमेह आणि तत्सम आजार यांमुळे माणसाला ऐशो-आरामाचं जीवन जरी मिळालं असलं तरी “निरोगी” जीवनाचा आभाव स्पष्टपणे दिसून येतो.
मोठ्या प्रमाणात उत्पादनासाठी रासायनिक खतांचा केला जाणारा अतिरिक्त वापर, किडीपासून संरक्षणासाठी वापरण्यात येणारी अतिरिक्त किटकनाशकं आणि एकाच पिकाच्या वर्षानुवर्षे घेत असलेल्या उत्पादनामुळे होणारं मातीचं नुकसान या आणि अशा अनेक कारणांमुळे पर्यावरणाबरोबरच मानवतेचीही मोठी हानी होत आहे. तसेच निर्वनीकरणामुळेही मानवाला मोठ्या संकटाला सामोरं जावं लागत आहे.
अशा परिस्थितीत संयुक्त राष्ट्राने सांगितलेल्या शाश्वत विकासाची ध्येयं साध्य करणं हे मानवासमोरील उद्दिष्ट असायला हवं. सर्व विचारसरणींमधील मतभेद बाजूला ठेऊन आपल्या अस्तित्वासाठी आणि आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी निदान पर्यावरणाच्या मुद्द्यावर जगाने एकत्र येऊन विचार आणि कृती करणं महत्वाचं आहे.
याच दृष्टीने एक पाऊल पुढे टाकत आणि जगासमोर एक आदर्श उभा करून भारताने २४ तासांत सुमारे ५ कोटी झाडांची लागवड केली. ही झाडे ८० वेगवेगळ्या प्रजातींची आहेत. भारताने हा जागतिक विक्रम ११ जुलै २०१६ या दिवशी उत्तरप्रदेश राज्यात केला.
५ कोटी झाडांची लागवड करत भारताने पाकिस्तानचा २०१३ साली असलेला रेकॉर्ड मोडीत काढला. पाकिस्तानने २०१३ मध्ये २४ तासांत सुमारे ८ लाख झाडांची लागवड करून जागतिक विक्रम केला होता.
२०१६ च्या जागतिक पृथ्वीदिनी पॅरिस क्लायमेट अग्रीमेंटवर स्वाक्षऱ्या करून भारताने सुमारे २३ कोटी एकर इतक्या जमिनीवर वनाच्छादन करण्याला मंजुरी दिली होती. तसेच वनीकरणासाठी सुमारे ६ कोटींचा निधी मंजूर केला होता.
त्यानुसार उत्तर प्रदेश राज्यात राबवल्या गेलेल्या या मोहिमेत विक्रमी स्तरावर वृक्षारोपण करण्यात आलं. उत्तर प्रदेशबरोबरच अन्य राज्यांमध्येही अशा प्रकारचे अभियान चालवण्यात आले.
या विक्रमी कामासाठी सुमारे आठ लाख स्वयंसेवकांनी रेल्वे रुळांच्या बाजूंनी, रस्त्याच्या दुतर्फा आणि पडीक जमिनींवर वृक्षारोपण केलं, या अभियानानंतर प्रदूषण कमी करण्याचे आणि भारताच्या एकूण भूभागापैकी सुमारे १२ टक्के भाग वनाच्छादित करण्याचे स्वप्न दूर नाही असे दिसते.
या कौतुकास्पद अभियानानंतरही झाडांच्या आयुष्याचा विचार करणं गरजेचं आहे, इतक्या मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड केल्यानंतर त्यांचा पाणीपुरवठा, रोगराई आणि झाडांच्या मृत्युदरात होत असलेला चढ-उतार यांच्याकडे लक्ष देणं महत्वाचं ठरतं. याचाच विचार करून या ५ कोटी वृक्ष लागवडीकडे नियमितपणे लक्ष ठेवता येईल अशी व्यवस्था प्रशासनाने केली आहे. या साठी हवेतून घेण्यात येणाऱ्या छायाचित्रांचा वापर करण्यात येईल.
जगातील सर्वांत जास्त १० प्रदूषित शहरांपैकी ६ शहरं भारतातील आहेत. त्यामुळे ५० कोटी वृक्षांची लागवड ही फक्त एक सुरुवात असून आपल्याला पर्यावरणाच्या रक्षणार्थ यापेक्षा अनेक मोठ्या कामगिरी पार पाडायच्या आहेत. कारण अति-शहरीकरण, प्रदूषण, रसायनांचा वापर यांमुळे पर्यावरणाचा ऱ्हासही इतक्या मोठ्या प्रमाणात घडला आहे.
भारताचा हा रेकॉर्ड कोणाला मागे टाकण्यासाठी अथवा कोणाला कमी लेखण्यासाठी नसून, जगातील इतर देशांनी आणि शहरांनी यातून प्रोत्साहन मिळवावं हाच या मागचा शुद्ध हेतू आहे. खराब होत चाललेल्या पर्यावरणाला काही प्रमाणात का होईना पण जीवनदान देण्यासाठी वृक्षलागवड हा शेवटचा आणि सर्वोत्तम पर्याय आहे. या मुळे हवेची गुणवत्ता तर सुधारेलच पण वन्य प्राण्यांनाही आपला अधिवास परत मिळेल.
निर्दयी ब्रिटिश सरकारलासुद्धा भारतातील वनस्पतींचं महत्व समजलं होतं, म्हणूनच त्यांनी रस्त्याच्या दुतर्फा झाडांची लागवड केली होती. जुना मुंबई-पुणे मार्ग, पुण्यातील विद्यापीठ मार्ग आणि मुंबईतील फोर्टचा परिसर ही याची सर्वोत्तम उदाहरणे आहेत.
आज सह्याद्री पर्वतरांगेतील हजारो एकरावरील जंगल विकासाच्या नावाखाली तोडण्यात येत आहे, पश्चिम घाटातील वनस्पती आणि प्राणी प्रजाती या जगात एकमेव अशा आहेत, त्यांचा अधिवास संपला तर १९७२ सारखे दुष्काळ वारंवार महाराष्ट्रात आणि देशात वारंवार पडतील असं म्हटलं तर ते अतिशयोक्त ठरणार नाही.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब