आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
तुम्हाला “फास्टफूड” क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या प्रथितयश “मॅकडोनाल्ड्स्” रेस्टॉरंटच्या “ड्राईव्ह-थ्रू” संकल्पनेबद्दल माहिती आहे का? भारतातील हायटेक शहरांमध्ये वास्तव्यास असणाऱ्या बऱ्याच जणांना या संकल्पनेबद्दल माहिती असेल, परंतु शहरेतर भागातील अनेकांना कदाचित या व्यवस्थेबद्दल फारशी माहिती नसावी, त्यामुळे ही व्यवस्था नेमकी काय आहे?, त्याची सुरवात कशी झाली? अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरे आम्ही आज आपल्यासाठी घेऊन आलो आहोत.
आपण गाडी चालवत असताना आपल्याला एखादी वस्तू घ्यायची असल्यास ती वस्तू आपल्याला गाडीतून खाली न उतरता मिळू शकेल अशी व्यवस्था म्हणजे “ड्राइव्ह-थ्रू”. भारतामध्ये कोरोनाकाळात जेव्हा लोक गर्दीशी संपर्क होण्याच्या भीतीने दुकानात जाणे टाळत होते तेव्हा आपल्या ‘फास्ट-सर्व्हिस’ आणि ‘फास्ट-फूड’साठी प्रसिद्ध असलेल्या मॅकडोनाल्ड्स्, बर्गरकिंग, केएफसी अशा काही मोठ्या रेस्टॉरंट्स्-नी ‘ड्राइव्ह-थ्रू’ ही व्यवस्था भारतातील प्रमुख शहरांमध्ये सुरु केली होती. भारतामध्ये कोरोनाकाळात भरभराटीला आलेली ही व्यवस्था आजची नाही तर या व्यवस्थेची सुरुवात अमेरिकेमध्ये असणाऱ्या ‘जॉर्डन मार्टिन’ या व्यवसायिकाने सन १९३० साली केली होती, तिथून पुढे मग हळूहळू ही व्यवस्था इतर देशांमध्ये पसरली.
खाद्यक्षेत्रामध्ये सोयीची तसेच वेळेची बचत करणारी ही ‘ड्राइव्ह-थ्रू’ व्यवस्था आपल्या आवडत्या ‘मॅकडोनाल्ड्स्’ने कशी सुरु केली हे आज आम्ही आपल्याला सांगणार आहोत. ‘मॅकडोनाल्ड्स्’मध्ये या व्यवस्थेची सुरवात होण्यामागचा इतिहास हा सुद्धा तितकाच रंजक आहे.
मॅकडोनाल्ड्स्-चा पहिला ‘ड्राइव्ह-थ्रू’ सन १९७० च्या जानेवारीमध्ये उघडला होता. ‘सिएरा विस्टा’ या ॲरिझोनामधील मॅकडोनाल्ड्स् फ्रँचाईजीचे स्टेट मॅनेजर असलेल्या ‘डेव्हिड रिच’ यांनी भिंतीमध्ये बनवलेली एक छोटेखानी खिडकी होती. ही खिडकी एवढी आकर्षक आणि सर्वसुविधांनी युक्त नव्हती. तशी गरज सुद्धा रिच यांना वाटली नसावी. कारण ही खिडकी सर्वसामान्य लोकांच्या वापरासाठी नव्हे तर तिथे गस्त घालणाऱ्या सैनिकांना उपयोगी ठरेल अशी होती.
सन १९७० साली ‘फोर्ट हुआचुका’ येथील सैनिक रिचच्या या रेस्टॉरंट समोरून आपल्या बेसकडे जात-येत असताना बर्गर आणि फ्राईज् पाहत असत. परंतु आपल्या गणवेशामध्ये असताना सार्वजनिक ठिकाणी जायचे नाही अशा त्यांना त्यावेळी असलेल्या कडक दंडकानुसार यापैकी कोणताही सैनिक या रेस्टॉरंटमध्ये प्रवेश करू शकत नव्हता, म्हणजेच त्यांची इच्छा असूनही साधे कपडे घातल्याशिवाय त्यांना या रेस्टॉरंट मध्ये प्रवेश करता येणार नव्हता.
सैनिक जरी असले तरी ती माणसे होती. पण एक गोष्ट खरी, की सैनिकांना कधीही आपल्या कर्तव्यापासून चुकता येत नाही. या शतकाच्या पूर्वी “हुआचुका फोर्ट” येथील सैनिक अमेरिकन-मेक्सिकन सीमा भागातील बंडखोर आणि दरोडेखोरांपासून त्या भागाची सुरक्षा करण्यासाठी तैनात असत. रात्रीच्या वेळी हे सैनिक गस्त घालत असताना, या रेस्टॉरंटच्या समोर येऊन त्यांच्या भुवया आपसूकच उंचावल्या जायच्या, पण यावेळी ते ड्युटीवर असताना त्यांना सैन्याचे नियम पाळणे बंधनकारक असल्याने ते पुन्हा आपल्या बेसकडे मार्गक्रमण करत असत.
त्यांची सार्वजनिक ठिकाणी प्रवेश न करता येण्याची अडचण मात्र ‘रिचने’ बरोबर ओळखली होती. सैनिकांच्या या समस्येवर लवकरच तोडगा शोधून काढण्याचे त्याने ठरवले. शेवटी या अडचणींवर रिचने शोधून काढलेला ‘ड्राइव्ह-थ्रू’चा उपाय मात्र लागू पडला. म्हणजेच गस्त घालणारे हे सैनिक आता चालता-चालतासुद्धा आपले आवडते “फास्ट-फूड” खरेदी करू शकत होते. आजही ॲरिझोना सेंट्रल स्टेटचे रहिवासी या रंजक आठवणी विसरलेले नाहीत. आपल्या “फास्टफूडच्या” प्रतीक्षेत या “ड्राइव्ह-थ्रू” मधून सरकणाऱ्या सैनिकांच्या रांगा येथील रहिवाशांच्या आजही स्मरणात आहेत.
काही काळानंतर डलास, टेक्सस या शहरांतील मॅकडोनाल्डचा मॅनेजर असलेल्या एका व्यक्तीने १९७४ साली त्याचे “ओक्लाहोमा” शहरातील रेस्टॉरंटचे नूतनीकरण करण्याचे योजताना ‘ड्राइव्ह-थ्रू’ संकल्पना सर्वसामान्य नागरिकांसाठी अवलंबण्याचे ठरवले. एखाद्या छोट्या बागेसारखी व्यवस्था असलेल्या याठिकाणी त्याने चार खांब रोवून एक प्रवेशद्वार तयार केले होते. शेजारी उभ्या केलेल्या “रॉनाल्ड” या एकेकाळी मॅकडोनाल्ड्स् कंपनीच्या फिक्शनल व्यक्तिरेखेचा पुतळा उभा करून त्यामध्ये स्पीकर्सच्या साह्याने ग्राहकांच्या ऑर्डर्स घेता येतील अशी व्यवस्था त्याने निर्माण केली होती. सुरूवातीला किचकट आणि गुंतागुंतीची वाटत असलेली ही व्यवस्था मात्र अगदी सुलभतेने ग्राहकांच्या प्रशंसेस पात्र झाली. यामधून मिळणारा नफा हा अगदी ओसंडून वाहत होता. “मॅकडोनाल्ड्सची” या दोनच महिन्यातील विक्री ही ४० टक्क्यांनी वधारली होती.
मित्रांनो, जसा काळ पुढे सरकत गेला तसे ‘मॅकडोनाल्ड्स्’च्या या व्यवस्थेमध्येसुद्धा अनेक आधुनिक बदल घडले. ‘ड्राइव्ह-थ्रू’च्या खिडक्यांसामोरून सरकणाऱ्या गाड्यांच्या रांगांना आता अधिक वेळ प्रतीक्षा करावी लागत नाही. प्रवेशद्वारावर असलेले “मायक्रोफोन, स्पीकर्स आणि डिजिटल स्क्रीन्स” यांच्या साहाय्याने ग्राहकांच्या ऑर्डर्स प्रोसेस करणे अगदी सुलभ झाले आहे.
इतकंच नव्हे तर, २०१९ साली ‘फास्टफूड’ इंडस्ट्रीमध्ये प्रमुख असलेल्या या कंपनीने ठिकठिकाणी डिजिटल डिस्प्ले असलेले ‘ड्राइव्ह-थ्रू’ निर्माण केले होते, जे हवामान, वेळ, ट्राफिक इत्यादी ओळखून तुम्हाला तिथे प्रसिद्ध असणारे मेन्यू आयटम निवड करून देत होते. ‘मॅकडोनाल्डस्’ने यामध्ये केलेली गुंतवणूक खऱ्या अर्थाने फलद्रूप झाली आहे. कारण २०२० या वर्षीची मॅकडोनाल्ड्सच्या ‘ड्राइव्ह-थ्रू’च्या माध्यमातून झालेल्या ऑर्डर्सची विक्री ही संपूर्ण फास्ट-फूड साखळीच्या रेव्हेनुच्या ७०% इतकी जास्त होती.
तुम्हाला रेस्टॉरंटमध्ये बसून खाण्याचा कंटाळा आला असेल किंवा आपल्या आवडत्या ठिकाणी आपले ‘फास्टफूड’ खाण्याचे ठरवले असेल तर ‘मॅकडोनाल्ड्स्’ची ड्राइव्ह-थ्रू व्यवस्था आपल्यासाठी अगदी सोयीची आणि वेळेची बचत करणारी आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.