आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
हॉरर सिनेमांमध्ये एक गोष्ट साधारणपणे दिसून येते, ती म्हणजे घनदाट जंगलामध्ये असलेला पडका आणि शापित वाडा! कित्येक चित्रपटांमध्ये आपण असे वाडे पाहिले आहेत. मात्र, दिल्लीमध्ये असलेला ‘मालचा महल’ हा खराखुरा शापित वाडा म्हणून प्रसिद्ध (किंवा कुप्रसिद्ध) आहे. ‘विलायत महल’ या नावानेही ओळखला जाणारा हा महाल खरंतर फार्म हाऊसारखा होता. स्वातंत्र्यपूर्व काळातील राजे-महाराजे जंगलात शिकारीसाठी गेल्यावर या महालात राहत.
दिल्लीच्या बिस्तदरी रोडवर असणाऱ्या बुद्ध जयंती पार्कमध्ये असलेला हा महाल आज अतिशय पडक्या स्थितीत आहे. याठिकाणी गेलेले लोक एकतर अतिशय घाबरलेल्या अवस्थेत परतले आहेत, किंवा गायबच झाले आहेत.
विलायत महालमध्ये गेलेले कित्येक पत्रकार गायब झाल्याचं बोललं जातं. मात्र, यात कितपत तथ्य आहे हे कोणालाच माहिती नाही.
हा विलायत महाल होता कोणाचा, तिथं कोण रहायचं, आणि असं काय झालं होतं की आज या महालाकडे सगळे भुताटकीच्या दृष्टीने पाहतात?
यासाठी आपल्याला स्वातंत्र्यपूर्व काळात जावं लागेल. १३२५ साली दिल्लीचा तत्कालीन सुलतान फिरोज शाह तुघलकाने हा महाल बांधला होता. मात्र, याला विलायत महाल हे नाव स्वातंत्र्योत्तर काळामध्ये मिळालं. भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा सर्व संस्थानांचं विलिनीकरण झालं, आणि बरेच राजवाडे सरकारजमा झाले.
यानंतर १९७० साली ‘बेगम विलायत महल’ या महिलेने हा महाल आपला असल्याचा दावा केला. आपण अवधच्या राजघराण्यातील असून या वाड्यावर आपला हक्क असल्याचा दावा या बेगमने केला. आपण अवधचे नवाब वाजिद अली शाहची नात असल्याचं या महिलेचं म्हणणं होतं.
सरकारने जप्त केलेली आपली सर्व संपत्ती परत करावी, अशी मागणी बेगम विलायतने केली होती. मात्र, सरकारने तिची मागणी फेटाळली. यानंतर तिने आधी लखनऊ आणि मग दिल्लीच्या रेल्वे स्थानकांमधील व्हीआयपी वेटिंग रुममध्ये राहून आंदोलन सुरू केलं. तिच्यासोबत तिची दोन मुलं, १३ श्वान आणि सात नोकरही होते. तब्बल नऊ ते दहा वर्षं ते याठिकाणी राहिले. या दरम्यान त्यांनी विविध अधिकाऱ्यांना, देशाच्या पंतप्रधानांना आणि अगदी पार इंग्लंडची राणी एलिझाबेथलाही पत्रं लिहिली होती. अखेर १९८४ साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी या सर्वांची भेट घेतली. त्यानंतर प्रशासनाला आदेश देऊन १९८५ साली हा महाल त्यांना देण्यात आला. मात्र, त्यानंतरही बेगम विलायतने आपल्या इतर संपत्तीसाठी मागणी सुरुच ठेवली.
सरकारने त्यांना महाल तर दिला. मात्र, या महालाला ना खिडक्या होत्या ना दरवाजे. स्वातंत्र्यानंतर कित्येक वर्षांपर्यंत दुर्लक्षित राहिलेल्या या महालाची मोठ्या प्रमाणात पडझड झाली होती. त्यातच जंगलात असलेल्या या महालामध्ये साप-विंचू आणि वटवाघळांनी घर केलं होतं. दिल्लीच्या इतर भागामध्ये वीज आणि पाणी पोहोचली असली, तरी या महालापर्यंत या सुविधा पोहोचल्या नव्हत्या. तरीही बेगम विलायत आपल्या दोन मुलांसह तिथं रहायला गेली. त्यानंतर त्या तिघांचा जगाशी संपर्कच तुटला. अशा परिस्थितीमध्ये राहिल्यानंतर त्यांच्यावर मानसिक परिणाम झाला नसता तर नवलच!
यानंतर १९९३ साली बेगम विलायतचा मृत्यू झाला. तिने ‘ड्रिंक ऑफ सायलन्स’ पिऊन आत्मह*त्या केली होती. वेगवेगळे विषारी पदार्थ, आणि तिच्याकडे असलेले हिरे-मोती यांचा चुरा एकत्र करुन तिने हे ‘पेय’ बनवलं होतं असं म्हणतात. यानंतर तिच्या मुलांनी तिचा मृतदेह जतन करुन ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, वर्षभराने त्यांनी तिचा मृतदेह (सांगाडा) दफन केला.
हे लोक या महालात येण्याच्या आधीपासूनच लोकांना या महालाबाबत कुतूहल निर्माण झालं होतं. या महालामध्ये खजिना असल्याच्या अफवाही पसरल्या. त्यामुळे लोकांनी याठिकाणी शिरुन खजिन्याच्या शोधात ठिकठिकाणी खड्डे खणून ठेवले होते. हे प्रकार तिघे याठिकाणी रहायला आल्यानंतरही थांबले नव्हते. त्यामुळे १९९० साली दिल्लीच्या लेफ्टनंट गव्हर्नरनी त्यांना बंदूक बाळगण्याची परवानगी दिली होती. यानंतर त्यांनी महालाच्या गेटवर बोर्डच लावला : ‘एन्ट्री रिस्ट्रिक्टेड. कॉशन ऑफ हाऊंड डॉग्ज. इंट्रूडर्स शाल बी गन्ड डाऊन’. यानंतर इकडे भटकणाऱ्यांची संख्या कमी झाली.
विलायतच्या मृत्यूनंतर महालामध्ये केवळ विलायतचा मुलगा रियाज उर्फ सायरस आणि मुलगी सकीना महल राहू लागले. आधीच लोकांशी कमी असलेला संबंध नंतर तर पूर्णपणेच तुटला.
सकीना आणि सायरस हे केवळ पत्रकारांशी बोलत, तेही अगदी कमी. बीबीसीच्या एका पत्रकाराने आत प्रवेश मिळवण्यासाठी आपल्या सहा वर्षांच्या मुलाची मदत घेतली होती. लहान मुलाला सोबत पाहून तरी सायरस आपल्यावर गोळी चालवणार नाही, अशी अपेक्षा ठेऊन तो पत्रकार आत गेला होता.
न्यूयॉर्क टाईम्सच्या एका पत्रकाराने सांगितलं, की हे दोघेही कोणाला भेटण्यास तयार होत नसत. अगदी क्वचित कधीतरी ते पत्रकारांना भेटत होते. मात्र, त्यातही ते केवळ विदेशी पत्रकारांना संधी देत. ॲलेन बॅरी या पत्रकाराची आणि सायरस यांची वारंवार भेट होऊन चांगली मैत्री झाली होती. २०१६ मध्ये पहिल्यांदा भेट झाल्यानंतर पुढे सुमारे दीड वर्षांपर्यंत कितीतरी वेळा एॅलेनने सायरसची भेट घेतली होती. या सर्व भेटींदरम्यान सायरसने आपली बहीण सकीनाचा कितीतरी वेळा बोलण्यात उल्लेख केला होता. मात्र, ॲलेनला ती कधीही भेटली नाही. मग काही महिन्यांनंतर त्यानं सांगितलं, की २०१३ मध्येच सकीनाचा मृत्यू झालाय. त्यानंतरही ॲलेन आणि सायरसमध्ये काही भेटी झाल्या. मात्र, २०१७मध्ये एका कामासाठी ॲलेना भारताबाहेर गेल्यानंतर तीनच महिन्यांनी सायरसचाही मृत्यू झाला.
ॲलेन बॅरीने पुढे सायरसच्या जीवनावर ‘द जंगल प्रिंस ऑफ दिल्ली’ असा लेख लिहिला. हा लेख पुढे पत्रकारितेतील सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या पुलित्झर पुरस्काराच्या शर्यतीतही पोहोचला होता. हा लेख प्रकाशित झाल्यानंतर बॅरीने या कुटुंबाची अधिक माहिती घेण्यास सुरू केलं. त्यासाठी ती लखनऊला गेली, जिथे अवध साम्राज्य होतं, आणि विलायतचं कुटुंब काही काळासाठी राहिलं होतं. तिथं विलायतबाबत चौकशी केल्यानंतर तिला समजलं, की ती राजघराण्याची वारस असल्याचा कोणताही पुरावा उपलब्ध नाही. स्थानिकांनीही हे मान्य करण्यास नकार दिला, की ती राजघराण्याशी संबंधित होती.
पुढे बॅरीला हेही समजलं, की सायरसचा एक मोठा भाऊही होता, जो आता इंग्लंमध्ये होता. हा शाहिद विलायतला पैसे पाठवत असे. या कुटुंबाचं खरं आडनाव महल नसून, ‘बट’ असल्याचंही त्याने सांगितलं. तसेच, आपला राजघराण्याशी कोणताही संबंध नसून, आपले वडील लखनऊ विद्यापीठात रजिस्ट्रार होते; आणि आपला मोठा भाऊ पाकिस्तान एअर फोर्समध्ये होता अशी माहितीही शाहिदने दिली.
पुढे असंही समोर आलं, की विलायत ही मूळची काश्मिरी होती. फाळणीच्या वेळी ती आपल्या कुटुंबीयांसह पाकिस्तानला गेली होती. याठिकाणी पाकिस्तानी पंतप्रधानांसोबत झालेल्या एका घटनेनंतर तिला वेड्यांच्या इस्पितळात ठेवण्यात आलं होतं. तिथं तिच्यावर शॉक थेरपीही वापरण्यात आली होती.
याठिकाणाहून सुटल्यानंतर ती आपल्या मुलांसह भारतात आली होती. याच्या काही दिवसांनंतरच शाहीद पळून गेला होता. तेव्हापासून ती सायरस आणि सकीनासोबत राहत होती. मात्र मग ज्याप्रकारे तिनं “मालचा महाल” मिळवला, आणि त्यात कित्येक वर्षं राहिलीही; ते पाहता तिला वेडी म्हणायचं की नाही हाच प्रश्न पडतो.
हा ‘विलायत महाल’ आज अगदीच मोडकळलेल्या अवस्थेत आहे. बेगम विलायत आणि त्यानंतर तिच्या दोन मुलांच्याही याठिकाणी झालेल्या मृत्यूमुळे या महालाभोवती गूढ वलय निर्माण झालंय. ज्याचीच परिणीती भुताटकीच्या कथांमध्ये होत आहे. २०१९मध्ये ‘इंडियन ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चर हेरिटेज’, म्हणजेच इनटॅचनं, या महालाची डागडुजी करण्याचा प्रस्ताव सरकारपुढे मांडला होता. यावर अद्याप निर्णय बाकी आहे. मात्र, याची डागडुजी झाल्यानंतर दिल्लीमध्ये हे एक आकर्षक पर्यटनस्थळ होईल, हे नक्की!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.










