आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
‘हॅरी पॉटर’ आता जवळपास सर्वांनाच माहिती झाले आहे. ‘जे.के. रोलिंग’ने लिहिलेल्या या पुस्तकांवर आधारित चित्रपटही जगभरात प्रसिद्ध आहेत. ‘हॅरी पॉटर’चे चाहते, म्हणजेच ‘पॉटरहेड्स्’मध्ये या सीरीजमधील डॉबी हे पात्र बरंच लोकप्रिय आहे. हॅरी पॉटरचा दुसरा भाग, म्हणजेच चेंबर ऑफ सीक्रेट्समध्ये डॉबी हे पात्र पहिल्यांदा सर्वांसमोर आणले गेले.
जेव्हा हे पुस्तक प्रसिद्ध झालं, तेव्हा याबाबत कोणालाच काही अडचण नव्हती. मात्र जेव्हा यावर आधारित चित्रपट प्रसिद्ध झाला, तेव्हा मात्र रशियामध्ये भूकंप झाला. एवढा मोठा, की रशियातील वकिलांनी चक्क ‘वॉर्नर ब्रदर्स’ – म्हणजेच या चित्रपटाच्या निर्मात्यांवर केस करण्याचा पवित्रा घेतला होता. याला कारण होतं ‘डॉबी’ आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यातील समानता.
तुम्ही जर हॅरी पॉटरमधील डॉबीला पाहिलं असेल, तर हा मुद्दा ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. कारण डॉबीचे रूप हे कुठूनही पुतीन यांच्यासारखे वाटत नाही. एकीकडे फाटके कपडे घालणारा, कधी चुकूनही अंघोळ न करणारा, अंगावरच्या फाटक्या कपड्याच्या तुकड्यानेच नाक पुसणारा, बटाट्याएवढे मोठे डोळे आणि फुग्यासारखं डोकं असणारा, बराचसा एलियन वाटणारा ओंगळवाणा डॉबी. तर दुसरीकडे; ज्युदोमध्ये ब्लॅक बेल्ट असणारे, नेहमी टापटीप कपड्यांमध्ये राहणारे असे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन. मात्र, तरीही रशियातील वकिलांच्या एका ग्रुपला डॉबी हे पुतीन यांचे विडंबन असल्याचे वाटले होते. म्हणूनच या वकिलांनी वॉर्नर ब्रदर्स विरोधात केस करण्याचा निर्णय घेतला होता.
‘हॅरी पॉटर’चे जादूई जग हे खऱ्या जगातील गोष्टींपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न ‘जे. के. रोलिंग’ पहिल्यापासून करत आल्या आहेत. खरंतर या जगाचा आणि त्या जगाचा तसा थेेट संबंध नाही. येथील नियम, राजकारण, वातावरण अशा सगळ्याच गोष्टी ‘हॅरी पॉटर’मध्ये वेगळ्या आहेत. बहुतांश लोक या जगापासून सुटका म्हणूनच ‘हॅरी पॉटर’च्या पुस्तकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये हरवून जाणे पसंत करतात.
तसं तर रोलिंगने ही पुस्तके लहान मुलांसाठी लिहिली असली, तरी मोठ्यांमध्येही याचे बरेच चाहते आहेत. जगभरात कित्येक भाषांमध्ये भाषांतरित झालेली, आणि मोठा फॅनबेस असणाऱ्या या सीरीजमध्ये तसं पहायला गेलं तर काहीच आक्षेपार्ह्य दिसून येत नाही. पण रशियातील वकिलांना मात्र त्यातील डॉबीमध्ये आपले लाडके राष्ट्राध्यक्ष दिसले, त्याला कोण काय करणार?
नाही म्हणायला पुतीन आणि डॉबीच्या चेहरेपट्टीमध्ये काही प्रमाणात साम्य आहे. जगभरातील नेटिझन्सनीदेखील हे मान्य केलं आहे. पुतीन यांची शारिरीक उंचीही इतर जागतिक नेत्यांच्या तुलनेत कमी आहे. डॉबीची उंचीही हॅरी पॉटरमधील इतर कित्येक कॅरेक्टर्सच्या तुलनेत कमी आहे. किती तरी नेटीझन म्हणतात, की फक्त डॉबीचे कान थोडे मोठे आहेत, आणि तो जरासा ठेंगणा आहे तसेच डॉबीकडे कदाचिक ब्लॅक बेल्ट नसेल; हे सोडलं तर पुतीन आणि डॉबीमध्ये काहीही फरक नाही.
एवढंच नव्हे, तर बीबीसीने जेव्हा आपल्या लहान मुलांसाठीच्या साईटवर, म्हणजेच ‘सीबीबीसी’वर एक व्होटिंग पोल घेतला, तेव्हा त्यातही सुमारे ५४ टक्के मुलांनी पुतीन आणि डॉबी सारखे दिसत असल्याचे म्हटले होते. “पुतीन आणि डॉबी हे जन्माच्या वेळी एकमेकांपासून दूर झालेले जुळे भाऊ वाटतात का?” असा मजेशीर प्रश्न सीबीबीसीने विचारला होता. एकंदरीत डॉबी आणि पुतीनमध्ये काहीतरी साम्य आहे, असा विचार करणारे केवळ रशियामधील वकील नव्हते. अशाच प्रकारचे आरोप अन्य ठिकाणहूनही करण्यात आले होते. तसेच रशियामध्येही विविध ठिकाणी अशा प्रकारच्या तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या.
चित्रपटामध्ये राजकारण्यांचे विडंबन करणे तशी नवीन गोष्ट नाही. कित्येक वेळा संपूर्ण सिनेमाच एखाद्या राजकारण्याचे विडंबन करण्यासाठी तयार करण्यात येतो, तर कधी देशातील राजकीय परिस्थितीचे विडंबन करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या चित्रपटांमध्ये राजकारण्यांनाही विनोदी रुपात दाखवण्यात येते. तर कित्येक वेळा राजकारणाशी संबंधित नसलेल्या चित्रपटांमध्येही राजकारण्यांचे विडंबन केल्याचा आरोप करण्यात येतो.
अर्थात, हे आरोप सिद्ध होण्याचे प्रमाण अगदीच नगण्य असते. ‘लॉर्ड ऑफ दि रिंग्ज : दि टू टॉवर्स’ या चित्रपटातील गोलम हे पात्र अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ‘जॉर्ज बुश’ यांचे विडंबन असल्याचा आरोपही करण्यात आला होता. अर्थात, हेदेखील न्यायालयात सिद्ध करणे शक्य झाले नव्हते.
डॉबी आणि पुतीन यांच्याबाबतही असंच झालं. ‘नोव्हाया गॅझेटा’ या वृत्तपत्राने काही वकील ‘वॉर्नर ब्रदर्स’वर केस करणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध केले होते. मात्र, त्याचे पुढे काय झाले किंवा ते कोणते वकील होते याबाबत त्यांनी कोणतीही माहिती जाहीर केली नाही. याप्रकरणी ‘वॉर्नर ब्रदर्स’विरोधात कोणतीही तक्रार दाखल झाली नाही.
दरम्यान, कित्येक नेटीझन्सनी डॉबी हा पुतीनपेक्षाही दुसऱ्याच एका नेत्याप्रमाणे दिसत असल्याचे म्हटले होते. बर्बनचा राजा किंग चार्ल्स दुसरा याच्यात आणि डॉबीमध्ये अधिक साम्य असल्याचे नेटीझन्सचे म्हणणे होते. या तुलनेने चिडलेल्या कित्येकांनी तर पुतीन यांनी आता या पत्रकारांवरच गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही केली. अर्थात, या सर्व प्रकरणांमध्ये ‘क्रेमलिन’ अगदीच शांत राहिले. रशियन सरकारकडून याबाबत कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही.
या प्रकरणात पुढे काहीच झालं नाही. ही खरंतर हॅरी पॉटरच्या चाहत्यांसाठी आणि वॉर्नर ब्रदर्ससाठीही चांगली गोष्ट होती. यानंतर पुढे कित्येक वर्षं हॅरी पॉटरच्या सर्व सिनेमांनी आपल्या चाहत्यांच्या मनात घर बनवलं. डॉबी या पात्राचाही एक विशेष फॅनबेस तयार झाला. हॅरीप्रती त्याचं असलेलं प्रेम, आणि हॅरिसाठी त्याने आपल्या प्राणाचं दिलेलं बलिदान हे कोणताही पॉटरहेड विसरू शकणार नाही.
दरम्यान, हॅरी पॉटर सीरीज संपल्यानंतर खरंतर ‘फॅन्टॅस्टिक बीस्ट्स’ ही सीरीज चाहत्यांना तेवढी रुचली नाही. या सीरीजमधील पहिले दोन चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपेक्षित यश मिळवू शकले नाहीत आणि ही सीरीज वादातही राहिली. मात्र, आता या सीरीजमधील तिसरा चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे.
हॅरी पॉटरमधील प्रसिद्ध पात्र, डम्बलडोर यांच्यावर आधारीत असल्यामुळे या चित्रपटाची हाईप सध्या मोठ्या प्रमाणात आहे. ‘फॅन्टॅस्टिक बीस्ट्स : सीक्रेट्स ऑफ डम्बलडोर’ हा चित्रपट २०२२ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये ‘ज्यूड लॉ’, ‘ईझ्रा मिलर’, ‘एडी हेडमेन’, ‘मॅड्स मिक्केलसेन’ अशी तगडी स्टारकास्ट असणार आहे. तेव्हा या चित्रपटाला पहिल्या दोन चित्रपटांपेक्षा जास्त चांगला प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.