आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा :फेसबुक ,युट्युब
शिक्षकी पेशा असो की डॉक्टर, नर्स, पोलीस, लष्करी अधिकारी, सर्वच क्षेत्रात आज स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने उभ्या आहेत. भारताच्या माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील अशी कितीतरी नावे सांगता येतील, ज्यांनी देशाच्या अत्युच्च पदावर काम केले आहे. स्वकर्तृत्वाने आपला ठसा उमटवणाऱ्या महिलांमुळेच आज स्त्रीशिक्षणाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होत आहे. स्त्रियांचे शिक्षण, नोकरी, करिअर यांना प्राधान्य दिले जात आहे. मुलींनी अमुक क्षेत्रात करिअर करावे तमुक क्षेत्रात करिअर करू नये अशी बंधने आता गळून पडत आहेत.
आज कित्येक महिला लष्करातही आपले कर्तृत्व गाजवत आहेत. देशाच्या रक्षणाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेत आहेत. पण, पूर्वी भारतीय सैन्यात महिलांना प्रवेश दिला जात नव्हता. महिलांनी लष्करात भरती होण्याचे स्वप्नसुद्धा पाहणे एकेकाळी अवघड होते. अशातही एका मुलीने शालेय जीवनातच लष्करात भरती होण्याचे स्वप्न बघितले होते. प्रिया झिंगन.
हिमाचल प्रदेशमधील शिमलामध्ये जन्मलेली प्रिया लहानपणापासूनच खोडकर वृत्तीची होती. वडील पोलीस अधिकारी होते. खोडकर अल्लड प्रिया कधीच मुलींप्रमाणे शामळू स्वभावाची नव्हती. तिच्या स्वभावातच एक धडाडी आणि धाडसीपणा होता. प्रियाचे शिक्षण “लॉरेटो कॉन्व्हेंट तारा कोल स्कूल” या शाळेत झाले. शाळेतील कडक शिस्त देखील प्रियाच्या चंचल स्वभावाला वेसण घालू शकली नाही.
शाळेत प्रिया प्रत्येकाला आपल्या खोडकरपणाने हैराण करून सोडत असे. तिचे शिक्षक देखील तिच्या खोड्यांची धास्ती घेत. तिने कुणाची खोड काढू नये म्हणून तिला पहिल्या बाकावर बसवले जाई. पण, पहिल्या बाकावर बसलेली प्रिया शिक्षकांसाठी डोकेदुखी ठरत असे.
प्रिया नववीत असताना तिच्या शाळेतील एका कार्यक्रमासाठी राज्याचे राज्यपाल प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. राज्यपालांसोबत त्यांचा सुरक्षा गार्ड देखील होता. हा सुरक्षा गार्ड दिसायला अगदी सुंदर होता. कार्यक्रम संपल्यानंतर मुलींमध्ये त्या तरुण, सुंदर, आणि सुडौल सुरक्षा राक्षकाचीच चर्चा सुरु होती. मुली म्हणत होत्या, आम्हाला सैन्यातील असाच सुंदर, सुडौल अधिकारी नवरा म्हणून मिळायला हवा.
यावर प्रिया आगदी सहज बोलून गेली की मी सैन्यातील अधिकाऱ्याशी लग्न करण्याऐवजी मीच सैन्यात अधिकारी होईन. अर्थात, चेष्टा-मस्करीत तिने बोललेले हेच वाक्य तिच्या आयुष्याला नवे वळण देऊन गेले.
प्रियाचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिने कायद्याचे उच्च शिक्षण घेण्याचे ठरवले. तिच्या वडिलांचीही तीच इच्छा होती. प्रियाला सैन्यात भरती व्हायचे असले तरी, तोपर्यंत तरी स्त्रियांना लष्करात प्रवेश दिला जात नव्हता. नाईलाजाने आणि वडिलांच्या इच्छेखातर तिने वकिलीचे शिक्षण सुरु ठेवले. वकिलीच्या तिसऱ्या वर्षात असताना तिला पेपरमध्ये लष्कर भरतीची जाहिरात दिसली. पण, ही जाहिरात फक्त पुरुषांसाठी होती. त्याकाळात लष्करात सैनिक म्हणून स्त्रियांची भरती केली जात नव्हती. लष्करात स्त्रियांना प्रवेश असला तरी तो फक्त डॉक्टरच्या पदापूरतच मर्यादित होता.
पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून चालणाऱ्या प्रियाला हाच प्रश्न सतावत होता की महिलांना लष्करात प्रवेश का दिला जात नाही? तिच्या मनातली ही खदखद तिने पत्राद्वारे लष्कर प्रमुखांना कळवली. महिला आता प्रत्येक क्षेत्रात पुढे आहेत. स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करत आहेत आणि पुरुषांच्या तुलनेत त्या कशातही कमी नाहीत मग त्यांना लष्करात प्रवेश का दिला जात नाही?, असा सरळ प्रश्न तिने केला. लष्कर प्रमुख तिच्या या पत्राची दखल घेतील अशी तिला अजिबात आशा नव्हती.
पण, तीन आठवड्यांनी लष्कर प्रमुखांचे प्रियाच्या पत्राला उत्तर आले. त्यात त्यांनी लिहिले होते की, लष्करात महिलांची भरती करण्याबाबत आम्ही विचार करत आहोत. लवकरच याबाबतचा निर्णय जाहीर केला जाईल. लष्करप्रमुखांनी आपल्या पत्राची दखल घेत त्याला सकारात्मक प्रतिसाद देखील दिला याचेच प्रियाला आश्चर्य वाटले. अर्थात, स्वतः लष्करप्रमुखच याबाबत विचार विनिमय करत आहेत म्हटल्यावर थोडा काळ वाट पहावी लागणार होती.
अशातच एक वर्ष निघून गेले. परंतु, महिला भरती बाबत कसलीच जाहिरात पेपरमध्ये पाहायला मिळत नव्हती. वडिलांच्या सांगण्यावरून प्रियाने उच्च न्यायालयात प्रशिक्षणासाठी प्रवेश घेतला. परंतु, तिला वकील व्हायचे नव्हते.
न्यायालयातच एकदा पेपर वाचत बसलेली असताना तिला एक जाहिरात दिसली. जाहिरात लष्कर भरतीसाठी होती आणि विशेष म्हणजे महिला भरतीसाठी. ही जाहिरात वाचताच ती आनंदाने बेभान झाली. तिला आत्ता कुठे तिच्या ध्येयाचा रस्ता दिसू लागला होता.
एलएलबी झालेल्या महिलांसाठी फक्त दोन जागा होत्या आणि इथेच प्रियाला स्वतःसाठी जागा मिळवायची होती. प्रियाला स्वतःवर इतका विश्वास होता की, दुसऱ्याच मिनिटाला तिने विचार सुरु केला सोबतची ही दुसरी महिला कोण असेल?
प्रियाने परीक्षेसाठी अर्ज भरला. परीक्षा उत्तीर्ण देखील झाली. आता पुन्हा प्रशिक्षणासाठी कधी बोलवले जाते याची वाट पाहण्याची गरज होती. महिन्यामागून महिने जात होते आणि एक दिवस असा उजाडला की प्रियाला इतिहासात नाव नोंदवण्याची संधी मिळाली.
यादीत तिचे नाव अगदी पहिल्या स्थानावर होते. ‘ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी, चेन्नई’ येथे प्रवेश मिळवणारी ती कॅडेट नं. ००१ होती. म्हणजेच भारतीय सैन्यात भरती होणारी ती पहिली महिला होती.
आता तिचे स्वप्न फक्त काही पाऊले दूर होते. पण तरीही अडचणी होत्याच. प्रिया ट्रेनिंगसाठी चेन्नईला निघाली. रस्त्यातच अचानक तिला पोटात असह्य वेदना होऊ लागल्या. ती दवाखान्यात गेली. तिथे गेल्यानंतर तिला सांगण्यात आले की तिच्या किडनीत काही दोष होता. आता यामुळे कदाचित तिचे ट्रेनिंग देखील रद्द केले गेले असते. हे ऐकताच ती अक्षरश: बिछान्यारून उठली आणि धावतच निघाली. तिने विनंती करून दवाखान्यातून डिस्चार्ज घेतला.
अकॅडमीत पोहोचल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तिला २.५ किमी धावायचे होते. तिच्या पोटदुखीला तिने स्वतःवर स्वार होऊ दिले नाही. या शर्यतीत ती पहिल्या क्रमांकावर आली.
मार्च १९९३ मध्ये प्रियाने या ट्रेनिंगमध्ये रौप्यपदक पटकावले. तिला ‘जज अॅडव्होकेट जनरल’च्या कार्यालयात तैनात करण्यात आले.
लष्करातील ती पहिलीच महिला असली तरी हा प्रवास तितकासा सोपा नव्हता. सैनिक पुरुष अधिकाऱ्यांना सलाम करत असत पण, महिला अधिकाऱ्याला सलाम करणे त्यांना कमीपणाचे वाटत असे. एक महिला आपली सिनियर आहे हे सत्य स्विकारणे त्यांना जड जात होते.
याशिवाय तिथे महिलांसाठी स्वतंत्र शौचालय नव्हते. ही आणखी एक समस्या. या सगळ्या गोष्टींचा प्रियाला सुरुवातीला खूप त्रास झला. परंतु, या प्रत्येक टप्प्यावर आलेल्या अडचणींवर तिने मात केली. काही महिन्यानंतर तिच्यावर प्रत्यक्ष कामाची जबाबदारी सोपवण्यात आली.
हा तिच्या आयुष्यातील हा पहिलाच कोर्ट मार्शल होता. परंतु प्रियाने ही जबाबदारी इतक्या चांगल्या पद्धतीने हाताळली की, कुणाला वाटलेसुद्धा नाही कोर्टमार्शल करण्याची ही तिची पहिलीच वेळ आहे.
प्रिया झिंगनसारख्या जिद्दी महिलाच आज लाखो तरुणींसाठी प्रेरणास्त्रोत ठरत आहेत. सैन्यात महिलांचे स्थान आज वाढत आहे तेव्हा, प्रियाच्या या प्रवासाची आणि तिच्या जिद्दीची दखल घेणे आवश्यक आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा :फेसबुक ,युट्युब | Copyright ©ThePostman.co.in | All Rights Reserved.