आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
मानव हा महत्वाकांक्षी प्राणी आहे. एक ध्येय गाठलं की दुसऱ्या ध्येयाच्या दिशेने तो कुच करतो. माणसाची ही महत्वकांक्षा कधी सत्ते साठी तर कधी श्रीमंती साठी असते आणि ही महत्वकांक्षा पूर्ण करण्यासाठी तो कोणत्याही थराला जाऊ शकतो काहीही करू शकतो. पण ह्या महत्वकांक्षेचा पाठलाग करताना माणसाने उचललेलं प्रत्येक पाऊल, त्याने घेतलेला प्रत्येक निर्णय हा त्याच्यावरच नाही तर सबंध जगावर परिणाम करणारा असतो, पण महत्वकांक्षेने झपाटलेल्या या माणसाला परिणामांचा विचार करायला वेळ आहेच कुठे ? चुकून एखादा आदर्शवादी माणुस असेल जो एखादा निर्णय घेण्यापूर्वी त्याच्या चांगल्या वाईट परिणामांचा विचार करत असेल, असा माणूस आजच्या काळात मिळणं अति दुर्लभ. आजची ही गोष्ट आहे अशाच एका महत्वकांक्षेची व त्याच्यामुळे जगावर होणाऱ्या परिणामांची.
20व्या शतकात 1945 साली दुसरं महायुद्ध समाप्त झालं. त्या दुसऱ्या महायुद्धाचे परिणाम इतके भयानक होते की प्रत्येक विकसित, विकसनशील, आणि गरीब देश त्यांची त्यांची धोरणं ठरवताना जगात शांतता राहील याची काळजी घेऊ लागला. पण इंग्रजीमध्ये म्हणतात ना, “History repeats itself it doesn’t need to be repeated”. ज्या विस्तारवादामुळे, वसाहतवादामुळे युद्ध झाली आज परत त्याच कारणामुळे युद्ध होत आहेत. 1945 पासून आत्ता पर्यंत बरीच युद्ध झाली पण माणूस काही सुधारला नाही आणि त्याची महत्वकांक्षा काही कमी झाली नाही.
1991 हे वर्ष जगाच्या इतिहासात एक महत्त्वाचं वर्ष म्हणून गणलं जात. अमेरिका व सोव्हिएत युनियन यांच्यात सुरू असलेलं शीत युध्द अखेर संपुष्टात आलं व या शीत युद्धात अमेरिकेचा विजय झाला व अमेरीका महासत्ता झाली. सोव्हिएत युनियनचं 1991 ला विभाजन झालं आणि त्या विभाजनाचे परिणाम आजतागायत आपल्याला अनुभवायला मिळतात आणि येणाऱ्या भविष्यात ही अनुभवायला मिळतील.
सोव्हिएत युनियन मध्ये 17 सदस्य देश एकत्र होते व या सोव्हिएत युनियनचा मुख्य होता रशिया. शीत युद्ध संपल्यानंतर ही रशियाची अमेरिकेसोबत सामरिक, आर्थिक , व कुटनैतिक पातळीवर स्पर्धा चालू होती व राहील. 17 सोव्हिएतचं विभाजन ही रशिया करता एक ठसठसती जखम होती. त्या 17 सोव्हिएतवर आपला प्रभाव व प्रभूत्व प्रस्थापित करण्यासाठी रशिया आजही प्रयत्न करीत आहे. ही गोष्ट आहे अशाच एका प्रयत्नाची ज्याचा सबंध जगावर परिणाम होणार आहे.
सध्या सर्व वर्तमानपत्रात रशिया युक्रेन संघर्षाच्या बातम्या येत आहेत. आता साहजिकच जगाचा नकाशा पाहिला आणि या दोन्ही देशांची तुलना केली तर रशिया हा देश आशिया खंडाचा जवळ जवळ 75% भाग व्यापून आहे तर युक्रेन हा देश महाराष्ट्रा एवढा किंवा त्याच्यापेक्षाही लहान आकाराचा असेल. मग या दोन देशांमध्ये नेमकं अस झालं तरी काय की युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली. चला तर हा विषय समजून घेऊ.
वर नुमद केल्याप्रमाणे युक्रेन हा 1920 ते 1991 पर्यंत सोव्हिएत युनियनचा भाग होता. जर तुलना करायला गेलो तर एकूण 17 सोव्हिएतमध्ये रशियानंतर आर्थिकदृष्टीने संपन्न असा दुसरा देश म्हणजे युक्रेन होय. रशिया व युक्रेन हे दोन्ही देश सांस्कृतिकदृष्ट्या , भाषिकदृष्ट्या, व वांशिकदृष्ट्या एकमेकांना जोडले गेले आहेत. याच सर्व कारणांमुळे रशियाला युक्रेनमध्ये स्वारस्य आहे. सोव्हिएत युनियनचं विभाजन झाल्यानंतर रशिया आणि बरेच पाश्चात्य देश हे युक्रेनमध्ये आपला प्रभाव व प्रभुत्व निर्माण करण्याचा प्रयत्न करू लागले. ह्या प्रभाव व प्रभुत्व निर्माण करण्याच्या स्पर्धेने 2013 साली कळस गाठला.
21 नोव्हेंबर 2013 रोजी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्हिक्टर यानुकोविच यांनी युरोपियन युनियन सोबत सहयोगी होण्याचा प्रस्ताव फेटाळून लावला. त्यामुळे युक्रेनच्या जनतेतले बरेच नागरिक जे या कराराच्या बाजूने होते त्यांनी देशभर आंदोलन करायला सुरूवात केली. या आंदोलनाला युक्रेन क्रांती अथवा “Ukrainian Revolution” असं म्हणतात. ह्या युक्रेन क्रांतीचा महत्वाचा भाग म्हणजे युरोमैदान आंदोलन. हे युरोमैदान आंदोलन युक्रेनभर पसरलं व या आंदोलनाच्या दबावामुळे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष यांना राजीनामा देऊन पायउतार व्हावं लागलं.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्हिक्टर यानुकोविच पायउतार होताच, युक्रेनमधील रशियन समर्थकांनी युक्रेनच्या पूर्व व दक्षिण भागात असंतोष पसरवायला सुरवात केली. ह्या असंतोषाला युक्रेनच्या पूर्वेकडील डॉनबॅस भागात जोरदार समर्थन मिळाले. आता युक्रेनमधला हा संघर्ष युरोपियन युनियन समर्थक विरुद्ध रशिया समर्थक असा सुरू झाला.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष यानूकोविच हे पायउतार झाले याचा वचपा काढण्यासाठी रशियाने युक्रेनच्या क्रिमिया या भागावर आक्रमण करून तो आपल्या ताब्यात घेतला. आता रशियाचा क्रिमियावर केलेला हल्ला व मिळवलेला ताबा याला एक ऐतिहासिक पैलू आहे.
रशियामध्ये जेव्हा जोसेफ स्टालिन यांची साम्यवादी राजवट होती, त्यावेळी जोसेफ स्टालिन यांनी रशियन वंशाचे काही नागरिक युक्रेनच्या क्रिमीया भागात वास्तव्य करण्यास पाठवले. रशियन वंशाच्या नागरिकांना युक्रेनमध्ये पाठवुन सोव्हिएत युनियनची युक्रेनमधील पकड मजबूत करणे व तिथे साम्यवादी विरोधी आंदोलनं मोडीत काढणे हा जोसेफ स्टालिन यांचा हेतु होता. अखेर मार्च 2014 रोजी रशियाने क्रिमियावर आक्रमण करून त्याचा ताबा मिळवला. या घटनेमुळे युक्रेनमधील रशियन समर्थकांचे मनोबल वाढले व पायउतार झालेल्या माजी राष्ट्राध्यक्ष व्हिक्टर यानुकोविच यांचा युक्रेन मध्ये परतीचा मार्ग मोकळा झाला.
आजच्या काळात लष्करी महासत्ता होण्याबरोबरच आर्थिक महासत्ता होणं ही महत्त्वाचं आहे. अर्थात याला रशिया ही अपवाद नाही. रशिया युक्रेन वादाला एक आर्थिक पैलू आहे. 1920 ते 1991 पर्यंत 17 सोव्हिएतपैकी युक्रेनचा सोव्हिएत युनियनच्या अर्थव्यवस्थेत सर्वांत मोठा वाटा होता. पण 1991 च्या सोव्हिएत युनियनच्या विभाजनानंतर ही आर्थिक समीकरणे बदलली.
युक्रेनला नैसर्गिक वायूचे साठे लाभले आहेत. या नैसर्गिक वायूच्या साठ्यांना विकसित करण्यासाठी युक्रेनला त्यांच्या बाजारपेठा ह्या युरोपियन युनियन, अमेरिका व इतर पाश्चात्य देशांना खुल्या करायच्या आहेत, पण रशियाला ह्या नैसर्गिक वायूच्या साठ्यांमध्ये स्वारस्य आहे त्यामुळे रशियाला युक्रेनवर प्रभाव व प्रभुत्व प्रस्थापित करायचं आहे.
हा झाला एक भाग, युक्रेनच्या दक्षिणेकडे ब्लॅक सी हा समुद्र आहे. ब्लॅक सी हा समुद्र 4,36,402 चौरस किलोमीटर एवढा याचा विस्तार आहे. हा ब्लॅक सी पूर्व युरोप व मध्यपूर्व देशांना एकत्र जोडतो. त्यामुळे ज्या देशाचं ह्या ब्लॅक सीवर नियंत्रण त्याला पूर्व युरोपमध्ये वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी सोपे जाईल. युक्रेनवर आपली पकड घट्ट करण्यासाठी रशियाने क्रिमिया काबीज केले आणि याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिका व इतर पाश्चात्य देशांनी रशियावर आर्थिक निर्बंध आणले.
दुसऱ्या महायुद्धानंतर 1949 साली शीत युद्धाच्या काळात सोव्हिएत युनियनला शह देण्यासाठी नाटो (North Atlantic Treaty Association)ची स्थापना करण्यात आली. रशिया युक्रेन यांच्यातला संघर्ष जेव्हा शिगेला पोचला त्यावेळी युक्रेनने मदतीसाठी नाटोकडे पाचारण केले. क्रिमिया काबीज केल्यानंतर युक्रेनच्या चिंतेत भर पडू लागली व ह्यामुळे युक्रेनने नाटोच्या सदस्यत्वाची प्रक्रिया जलदगतीने पुर्ण करावी ह्यासाठी हालचाली सुरू केल्या.
युक्रेनच्या ह्या सर्व हालचालींवर रशियाचे बारीक लक्ष होते. एकीकडे युक्रेन व ब्लॅक सीवर रशियाला प्रभुत्व निर्माण करायचं आहे तर दुसरीकडे युक्रेनला नाटोची सदस्यता ही मिळवू द्यायची नाही असा रशियाचा डाव आहे.
आता तुम्हाला प्रश्न पडेल की रशियाला युक्रेनला नाटोची सदस्यता का मिळू द्यायची नाही? तर याचं उत्तर असं की नाटो ही अमेरीका व बरेचसे युरोपियन देश मिळून तयार झालेली एक सामरिक व लष्करी आघाडी आहे. त्यामुळे कोणत्याही नाटो सदस्य देशावर जर कुणी आक्रमण केले तर अशावेळी सर्व नाटो सदस्य त्या आक्रमणकारी देशाला रोखण्यासाठी एकत्र येतील. त्यामुळे जर युक्रेनला नाटोची सदस्यता मिळाली तर ते रशियासाठी फायदेशीर ठरणार नाही.
आता रशिया युक्रेन वाद हा लवकरात लवकर मिटावा व युरोप खंडात शांतता पुन्हा प्रस्थापित व्हावी या करता मुत्सद्दी धोरणं अमेरिका व इतर पाश्चात्य देश आखत आहेत. मिन्स्क करार हा त्याच मुत्सद्दी धोरणांचा एक भाग आहे. मिन्स्क करार हा युक्रेन व रशिया पुरस्कृत फुटीरतावादी यांच्या मध्ये झालेला युद्ध विरामाचा करार आहे.
एकूण 2 मिन्स्क करार केले गेले. पहिला मिन्स्क करार हा सप्टेंबर 2014 साली करण्यात आला. पहिल्या मिन्स्क करारा मध्ये युद्ध कैद्यांचे व राजकीय कैद्यांचे हस्तांतरण, तणावग्रस्त भागात मदत पोचवणे, घातक शस्त्रे माघारी घेणे अशा तरतुदी होत्या. दुर्दैवाने ह्या पहिल्या मिन्स्क कराराचे रशिया व युक्रेन या दोघांकडून उल्लंघन झाले. पुढे डिसेंबर 2015 रोजी फ्रान्स व जर्मनी यांच्या मध्यस्तीने दुसरा मिन्स्क करार अस्तित्वात आला. दुसऱ्या मिन्स्क कराराचा उद्देश हा तणावग्रस्त भागात शांतता प्रस्थापित करणे हा होता. दुसरा मिन्स्क करार हा रशिया, युक्रेन व ऑर्गनायझेशन ऑफ सिक्युरिटी अँड को ऑपरेशन इन युरोप नावाच्या संस्थेत झाला.
काही दिवसांपूर्वी युक्रेनच्या सीमेवर रशियन लष्कराच्या हालचाली वाढल्या आहेत. हा वाद चिघळवुन रशियाला युक्रेन वर अधिकाधिक दबाव टाकायचा आहे व हे दबावतंत्र वापरून रशियाला युक्रेन व इतर पाश्चात्य देशांकडून बऱ्याच सवलती मिळवायच्या आहेत. पण आपण आधी हे लक्षात घ्यायला हवं की रशिया आणि युक्रेन मध्ये चालु असलेला हा वाद शीत युद्धाचं एक नवं रूप असू शकतं किंवा आहे.
दुसऱ्या महायुद्धानंतर युरोपला परत आर्थिकदृष्ट्या रुळावर यायला 40 ते 45 वर्ष लागली होती. त्यामुळे पहिल्या व दुसऱ्या महायुद्धाचा इतिहास लक्षात घेता, जर रशिया-युक्रेन हा वाद लवकर मिटवला नाही तर हा वाद तिसऱ्या महायुद्धाची पायाभरणी करेल हे निश्चितच.
आता हा वाद मिटवायला काही उपाय आहे का? तर हो उपाय आहे, तो म्हणजे युक्रेन आणि रशिया यांच्यामध्ये झालेल्या मिन्स्क कराराच्या अटीशर्थीचे पालन होणे आवश्यक आहे, व ह्या अटीशर्थीचे पालन होत आहे की नाही हे तपासण्यासाठी आंतरराष्ट्रीय संस्था व पाश्चात्य देशांनी पुढाकार घेणे गरजेचं आहे.
इतिहासात आधीच दोन महायुद्ध झालेली आहेत, व त्या महायुद्धाचे परिणाम अजून ही काही देश भोगत आहेत. त्यामुळे कोणत्याही देशांचे वाद हे युद्ध करून न सोडवता चर्चा करून व मुत्सद्देगिरीने सोडवणे गरजेचे आहे. असं झालं तरच या जगात शांतता खऱ्या अर्थाने नांदेल.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.