भारतात पहिली लस विकसित करून लाखोंचे प्राण वाचवणारा ध्येयवेडा अवलिया

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 

===

२६ जानेवारी २०२० ला ज्यावेळी देश एकीकडे प्रजासत्ताक दिन साजरा करत होता, त्याच वेळी भारताने आपला एक खूप मोठा हिरा गमावला. भारतीय लसीकरण क्षेत्रात क्रांती आणून एक मोठा इतिहास घडवणारे जेष्ठ शास्त्रज्ञ व बालरोगतज्ञ डॉ. महाराज किसान भान यांचे कर्करोगामुळे वयाच्या ७२ व्या वर्षी निधन झाले.

डॉ. एम के भान यांनी शोध लावलेल्या रोटाव्हॅक ह्या भारतात रोटाव्हायरस ह्या विषाणूच्या प्रतिकारार्थ बनवण्यात आलेल्या लसीमुळे आज डायरियाचा उपचार करणे स्वस्त दरात सहज शक्य होऊ शकले आहे.

आज त्यांच्या तीन डोसमध्ये देण्यात येणाऱ्या रोटाव्हॅक लसीची किंमत केवळ १८० रुपये असून जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या लसींच्या डोसांची किंमत प्रत्येकी २,५०० रुपये इतकी आहे.

रोटाव्हायरसचा संसर्गामुळे होणाऱ्या डायरियामुळे दरवर्षी भारतात ७८,००० मुले दगावतात.

यात पाच वर्षांखालील मुलांचे प्रमाण खुप जास्त आहे. अनेक दशकांचा प्रयत्नानंतर डॉ. भान सरकार, अशासकीय संस्था, आंतरराष्ट्रीय संस्था आणि खाजगी कंपन्यांना एकत्र आणून ह्या जीवनरक्षक लसीची निर्मिती करण्यात यशस्वी झाले होते. भारताच्या जैवतंत्रज्ञान संस्थेसोबत, बिल मेलिंडा गेट्स फाउंडेशन, नॉर्वेची रिसर्च संस्था आणि भारत बायोटेक ह्या सर्व मोठ्या कंपन्यांना एकत्र करून त्यांनी ह्या लसीची निर्मिती शक्य करून दाखवली होती.

डॉ. भान यांनी अगदी आधीपासून लसीच्या निर्मितीत मोठी दक्षता घेतली, आपल्या टीमच्या निवडीपासून ते लसीच्या मात्रेपर्यंत अगदी प्रत्येक गोष्टीत त्यांनी जातीने लक्ष घातलं. अखेरीस २०१४ साली त्यांच्या प्रयत्नांना यश मिळून सरकारची मान्यता ह्या लसीला मिळाली. हा एक अभिमानाचा क्षण होता कारण त्यांनी शोध लावलेली लस ही भारतात शोधलेली आणि तयार केलेली पहिली लस होती. २०१६ साली भारत सरकारने ह्या लसीला भारतीय आरोग्य विभागात आणले आणि असंख्य लोकांचे कल्याण त्यामुळे झाले.

१९४७ साली जन्माला आलेले डॉ. भान हे १९६९ साली पुण्याच्या आर्मड फोर्सेस मेडिकल कॉलेजात एमबीबीएस झाले. पुढे चंदीगडच्या पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्चमध्ये त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले. पुढे ते अखिल भारतीय आरोग्य संस्थान अर्थात एम्समध्ये पुढील रिसर्चसाठी गेले. त्यांनी डायरियल डिसीज आणि बालकांचा आहार ह्या विषयात संशोधन करण्यास सुरुवात केली. सार्वजनिक आरोग्य क्षेत्राचा विकास करून लोकांच्या आरोग्यविषयक समस्या दूर करण्याकडे त्यांचे संपूर्ण लक्ष केंद्रित झाले होते.

त्यांनी मायक्रोन्यूट्रिएंट्सचा अभ्यास केला त्यातूनच झिंक ह्या धातूच्या गुणधर्मांचा आरोग्यावर आणि रोटाव्हायरसवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास केल्यावर त्यांना भारतातही पहिली लस तयार करणे शक्य झाले. भारतातील सर्वात जास्त संसर्गजन्य असणाऱ्या रोगाच्या रोटाव्हायरस ह्या विषाणूवर मात करणारे संशोधन त्यांनी केले होते.

३५ वर्षांपूर्वी, १९८५ साली डॉ. भान एम्समध्ये दाखल करण्यात आलेल्या बालकांचे रक्ताचे नमुने तपासत असताना रोटाव्हायरस ह्या अत्यंत गंभीर जिवाणूवर परिणाम करणाऱ्या रोटाव्हॅक ह्या लसीची प्राथमिक संकल्पना डोक्यात आली होती. त्या बालकांना रोटाव्हायरसची लागण तर झाली होती पण त्यांच्यात डायरिया दिसून येत नव्हता. त्यांच्या शरीरातील त्या स्ट्रेनला डॉ. भान यांनी वेगळे केले आणि आपल्या संशोधनाला सुरुवात केली.

त्याचवेळी अमेरिकेच्या रॉजर ग्लास ह्या अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सच्या संशोधकाने देखील याच रोटाव्हायरसच्या स्ट्रेनवर संशोधन करण्यास सुरुवात केली होती. जे जगातील चार वेगवेगळ्या खंडातून गोळा करण्यात आले होते. डॉ. भान आणि डॉ. ग्लास यांनी आपल्या संशोधनाच्या नोट्स अदलाबदल केल्या आणि त्यांनी निष्कर्ष काढला की रोटाव्हायरस ह्या विषाणूचा एक असा स्ट्रेन देखील आहे, जो ज्या बालकांच्या शरीरात असतो, त्या बालकांना डायरिया आणि रोटोव्हायरसमुळे होणारे इतर आजार होत नाही. पुढे ह्याच स्ट्रेनच्या मदतीने त्यांनी लसींची यशस्वी निर्मिती केली होती.

डीबीटीचे सचिव म्हणून २००५ ते २०१२ सालापर्यंत कार्यरत असताना त्यांनी ट्रान्सलेशनल हेल्थ सायन्स अँड टेक्नॉलॉजी ह्या संस्थेची स्थापना फरिदाबाद येथे केली. लसी, संसर्गजन्य रोग, व्हायरस, औषधनिर्मिती आणि उपचारपद्धतीवर संशोधन त्या संस्थेत केले जाते. डॉ. भान यांनी फक्त ह्या संस्थेची निर्मिती केली नाही तर ह्या संस्थेला भारतातल्या एम्स सारख्या मोठ्या आरोग्य संस्थांशी जोडले. ह्या संस्थांशी असलेल्या संबंधांमुळे ह्या संस्थेत मोठ्याप्रमाणावर आधुनिक पद्धतीचे रिसर्च करण्यात आले.

जैवतंत्रज्ञान विकास परिषदेच्या स्थापनेत देखील त्यांनाही मोलाची भूमिका बजावली होती. ह्या संस्थेने जैवतंत्रज्ञान आणि आरोग्य क्षेत्रात रिसर्च करण्याचा कामात मोठा वाट उचलला आहे. ह्या संस्थांमधील मोठ्या वैज्ञानिकांना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यात डॉ. भान यांचे मोठे योगदान राहिले आहे.

जागतिक आरोग्य संस्थेने आपल्या संकेतस्थळावर डॉ. भान यांचा गौरव करताना म्हटले आहे की, रोटाव्हायरस, झिंकचा डायरियाच्या उपचारात होणारा वापर, लो ओस्मोलिटी ओआरएस, एंटेरोगेटिव्ह इ.कोलाय जिवाणू आणि त्याचे बालकांना होणाऱ्या डायरियात प्रमाण शोधणे ह्या सर्वच सार्वजनिक आरोग्याशी संबंधित विषयात असलेले कार्य खूप मोठे असून मानवता त्यांची सदैव कृतज्ञ असेल.

ज्यांच्यामुळे आज असंख्य बालकांचे प्राण वाचवणे शक्य झाले आहे ते डॉ. एम के भान आपल्यापाठी एक अतुलनीय वारसा भारतीय वैद्यकशास्त्रात सोडून गेले आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!