आंबेडकरांची सावली बनून माई त्यांचं संपूर्ण आयुष्य जगल्या होत्या

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब 


देशातील दलित वंचित आणि स्त्रियांच्या हक्कासाठी प्रज्ञासूर्य, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जो लढा दिला तो तर सर्वांनाच ज्ञात आहे. आधुनिक भारताच्या जडणघडणीत बाबासाहेबांनी दिलेले योगदान खूप मोलाचे आहे. या महान व्यक्तिमत्वाला आकार देण्यात काही मोजक्या व्यक्तींनी पराकोटीचा त्याग केला आहे. त्या व्यक्तींमध्ये रमाई आणि सविता माई या दोघींचेही स्थान सर्वात वरचे आहे.

बाबासाहेबांच्या उत्तरार्धातील जीवनात सविता माई अक्षरश: त्यांची सावली होऊन वावरल्या. आयुष्यभर सोसलेल्या हालअपेष्टांमुळे आयुष्याच्या उत्तरार्धात बाबासाहेबांना मधुमेह, न्युरायटीस, उच्च रक्तदाब, संधिवात अशा अनेक व्याधींनी जखडून टाकले होते. अशा काळात त्यांची भेट सवितामाईंशी झाली आणि त्यांचा हा संघर्ष काहीसा सोपा झाला. सविता माई यांचे माहेरचे नाव डॉ. शारदा कबीर होते.

डॉ. आंबेडकर जेंव्हा जेंव्हा मुंबईला येत तेंव्हा ते डॉ. मालवणकरांच्या कन्सल्टिंग रूमवर जात. मालवणकरांनी डॉ. आंबेडकरांना अनेक पथ्ये आणि औषधांबाबत अनेक सूचना दिल्या होत्या. तेंव्हा डॉ. शारदा कबीर या डॉ. मालवणकरांच्या सहाय्यक डॉक्टर होत्या.

डॉ. मालवणकरांनी सांगितलेले पथ्यपाणी पाळणे बाबासाहेबांना शक्य होणार नाही, तेंव्हा त्यांनी आपल्या देखभालीसाठी एखादी नर्स ठेवावी असा सल्ला डॉ. शारदा कबीर यांनी दिला. पण, नर्स ठेवण्यास बाबासाहेब तयार नव्हते.

अशा अवस्थेतील त्यांचा एकाकीपणा पाहून डॉ. कबीर खूपच भावूक झाल्या. बाबासाहेबंसारख्या व्यक्तिमत्वाबद्दल त्यांना पराकोटीचा आदर होता. बाबासाहेबांना अजून खूप कामे करायची होती, त्यामुळे प्रकृती स्वास्थ्याला महत्व देणे त्यांच्यासाठी अत्यावश्यक होतेच.

प्रकृतीच्या निमित्ताने बाबासाहेबांचे डॉ. मालवणकरांकडे बऱ्याचदा जाणे-येणे होई त्यामुळे डॉ. शारदा कबीर यांच्याशीही त्यांची वारंवार भेट होत असे. त्यांच्यात बऱ्याच गप्पा होत. बाबासाहेबांना रमाईच्या जाण्याने आयुष्यात जी एक भावनिक पोकळी तयार झाली होती, ती डॉ. शारदा यांच्यामुळे भरून निघेल अशी शक्यता वाटत होती.

बाबासाहेबांची विद्वत्ता, त्यांचा अभ्यास आणि त्यांचे कार्य याने डॉ. कबीरही भारावून गेल्या होत्या. बाबासाहेबांनी जेंव्हा त्यांच्यासमोर विवाहाचा प्रस्ताव मांडला तेंव्हा त्या गोंधळून गेल्या. कारण, बाबासाहेब एकाकी आहेत, या काळात त्यांची आत्मीयतेने काळजी घेईल अशा कुणाची तरी साथ आवश्यक आहे, हे डॉ. कबीरांनाही चांगलेच ठावूक होते. पण, यासाठी बाबासाहेब खुद्द त्यांच्याच विचार करतील याची त्यांना जरासुद्धा कल्पना नव्हती.

बाबासाहेबांबद्दल त्यांच्या मनात आदर होता. पण, या प्रस्तावावर नेमके काय उत्तर द्यावे हे त्यांना सुचेना. शेवटी याबाबत त्यांनी आपल्या मोठ्या भावाशी चर्चा केली तेंव्हा त्यांचे मोठे भाऊ त्यांना म्हणाले, “म्हणजे तू भारताची कायदेमंत्रिण होणार. अजिबात नकार देऊ नकोस.” त्यांचा एक भाऊ तर चिडवू लागला, “डॉ. आंबेडकरांचे अनुयायी त्यांच्यावर जीवापाड प्रेम करतात. तेंव्हा ही डॉक्टरीणबाई त्यांना नकार देते हे जर त्यांच्या अनुयायांना कळले तर तुझी काही खैर नाही.” त्यांच्याही मनात कुठेतरी बाबासाहेबांबद्दल आदरयुक्त ओढ होतीच म्हणून त्यांनीही होकार देण्याचा निर्णय घेतला.

एक डॉक्टर म्हणून, बाबासाहेबांना सेवासृशुषा करणाऱ्या आणि त्यांची भावनिक पोकळी भरून काढणाऱ्या व्यक्तीची किती गरज आहे, हे त्यांना चांगलेच ठावूक होते.

१५ एप्रिल १९४८ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि डॉ. शारदा कबीर यांचा रजिस्टर पद्धतीने विवाह सोहळा पार पडला. लग्नानंतर डॉ. बाबासाहेबांनी शारदा हे नाव बदलून सविता हे नाव ठेवले आणि त्या लग्नानंतर डॉ. सविता भीमराव आंबेडकर झाल्या.

बाबासाहेब जेंव्हा लंडनमध्ये शिकायला होते, तेंव्हा ते एका बोर्डिंग हाउसवर राहायचे. या बोर्डिंगच्या मालकिणीची मुलगी फ्रान्सिस फिट्जेराल्ड आणि डॉ आंबेडकर यांच्यातील मैत्रीचीही बरीच चर्चा होते. लंडनच्या वास्तव्यात फ्रान्सिस बाबासाहेबांशी त्यांच्या अभ्यासाबद्दल चर्चा करत असे. ती बाबासाहेबांची काळजी घेत असे. दोघांतील पत्रव्यवहार पाहिल्यास फ्रान्सिसला बाबासाहेबांची किती ओढ होती हे सहज लक्षात येते.

बाबासाहेब तिला गमतीने फॅनी म्हणायचे. फॅनीच्या पत्रातून बाबासाहेबांवरचे तिचे प्रेम, तिची थोडीशी अधिकाराची भाषा यातून त्यांचे नाते किती गहिरे होते याची प्रचीती येते. बाबासाहेब आणि फॅनी यांच्यातील हे प्रेम म्हणजे प्लेटोनिक लव्ह होते. या प्रेमाची उंची वेगळीच होती.

बाबासाहेबांनी त्यांचे शेवटचे पुस्तक, ‘व्हॉट कॉंग्रेस अँड गांधी हॅव डन टू अनटचेबल’ त्यांनी फॅनीला समर्पित केले आहे. रमाई आणि माई यांच्या व्यतिरिक्त फॅनीने देखील बाबासाहेबांच्या आयुष्यात काही काळ त्यांना भावनिक आधार दिला. १९२३ पासून १९४३ पर्यंत त्यांच्यात सातत्याने पत्रव्यवहार झाल्याचे दिसून येते. पण, १९४३ नंतर त्यांच्यातील हा पत्रव्यवहार अचानक थांबला.

आंबेडकर जेंव्हा फॅनीला पत्र लिहित तेंव्हा मायन्यात ते तिचा उल्लेख ‘डी’ असा करत. तर फॅनी त्यांना पत्र लिहिताना ‘डीअर भीम’ अशा मायन्याने सुरुवात करत असे. आपल्या एका पत्रात डॉ. आंबेडकर फॅनीला लिहितात, की मी तुझा असलो तरी, तुझ्या प्रेमात पडलेलो नाही.

फॅनीच्या वाढत्या भावनिक गुंतवणुकीबद्दल तिला दिलेला हा एक इशाराच होता. त्याकाळात बाबासाहेब भारतीय राजकारण आणि दलितांना न्याय्य हक्क मिळवून देण्याच्या लढ्यात इतके व्यस्त होते की, या सगळ्यांसाठी त्यांच्याकडे वेळही नव्हता.

फॅनीच्या पत्रावरून असे वाटते की तिला भारतात येण्याची खूपच इच्छा होती. पण, तत्कालीन राजकीय परिस्थितीमुळे हे शक्य झाले नाही. फॅनी हाउस ऑफ कॉमन्स अँड इंडियामध्ये टायपिस्ट होती. त्यांच्यातील नाते हे बौद्धिक स्तरावरील नाते होते. बाबासाहेबांचे चरित्रकार सी. बी. खैरमोडे यांनी लिहिलेल्या १२ खंडाच्या चरित्रातील दुसऱ्या खंडात फॅनीविषयी विस्ताराने लिहिले आहे.

बाबासाहेब आणि फॅनी यांच्यातील हा पत्रव्यवहार पुस्तक रूपाने प्रकाशित करण्याची योजना आखली होती. पण, बाबासाहेबांचे नातू प्रकाश आंबेडकर यांनी या योजनेला विरोध केला. आंबेडकरांचे साहित्य प्रकाशित करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने स्थापन केलेल्या संपादक मंडळाचे सदस्य प्रा. अरुण कांबळे यांनी ही पत्रे संपादित केली होती. परंतु, हा पत्रव्यवहार काही कारणाने अप्रकाशित राहिला.

नंतरच्या काळात बाबासाहेबांच्या प्रकृतीबाबत जी गुंतागुत निर्माण झाली त्याची बाबासाहेबांच्या अनुयायांना देखील चिंता लागून राहिली होती.

तरीही बाबासाहेबांनी एका ब्राह्मण कन्येशी केलेला दुसरा विवाह दलितांनाही फारसा पसंत नव्हता. ब्राह्मण आणि दलित या दोन्ही समाजात या लग्नावरून नाराजी दिसून येत होती.

बाबासाहेबांच्या माघारी माई वादाच्या भोवऱ्यात अडकल्या. काळाच्या ओघात त्यांचे निर्दोषत्वही सिद्ध झाले. पण, नंतरच्या काळात त्यांच्या वाट्यालाही प्रचंड एकाकीपणा आला. या काळात तर काही दिवस त्यांना अज्ञातवासात राहण्याचीही वेळ आली. पण, एवढे आरोप होऊनही त्यांनी बाबासाहेबांच्या विचारांचा मार्ग सोडला नाही.

२९ मे २००३ रोजी वयाच्या ९१ व्या वर्षी मुंबईच्या जे. जे. रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

अत्यंत खडतर आणि महत्वाच्या काळात पत्नी आणि सहचारिणी म्हणून बाबासाहेबांची काळजी घेण्यात आणि त्यांची सेवा करण्यात माई कुठेच कमी पडल्या नाहीत. तरीही त्यांच्या वाट्याला आलेली अवहेलना केवळ दुर्दैवीच म्हणावी लागेल.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!