आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
जेल म्हटलं की आपल्याला कैदी, तिथला जेलर आणि तिथे चाललेली दंडात्मक कामं आठवत असतील. अनेकांना शोलेमधील “अंग्रेजों के जमाने का जेलर” देखील आठवत असेल. पण कैदी म्हणून तुरुंगात जाताना त्या कैद्याची कसून तपासणी होते, त्याची माहिती नोंदवली जाते आणि मगच त्याची जेलमध्ये एंट्री होते.
कोणत्याही गुन्ह्यांचा तपास करताना हातांच्या बोटांचे ठसे म्हणजेच फिंगरप्रिंट्स अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात, याची कल्पना तर आपल्याला आहेच. सुमारे दोन शतकांपासून जगभरातील पोलीस खात्यांमध्ये फिंगरप्रिंट्सचा वापर होत आहे. हेच फिंगरप्रिंट्स पुढच्या काळात प्रत्येक व्यक्तीला भिन्न, विशिष्ट ओळख देण्यासाठी म्हणून आधारसारख्या नागरी यंत्रणांमध्ये वापरले जाऊ लागले.
कारागृहांमध्ये देखील कैद्यांना विशिष्ट ओळख देण्यासाठी असे फिंगरप्रिंट्सचे रेकॉर्डस् ठेवले जातात. पण सुरुवातीच्या काळात जेल्समध्ये कैद्यांची नोंदणी करताना त्यांचे फिंगरप्रिंट्स घेण्याची पद्धत नव्हती. दोन अगदी हुबेहूब सारख्या दिसणाऱ्या व्यक्तींमुळे जेल्समध्ये कैद्यांची माहिती घेताना फिंगरप्रिंट्स रेकॉर्ड करण्याची पद्धत सुरु झाली. ते प्रकरण नेमकं काय होतं, जाणून घेऊया या लेखातून..
बार्टीलियन पद्धत आणि दोन हुबेहूब दिसणारे कैदी
१९०३ साली अमेरिकेतील लिव्हेन्वर्थ कारागृहात विल वेस्ट नावाचा माणूस आपल्या गुन्ह्यांची शिक्षा भोगण्यासाठी दाखल झाला. त्याच्यावर लावले गेलेले आरोप सिद्ध झाल्याने तेथील कारकुनांनी बार्टीलियन पद्धतीनुसार त्याची इत्थंभूत माहिती घ्यायला सुरुवात केली. या माहितीमध्ये गुन्हेगाराच्या शरीराचे सर्व प्रकारचे मोजमाप, त्याच्या शरीरावरील विशिष्ट खुणा, उदाहरणार्थ चट्टे, जन्मखूण, टॅटू इत्यादींचा समावेश होतो.
वेस्टचे मोजमाप होत असतानाच त्याच्यासारखाच दिसणारा, अगदी याच शरीरयष्टीचा, आणि अगदी मिळते-जुळते शारीरिक मोजमाप असणारा एक व्यक्ती याआधीच तुरुंगात असल्याचे त्या कारकुनाच्या लक्षात आले. वेस्टला याबद्दल विचारणा केली असता, सहाजिकच त्याने नकारार्थी उत्तर दिले आणि आपण पहिल्यांदाच लिव्हेन्वर्थ कारागृहात आलो असल्याचा दावा केला. यामुळे तेथील कामगारांनी तुरुंगाच्या फाईल्स चाळायला सुरुवात केली आणि त्यांना वेस्टसारख्याच हुबेहूब दिसणाऱ्या त्या व्यक्तीची फाईल सापडलीही.
रेकॉर्ड क्लर्कने फोटोकडे अगदी निरखून पाहिले आणि मग आपल्या समोर उभ्या असलेल्या व्यक्तीकडे पाहिले. त्या दोघांमध्ये काडीमात्रही फरक नव्हता. असं म्हणतात, जगातील सात लोक हुबेहूब सारखे दिसतात. हे जरी खरं मानलं तरी ते दोघे हुबेहूब दिसण्याची शक्यता आहे.
जगातील दोन व्यक्ती समान दिसण्याची शक्यता असते, म्हणूनच रेकॉर्ड क्लार्कने त्या दोघांची इतर माहिती जसे की शरीरयष्टी, शारीरिक मोजमाप इत्यादी तपासण्यास सुरुवात केली. पण यामध्येही ते दोघे “शेम टू शेम” होते. इतकंच नाही तर रेकॉर्ड क्लार्कच्या हातात जी फाईल होती, त्यात “विल्यम वेस्ट” नावाच्या व्यक्तीची माहिती होती. म्हणजेच त्या दोघांचे नाव देखील जवळ जवळ सारखे होते. पण हे कसं शक्य होतं?
आश्चर्य म्हणजे आपण याआधी कधीही या तुरुंगात आलो नसल्याचा त्याचा दावा खरा होता. यावर तो क्लार्कला म्हणाला, “हा माझाच फोटो आहे, मला माहिती नाही हा तुम्हाला कुठे मिळाला, पण मी येथे पहिल्यांदाच आलो आहे..”
शेवटी सत्य सर्वांसमोर आले, ते दोघे एक माणूस नसून वेगवेगळेच आहेत हे सिद्ध झाले. दोन माणसं एकसारखी दिसण्याची शक्यता असते. म्हणूनच कारागृहाच्या अधिकाऱ्यांनी विल वेस्ट आणि विल्यम वेस्टचे फिंगरप्रिंट्स मॅच करून पाहिले, तेव्हा ते भिन्न असल्याचे आढळून आले. ते दोघे फक्त भिन्नच नाही तर लांब लांब पर्यंत एकमेकांचे नातेवाईकही नव्हते.
या घटनेमुळे तुरुंगातील कैद्यांच्या माहिती घेण्याच्या पारंपरिक बार्टीलियन पद्धतीतील दोष समोर आल्याने ही पद्धत तुरुंग अधिकाऱ्यांनी ही पद्धत वापरणे अंशतः बंद केले. बार्टीलियन पद्धत आजही वापरण्यात येते, फक्त त्यामध्ये प्रत्येक कैद्याला विशिष्ट ओळख देण्यासाठी फिंगरप्रिंट्सचे रेकॉर्ड्स देखील घेतले जातात. दोन हुबेहूब दिसणाऱ्या, एकमेकांना न ओळखणाऱ्या व्यक्तींमुळे जेलमधल्या पद्धतींमध्ये आमूलाग्र बदल झाले हे विशेष.
फिंगरप्रिंट्सचे महत्त्व आणि संक्षिप्त इतिहास
फिंगरप्रिंट्सद्वारे विशिष्ट ओळख निर्माण करण्याची संकल्पना इजिप्शियन्सच्या काळापासून अस्तित्वात असल्याचे सांगण्यात येते. पण फिंगरप्रिंट्सद्वारे विशिष्ट ओळख द्यायची पद्धत १८८० साली डॉक्टर हेनरी फौल्ड्स नावाच्या स्कॉटिश माणसाने आणली. त्याने याबद्दल नेचर नावाच्या एका वैज्ञानिक जर्नलमध्ये लेख लिहिला होता. प्रत्येक व्यक्तीची विशिष्ट ओळख करवून देते हे लक्षात आल्यावर त्याने फिंगरप्रिंट्सचे अत्यंत बारकाईने निरीक्षण केले होते. कायदेशीर बाबींसाठी होणार फिंगरप्रिंट्सचा उपयोग १८९०च्या दशकात सुरु झाला.
इन्स्पेक्टर एडुआर्डो अल्वारेझ हे फिंगरप्रिंटच्या सहाय्याने गुन्हेगाराला पकडणारे पहिले पोलीस निरीक्षक. त्यांनी याच पुराव्याच्या आधारे फ्रान्सिस्का वेलाझक्वेझला अटक केली होती. दारावर तिची रक्तरंजित फिंगरप्रिंट सापडल्याने हा पुरावा त्यांच्या हाती लागला. स्टॅम्पपॅड आणि शाईच्या मदतीने फ्रान्सिस्काच्या बोटांचे ठसे अर्जेंटिनामधील ला प्लाटा याठिकाणी घेण्यात आले. दारावरील फिंगरप्रिंट आणि तिची फिंगरप्रिंट मॅच झाली.
त्या वर्षाच्या सुरुवातीला, ला प्लाटा येथील पोलीस विभागाने जुआन वुसेटीच यांच्या नेतृत्वाखाली जगातील पहिला फिंगरप्रिंट डेटाबेस विकसित करण्यास सुरुवात केली होती. गणित, अकाउंट्स आणि स्टॅटिस्टिक्स या विषयात निपुणता असल्याने तो ला प्लाटाच्या पोलीस विभागासाठी एक महत्त्वपूर्ण ॲसेट होता.
१८९१ साली त्याला विभागाच्या मुख्यालयाने “मानववंशशास्त्र (अँथ्रोपोलॉजी) कार्यालय” स्थापन करण्याचे काम दिले. स्थानिक मोर्गमधील मृतदेहांवर प्रयोग केल्यानंतर त्याने फिंगरप्रिंट्सचे चार प्रकारांमध्ये वर्गीकरण केले. त्यानंतर त्याने गुन्हेगारांच्या बोटांचे ठसे गोळा करण्यास सुरुवात केली. १८९२ सालापर्यंत त्याच्याकडे सुमारे १४६२ लोकांच्या बोटांचे ठसे होते. काहीच वर्षांत जगभरातील श्रीमंत देशांमध्ये या पद्धतीचा वापर सुरु झाला. पण वर सांगितलेला प्रकार होईपर्यंत ही पद्धत जेलपर्यंत पोहोचली नव्हती.
जगात करोडो लोक आहेत, पण प्रत्येकाच्या फिंगरप्रिंट्स एकाच पॅटर्नमध्ये वेगळ्या ठेवण्याइतपत कॉम्बिनेशन्स माणूस तयार करू शकत नाही. निसर्गाने केलेला हा चमत्कारच म्हणावा लागेल.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.