आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
आज अनेकजण वजन कमी करण्याच्या किंवा वजन वाढवण्याच्या प्रयत्नांत आहेत. बदललेली जीवनशैली, अन्नधान्याची घटती गुणवत्ता, आणि अशा अनेक कारणांमुळे प्रत्येकाला एकतर कमी वजन किंवा प्रचंड वाढलेल्या वजनाचा सामना करावा लागतो. शरीराच्या या असंतुलित भारामुळे पुढे अनेक विकार उद्भवतात. यांमध्ये सांधेदुखी, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, डायबिटीस, हृदयविकार, इत्यादींचा समावेश आहे.
वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी आजही अनेक जण व्यायाम, योग, सकस आहार इत्यादींचा वापर करतात. पण अनेकांना या धकाधकीच्या आणि स्पर्धात्मक जगात सकस आहार घ्यायला जमत नाही, शिवाय व्यायाम/योग करायलाही अनेकजण एकतर कंटाळा तरी करतात किंवा त्यांना कामातून वेळही मिळत नाही. असं असलं तरी त्यांना आपलं वजन नियंत्रित ठेवण्याची गरज असते. मग ती गरज एकतर तशा इच्छेतून निर्माण झालेली असली पाहिजे किंवा आरोग्याच्या एखाद्या समस्येतून.
कारण कोणतंही असो पण वजन नियंत्रणात ठेवण्याची गरज सर्वांनाच आहे. अशा अनेक लोकांसाठी आता एक वजन घटवण्यास मदतगार ठरणारे एक औषध आले आहे, हे कोणतेही रँडम किंवा अनऑथराईझ्ड औषध नसून ते औषधं तयार करण्याच्या विशिष्ट प्रक्रियेमधून घडवण्यात आलं आहे. कदाचित आजवर अशी अनेक औषधे आपल्याला बाजारात मिळत असतीलही, पण हे त्या औषधांपेक्षा वेगळं आहे. नेमकं काय आहे हे औषध, जाणून घेऊया या लेखातून..
गेल्या अनेक दशकांपासून, वजन कमी करण्यासाठी किंवा दणकट स्नायू निर्माण करणारी अनेक औषधे उपलब्ध आहेत. पण त्या औषधांच्या अन्य दुष्परिणामांना देखील त्या औषध घेणाऱ्या व्यक्तीला सामोरं जावं लागतं. यालाच अनेकदा साईड इफेक्ट्स म्हटलं जातं. हे साईड इफेक्ट्स आरोग्यावर दूरगामी, विपरीत परिणाम करू शकतात. आज अनेक लोक वर सांगितल्याप्रमाणे धकाधकीच्या जीवनशैलीमुळे व्यायाम आणि योग यांच्याकडे दुर्लक्ष करून शॉर्टकट्स शोधात असतात.
औषधांच्या दुनियेत सध्या ओझेम्पिक आणि मौंजारोसारखी औषधे आली आहेत. ही औषधे सुमारे १२ ते १८ टक्के वजन कमी करू शकतात असा निष्कर्ष काढण्यात आला असून या औषधांवर मोठ्या प्रमाणात क्लिनिकल टेस्ट्स झाल्या आहेत. शिवाय, या औषधांचे कमीत कमी साईड इफेक्ट्स असल्याचे सांगितले जाते. सध्या ती औषधे इंजेक्शनच्या स्वरूपात उपलब्ध असून त्याच्या गोळ्याही लवकरच उपलब्ध होणार आहेत. ही औषधे घेतल्यावर माणसाला कमी भूक लागते, परिणामी तो माणूस एका दिवसात जितक्या कॅलरीज घेत होता त्यापेक्षा आता कमी कॅलरीज घेणार.
नवी औषधं नेमकं काम कसं करतात?
आता याच्याही पुढे जाऊन, कमी कॅलरी घेण्याबरोबरच, घेतलेल्या कॅलरीज औषधांद्वारेच कशाप्रकारे खर्च होतील याचाही शोध लावण्याच्या प्रयत्नात अनेक संशोधक आहेत. थोडक्यात सांगायचं झालं तर आपण ज्याप्रमाणात अन्न ग्रहण करतो, त्याप्रमाणात शारीरिक हालचाल देखील केली पाहिजे, अन्यथा खाल्लेलं अन्न चरबीच्या स्वरूपात शरीर साठवून ठेवतं, त्यामुळे या गोळ्या घेतल्यानंतर माणसाला हालचाल किंवा व्यायाम करण्याची तीव्र इच्छा निर्माण होईल याचा विचार करत आहेत.
याच तत्त्वावर सेंट लुईस येथील वॉशिंग्टन विद्यापीठातील संशोधकांची एक टीम नव्याने तयार केलेल्या औषधाचा वापर करून एका माणसावर टेस्टिंग करीत आहे. या औषधाचे नाव तूर्तास SLU-PP-332 असे ठेवण्यात आले आहे.
‘व्यायामाची’ गोळी
SLU-PP-332 शरीरातील विशिष्ट रिसेप्टर्सवर काम करते. हे रिसेप्टर्स ऊर्जेची प्रचंड गरज असलेल्या सेल्समध्ये आढळतात, उदाहरणार्थ, यकृत, हृदय, इत्यादी. व्यायाम किंवा कोणतीही शारीरिक हालचाल करताना हे रिसेप्टर्स त्या त्या व्यायामानुसार शरीरात मेटाबॉलिक (चयापचय) बदल घडवून आणतात. याशिवाय ते इतरही गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. यांमध्ये स्नायूंची ऑक्सिजन शोषून घेण्याची क्षमता, अतिरिक्त ऊर्जेसाठी फॅट्सचे विघटन इत्यादी क्रियांचा समावेश आहे.
संशोधकांच्या टीमने निरोगी उंदरांवर या औषधाचा प्रयोग करायचे ठरवले. ज्या उंदरांना SLU-PP-332 दिले गेले आहे ते उंदीर इतर उंदरांपेक्षा सुमारे ७०% जास्त पळू शकतात तर इतर उंदरांपेक्षा या उंदरांचा वेग सुमारे ४५% जास्त असल्याचे आढळून आले. उंदरांवर केलेल्या प्रयोगाचे हे निष्कर्ष या वर्षाच्या सुरुवातीला प्रकाशित करण्यात आले.
मागच्या महिन्यात देखील असाच एक प्रयोग करण्यात आला. यावेळी या कम्पाउंडचा परिणाम शरीराच्या एकूण वजनावर आणि मेटाबॉलिजमवर अर्थात चयापचय क्रियेवर कसा होतो हे पाहण्यासाठी हा प्रयोग करण्यात आला. यामध्ये त्यांनी काही लठ्ठ उंदरांना या औषधासह चरबीयुक्त आहार दिला आणि इतरांना चार आठवड्यांसाठी नियमित खाणेपिणे देणे सुरु ठेवले.
प्रयोगाअंती, ज्या उंदरांना SLU-PP-332 दिले आहे त्यांचे वजन १२ टक्क्यांनी कमी झाले होते. त्यांना चरबीयुक्त आहार दिला असला तरी हा निष्कर्ष निघाला होता. महत्त्वाचे म्हणजे, वजनातील फरक हा चरबी कमी झाल्यामुळे झाला होता. ज्या उंदरांना वजन कमी करण्यासाठी औषध दिले गेले होते, त्यांच्यामध्ये ऊर्जेचा वापर जास्त होता, ती ऊर्जा शरीरात साठलेल्या फॅट्समधूनही येत होती. शिवाय त्यांच्यावर कोणतेही गंभीर दुष्परिणाम (साईड इफेक्ट्स) दिसत नव्हते.
फ्लोरिडा विद्यापीठातील फार्मसीचे प्राध्यापक थॉमस बुरिस यांच्या मते “या कंपाऊंडमुळे स्नायूंमध्ये तेच बदल होतात, जे शरीराची हालचाल करताना किंवा व्यायाम करताना स्नायूंमध्ये होतात. जेव्हा उंदरांना ते औषध दिले जाते, तेव्हा त्यांच्या संपूर्ण शरीरातील मेटाबॉलिजम फॅटी ॲसिड्सचा वापर करते, हेच आपले शरीर डाएट किंवा व्यायाम करताना करत असते.”
आव्हाने
SLU-PP-332 ला औषधांच्या बाजारपेठेत ओझेम्पिक किंवा मौंजारो यांच्याशी स्पर्धा सुरु करण्यासाठी बराच लांबचा पल्ला गाठायचा आहे. संशोधनाच्या या टप्प्यावर, त्याला यश मिळवण्यापेक्षा या प्रक्रियेतून बाहेर पडण्याची अधिक शक्यता असते. गरज असलेल्या माणसाला याचा योग्य प्रमाणातील डोस, साइड इफेक्ट्स कमी करणे आणि या औषधाची एकूण परिणामकारकता या घटकांवर त्याचे बाजारात येणे अवलंबून आहे.
कदाचित पुढील चाचण्यांमध्ये याचे आणखी गंभीर साइड इफेक्ट्स समोर येऊ शकतात. तरीही प्रथमदर्शनी ते सुरक्षित आणि परिणामकारक ठरल्याने या औषधाला यश मिळेल अशी आशा आहे. असे झाले तर ते लाखो लोकांसाठी फायदेशीर ठरेल.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.