आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
कोणत्याही लढाईत सैन्यसंख्या, शस्त्रास्त्र, व्यूहरचना यांच्यापेक्षा महत्त्वाचा असतो तो आपल्या सैनिकांचा प्रामाणिकपणा आणि त्यांची निष्ठा. फितुरी झाली तर जिंकत आलेलं यु*द्ध हरण्यास वेळ लागत नाही. अशी असंख्य उदाहरणे आपल्या देशात आहेत. कश्मीरच्या हिंदू राजाविरोधात १९४८ साली मुस्लिम सैन्याने केलेल्या फितुरीला एक कारण तरी होतं, पण छत्रपती शिवरायांसारख्या यो*द्ध्यांनासुद्धा कित्येकदा स्वकियांविरोधात तलवार उपसायची वेळ आली होती.
अनेकदा यु*द्धाचं पारडं आपल्या बाजूने फिरणार असतं, पण फितुरीमुळे ते शत्रूच्या बाजूने फिरतं. आधुनिक भारताच्या इतिहासातील सर्वांत महत्त्वाची लढाई, प्लासीची लढाई देखील ब्रिटिशांनी मीर जाफर या फितुराच्या मदतीने जिंकली, अभेद्य, अजिंक्य समजला जाणारा रायगड देखील फितुरीनेच जुल्फिकार खानाने जिंकला. पण अशा प्रकारच्या फितुरीची प्रकरणं फक्त भारतातच नाही, तर अमेरिकेतही झाली आहेत. यावरून फितुरी एक वृत्ती असल्याचे दिसते, त्यामागे मोठी कारणपरंपरा असू शकते. अमेरिकेच्या स्वातंत्र्ययु*द्धाच्या वेळीसुद्धा असाच एक फितूर अमेरिकेत होता. बेनिडिक्ट अरनॉल्ड असं त्याचं नाव.
एकेकाळी बेनेडिक्ट अरनॉल्ड हे अमेरिकन स्वातंत्र्यलढ्यातील अग्रगण्य नाव होतं. जॉर्ज वॉशिंग्टनसह अमेरिकेतील पूर्ण जनता त्याला मानत असे. पण ज्याप्रमाणे भारतातील बंगाल प्रांतात “मीर जाफर” या नावाचा समान अर्थ “फितुरी” असा होतो, त्याचप्रमाणे अमेरिकेतही “बेनेडिक्ट अरनॉल्ड”चा समान अर्थ फितुरी, फसवणूक असा झाला.
गेल्या काही वर्षांत त्याच्या बाजूने बोलण्यासाठी अनेकजण आपापली थिअरी मांडत असले तरी अरनॉल्डने फितुरी केली हे स्पष्ट आहे. सुमारे १० हजार पौंड्स आणि ब्रिटिश आर्मीमध्ये एका पोस्टच्या बदल्यात त्याने न्यूयॉर्कमधील वेस्ट पॉईंटचा किल्ला ब्रिटिशांना गिळंकृत करू दिला. असं करण्यामागे अनेक कारणे सांगितली जातात.
प्रमोशन
जॉर्ज वॉशिंग्टनचे कॉन्टिनेन्टल काँग्रेसशी प्रमोशनच्या मुद्द्यावरून अनेक मतभेद होते. काँग्रेसने केवळ स्वातंत्र्ययु*द्ध लढण्याच्या स्ट्रॅटेजीजवरच नाही तर सैन्यात कोणाला बढती दिली जाईल आणि कोणाला बढती दिली जाणार नाही यावरही नियंत्रण ठेवले होते. अरनॉल्डने फितुरी केली त्यांपैकी एक कारण म्हणजे तो ज्या लष्करी पदाचा मानकरी स्वतःला समजत होता, तेवढी पदोन्नती त्याला मिळाली नाही.
खरंतर अरनॉल्ड हा जॉर्ज वॉशिंग्टनचा सर्वोत्कृष्ट, शूर आणि सक्षम कमांडर होता. असं असलं तरी कॉंटिनेंटल सैन्याच्या नॉर्दर्न विभागाच्या कमांडिंग ऑफिसर जनरल होरेशियो गेट्सने त्याला कमांडमधून काढून टाकले होते. जेव्हा जनरल होरेशियो आपल्या तंबूत बसला होता, तेव्हा अचानक त्याने ब्रिटिशांमधील हेशियन्स सैन्याकडून झालेल्या गोळी*बाराचा आवाज ऐकला.
त्याचवेळी अरनॉल्डने आपल्या माणसांबरोबर हेशियन्स सैन्याच्या मागील बाजूस जाऊन त्यांच्यावर ह*ल्ला केला. याच चकमकीत एक गोळी त्याच्या डाव्या पायाला लागली आणि त्याच्या मांडीच्या हाडाला मोठी दुखापत झाली. या जखमेमुळे तो आता कमांड हाती घ्यायला सक्षम नव्हता. म्हणूनच वॉशिंग्टनने अरनॉल्डची फिलाडेल्फियाचा लष्करी गव्हर्नर म्हणून नियुक्ती केली. खरंतर साराटोगावरील विजयाचा तो अमेरिकन “हिरो” होता. पण अरनॉल्डने याचा विपर्यास केला.
“जोरू का गुलाम?”
साराटोगाच्या लढाईनंतर अरनॉल्ड फिलाडेल्फिया येथे स्थायिक झाला. त्याला लक्झरियस घरांमध्ये राहण्याचे वेड होते. लक्झरियस घर त्याने घेतले होते. याच ठिकाणी तो एका फ्लर्टीशियस, श्रीमंत मुलीच्या प्रेमात पडला. तिचं नाव पेगी. काही काळातच त्यांनी लग्न केले. पण नव्याने झालेल्या लग्नामुळे अरनॉल्ड प्रचंड कर्जबाजारी झाला होता.
आपल्या नव्या बायकोची हौस पुरवण्यासाठी त्याने अनेकांकडून कर्ज घेतले होते. त्याची पत्नी फिलाडेल्फियामधील एका प्रतिष्ठित आणि श्रीमंत कुटुंबातील मुलगी होती. हे कुटुंब ब्रिटिशांचं निकटवर्तीय होतं, शिवाय त्यातील अनेक सदस्यांनी ब्रिटिशांसाठी चांगली कामे देखील केली होती. पेगीला हाय लाईफस्टाईल जगण्याची सवय होती, पण ती हौस पुरवण्यासाठी म्हणून पेगीनेच अरनॉल्डला ब्रिटिशांकडे नेले, आणि मग त्याने ब्रिटिशांशी हातमिळवणी करून त्यांना वेस्ट पॉईंट जिंकायला मदत केली असा काही इतिहासकारांचा दावा आहे.
व्यक्तिगत शत्रुत्व
काहींच्या मते, अरनॉल्डने असे केले त्याचे कारण पेनसिल्वानिया सुप्रीम कोर्ट एक्सेक्युटीव्ह कौन्सिलचा प्रमुख जोसेफ रीड होता. काही कारणाने अरनॉल्डवर रीडचा प्रचंड राग होता. त्यामुळे रीडने बेकायदेशीर वस्तू खरेदी करणे, ब्रिटिशांच्या निकटवर्तीयांच्या कंपनीला प्राधान्य देणे अशा अनेक देशद्रोहाच्या आरोपांनुसार अर्नोल्डवर खटला चालवण्याचा प्रयत्न केला. ही केस चालू असतानाच या आरोपांबद्दल रीड अर्नोल्डविरोधात अनेक अफवा पसरवत असे, त्याची बदनामी करत असे.
ब्रिटिशांनाही त्याच्यावर विश्वास नव्हता..
“त्या वेळी इतरांचीही काहीशी अशीच परिस्थिती होती पण त्यांनी स्वदेशाविरोधात कधीही फितुरी केली नाही.” असे ‘एरिक डी. लेहमन’, ‘होमग्राउन टेरर: बेनेडिक्ट अरनॉल्ड अँड द बर्निंग ऑफ न्यू लंडन’ या पुस्तकाचे लेखक म्हणतात. त्यांनी अर्नोल्डची अनेक पत्रे आणि इतर दस्तऐवज तपासले आहेत. पुढे ते म्हणतात, “काही जणांच्या मते तो भावनाहीन होता, पण काही जण तो भावनाप्रधान असल्याचे सांगतात – तो त्याच्या रागावरही नियंत्रण ठेवू शकत नव्हता. या सर्वांमध्ये मला एक गोष्ट सापडली ती म्हणजे त्याच्या लहानपणी आणि तारुण्यातही आत्मसन्मानाच्या अभावातून निर्माण झालेली त्याची स्वार्थी महत्त्वाकांक्षा. “
अरनॉल्डची कथा चांगल्या-विरुद्ध-वाईट या अनुषंगाने सांगितली जाते. अनेकदा लोक त्याला “मिसअंडरस्टूड हिरो” देखील म्हणतात. लेहमन म्हणतो, “तो मिसअंडरस्टूड हिरो आहेच, आणि अमेरिकन स्वातंत्र्ययु*द्धाच्या सुरुवातीच्या काळात तो ‘हिरो’च होता. हे वास्तव आपण स्वीकारलेच पाहिजे. पण ब्रिटिशांना जाऊन मिळाल्यानंतर त्याने अगदी आपल्या जवळच्या मित्रांचाही विश्वासघात केला, एक ब्रिटिश सैन्याधिकारी म्हणून आपल्या जुन्या साथीदारांच्या ह*त्येची परवानगी देण्याची किंवा प्रत्यक्ष ह*त्या करण्याची तयारीही त्याने दाखवली, पण तो फितूर होता हे दोन्ही बाजूचे यो*द्ध्ये मान्य करतात.”
वेस्ट पॉईंटचा किल्ला ब्रिटिशांना मिळवून देण्यावरच अरनॉल्ड थांबला नाही तर त्याने व्हर्जिनियावर देखील ह*ल्ला केला. या ह*ल्ल्यातून थॉमस जेफरसन थोडक्यात वाचला, त्याने नंतर कनेक्टिकटवर देखील ह*ल्ला केला.
खरंतर ब्रिटिशांना अरनॉल्डला विकत घेऊन बरेच काही मिळवायचे होते, पण अरनॉल्डवर विश्वास ठेवणे त्यांना देखील कठीण झाले होते. कारण उद्या हाच अरनॉल्ड जास्त पैसे मिळाले म्हणून उलटला तर ब्रिटिशांनाच महागात पडणार होते.
अरनॉल्ड यु*द्धातून वाचला आणि आपली पत्नी पेगीसह इंग्लंडला गेला, तिथेच त्याने आपले उर्वरित आयुष्य व्यतीत केले. त्याने ब्रिटिशांचाही अनेकदा विश्वासघात केला होता. यामुळे त्याचे व्यक्तीमत्त्व गोंधळात टाकणारे आहे.
अखेरीस १८०१ साली लंडनमध्ये त्याचे निधन झाले.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.