सध्या ट्रेंड होत असलेल्या डाल्गोना कॉफीचं भारताबरोबर एक नातं आहे..!

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लोकांच्या आयुष्यावर मोठा परिणाम झाला आहे. लॉकडाऊनचा वाढत चाललेला अवधी आणि रोगाचा वाढत चाललेला प्रभाव लोकांच्या आयुष्यावर परिणाम करत असून दिवसेंदिवस लोकांच्या चिंतेत वाढ होत आहे.

परंतु अशा काळात देखील वेगवेगळे घरगुती अन्न पदार्थ बनवून खाणे, टीव्हीवर मालिका बघणे अशा गोष्टींमुळे लोकांचं घरी राहणं सुसह्य होत आहे. लोक वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ तयार करून त्याचे फोटो समाज माध्यमावर टाकत आहेत आणि त्या माध्यमातून अनेक खाद्यपदार्थांच्या पाककृतीची देवाण घेवाण होत आहे.

 

न्यूयॉर्कमध्ये गव्हाच्या पिठाचा तुटवडा निर्माण झाला आहे कारण लोक घरच्या घरी पाव तयार करून खात आहेत. कॉफी अफीसायोङोस ही डालगोना कॉफी बनून लोकप्रिय झाली असून तिचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ही डालगोना कॉफी मूळच्या एका दक्षिण कोरियन कॉफीची प्रतिकृती असून सध्या समाज माध्यमांवर ह्या कॉफीचा ट्रेंड सुरू आहे. परंतु ह्या एका फेसाळलेल्या कॉफीने भारताला त्याच्या खाद्यसंस्कृतीचा प्रसाराचा एक नवा धडा शिकवला आहे.

जगभरात कॉफीचे सेवन हे मोठ्या प्रमाणावर केले जाते. कॉफी पिण्यासाठी लोक हे कॉफी शॉपमध्ये जात असतात, पंधराव्या शतकापासून कॉफी शॉप अस्तित्वात असून चर्चा आणि गप्पांचे सामाजिक केंद्र म्हणून उदयास आले आहेत.

परंतु आज जेव्हा सर्वत्र लॉकडाऊन आहे अशा प्रसंगी लोक घरी आहेत. मग घरी सोप्या पद्धतीने तयार करता येणाऱ्या फेसाळलेल्या डालगोना कॉफीने जगभरातील समाज माध्यमावर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं असून फक्त कॉफी, साखर आणि दूध ह्या इतक्याशा सामग्रीने तयार होणाऱ्या ह्या दक्षिण कोरियन कॉफीला लोकांनी डोक्यावर घेतलं आहे.

जगभरातील लोकांच्या फेसबूक पोस्ट, युट्युब चॅनेल, इन्स्टाग्राम स्टोरीजमध्ये ह्या डालगोना कॉफीने जागा मिळवली असून आता तिचा प्रसार सर्वत्र मोठ्या प्रमाणावर झाला असल्याने दक्षिण कोरियाने याचा फायदा उचलत आपल्या घरगुती पद्धतीच्या इतर अनेक खाद्य पदार्थांची वर्णी देखील आंतरराष्ट्रीय स्तरावर लावली असून खाद्य संस्कृतीच्या प्रसाराचे काम हाती घेत कलीनरी डिप्लोमसी खेळायला सुरुवात केली आहे.

त्यांच्या किमची आणि बीबीम्बॉप ह्या पदार्थांना देखीक आंतरराष्ट्रीय स्तरावर आता प्रसिद्धी मिळू लागली आहे. दक्षिण कोरियाच्या शासनाने स्वतः पुढाकार घेत ह्या पदार्थांचा प्रसार जगभर करायला सुरुवात करून जगावर आपली एक सांस्कृतिक छाप सोडण्यास सुरुवात केली आहे.

आजच्या ह्या सामाजिक विलगीकरणाच्या काळात घरी राहणाऱ्या लोकांनी स्वयंपाकात विविध प्रयोग करण्यास सुरुवात केली आहे. अशा काळात भारताला आपल्या खाद्य संस्कृतीचा वारसा जगभरात पोहचवण्याची एक नामी संधी चालून आली आहे.

फेसाळलेल्या कॉफीचा थर थंड दुधावर चढवून तयार होणारी ही डालगोना कॉफी भारतातील ‘फेंटी हुई कॉफी’शी बरेचसे साधर्म्य साधत असून फेंटी हुई कॉफी भारतातील घरा घरात अनेक दशकांपासून बनवली जात आहे.

 

भारतात तयार होणारी फिल्टर कॉफी देखील जगभरात प्रसिद्ध असून तिने इतर अनेक कॉफीच्या प्रकारावर मात करून आंतरराष्ट्रीय ख्याती मिळवली आहे. आता जेव्हा डालगोना कॉफी जगभरातील लोकांच्या पसंतीस उतरत आहे त्यावेळी भारताने देखील खाद्यपदार्थ व पेयांचा जगभरात प्रसार करणे गरजेचे बनले आहे. यासाठी फक्त थोडं लक्ष घालण्याची गरज आहे.

काही दिवसांपूर्वी भारतातील प्रसिद्ध पेय असलेल्या हळदीचा दुधाने जगभरात टरमरीक लाते म्हणून प्रसिद्धी मिळवली असून आज जगभरातील सर्वप्रसिद्ध कॉफी शॉपमध्ये हे उपलब्ध आहे.

स्टारबक्स देखील ह्याची विक्री करत आहे. २०१६ साली गुगलने देखील ह्या हळदीच्या दुधाला ब्रेकआउट स्टार्टर अशी पदवी प्रदान केली असून त्याच्या चवीने लोकांचया मनावर अधिराज्य गाजवल्याची नोंद केली आहे.

प्राचीन भारतीय आयुर्वेद शास्त्राने हळदीचा दुधाला मोठं महत्व दिलं असून असंख्य व्याधींवर गुणकारी असल्याचे म्हटले आहे. त्यातील अँटी ऑक्सिडेंट तत्वामुळे वजन कमी होण्यास व प्रतिकार शक्ती वाढण्यात मदत होत असल्याचे मत अनेक शास्त्रज्ञानी व्यक्त केले असून इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विडोडो यांनी देखील कोरोना पासून बचावासाठी हळदीच्या दुधाचे प्राशन सुरू केले आहे.

आज जेव्हा सर्वत्र शास्त्रज्ञ कोरोनावर गुणकारी उपाय शोधण्यात व्यस्त आहेत, त्यावेळी हळदीच्या औषधीय तत्वांमुळे युरोप अमेरिकेतून हळदीची मागणी मोठया प्रमाणावर वाढली आहे.

 

हळद ही भारताच्या एका समृद्ध खाद्य संस्कृतीचे प्रतीक असून आज ह्या खाद्य संस्कृतीची जागतिक ओळख निर्माण करण्यासाठी मोठी फायदेशीर ठरणार आहे. भारतातील काही मसाले जसे काळी मिरी, आलं आणि मिरची यांच्यातील आरोग्यदायी तत्वांमुळे शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि श्वसनसंस्थेला देखील हे मसाले गुणकारी ठरत असून हृदय व पोटसंबांधीत विकारांवर यांचा औषधी म्हणून उपयोगी पडत आहेत.

चीनच्या वुहान शहरातील एका मांसविक्री बाजारातून कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे जगभरातील लोकांनी मांसाहाराची धास्ती घेतली आहे अशावेळी जगभरातील लोकांना आपल्या शाकाहारी खाद्य संस्कृतीची ओळख करून देण्याची नामी संधी चालून आली आहे.

आपल्या खाद्यपदार्थातील मसाला आणि इतर तत्वांच्या वापरामुळे त्याला प्राप्त होणाऱ्या स्वर्गीय चवीने जगभरातील तृप्त करून भारतीय खाद्यसंस्कृतीचा जगभरात प्रसार करण्याचे काम आता करणे गरजेचे आहे. भारतातील ह्या खाद्य संस्कृतीमुळे भारतीयांमध्ये अनेक रोगांच्या विरोधात एक प्रतिकारशक्ती विकसित झाली असून अगदी संयुक्त राष्ट्रांनी देखील भारताच्या समृद्ध खाद्य संस्कृतीचे कौतुक केले आहे.

आज कोरोना विषाणूमुळे भयग्रस्त झालेल्या जगाला भारताने आपल्या खाद्यसंस्कृतीची ओळख करून देणे हे हिताचेच ठरणार आहे.

 


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

Get real time updates directly on you device, subscribe now.

यावर तुमची प्रतिक्रिया द्या

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!