आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
आज संपूर्ण जग कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने ग्रस्त असून दिवसेंदिवस खराब होत चाललेल्या परिस्थितीचा परिणाम म्हणून अमेरिकन नागरिकांनी सुपर मार्केटमध्ये टॉयलेट पेपरच्या खरेदीसाठी गर्दी केल्याचे चित्र काही दिवसांपूर्वी निर्माण झाले होते.
लॉकडाऊनमुळे दीर्घकाळ घरात राहावं लागणार असल्यामुळे टॉयलेट पेपरची कमतरता भासू नये यासाठी अमेरिकन नागरिक सुपर मार्केटमध्ये गर्दी करत होते. याचा परिणाम म्हणून टॉयलेट पेपर अमेरिकन बाजारातून हद्दपार झाले आहेत.
आता ह्या टॉयलेट पेपर नंतर अमेरिकन नागरिकांनी एका वेगळ्या गोष्टीच्या खरेदीसाठी गर्दी करायला सुरुवात केली असून ती निर्जीव वस्तू नाहीतर एक सजीव पक्षी आहे.
न्यू यॉर्क टाईम्सच्या एका रिपोर्ट नुसार अमेरिकन नागरिकांमध्ये आता जिवंत कोंबडीचे पिल्लू विकत घेण्यासाठी चढाओढ सुरू झाली असून अनेक लोकांनी घरी कोंबडीच्या पिल्लांची वाढ करायला सुरुवात केली आहे. इतकंच नाही अनेक कोंबडी विक्रेत्यांनी आपल्याकडे सर्व अंडी संपल्याचे बोर्ड लावले आहेत, इतकी गर्दी अमेरिकन नागरिक चिकन खरेदीसाठी करत आहेत.
खरंतर ईस्टर ह्या ख्रिस्ती सणाच्या काळात अंडीविक्रेत्यांचा व्यवसाय चरम सीमेवर असतो. पण सध्या तो जरा जास्तच तेजीत असून अर्थव्यवस्था ही कमालीची घसरली असतांना देखील चिकन विक्री झपाट्याने वाढत चालली आहे.
अमेरिकेत चिकन विक्रीचे प्रमुख केंद्र असलेल्या पोल्ट्री फार्म अथवा हॅचेरी ह्या संपूर्णपणे आउट ऑफ स्टॉक झाल्याचे चित्र निर्माण झाले आहेत. लोक मोठ्या प्रमाणावर कोंबड्यांची खरेदी करत आहेत कारण भविष्यात कोंबड्यांचा व अंड्यांचा तुटवडा निर्माण होऊ शकतो अशी भीती त्यांच्या मनात निर्माण झाली आहे, अशी माहिती एका पोल्ट्री चालकाने एका खाजगी वृत्तसंस्थेला दिली आहे.
वॉटकीन नावाच्या अमेरिकेतील एका प्रसिद्ध कंपनीने एवढ्या मोठ्या प्रमाणावर कोंबडीच्या पिल्लांची विक्री केली आहे की त्यांना आता सोल्ड आउट अर्थात माल संपल्याचे बोर्ड त्यांच्या सर्व स्टोअर्सवर लावण्याची वेळ आली आहे.
पुढील चार आठवडे नवीन कोंबडीची पिल्ले उपलब्ध होऊ शकणार नाहीत अशी माहिती त्यांनी ग्राहकांना दिली आहे. अनेक जुने ग्राहक त्यांच्या घरात नवीन कोंबडीच्या पिल्लांची भर घालत आहेत तर अनेक नवीन ग्राहक हे कोंबडीचे पिल्लू घरी घेऊन जाण्यासाठी गर्दी करत आहेत. यासाठी लोक अनेक निरनिराळे कारणं देत आहे, पण सर्व कारणांमागे कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा समान धागा आहे.
कोंबडीच्या पिल्लांच्या विक्रीत वाढ होण्यामागे अंड्याची वाढती किंमत एक कारण असून अमेरिकेच्या कृषी विभागाने नोंदवलेल्या निरीक्षणातून असे समोर आले आहे की होलसेल अंड्यांच्या किंमतीत तब्बल ५० टक्के वाढ मागील काही दिवसांत झाली आहे. जनतेची अंड्यांची मागणी पूर्ण करणे अवघड बनत चालले असून मागणीत प्रचंड वाढ झाल्याने अंड्याचा पुरवठा करणे अवघड झाले आहे.
भविष्यात अशा प्रकारे अंड्यांचा पुरवठा कमी होत गेला तर किमती गगनाला भिडण्याचा धोका लक्षात घेऊन लोकांनी कोंबडीचे पिल्लू विकत घेऊन त्याला वाढवायला सुरुवात केली आहे. एका कोंबडीच्या पिल्लाची संपूर्ण वाढ होण्यासाठी आणि त्यातून अंडे मिळवण्यासाठी तब्बल ५ महिन्याचा अवधी लागत असला तरी अमेरिकन नागरिक कोंबडीच्या पिल्लांची वाढ करत आहेत व त्यांच्यासोबत वेळ घालवत आहेत.
अनेक नागरीकांनी घरातील कंटाळवाण्या आणि नैराश्यग्रस्त वातावरणाला दूर करण्यात हे कोंबडीचे पिल्लू मदत करत असून यांच्या सोबत वेळ घालवल्याने तणावमुक्त राहता येते, अशी भावना व्यक्त केली आहे.
कोंबडीच्या पिल्लांची वाढ केल्यामुळे अनेक मनोविकार दूर होण्यास मदत झाली असल्याची भावना देखील त्यांनी व्यक्त केली आहे. भविष्यात उद्भवणारा अन्न तुटवडा आणि लॉक डाऊनमुळे घरात बसण्याची निर्माण झालेली परिस्थिती यामुळे ह्या कुकुटपालनाला नागरिकांनी पसंती दर्शवल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे.
पण हे कुकुटपालन करत असताना बहुतांश नागरिक हे त्याविषयी अनभिज्ञ आहेत. त्यांना ते कसं करावं हे माहिती नसल्याने अनेक कोंबडीची पिल्ले दगावली आहेत. अनेक नागरिक ह्यामुळे संभ्रम अवस्थेत असून समाज माध्यमावर याविषयी तक्रार करत आहेत आणि कुकुटपालन कसं करावं, कोंबडीचा पिल्लांची वाढ करण्यासाठी कोणती काळजी घ्यावी असे प्रश्न विचारत आहेत.
अनेकांनी युट्युबवर कुक्कुटपालन विषयक व्हिडिओ बघून संपूर्ण तयारीनिशी कोंबडीच्या पिल्लांची काळजी घेण्यास सुरुवात केली आहे.
अनेक पालकांनी ह्या कुक्कुटपालनाच्या सहाय्याने आपल्या मुलांना गणित, जीवशास्त्र व इतिहास ह्या विषयांचे धडे गिरवण्यास देखील सुरुवात केली असून कोंबडीच्या पिल्लांमुळे मुलांना प्रत्यक्षात विषयांचे आकलन होण्यास जास्त मदत होत असल्याचे अनेक पालक सांगत आहेत.
कोंबडीचा पिंजरा किती मोठा असावा याच्या भूमितीय ज्ञानापासून कोंबडीची वाढ होण्याचा जीवशास्त्रीय ज्ञानाचे सहज आकलन मुलांना होत असल्याचे समाधान पालकांना आहे.
एखाद्या संकटाच्या काळातही लोक आपल्याला व्यस्त ठेवण्यासाठी आणि तणावमुक्त करण्यासाठी कशाप्रकारे विविध प्रकारचे उद्योग करतात असतात याची जगभरात उदाहरण समोर येत असून एखाद्या कठीण काळातही मानव जातीच्या तगून राहण्याचा आत्मविश्वासाचे हे अमेरिकन कुक्कुटपालन प्रतीक बनले आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.