आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
डिसेंबर २०१९ मध्ये सुरु झालेल्या महामारीने तब्बल एक वर्ष भारतासह जगभरात थैमान घातलं. याच महामारीने लाखो लोकांचे जीव गेले, अगणित लोकांचे रोजगारही गेले. यानंतर काही महिन्यांच्या अंतराने कोव्हीड-१९ च्या लसी उपलब्ध झाल्या होत्या. कोव्हीड-१९ च्या महामारीदरम्यान आणि लसीकरण अभियानादरम्यान अनेक अफवांचं मोहोळ उठलं होतं. युनिसेफ, डब्लूएचओ आणि भारत सरकारच्या माहितीवर विश्वास ठेवण्याऐवजी बहुतांश लोकांनी ‘व्हाट्सऍप युनिव्हर्सिटी’वर विश्वास ठेवला, त्यामुळेसुद्धा अडचणींमध्ये वाढ झाली. आजमितीस काही प्रमाणात देश सावरताना दिसत आहे. पण कोव्हीड-१९च्या नवीन व्हेरियंटने डोकं वर काढल्याच्या बातम्या जगभरातून येत आहेत..
जगामध्ये सगळं पूर्ववत होत असताना दोन दिवसांपूर्वीच आफ्रिकेमध्ये कोव्हीड-१९चा नवीन व्हेरियंट आल्याच्या बातम्या येत आहेत. कोव्हीड-१९चा व्हेरियंट म्हणजे मूळ कोव्हीड-१९ व्हायरसचीच एक वेगळी आवृत्ती, फक्त ती आवृत्ती मूळ कोव्हीड-१९ व्हायरसपेक्षा जास्त सामर्थ्यवान असते. आजवर जगामध्ये कोव्हीड-१९चे अनेक व्हेरियंट्स आले आहेत. त्यापैकी कोव्हीड-१९चे काही व्हेरियंट्स म्हणजे अल्फा, बीटा, गॅमा, इप्सिलॉन, इटा, लोटा, कप्पा, मू, झेटा. आता आफ्रिकेत नव्याने आलेल्या व्हेरियंटचे नाव आहे ‘नू व्हेरियंट’.
काय आहे नवीन व्हेरियंट – ‘B.1.1.529’:
या नव्या व्हेरियंटमुळे जगामध्ये पुन्हा महामारीचे नवे संकट येईल अशी शक्यता निर्माण झाली आहे. नवीन व्हेरियंटबद्दल जी काही माहिती विश्वासार्ह माध्यमांमध्ये आहे, त्याच्याच मदतीने आपण आज आफ्रिकेतील ‘नू व्हेरियंट’चा आढावा घेणार आहोत. कोव्हीड-१९ च्या या नव्या व्हेरियंटचे वैज्ञानिक नाव आहे ‘B.1.1.529’. या व्हेरियंटमुळे मोठा धोका निर्माण होईल की नाही यावर अद्याप संशोधन सुरु आहे. पण या व्हेरियंटवर मोठ्या प्रमाणात ‘स्पाईक प्रोटीन म्युटेशन्स’ असल्याने या व्हेरियंटविषयी संशोधन सुरु झाले आहे.
‘B.1.1.529’ या व्हेरियंटचे एकूण ५० म्युटेशन्स आहेत. यातील ३० म्युटेशन्स स्पाईक प्रोटीन म्युटेशन्स आहेत. वापरात असलेल्या बहुतेक कोव्हीड-१९ प्रतिबंधक लसी स्पाइक प्रोटीनला लक्ष्य करतात. व्हायरस आपल्या शरीरातील पेशींमध्ये प्रवेश करण्यासाठी स्पाइक प्रोटीन वापरतो. त्यामुळे स्पाईक प्रोटिन्सचे जास्त म्युटेशन्स म्हणजे लसीच्या संरक्षणाला देखील धोका निर्माण होण्याची शक्यता.
नवीन व्हेरियंट जीवघेणा आहे का?:
कोव्हीड-१९ चा हा व्हेरियंट खरंच जीवघेणा आहे का या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचे काम ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’चे काही शास्त्रज्ञ करीत आहेत. तरीही B.1.1.529 या व्हेरियंटमध्ये पूर्वीच्या व्हेरियंट्समध्ये दिसून आलेल्या म्युटेशन्सपेक्षा बऱ्याच मोठ्या प्रमाणात म्युटेशन्स आढळून आले आहेत. म्युटेशन्समुळे मूळ व्हायरसवरच्या लसींवरील संशोधनात अडथळा आला होता.
कोव्हीड-१९ चा हा नवीन व्हेरियंट सर्वप्रथम दक्षिण आफ्रिकेत आढळला. लंडनस्थित यूसीएल जेनेटिक्स इन्स्टिट्यूटचे संचालक फ्रँकोइस बॅलॉक्स यांच्या मते, पहिला संसर्ग ‘एड्सचा उपचार न झालेल्या’ रुग्णाला झाला होता. दक्षिण आफ्रिकेमध्ये अधिकृतरीत्या ‘B.1.1.529’ या व्हेरियंटचे इन्फेक्शन झालेले सुमारे १०० रुग्ण आढळले आहेत.
दक्षिण आफ्रिकेच्या ‘नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर कम्युनिकेबल डिसीजेस’ने कोव्हीड-१९च्या संसर्गांमध्ये वाढ होत असल्याचं सांगितलं आहे. ‘नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर कम्युनिकेबल डिसीजेस’ने B.1.1.529 या नव्या व्हेरियंटला या वाढत्या संसर्गाचे कारण मानले नसले तरी अनेक वैज्ञानिकांच्या मते, हे नवे व्हेरियंटच मोठ्या प्रमाणातील संसर्गाला कारणीभूत आहे.
आंतरराष्ट्रीय प्रभाव:
दक्षिण आफ्रिकेव्यतिरिक्त, आतापर्यंत, या नवीन व्हेरियंटचे रुग्ण हाँगकाँग, बोत्सवाना आणि इस्रायलमध्ये याठिकाणी देखील आढळले आहेत. इस्रायलमध्ये नव्या व्हेरियंटचा पहिला रुग्ण सापडल्याची बातमी इस्रायलच्या आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी दिली. इंग्लंड, जर्मनी, इस्रायल, झेक रिपब्लिक आणि सिंगापूर या देशांनी अनेक आफ्रिकन देशांमधून विशेषतः दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या प्रवाशांवर अनेक निर्बंध लादले आहेत.
“युरोपियन युनियन दक्षिण आफ्रिकन प्रदेशातील देशांना उड्डाणे थांबवण्याचा प्रस्ताव देत आहे.” असे ट्विट शुक्रवारी युरोपियन कमिशनच्या प्रमुख उर्सुला वॉन डेर लेयन यांनी केले. तर झेक रिपब्लिकने दक्षिण आफ्रिकेतून येणारी सर्व फ्लाईट्स रद्द केल्या आहेत. इथे भारतात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तज्ज्ञांना नवीन व्हेरियंटविषयीची सर्व माहिती देण्यास सांगितली आहे, याशिवाय त्यांनी पंतप्रधानांना आंतरराष्ट्रीय फ्लाईट्सवर बंदी घालण्याचे आवाहन केले आहे.
आफ्रिकेतील परिस्थिती चिंतेची आहे कारण आफ्रिका खंडातील देशांमध्ये लसीकरणाचे प्रमाण कमी आहे. दक्षिण आफ्रिकेत तर केवळ ४३ टक्के प्रौढांना पूर्णपणे लसीकरण करण्यात आले आहे. यासर्व कारणांमुळे हा व्हेरियंट नक्कीच आफ्रिकेसह संपूर्ण जगासाठी चिंतेचं कारण बनलाय.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.