आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
मनुष्याने आपल्या बुद्धीच्या बळावर निसर्गातील अनेक गुपितांचा उलगडा केला आहे. मानवाने मेंदूच्या सामर्थ्याच्या बळावर केवळ पृथ्वीच नाहीतर संपूर्ण ब्रम्हांडाला आपल्या अधीन केले आहे. परंतु मानवाच्या स्वतःच्या संरचनेसमोर तो हतबल आहे. मानवाच्या शरीरात अनेक गूढ रहस्य दडले आहेत. आज त्या रहस्यांना समजून घेणे मानवाच्या आवाक्यात नाही.
अशाच काही रहस्यमय शारीरिक गुंतागुंतीसह ऍडम रेनरचा जन्म झाला आहे. ऍडम आपल्या जन्मापासून एक साधारण आयुष्य जगत होता पण आपल्या मृत्यूच्या वेळेपर्यंत विज्ञानासमोर अनेक अशी रहस्ये ठेवून गेला, ज्यांचा उलगडा आजपर्यंत करता आलेला नाही. ऍडमचा जन्म एक बुटका म्हणून झाला पण त्याच्या तारुण्यात त्याच्यात असे काही बदल घडले की त्याच्या मृत्यूच्या वेळी त्याचा आकार एखाद्या दैत्यासारखा झाला होता.
ऍडम रेनरचा जन्म १८९९ साली ऑस्ट्रियाच्या ग्राज या शहरात झाला होता. त्याच्या वडिलांची उंची एखाद्या सामान्य माणसाइतकीच होती. ऍडमच्या भावाची उंची देखील त्याच्या वडिलांप्रमाणे ५ फूट ८ इंच इतकीच होती. ऍडम मात्र त्याच्या बरोबरीच्या मुलांच्या तुलनेत धीम्या गतीने वाढत होता.
वयाच्या १८ वर्षी ऍडमच्या मनात देशप्रेमाची भावना जागृत झाली. त्याला पहिल्या महायुद्धात सैन्यात जाऊन देशाची सेवा करायची होती, पण त्याला सैन्यात घेण्यात आले नाही. ऍडमने हार मानली नाही, पुन्हा प्रयत्न केला पण शारीरिक चाचणीच्या वेळी त्यांच्या कमी उंचीमुळे त्यांना सैन्यात नोकरीची संधी मिळाली नाही. त्यांचं वय त्यावेळी १८ वर्ष होतं आणि उंची १२२ सेंटी मीटर इतकीच होती.
सैन्याचं म्हणणं होतं की ऍडमची उंची आणि शारीरिक शक्ती ही सामान्य व्यक्तीपेक्षा कमी आहे. वयाच्या १९व्या वर्षी फक्त ४ फूट ८ इंच इतकी उंची असल्यामुळे ऍडम बुटक्या लोकांमध्ये गणला जाऊ लागला होता. यानंतर ऍडमने देखील सैन्यात भरती होण्याचा अट्टहास सोडला.
एखाद्या सामान्य मनुष्याप्रमाणे आयुष्य जगण्याची इच्छा असलेल्या ऍडमला माहिती देखील नव्हते की त्याच्या आयुष्यात एक विचित्र घटनांचे वादळ येणार आहे. ज्याने त्याचे आयुष्यच पालटणार आहे.
याची सुरुवात ऍडम २१ वर्षांचा होता त्यावेळी झाली. अचानक ऍडमच्या पायांचा आकार वाढायला लागला. ऍडमची उंची कमी असली तरी ऍडमच्या पायांचा आकार एखाद्या सामान्य माणसाच्या पायाच्या आकारापेक्षा दुप्पट झाला होता. १८ वर्षांच्या वयापर्यंत ऍडमच्या चप्पलचा नंबर १० होता, २१व्या वर्षी तो वाढून चक्क २० झाला. त्याकाळी २० नंबरचा बूट घालणं निश्चितच लोकांना आश्चर्यचकित करत होतं.
छोटंसं शरीर आणि मोठे पाय यामुळे ऍडम लोकांच्या आकर्षणाचे केंद्र बनला होता. त्याचा आकार असाच वाढत चालला होता, फक्त त्याचे पाय नाहीतर त्याचे संपूर्ण शरीर देखील वाढण्यास सुरुवात झाली होती. आधी ऍडमला त्याच्या शरीरात घडणाऱ्या बदलांचे कौतुक वाट होते.
लहानपणापासून एक बुटका म्हणून लोकांची टिंगल सहन करणाऱ्या ऍडमला वाढती उंची आनंद देत होती, पण त्याचा हा आनंद फार काळ टिकला नाही. वयाच्या १८ व्या वर्षी ४ फूट ८ इंच उंचीचा असलेला ऍडम वयाच्या ३२ व्या वर्षी ७ फूट २ इंच उंच झाला होता.
ऍडमला एखाद्या दैत्याचा आकार मिळाला होता. त्याच्या शरीरात घडत असलेल्या बदलांमुळे सामान्य लोकच नाहीतर डॉक्टर देखील हैराण होते. डॉक्टरांनी त्याच्या पाठीच्या कण्याला त्याच्यात घडणाऱ्या शारीरिक बदलांसाठी कारणीभूत मानले होते.
वय आणि आकार वाढत गेल्यामुळे ऍडमला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्याच्या पचनक्रियेवर याचा परिणाम झाल्यामुळे जेवायला सुद्धा ऍडमला अनेक अडचणी येत होत्या. त्याला अनेक अंतर्गत समस्यांना सामोरे जावे लागत होते. खाण्यापिण्याच्या अडचणीनंतर ऍडमला आंधळेपणाच्या समस्येने घेरले.
हळूहळू त्याची दृष्टी कमी होऊ लागली. त्याच्या ऐकण्याचा क्षमतेवर देखील याचा परिणाम झाल्यामुळे तो बहिरा झाला होता.
ऍडमच्या वाढत्या समस्या बघून त्याच्या घरातले लोक देखील दुःखी होते. त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर एफ विंडहोल्ज यांची देखील अशीच काहीशी परिस्थिती होती. ऍडमची संपूर्ण शारीरिक चाचणी करण्यात आली आणि त्यात निष्पन्न झाले की ऍडमची त्याच्या हायपोथॅलेमसमधील ट्युमर त्याचा आकाराच्या वाढीसाठी कारणीभूत आहे. याचाच त्याच्या ऐकण्याच्या आणि बघण्याच्या परिणाम होतो आहे.
समस्येची माहिती मिळाल्यानंतर १९३० साली डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून ट्युमरला काढले. शस्त्रक्रिया केल्यानंतर देखील ऍडम यांच्या पाठीच्या कण्याची लांबी वाढतच चालली होती. हे आता चिंतेचे कारण बनत चालले होते. शस्त्रक्रिया केल्यानंतर पुढील १९ वर्षे ऍडम यांच्या उंचीत वाढ होतच राहिली. हा खरंतर एक चिंतेचा विषय बनला होता. डॉक्टर इच्छा असूनदेखील त्याच्या शरीराची वाढ थांबवण्यास असमर्थ होते.
वयाच्या २१ व्या वर्षापर्यंत एक बुटका म्हणून ज्याने लोकांचे टोमणे ऐकले त्या ऍडम रेनरचे ४ मार्च १९५० ला वयाच्या ५१ व्या वर्षी निधन झाले. मृत्युच्या वेळी त्याची उंची ७ फूट ८ इंच होती. कोणी विचार ही केला नव्हता की ऍडम यांच्या आयुष्यात असे परिवर्तन घडून येईल.
एक बुटका म्हणून जन्माला आलेले पण सर्वात उंच मनुष्य म्हणून मृत्युमुखी पडलेला ऍडम सध्याच्या काळातील एकमेव मनुष्य होता. त्याची उंची आजही विज्ञानासाठी आश्चर्य आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.