आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
जगात एक असे जेल आहे जिथे कैद्यांना एखाद्या सप्ततारांकित हॉटेलप्रमाणे सुविधा प्रदान करण्यात येतात. क्युबा या छोट्याशा देशात ग्वांतानमो बे हे जगातील सर्वात “पॉश तुरुंग” म्हणून ओळखले जाते. याठिकाणी एका कैद्यावर वर्षाकाठी १३ मिलियन डॉलर म्हणजेच ९८ कोटी रुपये इतका खर्च करण्यात येतो. याठिकाणी ४५ अमेरिकन सैनिक पहारा देतात.
असं काय विशेष आहे या जेलमध्ये?
दुसऱ्या महायुद्धानंतर एक जर्मन कैदी रुडॉल्फ हॅस याला जेलमध्ये ठेवण्यात आले होते. त्याच्यावर वर्षाकाठी १५ लाख रुपये खर्च करण्यात येत होते. अमेरिकेच्या काही खुंखार कैद्यांना कोलोरॅडोच्या एका जेलमध्ये ठेवण्यात आले आहे, यावर ७८,००० डॉलर इतका खर्च प्रास्तवित करण्यात आला आहे. परंतु हा संपूर्ण खर्च ग्वांतानमो बे जेलच्या खर्चासमोर फिका आहे.
न्यूयॉर्क टाइम्सच्या रिपोर्टनुसार जगातील सर्वात खतरनाक आणि “मास्टर माईंड” कैद्यांना या जेलमध्ये डांबण्यात आले आहे. या सगळ्यांना सांभाळण्यासाठी आणि जिवंत ठेवण्यासाठी ५४० दशलक्ष डॉलर्स खर्च करण्यात येतात.
ग्वांतानमो खाडीच्या तटावर असलेल्या या तुरुंगात सध्या ४० कैदी आहेत. यांच्याभोवती १८०० सुरक्षा रक्षक आहेत. एका कैद्यावर नजर ठेवायला इथे ४५ लोक आहेत. याव्यतिरिक्त इतर कामांसाठी इथे वेगळा स्टाफ नेमण्यात आला आहे.
हे जेल तीन इमारतीमध्ये विभागण्यात आली आहे. इथे दोन गुप्त हेडक्वार्टर आहेत. इथे तीन दवाखाने आहेत. या इमारतीभोवती इतके कडक सुरक्षा कवच आहे की आता काय आहे, याचा साधा अंदाजही कोणी लावू शकत नाही.
या जेलमध्ये कोर्ट आणि पॅरोल बोर्ड रूम आहे. दोन वेगवेगळे कंपाउंड आहेत. जिथे कैदी आपल्या वकिलाची भेट घेऊ शकतात. इथे जेल स्टाफ आणि कैद्यांसाठी हॉटेलसारख्या सोयीसुविधा आहेत. इथे कैद्यांसाठी चर्च, जिम, प्ले स्टेशन आणि सिनेमा हॉलची व्यवस्था आहे. याशिवाय कैद्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेण्यासाठी मानसोपचारतज्ज्ञ देखील आहे. इतकंच नाही तर, एखादा कैदी जर कुत्रा अथवा मांजराची मागणी करतो, तर त्याला ते उपलब्ध करून दिले जातात.
क्युबामधील हे जेल एकेकाळी अमेरिकन नेव्हीचा बेस होते. पण २००२मध्ये जॉर्ज डब्लू बुश यांनी इथे कंपाउंड उभारले व आतंकवाद्यांना जेरबंद करण्याची व्यवस्था केली. यानंतर बराक ओबामांनी हे जेल बंद करण्याची तयारी सुरू केली होती, पण त्यात त्यांना यश मिळाले नाही.
२०१८मध्ये ट्रम्प सरकारने हे जेल कायम ठेवण्यासाठी एक्झिक्युटिव्ह ऑर्डर्सवर हस्ताक्षर केले. याठिकाणी राहणारे बहुतांश कैदी आतंकवादी आहेत. दुसऱ्या कैद्यांसोबत यांना ठेवणे धोकादायक ठरले असते म्हणून त्यांना या जेलमध्ये डांबले गेले होते.
जेलमधील कैद्यांचा सुरक्षेसाठी जो खर्च करण्यात येतो यावर सतत लोक टीका करत असतात. एका माजी अमेरिकन नौदल अधिकाऱ्याने या जेलची थट्टा उडवत याला अमेरिकेचे बुटीक प्रिझन म्हटले होते. हा फक्त म्हाताऱ्या जिहाद्यांसाठी बांधलेला आश्रम आहे, असे देखील अनेकांनी म्हटले आहे. अनेक लोक हे जेल बंद करण्यासाठी आंदोलन करत असून कैद्यांना सर्वसाधारण कारागृहात ठेवण्यात यावे अशी मागणी करत आहेत.
जगातील सर्वात महागडे डिटेन्शन सेंटर असले तरी इथे सतत कैद्यांना टॉर्चर करण्यात येते. याची कुठलीच बातमी बाह्य जगताला कळत नसते.
न्यूयॉर्क टाइम्स या वृत्तपत्राने इंटरनॅशनल रेड क्रॉस कमिटीच्या हवाल्याने ही माहिती शोधून काढली आहे. रेडक्रॉसने आपल्या इन्स्पेक्शन रिपोर्टमध्ये इथे कैद्यांना मारहाण न करताच भयानक टॉर्चर केले जाते असे नमूद केले आहे.
इथे कैद्यांना जेलमध्ये डांबले जाते, त्यांना कित्येक दिवस अंधाऱ्या कोठडीत डांबून ठेवण्यात येते. त्यांना चिटपाखराचा आवाज येणार नाही, अशी व्यवस्था या जेलमध्ये आहे. काही वेळा कैद्यांना दीर्घकाळ उभे राहण्याची नाहीतर बसण्याची शिक्षा करण्यात येते. शरीराचे वजन मांसपेशीवर पडून कैद्याला बेजार करण्यात येते. अत्यंत कठोरपणे कैद्याला मारहाण केल्यामुळे त्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो.
हे तुरुंग लांबून स्वर्गासारखे भासत असले तरी तिथे जीवन जगणे हे नरकाइतके भयंकर आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.