आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
श्रीमंत कोणाला व्हायचे नाही? ज्यांच्याकडे पैसे नाहीत, त्यांना पैसे कमवायचे आहेत. ज्यांच्याकडे पैसे आहेत, त्यांना अजून पैसे कमवायचे आहेत. आपल्या मानवी इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण दुसऱ्यांकडे बघत असतो. आपल्याला करोडपती बनायचे असेल तर आपण श्रीमंत लोकांचे उदाहरण घेतो.
टाटा-अंबानींसारख्याच लोकांपैकी एक आहेत वॉरेन बफे! जगातील गर्भश्रीमंत व्यक्तींच्या यादीत पहिल्या दहामध्ये येणारे वॉरेन बफे. आपल्या धनदौलतीचा फार कमी खर्च करतात. आपल्या वयाची नव्वदी पार करूनही वॉरेन लोकांना श्रीमंत कसे व्हायचे याचे सल्ले देतात.
३० ऑगस्ट १९३० रोजी नेब्रास्काच्या ओमाहा इथे जन्मलेले वॉरेन बफे आज एक प्रसिद्ध गुंतवणूकदार आहेत. त्यांचा स्वतःचा मोठा व्यवसाय देखील असून ते समाजसेवेचे कार्य देखील करत असतात. गुंतवणुकीच्या बाबतीत त्यांचे सल्ले जाणून घेण्यासाठी जगभरातील लोक इच्छुक असतात. वयाच्या अकराव्या वर्षी जेव्हा बाकी मुलं खेळण्यात व्यस्त असतात तेव्हा वॉरेन बफेट यांनी आपल्या आयुष्यातील पहिला शेयर खरेदी केला होता. याच वयात ते एका किराणामालाच्या दुकानात काम करायचे. ते काम पारिवारिक गरज म्हणून नाहीतर गुंतवणुक करण्यासाठी कमवत होते. लहान वयातच त्यांनी मोठी कमाई करण्यास सुरुवात केली.
वयाच्या तेराव्या वर्षी त्यांनी पहिल्यांदा टॅक्स भरला होता. त्यांचे वडील छोटे ब्रोकर होते. त्यांचा बहुतांश वेळ हा लोक कसे पैसे लावतात आणि मालामाल होतात, हे बघण्यातच जात असे. वॉरेन बफे यांच्या रक्तातच बिझनेस होता असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
वॉरेन ज्यावेळी हायस्कुलमध्ये शिक्षण घेत होते, त्यावेळी त्यांनी वॉशिंग्टन पोस्ट हे पत्रक वाटायला सुरुवात केली होती. हे त्यांच्यासाठी एक चांगले काम होते, यातून त्यांची चांगली कमाई होत होती. ज्यावेळी बहुतांश ऑफिस बंद असायचे त्यावेळी वॉरेन बफे सकाळी सकाळीच कमाई करायला सुरुवात करायचे. काही काळाने वॉरेन बफे यांनी या वृत्तपत्राचे शेयर विकत घेतले आणि याच वृत्तपत्राचे शेयर होल्डर बनले.
त्यांनी अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या नोकऱ्या केल्या, यातून मिळणारा पैसा त्यांनी बॉल मशीन खरेदीसाठी लावला होता. ही मशीन त्यांनी स्थानिक व्यापारासाठी वापरली आणि यातून त्यांनी चांगलीच कमाई केली. पैसे कमावण्याच्या मागे लागून वॉरेन बफे यांनी आपल्या शिक्षणाकडे दुर्लक्ष केले. त्यांच्या वडिलांनी त्यांना जबरदस्ती कॉलेजात पाठवल्यानंतर त्यांनी नेब्रास्का युनिव्हर्सिटीतून पदवी मिळवली.
वॉरेन बफे यांना हार्वर्ड बिझनेस स्कुलने दाखला देण्यास मनाई केली. यानंतर त्यांनी कोलंबिया विद्यापीठातून अर्थशास्त्रात मास्टर्सची डिग्री पूर्ण केली. कोलंबिया विद्यापीठात त्यांनी मूल्य निवेशाच्या सिद्धांताचे शिक्षण घेतले.
मास्टर्स पूर्ण झाल्यानंतर बफे यांना वॉल स्ट्रीटवर काम करण्याची इच्छा होती. पण त्यांनी स्टॉक ब्रोकर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. याबरोबरच त्यांनी स्टॉक ब्रोकिंगमध्ये आपला व्यवसाय पुढे नेण्याचा प्रयत्न केला.
वयाच्या ३१व्या वर्षी वॉरेन बफे कोट्याधीश बनले. १९५९ पासून त्यांनी कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली.
विंडमिल तयार करणाऱ्या एका कंपनीत त्यांनी १० लाख यूएस डॉलर्सची गुंतवणूक त्यांनी केली. यानंतर बॉटल तयार करणाऱ्या कंपनीत त्यांनी गुंतवणूक केली. वॉरेन यांची सात फर्म्समध्ये ९.५ टक्के हिस्सेदारी होती. यानंतर त्यांनी या सर्व फर्म्सचे एक युनिट स्थापन केले. बफेट यानंतर अशा कंपन्यांच्या मागे लागले ज्यातून त्यांना चांगला पैसे मिळण्याची अपेक्षा होती.
१९६२ साली त्यांनी न्यू इंग्लंडच्या बर्कशायर हॅथवे कंपनीत गुंतवणूक केली. त्या कंपनीचे त्यांनी काही शेयर्स खरेदी केले. पुढे या कंपनीच्या मंडळाबरोबर बफे यांचे वाद झाले आणि त्यांनी ही कंपनी विकत घेण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आपले शेअर्स वाढवून बर्कशायर हॅथवे १९६५ मध्ये खरेदी केली. आज या कंपनीचे वॉरेन बफेट सीईओ आहेत. आज या ग्रुपच्या अखत्यारीत ६०हुन अधिक कंपन्या आहेत. यात गिको, ड्युरोसेल यांचा देखील समावेश आहे. त्यांनी मोठमोठ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली, ज्यात अमेरिकन एक्स्प्रेस देखील होती, या कंपनीचे शेअर्स दोन वर्षात डबल झाले होते.
वॉरेन बफे म्हणतात की, “गुंतवणूक करण्याअगोदर आपल्याला आपण कुठे गुंतवणूक करतो आहे, याची जाणीव असली पाहिजे, आपल्याकडे योजना आणि लक्ष्य तयार असले पाहिजे.”
धैर्य ही सर्वात मोठी गोष्ट आहे, जी प्रत्येक गुंतवणूकदाराकडे असायलाच हवी. वॉरेन म्हणतात की प्रत्येकाने आपल्या गरजेनुसार रकमेचे वाटप करून गुंतवणूक करायला हवी. अशाच ठिकाणी पैसे गुंतवले पहिजे ज्याठिकाणी उत्तम वाढ होईल आणि कमी नुकसान सोसावे लागेल. मार्केटमध्ये पैसे लावण्यासाठी उत्पन्नाचे स्रोत उत्तम असावे असं बफेट म्हणतात.
कधीच पैसे मिळवण्याचा एका स्रोतावर अवलंबून राहू नका, आपल्याकडे उत्पन्न कमी होणार नाही, याची काळजी घ्या. वॉरेन म्हणतात की स्टॉकच्या मुल्याला त्याच्या किंमतीपेक्षा जास्त महत्व असते. बऱ्याचदा महागडा स्टॉक तुम्हाला चांगले रिटर्न्स देऊ शकतो. पण गुंतवणूक करण्याअगोदर दोनवेळा नक्की विचार करा.
बफे यांनी आपली ९९ टक्के संपत्ती दान केली आहे. त्यांनी आपल्या संपत्तीतून तब्बल ३२ अब्ज यूएस डॉलर्स इतकी रक्कम गेट्स फाऊंडेशनला दान केली आहे. बिल गेट्स बफे यांचे फार चांगले मित्र आहेत. २०१० मध्ये दोघांनी गिव्हिंग प्लेज या कार्यक्रमाची सुरुवात केली होती. त्यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजकार्यासाठी आपली संपत्ती दान केली होती.
वॉरेन बफे आजदेखील त्याच घरात राहतात जे त्यांनी साठ वर्षांपूर्वी खरेदी केले होते. आज वॉरेन बफे यांच्याकडे ना कुठले विमान आहे ना कुठली महागडी कार. ते आपले आयुष्य साधेपणाने जगतात आणि अजूनही पैसा पैसा जोडून गुंतवणूक करतात. वयाच्या ११ व्या वर्षापासून गुंतवणूक करणाऱ्या बफे यांनी आज अमाप दौलत कमावली आहे.
वॉरेन बफे हे श्रीमंती आणि साधेपणाचे उत्तम उदाहरण आहे..!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.










