आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
लेखक – वैभव पाटील
ओशो हे नाव जगात प्रत्येकाला माहीत आहे. गेल्या काही वर्षांपासून समाज माध्यमांमुळे जगभरातील अनेक व्यक्तिमत्त्वांबद्दल अनेक गोष्टी बाहेर आल्या, ज्यांच्यामुळे त्यांच्याबद्दल जगाने करून ठेवलेले समज दूर झाले. निकोल टेस्ला नावाचा काळाच्या पडद्याआड गडप झालेला असामान्य प्रतिभेचा शास्त्रज्ञ आज एवढ्या वर्षानंतर तरुणांना त्याच्या प्रतिभेबद्दल अवाक करत आहे. कारण या शास्त्रज्ञाने करून ठेवलेले प्रचंड संशोधन समाज माध्यमांमुळे पुन्हा लोकांपुढे येण्यास मदत झाली. ओशो यांच्याबद्दल देखील काहीसे असेच म्हणता येऊ शकते.
19 जानेवारी 1990 रोजी ओशोंनी जगाचा निरोप घेतला. या घटनेला आता 30 वर्ष उलटून गेली आहेत. ओशोंच्या मृत्यूनंतर त्यांची पुस्तके, ऑडिओ, विडिओ कॅसेट्सच्या माध्यमातून त्यांचा चाहता वर्ग त्यांना जिवंत ठेऊ पाहत होता. पण समाज माध्यमे आल्यावर ओशोंचे भाषणे, यु ट्युब आणि इतर माध्यमांतून सर्वांसमोर आली. तारुण्यात प्रवेश करू पाहणाऱ्या अनेकांना जेव्हा ओशो कानावरून जाऊ लागले तेव्हा आधी ठरवून बसलेल्या विचारांना दनादन हादरे बसायला लागले. आजवर समज करून घेतलेले ओशो आणि वास्तवातले ओशो यात जमीन अस्मानाचा फरक आहे हे तरुणांना कळून चुकत आहे. म्हणूनच आजही यु ट्युबवर ओशोंच्या व्याख्यानांच्या व्हिडिओजला लाखोंच्या संख्येने व्युज असतात.
ओशो आजवरचे कदाचित सर्वात वादग्रस्त आध्यात्मिक गुरू असतील. ओशोंच्या आयुष्यात आलेली अनेक वादळे हे सहसा कोणत्याही अध्यात्मिक गुरूच्या आयुष्यात येत नाहीत. विदेशात कामाचा प्रसार करायला गेलेल्या अनेक योगगुरुंच्या आयुष्यात प्रचंड वादळे आली. बिक्रम चौधरी, महेश योगी ही काही तशी नावे सांगता येतील. पण जे ओशोंच्या वाट्याला आले, त्याची तुलना कुणाशीही करता येऊ शकत नाही. यात एक गोष्ट अशी देखील सांगितले जाते की, भारतीय योगगुरू प्रबळ होऊ नयेत म्हणून अमेरिकन एजेंस्या जाणीवपूर्वक षडयंत्र करून या योगगुरूंना बदनाम करत असतात, यातले तथ्य किती माहीत नाही पण ओशोंच्या आयुष्यात मात्र प्रचंड उलथापालथ झाली.
11 डिसेंबर 1931 रोजी मध्य प्रदेशातील कुचवाडा येथे ओशोंचा जन्म झाला होता. त्यांचे खरे नाव हे चंद्रमोहन जैन असे होते. सुरुवातीचे शिक्षण जबलपूरला पूर्ण करून जबलपूर विद्यापीठातच त्यांनी अध्यापनास सुरुवात केली. तत्वज्ञानाचे प्राध्यापक असलेले ओशो अनेक गुंतागुंतीच्या विषयांवर रसाळ शब्दात भाष्य करत असत. आपले म्हणणे अधिक लोकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी त्यांनी नोकरी सोडून व्याख्याने द्यायला सुरुवात केली. विचारांमधले वेगळेपण, तीक्ष्ण तर्क आणि ओघवते वक्तृत्व यामुळे ओशो प्रसिद्ध व्हायला लागले. त्याकाळी त्यांचे वास्तव्य मुंबईत होते. त्यांचे बोलणे ऐकून इतर अनेक आध्यत्मिक गुरू नाराज झाले. यात पुरीचे शंकराचार्य देखील होते. तर मुरारी बापूंसारखे गुरू मात्र ओशोंचे गुणगान गाताना थकत नाहीत. असे प्रेम आणि द्वेष वाट्याला आलेले ओशो मात्र एकमेव असावेत. ओशोंवरील नाराजी आजही अनेकांना आहे.
ओशोंचे विचार नाकारणारे आणि ओशोंना प्रमाण मानून जगणारे दोन्ही प्रकारचे लोक समाजात मुबलक प्रमाणात दिसून येतात. कदाचित ओशो स्वतःबद्दल काय सांगून गेले आहेत, हे त्यांनी पुरेसे ऐकले नसावे. ओशोंची लोकप्रियता चढत्या क्रमाने वाढत होती. आधी त्यांनी मुंबई सोडून पुण्याला जाण्याचा निर्णय घेतला. नंतर पुण्याहून थेट अमेरिका गाठले. मुंबई, पुणे, अमेरिका ते परत पुणे असा त्यांचा प्रवास हा ओशोंच्या आयुष्यात अनेक चढउतारांचा असला तरी या काळात ते मधले काही वर्ष सोडले तर सातत्याने बोलत राहिले. ओशोंनी स्वतःची अशी ध्यानधारणेची पद्धत विकसित केली होती. ओशो जिथे गेले तेथील स्थानिक प्रशासन तसेच इतर घटकांनी त्यांना विरोध करायला सुरूवात केली. पुण्यात असताना तर त्यांच्यावर हल्ला देखील झाला होता. अमेरिकेतील ओरेगॉन येथे अवघ्या काही महिन्यांमध्ये त्यांनी रजनिशपूरम नावाचे शहर वसवले होते. खुद्द अमेरिका सांगू लागली की ओशो आमच्या संस्कृतीला बिघडवण्याचे काम करत आहेत.
नेटफ्लिक्सवर २०१९ यावर्षी ओशोंच्या आयुष्यावर आधारित प्रत्यक्ष फुटेजच्या आधारावर प्रदर्शित झालेली वाइल्ड वाइल्ड कंट्री हि सिरीज बऱ्याच मुद्द्यांना समोर घेऊन आली. अमेरिकेचा भारतीयांबदल असलेला पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन देखील या निमित्ताने समोर आला. त्या सिरीजवर मोठमोठ्या सेलेब्स आयकॉन्सने आश्चर्यकारक प्रतिक्रिया दिल्या तेव्हा ओशो नावाचा अवलिया तत्वज्ञ अनेकांच्या निदर्शनास आला. ओशो नावाचा अर्थ म्हणजे समुद्र.
ओशोचे तत्वज्ञान अगदी त्यांच्या नावाला साजेसे असे होते. त्यांनी त्यांच्या अध्यात्मिक आयुष्यात सर्व प्राचीन ते आधुनिक भारतीय, चिनी, अरबी तत्वज्ञानाची सांगड घालण्याचा प्रयत्न केला, कारण त्यांच्यामते सत्य हे जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात सारखेच आहे पण ज्या त्या देशातील व कालखंडातील प्रभाव ह्यामुळे ते सत्य सांगायची पद्धत मात्र फक्त बदलते पण सत्य मात्र सनातन व कधीही न बदलणारे असे आहे. हेच त्यांचे तत्वज्ञान होते. त्यांनी अध्यात्म हे वैज्ञानिक व सायकोलॉजिकल आणि बायोलॉजिकल पद्धतीने समजावण्याची नवीच पद्धत विकसित केली असे म्हणावे लागेल. त्यांनी अध्यात्माला मानसशास्त्रीय दृष्टीने उलगडण्यासाठी freud आणि हक्सले यांच्या पद्धती आणि शिकवणीचा फायदा अध्यात्म समजावून देण्यासाठी केला.
ओशोंचे नन्तरचे पूर्ण आयुष्यच हे धोका पत्करण्याची हिम्मत दाखवण्यात गेलं. त्यांनी जगातील बहुमूल्य तत्वज्ञान जणू खाणीतून सोने काढावे असे शोधून काढून त्याला सद्यकालीन पद्धतीने समजावले. लाओ त्झु, गुर्डजीएफ सारख्या तत्वज्ञांशी भारताची ओळख घडवून देण्याचे श्रेय ओशोंनाच जाते. महात्मा गांधीच्या ‘साधी राहणी उच्च विचार’ या तत्वाचा उपहास करत त्यांनी म्हटले होते की ‘गांधींचे गरिब राहणीमान हे खूप महागडे होते’.
ओशोंनी श्रीकृष्ण, गीता, भगवान बुद्ध, महावीर सर्वांवर अगदी विस्तृत प्रवचने दिली पण त्यांचे तत्वज्ञान हे भारतीयतेच्या सीमेतच गुंडाळले जाऊन लुप्त होण्याच्या भीतीने त्यांना अमेरिकेकडे ओढले असे म्हणता येते. त्यांच्या आयुष्यातील अतिशय खडतर व अमानुष असे प्रसंग त्या कालखंडात त्यांच्यावर ओढवले. त्यांचा आश्रम हा अगदी विस्तृत जागेत पसरलेला होता त्यांचे पूर्ण नियोजन हे तेथूनच व्हायला सुरुवात झाली त्यांनी त्या जागेला रजनिशपूरम हे ओशोच्या खऱ्या नावावरून नाव दिले. तेथे त्यांच्या आश्रमात डॉक्टर इंजिनीअर व कन्स्ट्रक्शन प्लॅनर सर्वच व्यवसायातील लोकांनी संन्यास घेतलेला असल्याने त्यांना कोणतीही मदत बाहेरून घ्यावी लागत नव्हती.
रजनीशपुरममध्ये घडलेल्या घडामोडींमुळे ओशोंना जेलमध्ये टाकण्यात आले. त्यांच्यावर जगातील 21 देशांनी प्रतिबंध घातले होते. एवढे होऊन देखील त्यांची विचार मांडण्याची पद्धत बदलली नव्हती. 1985 साली ते परत पुण्याला येऊन नव्याने सुरुवात करायचे त्यांनी ठरवले. 5 वर्ष ओशो सातत्याने बोलत होते. त्यांची तब्येत मात्र ढासळत जाऊन 19 जानेवारी 1990 साली त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूबद्दल देखील अनेक तर्कवितर्क लावण्यात येतात. अमेरिकेत जेलमध्ये असताना त्यांना तिथे थेलीयम नावाचे स्लो पॉइजन दिले गेले असे म्हटले जाते. तर ओशोंची प्रचंड संपत्ती ताब्यात यावी यासाठी त्यांच्याच आश्रमातील काहीनी त्यांना संपवले असे देखील बोलले जाते. ओशोंच्या मृत्युवर अनेक लेख आणि पुस्तके लिहिली गेली आहेत. आयुष्यभर रहस्य वाटणाऱ्या ओशोंचा मृत्यूदेखील रहस्यमयीच झाला असेच म्हणावे लागेल. आपल्या मृत्यूचा उत्सव मनविण्यात यावा असे स्वतः ओशोंनी सांगून ठेवले होते.
ओशोंचे वेगळेपण हे प्रत्येक गोष्टीत उठून दिसते. ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्ष जातील, एवढे विस्तृतपणे त्यांनी आयुष्यभर भाष्य केले आहे. असे सांगितले जाते की ओशो बोलायला लागले की कित्येक तास फक्त बोलत असत. ओशोंनी हात घातलेला नाही, असा जगातील कचितच एखादा विषय असेल. पण ओशोंना मात्र कित्येकांनी सेक्स या एकमेव गोष्टीत बंदिस्त करून ठेवले आहे. ओशोंचे सेक्सवरील विचार देखील जसे समाजापुढे आणले जातात मुळात तसे नव्हते.
सेक्स, रोल्स रॉयस कार्स, डिझायनर कपडे, आलिशान राहणीमान याभोवतीच ओशोंबद्दल चर्चा फिरत असते. पण ओशो व्यवस्थित समजून घेतलेला माणूस कधीच या गोष्टीत अडकून पडणार नाही. ओशोंचे आर्थिक विचार ऐकले तर ते पक्के भांडवलशाही विचारांचे समर्थक होते असे देखील वाटू शकते एवढे ते मुक्त विचारांचे होते. ओशोंनी केलेली अनेकांची चिकित्सा ही विचारात पाडणारी तसेच वर्षानुवर्षे धरून ठेवलेल्या धारणांना जबरदस्त धक्के देणारी होती. खरंतर ओशोंच्या विचारांची चर्चा करायला ही जागा पूरेशी नाही.
एवढे मात्र खरे की हा माणूस आपल्या उण्यापुऱ्या साठ वर्षांच्या आयुष्यात भारत आणि जगातील अनेक प्रस्थापित समजांना आयुष्यभर दणके देत राहिला. ज्यामुळे ओशो कधीही उचलून ऐकले तरी जुने वाटणार नाहीत, ते नेहमीच कालसुसंगत वाटू शकतील.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.