आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
१९५९ साली भारतीय सैन्यात कुत्र्यांचा समावेश करण्यात आला. तेव्हापासून आतापर्यंत अनेक प्रजातींच्या कुत्र्यांनी भारतीय सैन्यात मोलाची कामगिरी बजावली आहे. कुत्र्यांची खरी मदत लपवलेल्या विस्फोटक पदार्थांचा शोध घेण्यासाठी होते. इतकेच नाहीतर संदिग्ध व्यक्तींचा शोध घेऊन त्यांची शिकार देखील हे कुत्रे करतात. अर्थात, यासाठी या कुत्र्यांना अत्यंत कडक ट्रेनिंग देण्यात येते.
आज असे बरेच प्रशिक्षित कुत्रे भारताच्या विविध भागात तैनात आहेत. काही कुत्रे अनेक महत्वपूर्ण लोकांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहे. या कुत्र्यांना देखील सैनिकांप्रमाणे वीरता पुरस्काराने गौरविण्यात येते.
आज आपण भारतीय सैन्यात कार्यरत असलेल्या कुत्र्यांच्या प्रजातीविषयी जाणून घेऊया…
लॅब्राडोर
लॅब्राडोर प्रजातीचे कुत्रे हे माणसाळले असतात. ते घर-परिवाराशी व्यवस्थितपणे जुळवून घेतात. त्यांच्या याच प्रवृत्तीमुळे त्यांचा सैन्यदलात वापर करण्यात येतो. ते फार प्रामाणिक असतात. लॅब्राडोर प्रजातीच्या कुत्र्यांची हुंगण्याची क्षमता देखील इतर प्रजातींच्या कुत्र्यांपेक्षा जास्ती असते.
व्हिएतनाम युद्धाच्या वेळी अमेरिकन सैन्याने या प्रजातीच्या चार हजार कुत्र्यांची मदत घेतली होती.
लॅब्राडोर कुत्र्यांनी अमेरिकन सैन्याला पाण्याखाली लपलेल्या शत्रूला शोधण्यास मदत केली होती. भारतीय सैन्याच्या अँटी मिलीटंट अभियानात या प्रजातीच्या कुत्र्यांनी भारतीय सैन्याला मोठी मदत केली आहे. आतंकवादी आणि सैन्याच्या झडपीत जर एखादा आतंकवादी पळून जाण्यास यशस्वी ठरला तर त्याचा शोध घेण्यास लॅब्राडोर प्रजातीच्या कुत्र्यांनी भारतीय सैन्याला मदत केली आहे.
जर्मन शेफर्ड
फार पूर्वीपासूनच सैन्यात जर्मन शेफर्ड कुत्र्यांना शामिल करण्यात आले आहे. पहिल्या महायुद्धावेळी या कुत्र्यांच्या प्रजातीने जर्मन सैन्याला मोठी मदत केली होती. हे कुत्रे शारीरिकदृष्ट्या तंदरुस्त असतात. चपळपणा हा या कुत्र्यांचा एक महत्वाचा गुण आहे. लहान हत्यारांना इकडून तिकडे नेण्यासाठी या कुत्र्यांचा वापर करण्यात येतो. संदेशवाहक म्हणून देखील या कुत्र्यांचा वापर करण्यात येतो.
जखमी सैनिकांच्या उपचारासाठी आवश्यक वैद्यकीय साहित्याची देवाणघेवाण करण्यासाठी देखील या कुत्र्यांचा वापर करण्यात येतो. जर्मन सैन्याला या कुत्र्यांचा युद्धाच्या दरम्यान झालेला उपयोग लक्षात घेऊन अमेरिका आणि ब्रिटन यांनी देखील या कुत्र्यांचा वापर करायला सुरुवात केली.
संवेदनशील माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी भारतीय सैन्य देखील जर्मन शेफर्ड कुत्र्यांचा वापर करतात.
बेल्जियन मेलिनोईस
बेल्जियन मेलिनोईस जातीचे कुत्रे अतिशय बुद्धिमान असतात. हे कुत्रे आपल्या मालकाप्रती शंभर टक्के प्रामाणिक असतात. सडपातळ, चपळ आणि मजबूत बांधा हे या कुत्र्यांचे वैशिष्ट्य आहे. हे कुत्रे साहसी आणि हुशार असतात. याच वैशिष्ट्यांमुळे त्यांना सैन्यात समाविष्ट करण्यात आले आहे. शोधमोहिमेत या कुत्र्यांचा अधिक वापर करण्यात येतो.
दुसऱ्या महायुद्धाच्या काळापासूनच या कुत्र्यांचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येतो. सैन्य दलासाठी कुत्र्यांची ही प्रजाती फार महत्वपूर्ण आहे. संदेशवहन तसेच वैद्यकीय मदतीची देवाण घेवाण करण्यासाठी हे कुत्रे जर्मन शेफर्डप्रमाणेच मदतगार सिद्ध झाले आहेत. इतर कुत्र्यांच्या तुलनेत यांची श्रवणशक्ती उत्तम असल्याने सीमावर्ती भागात गस्त घालण्यासाठी या कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येतो.
ग्रेट स्विस माउंटन डॉग
ग्रेटर स्विस माउंटन डॉग ही कुत्र्यांची सर्वोत्तम प्रजाती आहे. ही प्रजाती शंभर टक्के विश्वसनीय आहे. हे कुत्रे कधीच आपल्या आज्ञेचे उल्लंघन करत नाहीत, याशिवाय हे प्रचंड बलशाली देखील असतात. या प्रजातीच्या कुत्र्यांनी स्वित्झर्लंडच्या शेतकऱ्यांना मोठी मदत केली असून शेतात घुसणाऱ्या इतर जनावरांना हाकलण्यासाठी यांचा वापर करण्यात येतो.
हे कुत्रे शेतीच्या सामानाची वाहतुक करण्यासाठी देखील वापरण्यात येतात. मालकाप्रती दाखवत असलेल्या प्रामाणिकपणामुळे अनेक देशांच्या सैन्यात या कुत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे.
या कुत्र्यांच्या अस्तित्वाचे अनेक ऐतिहासिक दाखले आहेत. रोमन सम्राट ज्युलियस सीझर याने हे कुत्रे वापरले होते. दुसऱ्या महायुद्धात देखील या कुत्र्यांचा प्रयोग करण्यात आला होता. लांब घडणाऱ्या घटनांचा मागोवा घेण्याच्या विशेष कौशल्यामुळे याचा वापर सैन्याच्या तंबूच्या सुरक्षेसाठी करण्यात येतो.
या कुत्र्यांचे भारताच्या सैन्यदलात मोठे व अमूल्य असे योगदान आहे, हे मात्र निश्चित!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.