आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
स्वातंत्र्यानंतर आपण ब्रिटीश पार्लमेंटच्या धरतीवर संसदीय लोकशाही व्यवस्था स्वीकारली. भारतीय संसदेत राज्यसभा आणि लोकसभा असे दोन सभागृह आहेत. राज्यसभा हे भारतीय संसदेतील वरिष्ठ सभागृह किंवा द्वितीय सभागृह आहे.
राज्यसभेत २५० सभासद असतात, यातील १२ सभासद हे राष्ट्रपती नियुक्त असतात. साहित्य, कला आणि विज्ञान या विषयात ज्ञान किंवा व्यावहारिक अनुभव असलेल्या व्यक्तींमधून राष्ट्रपती १२ सदस्यांची नियुक्ती करतात. तर २३८ सभासद हे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाच्या विधिमंडळातून निवडून दिले जातात. राज्यसभा हे स्थायी सभागृह समजले जाते. दर दोन वर्षांनी यातील एक तृतीयांश सभासद निवृत्त होतात आणि पुन्हा नव्याने तितकेच सभासद निवडले जातात.
लोकसभा हे भारतीय संसदेचे कनिष्ठ सभागृह किंवा प्रथम सभागृह समजले जाते. यामध्ये ५५० सभासद असतात. जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी हे या सभागृहाचे सदस्य असतात. भारतीय राज्यघटनेच्या चौकटीशी सुसंगत असे कायदे बनवणे आणि त्यावर बहुमत मिळवून ते कायदे संमत करणे हे लोकसभेचे प्रमुख काम असते. ५५० पैकी २० सभासद हे केंद्रशासित प्रदेशांचे लोकप्रतिनिधी असतात तर ५३० सभासद हे राज्यांमधून निवडून आलेले लोकप्रतिनिधी असतात.
लोकसभेत होणाऱ्या चर्चा आपण अनेकदा टीव्हीवर पाहतो. लोकसभा आणि राज्यसभेतील आतील रचना थोडी लक्षपूर्वक पाहिल्यास आपल्या लक्षात येईल की लोकसभेत हिरव्या रंगाचा गालीचा अंथरलेला असतो तर राज्यसभेत लाल रंगाचा गालीचा अंथरलेला असतो.
परंतु यामागे काही ठोस कारण असते की हा एक निव्वळ योगायोग असेल? नाही! हा निव्वळ योगायोग नक्कीच नाही. दोन्ही सभागृहात या वेगवेगळ्या रंगाचे गालिचे अंथरण्यामागे एक विचार आहे. त्याची विशिष्ट कारणे आहेत.
लोकसभा हे भारतातील जनतेने थेट निवडून दिलेल्या प्रतिनिधींनी बनलेले असते. म्हणजेच लोकसभा हे भारतीय जनतेचे प्रतिनिधित्व करणारे सभागृह आहे. इथल्या सदस्यांनी जनतेचे थेट प्रतिनिधी या नात्याने जनतेच्या जमिनिस्तरावरील ज्या काही समस्या असतील त्या सोडवण्यासाठी प्राधान्य दिले पाहिजे.
जनतेच्या सोयीसाठी, त्यांच्या कल्याणासाठी विविध योजना तयार करणे, कायदे तयार करणे, त्याच्या प्रश्नासंबंधी लोकसभेत चर्चा करणे ही लोकसभेच्या सदस्यांची कर्तव्ये आहेत. म्हणून या प्रतिनिधींनी सतत स्वतःला जमिनीशी जोडून ठेवले पाहिजे. या त्यांच्या कर्तव्याचे स्मरण करून देणारे एक प्रतिक म्हणून इथे हिरवा गालीचा अंथरला जातो.
हिरवा रंग हा शेतीचे देखील प्रतिक मानला जातो. गवताचा, वनस्पतींचा, रोपांचा रंग हिरवा असतो. म्हणून लोकसभेतील गालीचाही हिरव्या रंगाचा ठेवण्यात आला आहे.
राज्यसभा म्हणजेच संसदेतील वरिष्ठ सभागृह. इथे मात्र लाल रंगाचा गालीचा वापरला जातो. राज्यसभेचे सदस्य हे थेट निवडणुका लढवून आलेले नसतात. तर त्या त्या राज्यातील लोक प्रतिनिधींच्या संख्येच्या तुलनेत हे सदस्य निवडले जातात. राज्यसभेत लाल रंगाचा गालीचा टाकला जातो. यामागे दोन विचार आहेत.
एक लाल रंग हा राजेशाही थाटाचे प्रतिक आहे. दुसरे म्हणजे स्वातंत्र्य चळवळीतील शहिदांच्या बलिदानाचे प्रतिक म्हणूनही लाल रंगाकडे पहिले जाते. याच विचारातून लाल रंगाचा गालीचा येथे टाकण्यात येतो.
राज्यसभा आणि लोकसभेच्या सभा किंवा चर्चा जिथे भरावल्या जातात त्या इमारतीला संसद भवन म्हटले जाते. जुनी संसदेची इमारत १९१२-१३ साली ब्रिटीश वास्तुकार हर्बट ब्रेकर यांनी या वस्तूची रचना केली आहे. इमारतीच्या बाह्य वर्तुळाकार गच्चीला २५७ स्तंभांचा आधार आहे. हे स्तंभ ग्रेनाईटपासून बनवण्यात आले आहेत.
संसदेच्या बांधकामात वापरले गेलेले दगड हे मध्ययुगीन भारतीय वास्तुकलेचे निदर्शक आहेत. संसदेच्या वर्तुळाकार रचनेत, गोलाकार खांबातही भारतीय परंपरेची झलक आहे. संसद भवनच्या या इमारतीचे उद्घाटन १९२७ साली करण्यात आले. संसदेच्या या इमारतीच्या रचनेची प्रेरणा मध्यप्रदेशातील मुरेन या ठिकाणच्या चौसष्ट योगिनी मंदिराच्या वास्तुकालेतून घेण्यात आली आहे.
ब्रिटीश सरकारच्या काळात जेव्हा ही इमारत बांधण्याचा विचार सुरु झाला तेव्हा त्याचे नाव कौन्सिल हाऊस असे ठेवले जावे अशा सूचना करण्यात आल्या होत्या. या संसद भवनात एकूण तीन प्रमुख सभागृह आहेत.
पहिले सभागृह राज्यांच्या परिषदांसाठी बांधण्याचा विचार करण्यात आला. ज्याला नंतर राज्यसभा हे नाव देण्यात आले. दुसरे सभागृह होते विधानसभा यालाच नंतर लोकसभा म्हटले गेले. आणि तिसरे सभागृह राजकुमार सदन होते. या सदनाचे रुपांतर आज भव्य ग्रंथालयात करण्यात आले आहे.
लोकसभेत ५४५ सदस्यांसाठी आसन व्यवस्था आहे, तर राज्यसभेत २४५. दोन्ही सभागृहांचे संयुक्त सत्र असेल तेव्हा संसद भवनाच्या सेन्ट्रल हॉलमध्ये बैठक व्यवस्था केली जाते. या दोन्ही सभागृहांची रचना ही घोड्याच्या नालेसारखी अर्धगोलाकार आहे. या सभागृहाचा एरीअल व्ह्यू पाहिल्यास घोड्याच्या नालेसारखी यांची रचना स्पष्ट दिसते.
संसद भवनात एक ग्रंथालय देखील आहे. पूर्वी हे ग्रंथालय संसद भवनाच्या परिसरातच स्थित होते. परंतु आता पुस्तकांची संख्या वाढल्याने या ग्रंथालयासाठी एक वेगळी इमारत बांधण्यात आली आहे. हे ग्रंथालय देशातील दुसरे मोठे ग्रंथालय आहे. देशातील पहिले ग्रंथालय कलकत्ता येथे आहे. या ग्रंथालयात २२ लाखाहून जास्त पुस्तके आहेत.
याच परिसरात देशाच्या सांस्कृतिक वारशाची झलक दाखवणारे एक संग्रहालय देखील आहे. याशिवाय संसद भवनातील कँटीनची चर्चा नेहमी होत असते.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.








