पंडित नेहरू नाही, हे होते भारताचे पहिले पंतप्रधान

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


समजा तुम्ही केबीसीच्या सीटवर बसला आहात. समोर साक्षात अमिताभ बच्चन तुम्हाला एकेक प्रश्न विचारून बुचकळ्यात टाकत आहे. तुम्ही सर्व प्रश्नांची बरोबर उत्तरे देऊन शेवटच्या प्रश्नापर्यंत मजल गाठली आहे आणि शेवटच्या एक करोड रुपयासाठी तुमच्या स्क्रीनवर प्रश्न आला आहे. भारताचे पहिले पंतप्रधान कोण? आणि पर्याय आहेत, ए) पंडित जवाहरलाल नेहरू, बी) लाल बहाद्दूर शास्त्री, सी) इंदिरा गांधी डी) बरकतुल्ला खान. तुम्ही नक्कीच म्हणाल इतक्या सोप्या प्रश्नासाठी काय विचार करायचा आणि तुमचे उत्तर असेल ऑप्शन ए, अर्थातच पंडित जवाहरलाल नेहरू. पण केबीसीतील कम्प्युटरजी या उत्तरावर लालेलाल होतात आणि एक करोड रुपये जिंकण्याची संधी तुम्ही अतिउत्साहात गमावून बसलेले असता.

हो! आश्चर्य वाटेल पण, पंडित नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान नव्हते तर ते स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होते. भारताचे पंतप्रधान आणि स्वतंत्र भारताचे पंतप्रधान यात खूप मोठा फरक आहे आणि या फरकामागे खूप मोठा इतिहास दडलेला आहे.

मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, कोण होते भारताचे पहिले पंतप्रधान?

भारताचे पहिले पंतप्रधान होते बरकतुल्ला खान. जे गदरसारख्या विद्रोही सघटनेचे निष्ठावंत पाईक आणि ब्रिटीशांविरोधात धारधार लेखणीची तलवार चालवणारे पत्रकार होते.

भारताला स्वातंत्र्य मिळण्याआधीच काही प्रखर देशभक्त लोकांनी एकत्र येऊन भारताचे स्वतंत्र सरकार स्थापन केले होते. ही काही फक्त सांगोवांगीची गोष्ट नाही. काही ऐतिहासिक दस्तऐवजही तुम्हाला हेच सांगतील की भारताचे पहिले पंतप्रधान बरकतुल्ला खान होते. जवाहरलाल नेहरू हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होते. स्वातंत्र्य मिळण्याआधी स्थापन केलेल्या या सरकारबद्दल आपल्याला फारशी माहिती नसल्याने आणि स्वातंत्र्यानंतर नेहरूंनीच पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्याने साहजिकच नेहरू हेच भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून डोळ्यासमोर उभे राहतात.

स्वातंत्र्यापूर्वी गदर या क्रांतिकारी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हे सरकार स्थापन केले होते. या सरकारमध्ये देशाचे राष्ट्रपती आणि पंतप्रधानसुद्धा निवडण्यात आले होते. ज्यांनी आपापल्या पदाच्या गोपनीयतेची शपथ घेतली होती. इतकेच नाही तर या सरकारला रशिया, अफगाणिस्तान, जपान आणि तुर्की सारख्या ब्रिटन विरोधी देशांकडून पाठींबादेखील मिळाला होता.

मग हे बरकतुल्ला खान होते तरी कोण? आणि आज पर्यंत त्यांचे नाव कधीच कसे चर्चेत आले नाही? याचे कारण म्हणजे जेंव्हा बरकतुल्ला खान यांचे सरकार स्थापन झाले तेंव्हा देश स्वतंत्र झाला नव्हता. देशावर ब्रिटीशांचीच हुकुमत होती.

या सरकारचे महत्व इतके वाढले होते की इंग्रजांना हे सरकार पाडावे लागले. हे सरकार एक अल्पकालीन सरकार ठरले असले तरी, इतिहासात भारताचे पहिले सरकार म्हणून याच सरकारची नोंद आहे आणि बरकतुल्ला खान यांनाच देशाचे पहिले पंतप्रधान मानले जाते.

७ जुलै १८५४ रोजी भोपाळमध्ये बरकतुल्ला खान यांचा जन्म झाला. त्यांचे कुटुंब भोपाळच्या संस्थानिकांच्या मर्जीतील आणि निकटवर्ती होते. त्यांच्या जन्मसालावरून काही लोकांमध्ये मतभेत आहेत, काहींच्या मते त्यांचा जन्म १८५८ मध्ये झाला होता. रियासतकर कुटुंबाशी संबधित असल्याने त्यांचे कुटुंब एक सधन आणि मातब्बर कुटुंब होते, हे वेगळे सांगायला नकोच.

त्यांनी सुलेमानिया स्कूलमधून अरबी, फारसी आणि इंग्रजीचे शिक्षण घेतले होते. या दरम्यान मुस्लीम लीगच्या माध्यमातून जगभरातील मुस्लीमांवर प्रभाव टाकणारे जमालुद्दीन अफगाणी यांच्या विचारांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता. त्यांच्याच विचारांचे अनुसरण करत, त्यांनी जगभरातील मुस्लीमांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाल्याने घरच्या जबाबदाऱ्यांचे ओझे त्यांच्याच खांद्यावर आले. त्यांची एकच बहिण होती, तिचे लग्न लावून दिले आणि ते सर्व प्रकारच्या कौटुंबिक जबाबदारीतून मुक्त झाले.

बहिणीचे लग्न झाल्यावर त्यांना खूपच एकटे वाटू लागले. त्यांनी भोपाळ सोडले आणि तडक मुंबई गाठली. मुंबईत राहून काही दिवस त्यांनी विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकवण्याचे काम केले. यावेळी ते स्वतःही इंग्रजी शिकत होते. मुंबईत राहूनही आपले लक्ष्य साध्य करणे शक्य नसल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी इंग्लंडला जाण्याचा निर्णय घेतला.

उच्च शिक्षण घेण्याच्या उद्देशाने ते इंग्लंडला गेले आणि तिथेच त्यांच्या आयुष्याला एक नवे वळण मिळाले. इंग्लंडमध्ये त्यांची ओळख श्यामजी कृष्ण वर्मा यांच्याशी झाली. श्यामजी कृष्ण वर्मा त्यावेळी इंग्लंडमधून भारतीय स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या क्रांतीकारकांची संघटना चालवत होते. श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या भेटीनंतर त्यांच्यात देशभक्तीची आणि स्वतंत्र भारताच्या निर्मितीची प्रबळ आस निर्माण झाली.

भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी इतर क्रांतिकारक जिथे शस्त्रांची निवड करत होते, तिथे बरकतुल्ला यांनी हातात लेखणी घेतली.

देशाच्या स्वातंत्र्यासाठी क्रांतिकारी विचारांचा आणि क्रांतिकारी कारवायांचा प्रसार करण्यासाठी त्यांनी आपल्या लेखणीचा वापर केला. त्याच्या क्रांतिकारी लेखांमुळे लवकरच बरकतुल्ला खान यांना प्रसिद्धी मिळाली.

लिवरपूल युनिव्हर्सिटीच्या ओरिएन्टल कॉलेज मध्ये ते फारसीचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले पण, तरीही त्यांनी आपले लेखन कार्य सोडले नाही. त्यांच्या क्रांतिकारी लेखनामुळे इंग्लंडमध्ये त्यांना विरोध होऊ लागला. त्यांच्याविरोधात इंग्रजांनी कठोर निर्देश दिल्याने त्यांना देश सोडवा लागला.

१८९९ साली ते अमेरिकेत गेले आणि तिथल्या प्रवासी भारतीयांना एकत्र करून भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करत राहिले. ब्रिटीशांच्या विरोधात त्यांनी अनेक भाषणे आणि लेख लिहून भारतीय लोकांमध्ये स्वातंत्र्याचे स्फुल्लिंग चेतवले. याचवेळी स्वतःचा खर्च भागवण्यासाठी त्यांनी एका शाळेतून अरबी शिकवले. परंतु त्यांचे सर्व लक्ष भारतीय स्वातंत्र्यलढ्याकडे लागून राहिले होते. देशातील मुस्लीम आणि हिंदुनी एकत्र येऊन कॉंग्रेसच्या नेतृत्वाखाली देशाला स्वतंत्र करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, असा विचार ते मुस्लिमांमध्ये पेरत असत. 

१८५७ च्या क्रांतिकारी लढ्याबद्दल अधिक जागृती निर्माण करण्यासाठी ते अमेरिका सोडून जपानमध्ये आले पण ब्रिटीशांनी त्यांना इथेही उसंत दिली नाही.

जपान सोडून ते पुन्हा अमेरिकेत गेले तेंव्हा अमेरिकेतील भारतीयांनी गदर या क्रांतिकारी संघटनेची स्थापना केली होती. गदर चळवळ ही भारताबाहेरून भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणारी एक प्रमुख संघटना होती. यात सोहन सिंह बहकना आणि लाला हरदयाळसारखे क्रांतिकारीही सामील होते.

भारतातील ब्रिटीश राजवट संपवून त्याऐवजी भारतात लोकशाही आणि धर्म निरपेक्ष गणराज्य स्थापन व्हावे हेच बरकतुल्ला यांचे स्वप्न होते. गदर पार्टीने साप्ताहिक गदरचे प्रकाशन सुरु केले ज्यात बरकतुल्ला यांचे क्रांतिकारी लेख छापून येत असत. हळूहळू गदर संघटनेचा अमेरिकेबाहेरही प्रसार होऊ लागला.

पुढे बरकतुल्ला यांची भेट राजा महेंद्र प्रताप यांच्याशी झाली. दोघांनीही बर्लिन युद्धात सहभागी झालेल्या हिंदुस्तानी सैनिकांना इंग्रजी सैन्याशी बंडखोरी करण्याचे आवाहन केले. यावेळी जर्मनी आणि ब्रिटन यांच्यात युद्ध सुरु असल्याने जर्मनीने बरकतुल्ला आणि राजा महेंद्र प्रताप यांना विशेष सरंक्षण दिले.

हे आंदोलन भारतापर्यंत पोहोचवण्यासाठी दोघांनी तुर्की, बगदाद आणि अफगाणीस्तान मार्गे प्रवास केला. या प्रवासादरम्यान जर्मनीने त्यांच्या सुरक्षेसाठी त्यांच्यासोबत काही सैनिक पाठवले होते. परंतु ते दोघे जेंव्हा काबुल मध्ये पोहोचले तेंव्हा ब्रिटीश सैनिकांनी त्यांना नजरबंद केले. परंतु जर्मन सरकार आणि अफगाणीस्तान सरकारने या विरोधात आवाज उठवल्यानंतर त्यांची या कैदेतून सुटका झाली.

१९१५ साली त्यांनी अफगाणिस्तानमधे स्वतंत्र हिंदुस्तानी सरकार स्थापन केले. पहिल्या विश्व युद्धाच्या या काळात ब्रिटीशांचे विरोधक असल्येल्या जर्मनीने या सरकारला मान्यता दिली.

या सरकारमध्ये पंतप्रधान होते बरकतुल्ला खान आणि राष्ट्रपती होते राजा महेंद्र.

या सरकारसोबत अफगाणिस्तानने एक करार केला होता. ज्यानुसार या सरकारला आपला देश स्वतंत्र करण्यासाठी जी काही मदत लागेल त्यासाठी अफगाणिस्तान कायम त्यांच्यासोबत असेल या बदल्यात हे सरकार बलुचिस्तान आणि पख्तुनी भाषिक क्षेत्र अफगाणिस्तानला देईल.

१९१७ साली ऑक्टोबर क्रांतीच्या माध्यमातून रशियात झारशाही संपुष्टात आली. १९१९ साली बरकतुल्ला सरकार रशियन सरकारशी भारतीय स्वातंत्र्या संबंधात चर्चा करण्यासाठी माॅस्कोला पोहोचले. लेनिननेदेखील या सरकारला आपला पाठींबा दर्शवला. भारतीय स्वातंत्र्यासाठी त्यांना रशियाकडून थेट सहकार्य मिळेल असे आश्वासन दिले.

भारताच्या स्वतंत्रता आंदोलनाला मिळणाऱ्या या जागतिक स्तरावातील पाठींब्यामुळे स्वातंत्र्य लढ्याला एक वेग येऊ लागला होता. हे आंदोलन भारतात पोहोचावे अशी त्यांची इच्छा होती आणि यासाठी त्यांचे जोरदार प्रयत्नही सुरु होते. पण, आता त्यांचे वय झाले होते. त्यामुळे त्यांची तब्येत आता पूर्वीप्रमाणे साथ देत नव्हती. 

भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाच्या निमित्ताने कॅलिफोर्नियातील सभेला संबोधित करण्यासाठी ते अमेरिकेला गेले. पण, या सभेत ते जेंव्हा बोलण्यासाठी उभे राहिले, तेंव्हा त्यांना खूप त्रास होऊ लागला. त्यांना बोलणे जड जाऊ लागले. त्यांच्या खालावलेल्या प्रकृतीमुळे ही सभा तत्काळ रद्द करण्यात आली. पण, यानंतर काही दिवसातच, म्हणजे २७ सप्टेंबर १९२७ रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.

आपल्या अखेरच्या दिवसात ते आपल्या साथीदारांना नेहमी म्हणत, 

“मी आजीवन हिंदुस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढलो आणि त्याचसाठी सक्रीय राहिलो. माझे संपूर्ण जीवन माझ्या देशाच्या भल्यासाठीच मी खर्ची घातले, याचा मला खूप आनंद आहे. 

माझ्या प्रयत्नांना माझ्या हयातीतच यश आले नाही, याबद्दल मला प्रचंड खेद वाटतो. परंतु आता देशातील परिस्थिती बदलत आहे. हजारोंच्या संख्येने युवक स्वातंत्र्य लढ्यात उतरत आहेत. हे युवक प्रामाणिक आणि धाडसी आहेत. माझ्या देशाचे भविष्य अशा तरुणांच्या हाती सोपवून मी जात आहे, याचाही मला आनंद आहे.” 

त्यांची इच्छा होती की, त्यांच्या कबरीतील मुठभर माती, भारतात न्यावी आणि तिथे तीचे दफन करावे. बरकतुल्ला अमेरिकेत असतानाच त्यांचे निधन झाले. त्यामुळे अमेरिकेतील मार्वस्बिली ग्रेव्ह यार्ड मध्येच त्यांना दफन करण्यात आले.

परंतु त्यांची शेवटची इच्छा काही पूर्ण झाली नाही. त्यांच्या कबरीची माती आणणे तर खूपच दूरची गोष्ट आहे, पण भारतीयांना या महान नेत्याचे कधी स्मरणही होत नाही. ज्यांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी आमरण प्रयत्न केले त्या बरकतुल्ला खान यांच्याबद्दल कृतज्ञता बाळगण्याऐवजी त्यांना विस्मृतीत ढकलून भारतीयांनी त्यांच्याशी कृतघ्नपणाच केला आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!