आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
पुनर्वित्तं पुनर्मित्रं पुनर्भार्यां पुनर्मही । एतत्सर्व पुनर्लभ्यं न शरीरं पुन: पुन: ।।
या संस्कृत सुभाषितप्रमाणे सर्वकाही पुन्हा मिळेल पण शरीर नाही, हेच शारीरिक स्वास्थ्य जपण्यासाठी कैक प्रकारचे व्यायाम आणि योगसाधना केली जाते. व्यायाम आणि योगसाधनेच्या व्यतिरिक्तही माणसामधील एका नैसर्गिक गुणाने त्याचं शरीर स्वस्थ राहत असतं, तो गुण म्हणजे खिलाडुवृत्ती, ज्याची जोपासना माणूस लहानपणीपासूनच करत असतो, आयुष्यात पुढे जाताना अनेक जबाबदाऱ्या आणि काही वेळा अहंकारामुळे या गुणाची कमतरता भासू लागते.
प्राचीन जगात मात्र ऑलिम्पिकसारख्या मोठ्या क्रीडास्पर्धांच्या माध्यमातून माणसाची खिलाडुवृत्ती आपसूकच जपली जात होती. विशेषतः रोमन साम्राज्यात अशा क्रीडास्पर्धा राजकीय व्यक्तींच्या मनोरंजनासाठी मोठ्या प्रमाणात खेळल्या जात. या क्रीडास्पर्धांमध्ये अनेक मल्ल खेळवले जात आणि त्यांच्यामध्ये विविध प्रकारचे संघर्षमय क्रीडाप्रकार घडवून आणले जात.
या क्रीडास्पर्धांमध्ये अनेक नामवंत खेळाडू सहभागी होऊन प्रेक्षक आणि प्रजेचे मनोरंजन करत. या खेळाडूंपैकीच एक म्हणजे स्पार्टाकस, सुमारे ख्रिस्तपूर्व १०९ या वर्षी जन्माला आलेला उल्लेखनीय यो*द्धा.
एकोणिसाव्या शतकापासून स्पार्टाकसच्या संघर्षाने आधुनिक लेखकांसाठी नवीन अर्थ प्राप्त करून दिलाआहे, गुलामांना संघटित करून त्यांना स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठीचा त्याने दिलेला लढा हा एक आदर्शच आहे. स्पार्टाकसचे बंड अनेक लेखकांना प्रेरणादायी ठरले आहे, यामुळे स्पार्टाकस प्राचीन आणि आधुनिक दोन्ही संस्कृतींमध्ये नायक बनलाय.
या असामान्य, प्राचीन यो*द्धा तसेच क्रीडापटूबद्दल अनेक इतिहासकारांची वेगवेगळी मतं आहेत. स्पार्टाकस हा रोमन सैन्याचा बंदिवान होता, त्याला कॅपुआजवळील असिक्रीडक प्रशिक्षण केंद्रात वेगवेगळ्या क्रीडाप्रकारांचं प्रशिक्षण मिळालं. हे गुलाम असिक्रीडकच्या रॉयल लोकांच्या स्पर्धात्मक मनोरंजनासाठी ठेवले जात असत. ते आयताकृती ढाल आणि सुमारे १८ इंच लांबीची सरळ पात्याची तलवार बाळगत असत.
गुलाम असणाऱ्या या माणसांना तर मानवी वागणूकही मिळणं कठीण, अशा परिस्थितीत या सगळ्यांनी बंधनांना झुगारून स्वतंत्र व्हायचं ठरवलं! या सगळ्या गुलामांनी ख्रिस्तपूर्व ७३च्या सुमारास पलायन केले. ख्रिस्तपूर्व ७३ च्या सुमारास पलायन करणाऱ्या गुलामांमध्ये स्पार्टाकसही होता.
संधी पाहून काही गुलामांनी पाकगृहातील भांडी मिळवली, त्यामुळे पलायन करणारे गुलाम संख्येने कमी असले तरी ते प्रशिक्षण केंद्रातून सुटले आणि त्यांनी शस्त्रास्त्रं वाहून नेणाऱ्या घोडागाड्यांवर ताबा मिळवला. या मुक्त झालेल्या गुलामांनी कॅपुआ आणि आसपासच्या प्रदेशावर ताबा मिळवला, आणि आणखी गुलामांना संघटित केले, शिवाय त्यांच्यावर धाडल्या गेलेल्या सैन्याला गारद करण्यातही हे गुलाम यशस्वी ठरले. अशा प्रकारे आपल्यासारख्याच गुलामांना सैन्यात सामील करवून घेत या गुलामांच्या सैन्याने वेसुवियस डोंगरावर आसरा घेतला.
रोमन सैन्य स्पेन आणि तिसऱ्या मिथ्रिडॅटिक यु*द्धात गुंतले होते, त्यामुळे त्यांना येथील परिस्थितीवर नियंत्रण मिळवता आले नाही. शिवाय, हे बंड यु*द्ध नसून केवळ अंतर्गत कलह आहे असा रोमचा गैरसमज झाला. उपासमार झाल्यामुळे गुलाम शरणागती पत्करतील या आशेने डोंगरावरील गुलामांना वेढा घालण्यासाठी प्रेटर गायस क्लॉडियस ग्लॅबेरसच्या नेतृत्वाखाली रोमने एक नागरी सैन्य पाठवले. पण झालं उलटंच!
स्पार्टाकसने वेलींच्या साहाय्याने दोरखंड तयार केले होते, आणि त्यांच्या मदतीने तो ज्वालामुखीय पर्वताच्या दगडी भागावरून आपल्या सहकाऱ्यांसह उतरला आणि पायथ्याशी बेसावध असलेल्या रोमन सैन्यावर जोरदार ह*ल्ला केला, ज्या मध्ये अनेक रोमन मृत्युमुखी पडले.
मुक्त झालेल्या या लोकांनी स्पार्टाकस आणि अन्य दोन गॅलिक गुलाम असलेल्या – क्रिक्सस आणि ओएनोमौस यांची नेतृत्व करण्यासाठी निवड केली. या संघर्षात स्पार्टाकस सर्वोत्कृष्ट रणनितीकार ठरला. बंडखोर गुलामांना विशेष सैनिकी प्रशिक्षण नसले तरी त्यांनी कौशल्यपूर्ण रितीने त्यांच्याकडे असलेल्या शस्त्रादी उपकरणांचा वापर केला. तसेच अनियमित आणि आजवर कोणीही न वापरलेल्या रणनीतीचा वापर करत शिस्तबद्ध आणि अनुभवी रोमन सैन्याचा पाडाव केला होता. यानंतर या गुलाम सैन्याने आपली सैन्यशक्ती वाढवण्यात आणि नव्या सैन्याला उत्तम रीतीने प्रशिक्षित करण्याचे काम सुरू केले. याच काळात त्यांनी नोला, नौसेरिया, थुरली आणि मेटा पोंटम या शहरांवर आपलं प्रभुत्व प्रस्थापित केलं.
ख्रिस्तपूर्व ७२ मध्ये बंडखोर यो*द्ध्यांनी आपले तळ सोडले आणि ते उत्तरेकडे येऊ लागले. आपल्याच सर्वोत्तम सैन्याचा पराभव झाल्याने सावध असलेल्या रोमन सिनेटने सैन्याच्या तुकड्यांना या बंडखोर सैन्यावर धाडले, रोमन सिनेटने पाठवलेल्या सैन्याचे नेतृत्व लुसियस गेलीयस आणि नेऊस कॉर्नैलियस लेंटलस क्लोडीयानस या दोघांकडे होते, सुरुवातीला हे सैन्य यशस्वी ठरलं, या सैन्याने क्रिक्ससच्या नेतृत्वाखालील गुलामांच्या तीस हजाराच्या सैन्याला पराभूत केलं. शेवटी स्पार्टाकसकडून या सैन्याचाही दारुण पराभव झाला.
रोमन सैन्याने आता रोममधील सर्वांत प्रतिष्ठित माणसाला तब्बल ८ रोमन सैन्याच्या तुकड्या घेऊन गुलामांच्या सैन्यावर चाल करून जायला सांगितलं, हा सर्वांत प्रतिष्ठित माणूस म्हणजे लिसीनियस क्रॅसस. या सर्व ८ तुकड्यांमध्ये तब्बल ४० हजारांवर प्रशिक्षित रोमन सैनिक होते. तो या सर्वांनाच अतिशय शिस्तीने वागवायचा. क्रॅससने आपल्या सैन्यात “डिसीमेशन”च्या शिक्षेची प्रथा सुरू केली, जेणेकरून त्याच्या सैन्याला शत्रूपेक्षा त्याची भीती जास्त वाटली पाहिजे.
स्पार्टाकस आणि त्याचे अनुयायी काही कारणास्तव दक्षिण इटलीमध्ये परतले आणि ख्रिस्तपूर्व ७१च्या सुरुवातीला पुन्हा दक्षिणेकडे गेले तेव्हा क्रॅससने आपल्या ६ तुकड्या त्या प्रदेशाच्या सीमेवर तैनात केल्या, आणि आपल्या अन्य साथीदारांना उर्वरित दोन तुकड्या देऊन स्पार्टाकसला मागून घेराव घालण्यासाठी पाठवले. बंडखोरांवर ह*ल्ला न करण्याचा आदेश असूनही त्यांनी ह*ल्ला केला, पण स्पार्टाकस समोर त्यांचं काय चालणार, शेवटी त्यांना त्या मोक्याच्या ठिकाणावरून पळ काढावा लागला.
पण या पराभवानंतरही क्रॅससच्या सैन्याला अनेक छोट्या-मोठ्या घातपातांमध्ये विजय मिळत राहिला, ज्यामुळे स्पार्टाकसला लुसनियामधून आणखी दक्षिणेकडे सरकावे लागले. ख्रिस्तपूर्व ७१च्या शेवटी स्पार्टाकस स्ट्रेट ऑफ मेसीनाजवळील ऱ्हेजियम, म्हणजेच रेजियो कॅलाब्रिया या ठिकाणी मुक्कामी होता.
या यु*द्धातमात्र स्पार्टाकसचा पराभव झाला असं म्हणता येईल. हे यु*द्ध सध्याच्या सेले नदीच्या उजव्या किनाऱ्यावर वसलेल्या सेनेरचिया या ठिकाणी झालं. या भागाची सीमा ओलिव्हेटो सीट्रा पासून कॅलाब्रिटोपर्यंत जाते, हा सगळा भाग त्यावेळी लुसनियचा होता. आजच्या युगात, इसवी सन १८९९ पासून याच भागात रोमन काळातील शस्त्रे सापडतात.
याच यु*द्धात स्पार्टाकसचा मृत्यू झाला हे प्लुटार्च, अँपियन आणि फ्लोरस सगळेच इतिहासकार एकमताने सांगतात. यु*द्धात वाचलेल्या सुमारे ६ हजार गुलामांना क्रॅससच्या रोमन सैन्याने ठार मारून टाकले.
पुढे अनेक विचारसरणींमध्ये स्पार्टाकस एक आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणून उदयाला आला. जगातील अनेक स्पोर्ट्स क्लब्सना स्पार्टाकसचं नाव देण्यात आलंय, स्पार्टाकस वर कैक चित्रपट, मालिका आणि व्हिडीओ गेम्ससुद्धा तयार करण्यात आल्या आहेत. दक्षिण शेटलंड बेटसमूहातील लिविंगस्टन बेटावरील एका शिखराला स्पार्टाकस शिखर म्हटले जाते.
कोणत्याही बंधनातून स्वातंत्र्याची इच्छा बाळगणाऱ्याला आणि त्या इच्छापूर्तीच्या दृष्टीने विजयी वाटचाल करणाऱ्या माणसाला जग अशा प्रकारेच ओळखतं आणि इतिहासही त्याची दखल घेतो!!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.