एफबीआयचा जगभर असलेला दबदबा या माणसामुळे निर्माण झालाय

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


अमेरिकेच्या एफबीआय अर्थात फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिंगेशनबद्दल आपण ऐकलं असेलच. ज्यावेळी पोलिस एखाद्या प्रकरणाचा तपास करण्यात असमर्थ असतात अशावेळी एफबीआय त्या प्रकरणाचा तपास करते. सीआयए ही अमेरिकन गुप्तचर यंत्रणा देशाबाहेरच्या कारवायांवर नजर ठेवून असते तर तेच काम देशांतर्गत ‘एफबीआय’ पार पाडत असते. या जगातील सर्वात मोठ्या गुन्हेगारी प्रतिबंधक आणि संशोधक संस्थेची पायाभरणी ‘जे. एडवर्ड हुवर’ या व्यक्तीने केली होती. पोलीस यंत्रणेला अधिक सक्षम कसे बनवता येईल या दृष्टिकोनातूनच त्यांनी या संस्थेची स्थापना केली होती.

हे एडवर्ड हुवर कोण होते आणि त्यांनी एफबीआयला आकार कसा दिला, याच्या इतिहासावर नजर टाकूया..

१ जानेवारी १८९५ मध्ये जन्माला आलेल्या जॉन एडवर्ड हुवर यांचे आई वडील दोन्ही अमेरिकन सरकारमध्ये काम करत होते, त्यामुळे बालपणापासूनच त्यांना सरकारी यंत्रणा कशा कार्य करतात, याची पुरेपूर जाणीव होती. बालपणापासून त्यांना राजकारणाच्या गोष्टीत प्रचंड रस होता. राजकारणात घडणाऱ्या प्रत्येक लहान सहान गोष्टीवर ते नजर ठेवत व आपल्या तर्काने अनेकांना आश्चर्यचकित करून सोडायचे. त्यांची वाणी अगदी स्पष्ट होती. ते इतके फटाफट बोलायचे की त्यांना शब्दात पकडणे अनेकांना अवघड होऊन बसायचे.

लहानपणीच ते एक कुशल वाद विवादपटू म्हणून उदयास आले. अनेक वादविवाद स्पर्धा त्यांनी आपल्या कौशल्याचा बळावर जिंकल्या होत्या. त्यांना त्यावेळी राजकारणात प्रवेश करण्याची इच्छा देखील निर्माण झाली होती. याचाच एक भाग म्हणून ते लायब्ररी ऑफ काँग्रेसमध्ये काम करू लागले. पुढे त्यांनी कायद्याचे शिक्षण घेतले जेणेकरुन त्यांना राजकारणात प्रवेश करणे सहज होईल.

कायद्याचे शिक्षण घेताना मात्र एक बदल घडला आणि हुवर यांनी राजकारणाकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली. तो काळ पहिल्या महायुद्धाचा होता. हुवर त्यावेळी अमेरिकेच्या डिपार्टमेंट ऑफ जस्टीसमध्ये कार्यरत होते.

युद्धकाळात त्यांचे काम फक्त ऑफीसमध्ये बसून राहण्याचे होते पण तरीदेखील त्यांनी शांत न बसता माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. त्यांचा मनात जेव्हा जेव्हा संशयाची पाल चुकचुकायची तेव्हा ते त्या घटनेचा मागोवा घेत त्याविषयी पुरावे एकत्रित करण्याचा कामात स्व:तला गुंतवून घेत होते.

त्यांना एखाद्या विषयाचा तपास व संशोधन करण्यात मोठे स्वारस्य होते. ते ज्या कामाला हात लावायचे ते पूर्ण करायचे, त्यांची ही प्रवृत्ती त्यांचा सिनियर्सला फार आवडायची. त्यांच्या याच संशोधन आणि तपासाच्या कौशल्यामुळे त्यांची डिपार्टमेंट ऑफ जस्टीसवरून विश्वयुद्धानंतर ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिंगेशनच्या ‘जनरल इंटेलिजन्स डिव्हिजन’वर नेमणूक करण्यात आली. पदभार स्वीकारताच त्यांनी अनेक प्रकरणांना हात घालत अनेक मोठंमोठे रॅकेट उघडे केले. त्यांनी टाकलेल्या अनेक छाप्यांमुळे हळूहळू ते अमेरिकेत लोकप्रिय होत गेले.

अमेरिकेत त्या काळी अपराध वाढत जात होते आणि त्यांच्यावर प्रतिबंध आणण्यासाठी कार्य करणारी यंत्रणा असक्षम होती. हुवर यांनी पुढे हे काम हाती घेतले आणि त्यांनी अमेरिकेच्या पूर्ण सिस्टममध्येच बदल घडवून आणायला सुरुवात केली. त्यांनी आपल्या डिपार्टमेंटची साफसफाई सुरू केली.

तेव्हा अमेरिकेत सरकारी यंत्रणेत काम करणारे सरकारची हुजरेगिरी करायचे. हुवर यांची नजर अशा लोकांवर गेली आणि त्यांनी राजकीय पक्षाशी संबंधित लोकांची सरळ हाकलपट्टी केली. यानंतर त्यांनी आशा लोकांची त्या पदावर नेमणूक केली ज्यांची निवड स्पेशल टेस्टच्या माध्यमातून करण्यात आली होती.

हुवर यांनी सिस्टममध्ये अमुलाग्र बदल घडवला. त्यांनी संस्थेचे नामकरण करून तिचे रूपांतर करण्याची योजना तयार केली आणि यातूनच एफबीआय अस्तिवात आली.

एफबीआय हे नाव संस्थेला बरेच नंतर मिळाले पण तिचे काम आधीच सुरू झाले होते. हुवर यांनी पुरावे तपासण्यासाठी आवश्यक असलेल्या फॉरेन्सिक डिपार्टमेंटची सुरुवात देखील केली. यामुळे अनेक गुन्हेगारांना जेरबंद करण्यात आले.

हुवर यांनी संस्थेत केलेले बदल इतके ठळक होते की ही संस्था अमेरिकन सरकारने तयार केली नसून हुवर यांनी तयार केली आहे व तेच या संस्थेचे मालक आहेत अशी चर्चा सर्वत्र सुरू झाली होती.

हुवर यांनी १९३५ साली या संस्थेचे ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिंगेशनवरून ‘फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिंगेशन’ अर्थात एफबीआय असे नामकरण केले.

हुवर यांनी एफबीआयमध्ये गुन्हेगारांचे रेकॉर्ड जमवण्यास सुरुवात केली, यामुळे गुन्हेगारांची कुंडलीच अमेरिकन सरकारच्या हाती आली. यामुळे गुन्हेगारांची झोप उडाली. अमेरिकेत वाढती गुन्हेगारी रातोरात कमी होऊ लागली. अनेकांनी हुवर यांची एफबीआयमधून उचल बांगडी करण्याचे प्रयत्न केले पण ते सर्वच प्रयत्न अयशस्वी ठरले. हुवर यांच्याकडे इतकी गुप्त माहिती होती की ते अनेकांना सहजपणे रस्त्यावर आणू शकले असते पण त्यांनी आपल्या कामाच्या निष्ठेशी कधीच तडजोड केली नाही. इतके की त्यांनी कधीच विवाह देखील केला नाही. त्यांच्या कामाप्रतीच्या समर्पणाने राष्ट्रपती रुझवेल्ट यांना देखील चकित करून सोडले होते.

१९३६ मध्ये हुवर यांना राष्ट्रपती रुझवेल्ट यांनी त्यांना प्रत्येक गुन्हेगारी वार्ता पोहचवण्याची मागणी केली होती. हुवर यांच्याजवळ त्यावेळी अमेरिकेतील खबरींचा सर्वात गोपनीय साठा होता. त्याच माहितीच्या आधारावर ते अमेरिकन राष्ट्रपतींना गुन्हेगारी वृत्तांत सादर करायचे. त्यांच्याकडे कुठल्याही अटी-शर्तीविना माहिती गोळा करण्याचा अधिकार होता. याचाच फायदा घेत त्यांनी अमेरिकेतल्या अनेक उद्योगपत्यांची यादी बाहेर काढली जे देशाला पोखरत होते. त्यांच्या या कार्यामुळे प्रभावित होऊन राष्ट्रपतींनी त्यांची रिटायरमेंट रद्द केली होती.

त्यांनी आयुष्यभर एफबीआयच्या विकासासाठी काम केले. आज ते गेल्यानंतर देखील एफबीआय तितक्याच कार्यक्षमतेने कार्यरत आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!